एक मुलाखत

एक मुलाखत - रविंद्र कामठे यांचा लेख.

1989 चा तो काळ होता. म्हणजे त्याला आज जवळ-जवळ 30 वर्षे झालीत. तरीही असं वाटतंय की हे सगळं अगदी काल-परवाच घडलंय की काय! हो, अगदी खरं आहे हे. हे माझ्याच नाही तर तुमच्या सुद्धा बाबतीत असंच काहीसं घडलेलं असणार, घडत असणार. मी फक्त मन मोकळं करून हे अनुभव शब्दबद्ध करून माझ्या ह्या अविस्मरणीय स्मृतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. तसेच त्यानिमित्ताने तुम्हा रसिक वाचकांशी संवाद साधण्याचे हे एक उत्तम असे साधन समजतोय. चूक भूल माफ असावी!

आकुर्डीतील एका खाजगी कंपनीमध्ये 1989-1994 ह्या काळात मी कामाला होतो. त्याच कंपनीमधील नोकरीसाठीच्या माझ्या मुलाखतीचा हा एक अविस्मरणीय असा अनुभव माझ्या आयुष्यात मला खूप काही शिकवून गेला आणि खूप काही देवून गेला. ह्या मुलाखतीच्या सफलतेमुळे 1989-1994 हा पाच वर्षांचा सुवर्णकाळ माझ्यासाठी आणि आमच्या संसारासाठी अनमोल ठरला आहे हे काही वेगळे सांगायला नको. ह्याच काळाने आमच्या उर्वरित सुखी आणि समाधानी आयुष्याची भक्कम पायाभरणी केली होती हे विसरून कसे चालेल! इमारतीचा काय अथवा तुमच्या उद्दिष्टांचा काय, पाया जर आत्मविश्वासाने भरून भक्कम केलेला असेल तर कितीही संकटे आली तरी इमारत कधीही कोसळत नाही अथवा उद्दिष्टांपासून तुम्हाला कोणीही दूर लोटू शकत नाही, हाच काय तो अनुभवाचा ठेवा मला आजवर लाभला आहे हे इथे नमूद करावेसे वाटते.

ह्या आधी मी 1983 सालापासून 1985 पर्यंत दोन अगदी छोट्याशा कारखान्यांमध्ये एक एक वर्षे नोकरी केलेली होती. ते करत असतानाच कायद्याचे पदवीधर होण्याचे ठरवलेले होते कारण आयुष्यात पुढे जावून काही उद्दिष्ट गाठायचे असेल तर नुसते पदवीधर होऊन चालणार नव्हते. थोडे उच्च शिक्षण तर हवेच होते परंतु आपल्या खिश्याला परवडेल व बुद्धिमत्तेला झेपेल असेच काहीतरी शिकायला हवे होते, जेणेकरून चांगली नोकरी मिळवता येईल. अर्थात हे तीन-चार वर्षांचे शिक्षण व त्याचा खर्च मला एखादी अर्धवेळ नोकरी करूनच करावे लागणार होते. त्यामुळेच वडिलांच्या ओळखीने मला त्यांच्याच नोकरीच्या ठिकाणी म्हणजे कृषी महाविद्यालयात बदली कारकून म्हणून कंत्राटी पद्धतीवर नोकरी मिळाली होती. सकाळी कॉलेज करून 10 वाजता कृषी महाविद्यालयात मी जवळ-जवळ दीडएक वर्ष कारकुनी केली आहे हे सांगताना मन कसं त्याही स्मृतींमध्ये अलगद गुरफटून जातं.

असा एकंदरीत पाच वर्षांचा अनुभव माझ्या गाठीशी होता. त्यात मी वाणिज्य आणि कायदा ह्या शाखांचा पदवीधर होतो. 1987 सालीच माझे लग्न होवून 1988ला आमच्या संसारवेलीवर एक गोंडस फुल उमलून आम्हाला एक धनाची पेटी लाभलेली होती. संसाराच्या जबाबदारीच्या जाणीवेने मी आता आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी शोधायला हवी अशा विचारत होतो. त्याच विचारांती 1989 साली वृत्तपत्रातील जाहिरात पाहून मी ह्या आकुर्डीच्या एका कंपनीमध्ये अर्ज केला होता. ह्या कंपनीमध्ये माझी मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. ‘ऑफिस असिस्टट’ अशी एकच जागा तीही त्यांच्या आकुर्डीमधील कारखान्यात होती.

