एका शिष्यानं ओशोंना विचारलं – ‘श्रद्धा म्हणजे काय?’
त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. त्यावेळी ओशो एक दिवस प्रवचन, एक दिवस प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम करायचे. आलेल्या प्रश्नांतील निवडक प्रश्नांना ओशो उत्तरं देत. त्यामुळे इतर अनेकांच्या मनातील अनेक प्रश्न आपोआप मिटत.
ओशो म्हणाले –
श्रद्धा म्हणजे आतला डोळा. जसं जग पाहण्यासाठी आपल्याला दोन डोळे असतात तसा एक हृदयात तिसरा डोळा असतो, तो असतो श्रद्धा. त्या डोळ्यामुळं देवाचं दर्शन घडतं. श्रद्धेचा डोळा म्हणजे प्रेमाचा डोळा. काही गोष्टी फक्त प्रेमच समजू शकतं. दुसरं कोणीच नाही.
जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर इतरांना दिसत नाहीत अशा काही गोष्टी तुम्हास दिसतात. तुम्हाला माधुर्य दिसेल पण ते खूपच नाजूक असतं आणि ते प्रेमाच्या स्पर्शानंच प्रकट होतं. तुम्हाला त्या व्यक्तीत गीताची सुरावट ऐकू येईल. ती ऐकू येण्यासाठी जेवढं जवळं जावं लागतं तेवढं इतर कोणीच जाऊ शकत नाही म्हणून त्यांना ती ऐकू येत नाही.
म्हणूनच ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यात सौंदर्य प्रकटायला लागतं. लोकांना कळतं की आपण सुंदराच्या प्रेमात पडतो पण हे चूक आहे. तुम्ही ज्याच्या प्रेमात पडता त्याच्यात सौंदर्य दिसू लागतं. आयुष्यातलं सगळं मोठेपण तिथं प्रकट होतं आणि ते कल्पनेत नसतं. प्रेमाचे डोळे उघडले की आपल्याला अदृश्य दृश्य व्हायला लागतं. जे लपलंय त्याची उपस्थिती जाणवू लागते. दार न उघडताच कोणीतरी आपल्या आत प्रवेशतं.
कोणत्या अज्ञात दारानं देव आत प्रवेशतो याचं श्रद्धावानाला आश्चर्य वाटतं.
दार बंद करून, कडीकोयंडे लावून प्रेयसी झोपते. तिच्या स्वप्नात प्रियकर येतो आणि अचानक ती जागी होते. ‘अरेच्चा! दार तर कडी लावून बंदच आहे. मग हा चोरटा आला कुठून आणि गेला कोणत्या वाटेनं?’ कोणत्या झरोक्यातून तो डोकावला? त्या झरोक्याचंच नाव श्रद्धा आहे.
जो माणूस तर्कानं, गणितानं जगतो तो पदार्थापेक्षा जास्त खोल, गूढ असं जाणू शकणार नाही. त्याचं आयुष्य व्यर्थच म्हणावं लागेल. संपत्ती खूप गोळा केली तरी ती पडूनच राहील पण ध्यान मात्र मरणाच्या वेळीही बरोबर जातं.
तर्कानं जपणार्याला परमधन मिळत नाही. ज्याचे आतले डोळे उघडे आहेत त्यालाच धन मिळतं.
जिज्ञासू किंवा जाणून घेऊ इच्छिणार्यांचे चार प्रकार आहेत. जो हिशोब, तर्क, गणित याचा आधार घेतो तो विद्यार्थी, प्रयोग करायला तयार असतो तो साधक, प्रेमानं जीवन घालवतो तो शिष्य आणि श्रद्धेवर जगतो तो भक्त!
श्रद्धा म्हणजे प्रेमाची पराकाष्ठा. श्रद्धेचा अर्थ आहे जे आजवर झालं नाही तेही होईल यावर विश्वास. जे झालंय, घडून गेलंय त्यावरच विश्वास असतो.
पण जगात इतकं सौंदर्य, इतका प्रकाश, इतकं संगीत आहे. पक्ष्यांच्या कंठात संगीत आहे. पानापानात सौंदर्य आहे. तार्यातार्यातून प्रकाश ओसंडतो आहे. जर जग एवढं सुंदर आहे तर त्यामागं कोणीतरी चित्रकार, निर्माता असेलच. श्रद्धेचा अर्थ आहे की जर एवढं सौंदर्य वर्षत आहे तर त्याचा मूळ स्त्रोत कुठंतरी असेलच.
