सकाळचा प्रहर जसजसा पुढे सरकतो तसतशी संवादाची साखळीही एक एक करुन पुढे सरकते. ज्योत से ज्योत जलाते चलो सारखं कडी से कडी मिलाते चलो, संभाषण धारा बढाते चलो असंच काहीसं. शब्द, संवाद हा मानवी जीवनातला अहम हिस्सा आहे. न बोलणं ही माझ्यासाठी शिक्षा आहे, सांगणारी कितीतरी माणसं तुम्हाला भेटतील. बोलणं ही काहींसाठी भावनिक गरजही असू शकते तर काहींचं जगणं हे त्यांच्या बोलण्यावर अवलंबून असतं. संवाद हा नेहमी चतुर असावा. तो करताना समोरच्याला न दुखावता त्याची चूक त्याला दाखवता येण्याचं कौशल्य त्या संवादात असावं.
पण तुलनेत अशी चतुर माणसं कमीच असतात. सगळ्यांनाच सहजसंवाद जमेल असं नाही. हे एक झालं पण बोलत्या माणसांच्या अनेकानेक तर्हा असतात. ही माणसं कधी भावतात, कधी मनस्ताप देतात. कधी बोलण्यातून लुब्ध करतात तर कधी निर्विकार राहण्यास भाग पाडतात.
आता हेच पहा ना, कुठेही, कधीही भेटल्यानंतर यांच्या संवादाची गाडी जी सुसाट निघते की तिला थांबा नसतो. एका विषयातून दुसरा विषय, मग तिसरा. गाडी चालूच. त्यांना थांबवण्याचा किंवा प्रतिक्रिया देण्याचा कुणाचा प्रयत्न त्यांच्या लक्षातही येत नाही. काही वेळा या सदरात मोडणार्या काहीच बोलणं सुद्धा ऐकणार्यासाठी सुवर्णसंधी असते. कान तृप्त होतात आणि माहितीचा खजिना खुला होतो. प्रबोधन होतं. वेळेचं भान मात्र यांच्याकडे जरा बेताचच असतं पण अशी काही माणसं मनाच्या जवळ असतात. काहींचं संभाषण म्हणजे निव्वळ विरोध या संज्ञेला धरुन असतं. आपण एखादं विधान केलं रे केलं, की ते आपल्या विधानाला छेद देणारं विधान करतात आणि मग संवाद विवादाकडे वळतो. काढता पाय हा त्याच्यावरचा रामबाण उपाय असतो.
जगातील आपण एकमेव सर्वज्ञ आहोत, अशी धारणा घेऊन जन्माला आलेले काहीजण आपल्या संवादातून डोस पाजल्यासारखे ज्ञानाचे अमृत पाजतात. वर हे मला माहीत आहे सांगायची सोय नसते. सांगायचा प्रयत्न आपलं असलेलं शहाणपण रसातळाला घेऊन जातं. यात स्त्री-पुरुष भेद नाही. दोन्हीकडे पक्की समानता!
आज काय भाजी केलीस? या सखीच्या प्रश्नावर दुधी म्हटलं, की मला पुढे दुधीच्या भाजीच्या चवदार, चविष्ट रेसीपी ऐकाव्या लागतात आणि वर मी केलेली भाजी तद्दन बेचव कशी असणार, असा ती भाजी न चाखताच दिलेला शेरा मुकाट गिळावा लागतो. उलटून प्रश्न विचारायचा स्वभाव नसला की बर्याच गोष्टी निमुट गिळाव्या लागतात ना? समोरच्या व्यक्तिच्या अज्ञानीपणाचे दाखले देणे हे काहींचं व्यसन असतं. तावातावाने वरच्या पट्टीत बोललं की आपण फार ज्ञानी आहोत असा समजही काहीजणांचा असतो. वाहिन्यांच्या चर्चांमधून ही जमात आपल्याला पाहता येते.. त्यांचं ते अवास्तव किंचाळणं कान बंद करायला भाग पाडतं. आपलंच चर्हाट वळणारी ही जमात चिड आणणारी झालीय. संवाद आणि गोंगाट यातला फरकही समजत नसल्यासारखे किंचाळतात ना?
सणासुदीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन आपण करावा पण समोरुन शुभेच्छा आधी येतील. मग पुढची चार मिनिटे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहीत असलेली खुशाली तुम्हालाच सांगितली जाईल. उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे संधी असणारच नाही कारण सराईतपणे फोनवरुन बोलण्याचा ताबा ते आपल्याकडे ठेवतात. तुम्ही हतबल किंवा केविलवाणे होता आणि मग होय किंवा दिवाळीच्या शुभेच्छा म्हणेपर्यंत समोरचा म्हणतो अधुनमधुन बोललं की बरं वाटतं. कळतात बर्याच बातम्या. आश्चर्य वाटून घेण्याची पाळी आपली असते. संवाद ऐकणं आणि तो समजून घेणं, यातही कधी गफलत होते.
संवादातले सारेच शब्द आपण मेंदूपर्यंत पोहचू न देता आपल्याला सोयीस्कर अर्थ त्यातून काढला जातो. समोरच्याला अभिप्रेत असतं वेगळं, आपलं मन विचार करतं वेगळा. कधी उत्कट, कधी निलाजरा, कधी हवाहवासा! दैनंदिन जीवनातील सारीच माणसं संवादातून कधी तापदायक होतात आणि ताजेतवानेही करतात. बोलण्यातल्या या उभ्याआडव्या किंवा तिरप्या रेषा जीवनाचं एक अनाकलनीय रेखाचित्रच तयार करीत असतात ना?
नीता जयवंत
अंबरनाथ, 9637749790