जवळ-जवळ 50-100 जणांनी ह्या नोकरीसाठी अर्ज केले होते व त्यातून त्यांनी 15-16 उमेदवारांना मुलाखतीला बोलावले होते. त्यांच्या बंडगार्डन येथील मुख्य कार्यालयात सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे दाखले व दोन ओळखीची पत्रे घेऊन ह्या मुलाखतीला बोलावण्यात आले होते. वेळेच्या पंधरा मिनिटे आधीच मी लागणारी सर्व कागदपत्रे (सरकारी अधिकार्‍यांच्या सही शिक्क्यानिशी) व तयार केलेल्या प्रती घेऊन त्यांच्या कार्यालयात पोचलो होतो. सुरक्षारक्षकाने रीतसर चौकशी करून, कुठल्याश्या यंत्राने माझी अंगभर तपासणी करून नंतरच मला आत सोडले होते. माझ्या आधी काहीजण आत गेलेले होते आणि माझ्या मागेही एक-दोन जण उभे होते. बापरे! इतकेजण एका जागेसाठी! मला तर धडकीच भरली होती. आपलं कसं निभवायचं ह्या सगळ्यांच्यात असं वाटलं होतं. मनात धाकधूक होत होती.

स्वागत कक्षामधील महिलेस मला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं पत्र दाखवलं. त्यांनी ते पाहून त्यावरील माझ्या वेळेची त्यांच्या एका वहीत नोंद करून घेतली आणि मला इतर उमेदवारांबरोबर बसण्यास सांगितलं. त्यांच्या बोलण्यातील नम्रपणा, आदरातिथ्याची भावना व कार्यालयाचा नीटनेटकेपणा, प्रशस्तपणा माझ्या मनाला तर खूप भावून गेला. हीच ती चांगली नोकरी जी मी गेली वर्ष-दोन वर्षे शोधत होतो असे मला वाटले होते. मनावर थोडेसं दडपणही आलेलं होतं. घशाला कोरड पडली होती. त्यामुळं मी कोचावर बसायच्या आधी एक पेला पाणी पिऊन घेतलं. तहान भागली व अस्थिर मन स्थिरावण्यासाठी त्याची थोडी मदतही झाली. तुम्ही कितीही काहीही म्हणा पण प्रत्येकाला ह्या अशा मुलाखतींचे दडपण नक्कीच येत असणार. मी काही त्यातून निराळा नव्हतो. माझ्या आजूबाजूला बसलेले इतर उमेदवार एकदम आत्मविश्वासाने बसलेले होते व त्यांच्या मनावर कुठलेही दडपण, तणाव मला जाणवत नव्हता. काहीजण तर अगदी सुटा-बुटात आलेले होते तर काहींनी छान टाय घातलेला होता. मी मात्र जरा साधाच पण व्यवस्थित इस्त्री केलेला पांढरा सदरा, काळी विजार व छान चकाकी केलेले काळे बूट घालून आलो होतो. असेल बाबा त्यांना अशा मुलाखतींची सवय, असे मनातल्या मनात म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करून बरोबर आणलेली सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून मनाचे समाधान करून घेतले. मला बोलवेपर्यंत मी मनातल्या मनात आपल्याला विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची माझ्या आकलनशक्तीनुसार उजळणी करत बसलो होतो. ही नोकरी काहीही करून मिळवायचीच असा मनाचा हिय्या करून मी मनातल्या मनात मुलाखतीची तयारी करून ठेवली होती. त्यामुळे थोडासा निर्धास्त झालो होतो.