हा काही तर्क नाही किंवा कार्यकारण भावही नाही. ही फक्त प्रचिती आहे. जसं आपण बागेजवळ जाऊ लागलो की हवा थंडगार, शीतल वाटू लागते. अजून बाग दिसत नाही पण आपण जवळ आलोय हे नक्की. कळत-नकळत आपण योग्य मार्गावर असतो. अंतर कमी होत असतं. हळूहळू वार्याबरोबर फुलांचा सुगंधही येतो. हा रातराणीचा, हा जाईजुईचा, हा गुलाबाचा. अजूनही बाग दिसत नाही पण आपण निश्चिंत होतो की जवळ बाग असणार. नाहीतर सुगंध कसा येईल? अजून जवळ आल्यावर पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येतो. हा तर कोकीळेचा आवाज म्हणजे जवळ आमराई दाट झाडं असणार!
श्रद्धा म्हणजे जे छोटे छोटे संकेत, इशारे मिळतात त्यावरून स्त्रोताची कल्पना स्वीकारणं. गुरुजवळ बसून मनविभोर होतं. थोडासा वर्षाव होतो, हृदयकमळ उमलू लागतं. आता आपण समजतो की जवळ बसल्यानंच हे होतंय. आता अजूनही काही घडेल हा विश्वास वाढतो.
सर्वत्र संकेत
संकेत आणि इशारे सगळीकडे आहेत. ते समजण्याचं नावच श्रद्धा आहे.
तर्क आंधळा आहे कारण तो फक्त (स्थूल) दिसणार्या ढोबळ गोष्टी मागतो. गुलाबाचं फूल उमललं असेल आणि तुम्ही जर तर्कज्ञाला म्हणालात की हे फूल किती सुंदर आहे तर तो म्हणेल की ‘कुठाय सौंदर्य दाखव मला. मी ते सौंदर्य हातात घेऊ इच्छितो. मी गणिताच्या, विज्ञानाच्या कसोटीवर ते तोलून पाहीन, मी ते तर्काच्या क्षेत्रात आणू इच्छितो. तरच मी मान्य करीन.’ मग तुम्ही काय कराल?
आणि फूल तर सुंदर नाही असंही नाहीये. ते तर अप्रतिमच आहे पण सौंदर्य ही काही वस्तू नाही की तुम्ही तार्किलाला उचलून द्याल, म्हणाल – ‘घे बाबा, मोज, कर परीक्षा.’
मी बाऊलांचं एक गोड गाणं असल्याचं ऐकलं. एका बाऊल फकीराला एका दार्शनिकानं विचारलं – ‘तुम्ही देवाची गाणी गात, वेड्यासारखे फिरत असता पण मला तर काहीच दिसत नाही. मग तुम्ही हा इकतारा आणि ढोलकं घेऊन का हिंडता? का नाचता? कोणासाठी गाणं गाता? मला तर सगळं मोकळं दिसतं आणि तुमच्या तर डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहतात. तुम्ही बेभान होता. तुम्ही काय वेडे आहात का?’
यामुळेच त्यांचं नाव बाऊल पडलं. बाऊल म्हणजे वेडे-खुळे! तो फकीर इकतारा वाजवून गाऊ लागला. गाणं खूपच वेगळं आहे. ते असं – ‘एकदा एक सोनार एका बागेत गेला. तो माळ्याला म्हणाला, तुझ्या फुलांची कीर्ती खूप ऐकली आहे की तू खूप सुंदर फुलं उगवतोस म्हणे! आज मी सोनं पारखण्याचा दगड घेऊनच आलोय. आज होऊनच जाऊ दे. कस लावून पाहतो कोणती फुलं असली आणि कोणती नकली?’
त्या बाऊलनं विचारलं – ‘सांगा बरं, त्या माळ्याची अवस्था कशी झाली असेल? त्यांच्या फुलांना दगडावर घासणार? सोन्याची परीक्षा करणारा दगड फुलांची परीक्षा, फुलांचं सौंदर्य याची परीक्षा करू शकत नाही. सोनं स्थूल आहे आणि स्थूल लोकांची बुद्धीच ते प्रभावित करू शकतं. त्यात खूप जडता, वजनदारपणा आहे म्हणून ते सगळ्यात महाग आहे पण ज्याची संवेदनशीलता गहन आहे अशाही काही गोष्टी आहेत. जगातलं सगळं सोनं दिलं तरी ते एका फुलाची किंमत देऊ शकत नाहीत कारण फुलं जिवंत सौंदर्य आहे.’
फकीर म्हणू लागला – ‘त्या माळ्याची झाली तशीच अवस्था तुम्ही माझी करून टाकली आहे. तुम्ही विचारता की देव कुठाय? तर्कानं सिद्ध करा.’
तर्क-निरुपयोगी
सोन्याचा कस लावणार्या दगडामुळं फुलांची परीक्षा होऊ शकत नाही तसं तर्काच्या कसोटीवर देव उतरू शकत नाही. तर्क स्थूल गोष्टीच पकडतो पण जीवन स्थूल नसतं. सूक्ष्म गोष्टी ज्याला जाणवतात ती श्रद्धा. श्रद्धा ही एक वेगळीच गोष्ट आहे.