स्वागत कक्षामधील महिलेने कंपनीचे चार संचालक व दोन अधिकारी मिळून ही मुलाखत घेणार आहेत हे त्यांच्या कंपनीच्या रीती-रिवाजानुसार आलेल्या प्रत्येक उमेदवारास सांगितले होते, तसे मलाही सांगितले. हे कळल्यावर माझी तर पाचावरच धारण बसली. मनावर अजून थोडासा ताणही आलेला होता. असाही मला इतक्या मोठ्या कंपनीत मुलाखत देण्याचा फारसा अनुभवही नव्हता आणि तसा मी कधी प्रयत्नच केलेला नव्हता कारण पदवीधर झाल्याबरोबर एक-दोन छोट्याशा कारखान्यात लगेचच नोकरी मिळाली होती आणि ती मुलाखत म्हणजे एक सोपस्कार होता असे मला इथली सगळी व्यवस्था व गर्दी पाहून वाटायला लागले होते. माझ्या बरोबरची सगळीच पोरं चांगलीच हुशार वाटत होती, म्हणजे त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून तरी ते उच्चशिक्षित आणि हुशार वाटत होते. असो. एकेक करून आम्हाला आत बोलावले जात होते. काहींची मुलाखत 10 मिनिटे तर काहींची 15-20 मिनिटे चालत होती. असे करता करता माझा नंबर आला व मला आत बोलावले गेले.

मला बोलावल्यावर मी दारावर टकटक करून ते हलकेसे उघडून ‘‘मी आत येऊ का?’’ अशी त्यांची परवानगी घेतली. त्यांनी ती दिल्यावरच त्यांच्या त्या प्रशस्त चेंबरमध्ये प्रवेश केला व ते मला बसण्याचा आदेश कधी देतात ह्याची वाट पाहत तसाच उभा राहिलो. ते सर्वजण माझ्या आधी गेलेल्या उमेदवाराबद्दल चर्चा करत असावेत बहुधा! साधारण एक 15-20 सेकंदच मी उभा होतो. त्यांच्यातील मुख्य व्यवस्थापकांनी मला समोरच्या खुर्चीत हाताने खुणावून बसण्यास सांगितले. त्यांचे आभार मानून मी त्यांनी सांगितलेल्या खुर्चीत विसावलो. अर्थात हे सगळे संभाषण इंग्रजीत झाले होते हे वेगळे सांगायला नको. (मी ह्या लेखामध्ये शक्यतो इंग्रजी शब्द टाळण्याच्या प्रयत्न करतो आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच.) कंपनीचे तीन मालक-संचालक, एक कार्यकारी अधिकारी, आकुर्डीच्या विभागाचे मुख्य व्यवस्थापक आणि मुख्य कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक असे सगळे मिळून पाच जण आत एका मोठ्या टेबलाच्या समोरच्या बाजूला अगदी थाटात बसलेले होते.

सर्वप्रथम मला माझ्याबद्दलची माहिती सांगण्यास सांगितले. माझ्या अर्जात मी जसे लिहिले होते अगदी तसेच थोड्याफार फरकाने सांगून मी मोकळा झालो. त्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास थोडासा बळावला होता आणि मनावरचा ताणही थोडासा हलका झाला होता. आपल्याला समाधानकारक पद्धतीने इंग्रजी बोलता येते आहे हे उमजल्यामुळे माझ्याही नकळत मी खुर्चीत जरा सावरून आरामात बसलो होतो. त्यानंतर मला माझ्या कामाच्या अनुभवाबद्दल काही प्रश्न विचारले गेले. त्यांच्या प्रत्यके प्रश्नाचे अगदी मोजक्या शब्दांमध्ये मी उत्तर देत होतो. तसेच माझे उत्तर त्यांना योग्य वाटले आहे की नाही वा पटले आहे की नाही हे ही आजमावून पाहत होतो. जवळ-जवळ 20 मिनिटे माझ्या मुलाखतीला झालेली होती आणि कंपनीच्या संचालक आणि अधिकारी वर्गाच्या चेहर्‍यावरील हावभावावरून मी त्यांना समाधानकारक उत्तरे देत आहे हे मला जाणवत होते.

आता मुख्य व्यवस्थापकांनी मला माझ्या कामाचे स्वरूप काय असणार आहे ते सांगितले व त्या संदर्भातील काही प्रश्न विचारून माझी ह्या जागेसाठीची पात्रता पडताळून पाहू लागले. मला त्यांनी विचारलेल्या प्रत्यके प्रश्नाचा रोख काय आहे ते समजत होते. जर का एखादा प्रश्न मला समजला नाही तर मी त्यांना तो परत विचारून खात्री करून घेत होतो व त्यानुसार नीट विचार करूनच उत्तरे देत होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी मला जे समजत होते आणि कळत होते त्याच प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देत होतो. उगाचच आगाऊपणा करून आपल्याला सर्व काही येत आहे असा अट्टहास न करता आणि अजिबात खोटे न बोलता त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत होतो.

एक एक करून उपस्थित असलेल्या सर्वच जणांनी माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती केलेली होती. मी पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नास अतिशय आत्मविश्वासाने उत्तरे देत होतो. माझ्याकडे कामाचा जेमतेम पाच वर्षांचा अनुभव होता. तोही अगदीच लहान कारखान्यातला होता परंतु मी जी काही कामे केलेली होती, ती अतिशय मन लावून प्रामाणिकपणे केलेली होती. त्या अनुभवातून जे काही शिकलेलो होतो, जे मला माझ्या ह्या मुलाखती दरम्यान खूप उपयोगी पडत होते, हे मला पदोपदी जाणवत होते. मुलाखतीला जवळ जवळ 30 मिनिटे होवून गेली होती आणि अजूनही काही प्रश्न त्यांना विचारावेसे वाटत होते. त्यामुळे मी अगदी योग्य मार्गावर आहे असे मला वाटू लागले होते. त्याचेच प्रत्यंतर आकुर्डीच्या मुख्य व्यवस्थापकांनी विचारलेल्या प्रश्नात आले. ते म्हणजे ‘‘तुम्ही रहायला धनकवडीला आणि कंपनी आकुर्डीला. त्यात आमच्या कंपनीची येण्याजाण्यासाठीची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे तुम्हाला जर आम्ही ही नोकरी देऊ केली तर तुम्ही कसे काय येणार जाणार?’’

त्यांचा हा प्रश्न अतिशय कळीचा होता आणि माझी खरी परीक्षा पाहणारा होता. माझ्या एकंदरीत एक गोष्ट लक्षात आली होती की आपली निवड जवळ जवळ ठरलेली आहे परंतु आपल्या ह्या प्रश्नाच्या सकारात्मक उत्तरावरच ती शिक्कामोर्तब होऊ शकते. मी मुलाखतीला येण्याअगोदरच ह्या विषयावर माझ्या बायकोशीही सविस्तर चर्चा केलेली होती व त्यावर मार्गही शोधून ठेवलेला होता. नेमकी तीच गोष्ट मला त्यांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देताना खूप उपयोगी पडली. ते म्हणजे, मी त्यांना आमच्या दोघांमध्ये झालेला संवाद अगदी थोडक्यात सांगून टाकला व त्यावरील उपाय म्हणजे मी एक मोटरसायकल विकत घेऊन माझी येण्याजाण्याची व्यवस्था करणार आहे, कारण मला तुमच्या ह्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करून माझे उर्वरित भविष्य घडवायचे आहे! माझे हे उत्तर उपस्थित सर्वच जणांना अगदी मनापासून पटले आणि त्यांनी मला थोडावेळ स्वागतकक्षामध्ये बसण्यास सांगितले.

मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ह्या 40 मिनिटांमध्ये व विचारलेल्या प्रश्नांमधून आणि मी दिलेल्या समर्पक उत्तरांमधून समोर बसलेली अनुभवी आणि जाणकार मंडळी माझ्यातल्या प्रामाणिकपणा, हजरजबाबीपणा, संयमितवृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन, कामाप्रती असलेली आत्मीयता, तत्त्वनिष्ठता, कष्ट करण्याची तयारी, सचोटी आणि ध्येयवादीवृती अशा व इतर काही गुणांची तसेच माझ्यातल्या काही उणिवांची पारख करत होत्या, हे मला आज 25-30 वर्षानंतर जाणवले. जवळ 40 मिनिटे माझी मुलाखत चालली होती. त्यामुळे माझ्या नंतरच्या चार-पाच उमेदवारांचे चिंताग्रस्त झालेले चेहरे मला बाहेर आल्यावर जाणवले. एक दोघांनी हळूच विचारायचा प्रयत्नही करून पाहिला पण तिथे फारसे बोलता येत नसल्यामुळे माझी आपसूकच सुटका झाली होती कारण त्यांना माझी मुलाखत सकारात्मक झालेली आहे व मला बाहेर बसण्यास सांगितले आहे हे सांगावयास लागले असते हो. असो. तसेही त्यांना त्यांचा अंदाज आलेलाच होता हेही तितकेच खरे होते.