हा बोधाचा, जाणिवेचा, समजण्याचा रस्ता आहे. तू या रस्त्यावर कधी ना कधी भेटशीलच हा विश्वास आहे कारण तू आहेसच. फुलांनी खबर दिलीय की तू आहेस. वृक्षांतून जमिनीवर पडणार्या सूर्यकिरणांनी सांगितलंय की तू आहेस. रात्री तार्यांचा लुकलुकण्याचा खेळ सुरु होतो आणि जाणवतं की तू आहेस. जीवन आणि अस्तित्वात इतका गुलाल उडतोय, होळीचे रंग उधळतायत, दिवाळी साजरी होतेय या सगळ्यांनी सांगितलंय की तू आहेस! जर इतका उत्सव चाललाय तर रंग खेळणारा असणारच. नाहीतर उत्सव कधीच बंद पडला असता. जिथं इतकं नृत्य सुरू आहे तिथं केंद्रावर कोणीतरी असणारच.
श्रद्धा माणसाच्या आयुष्यात सर्वात मूल्यवान गोष्ट आहे. श्रद्धा असेल तरच त्याच्या आयुष्यात देवाची सावली पडेल, हृदयात काव्य उमटेल, प्राणात बासरी वाजेल. त्याचेच जीवन सार्थक होईल.
तर्काच्या आधारानं गेलात तर आज नाही तर उद्या आत्महत्या करण्याशिवाय काहीच उतर नाही.
पश्चिमेचे विचारवंत, तीनशे वर्षे तर्काच्याच आधारे जातायत पण आज ते आत्महत्येपर्यंत पोचलेत. पश्चिमेतला मोठा विचारवंत, अल्बर्ट कामू लिहितो की मला ही सगळ्यात मोठा तात्विक समस्या वाटते कारण रोज उठायचं, नाश्ता करायचा, ऑफिसात जायचं. दिवसभर काम करून यायचं, जेवून झोपायचं. पुन्हा सकाळी उठून तेच-ते!
किती आठवडे-महिने-वर्ष तेच करायचं? यात सार तरी काय? आणि तर्क तर सांगता े- बस्स! फक्त हेच आहे.
तर्काचा अंतिम परिणाम आत्महत्या तर श्रद्धेचा अंतिम परिणाम अमृत जीवन!
जे हवंय ते निवडा. शेवटी तुम्हीच मालक आहात. श्रद्धा सोडून तर्क निवडलात तर असा विचार करू नका की तुम्ही देवाला विरोध करताय. तुम्ही आत्महत्या निवडताय.
ज्या दिवशी फ्रेडरिक नीत्शेने घोषित केलं की देव मेला आहे त्यादिवशी देव मेला नाही पण नीत्शे मात्र त्याच दिवशी वेडा झाला. कोणी घोषित करून का देव कुठं मरतो किंवा रिटायर होतो? पण देवच नसेल तर ते जीवनच व्यर्थ होतं. आपण मराठीत ‘आयुष्यात राम उरला नाही’ असंच म्हणतो की!
ईश्वर गेला की सौंदर्य गेलं, प्रेम गेलं, प्रार्थना गेली, कृतज्ञता गेली. मग मंदिरात टाळ-मृदुंग वाजणार नाही, पूजा होणार नाही. जीवनात सगळंच देव गेला तर जातं. मग उरतंच काय? केरकचरा? मग आज मेलं काय अन् उद्या मेलं काय सारखंच. मग जिवंत राहून तरी काय उपयोग?
नीत्शेच नव्हे तर आता जगच वेडं व्हायला लागलंय. पहिल्यांदाच लोक श्रद्धेचा अर्थ विचारायला लागलेत. अनुभव नाही तेव्हाच अर्थ विचारावा लागतो. लोक आता विचारतात प्रेम म्हणजे काय? कारण अनुभव नाही उरला.
प्रकाश, संगीत, श्रद्धा याचा अर्थ न विचारावा पण अनुभव नसावा हे विचित्रच घडू लागलं आहे.
श्रद्धा हरवली आहे. आपण मंदिरात जाण्याचं, चर्च-मशिदीत जाण्याचं नाटक करतो. तिथं श्रद्धा नसते. तिथं जाताना मला तुमच्या पायात नृत्य दिसत नाही, डोळ्यात आनंद भरत नाही. मंदिरात हात जोडताना तिथं हृदय नसतं.
श्रद्धा गेली की देव पाहण्याची दृष्टी गेली पण ती अजून तुमच्या आत आहे. ती परत उघडली जाऊ शकते. ज्या आघातानं ती बंद पेटी उघडते त्याचंच नाव सत्संग आहे. ज्याच्या उपस्थितीत श्रद्धेची कळी उमलून तिचं फुलात रुपांतरण होतं त्याचं नाव सद्गुरु आहे.
– स्वामी सहजानंद
९८२२५२८३६७