मला मात्र हुश्श झाले होते. मी स्वागत कक्षात येवून पुन्हा एकदा पेलाभर पाणी प्यायलो व कोचावर डोळे बंद करून शांत बसून राहिलो. साधारण 40-45 मिनिटांनी मला पुन्हा एकदा आत बोलवण्यास आले. तोवर बाकीच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या होत्या व अजून एक उमेदवार सोडून बाकीचे सर्व बहुतेक त्यांनी सांगितल्याप्रमाणे निघून गेलेले होते.

मला आत बोलवून माझी मुलखात चांगली झाली आहे व माझी ह्या जागेसाठी निवड करण्यात आली आहे हे सांगण्यात आले. मला महिना 3500 रुपये पगार ठरवण्यात आला होता. कंपनीच्या नियमाप्रमाणे बाकीचे भत्ते इत्यादी देण्यात येणार होते. हे सगळे मला मान्य आहे का आणि असले तर मी कधीपासून कामावर रुजू होवू शकतो हे त्यांनी मला विचारले. एका क्षणाचीही उसंत न घेता मी सर्व गोष्टी मान्य करून 1 तारखेपासून कामावर रुजू होऊ शकतो सांगितले. (मुलाखतीची तारीख 20 होती, त्यामुळे मला 10 दिवसांचा अवधी तयारीसाठी मिळणार होता.) व्यवस्थापकांनाही सर्वानुमते माझी संमती मान्य केली आणि माझी ह्या जागेसाठी निवड झाली आहे हे शिक्कामोर्तब केले व मला पुन्हा एकदा बाहेर थांबण्याची विनंती केली.

माझ्याबरोबर अजून एका उमेदवाराला त्यांनी थांबवले होते. त्याला आत बोलवण्यात आले आणि साधारण 10 मिनिटांनी तो बाहेर आला व मला शुभेच्छा देवून निघून गेला. त्याचे काम झाले नाही हे माझ्या लक्षात आले. मनोमन मी त्याचे आभार मानले व त्यालाही पुढील मुलाखतीसाठी शुभेच्छा देवून मला कधी आत बोलावताहेत ह्याची वाट पाहू लागलो. 5 मिनिटांत मला पुन्हा एकदा आत बोलावण्यात आले आणि ह्या वेळेस मात्र सर्वांनी माझ्याशी हस्तांदोलन करून माझी ह्या जागेसाठी निवड करून मला ही नोकरी बहाल करण्यात आली आहे असे जाहीर केले. एक क्षण माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या परंतु मी माझ्या भावनांना आवर घातला आणि उपस्थित सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले. मला दोन दिवसांमध्ये कार्यालयात येवून पुढील सर्व सोपस्कार पुरे करण्यास सांगण्यात आले व आता आपली भेट आकुर्डीच्या कारखान्यातच होईल असे सांगतिले. मनातल्या मनात नाचतच मी ह्या कंपनीच्या कार्यालयातून बाहेर पडलो. एसटीडी बुथवर जावून बायकोला घरी दूरध्वनी करून ही आनंदाची बातमी दिली व जवळच्या एका टपरीवर मस्तपैकी गरमागरम वडापाव हाणला. एक चहा घेऊन इतका वेळ मारलेली पोटाची भूक शमवली आणि आज आपण जगच जिंकल्याच्या आविर्भावात घराकडे जायला निघालो.
ही यशस्वी मुलाखत म्हणजे माझ्या आयुष्यातला फार मोठा मैलाचा दगड होती ह्याचे प्रत्यंतर मला माझ्या आयुष्यातल्या पुढील प्रवासात कायमच जाणवत राहिले व तीच तर खरी माझ्या सफल आयुष्याची गुरुकिल्ली ठरली. आज 30 वर्षांनी मागे वळून पाहताना माझ्या आयुष्यातल्या ह्या सुखद अनुभवाची आठवण येणे स्वाभाविकच आहे की नाही हो!

– रविंद्र कामठे, पुणे
चलभाष – ९८२२४०४३३०

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा