माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला एकटे राहणे शक्यच नाही. आपले विचार, मतं स्पष्ट करायला, बोलायला कुणीतरी हवं असतं. संवाद साधायला कुणीतरी हवं असतं. विचारविनिमय महत्त्वाचे आहे. दूर असलेल्या व्यक्तिशी संवाद साधण्यासाठी, त्या व्यक्तिची खुशाली कळण्यासाठी एक मार्ग होता तो म्हणजे पत्र. आपल्या मनातील भावना, खुशाली, आनंद लोक पत्र लिहून व्यक्त करत होते. ते पत्र पोस्टमन इकडून तिकडे पोहचवण्याचे काम करायचा. दोन व्यक्तींच्या भावना पोहचवणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘पोस्टमन’.
पूर्वी संवाद साधण्याचे मार्ग उपलब्ध नव्हते. डाकसेवा सुरु झाल्यामुळे लोक लिहू लागली, पत्र पाठवू लागली, एकमेकांशी संवाद साधू लागली. पोस्टमन गावात आला की, लोकांना खूप आनंद व्हायचा, कारण तो आपल्या प्रिय व्यक्तीचा संदेश आपल्यापर्यंत पोहचवतो. पोस्टमनला लोक देवदूतच समजायचे. एक-एक पत्राचे उत्तर येण्यास बरेच दिवस लागायचे पण लोक धिराने घ्यायची, पत्राची वाट पहायची. एक कागद व एक पेन याच्या सहाय्याने कागदावर मनातल्या भावना सहज लिहिल्या जायच्या. त्या पत्रातील शब्दांमध्ये माया, प्रेम ओथंबलेले असायचे. पत्र वाचणार्या व्यक्तीच्या चेहर्यावरील आनंद काही औरच असायचा.
हळूहळू तंत्रज्ञानात प्रगती झाली. टेलिफोनचा शोध लागला. मग मोबाईल आला. सध्या ‘स्मार्टफोन’ जास्त चर्चेत आहेत. सोशल मीडियावर अनेक माध्यमं आहेत, ज्याद्वारे लोक एकमेकांशी संवाद साधतात. व्हाट्सऍप, फेसबुक इ. ऍप्सद्वारे लोक एकमेकांशी बोलतात. कीबोर्डवर टाइप केले की, मोबाइल स्क्रीनवर आपोआप शब्द उमटतात व मेसेज पाठवला जातो. त्यामुळे हातांच्या बोटांना टकटक टाइप करण्याची सवय लागते. मग कोण लिहितेय पत्र आजकाल? लिहिण्याचा आळस बाकी काही नाही. ‘टाइप करा आणि सेंड करा’ हाच आजचा मूलमंत्र आहे. पानभर पत्र लिहायला कुणाकडे वेळ आहे का? लोक आजकाल भावनाही व्हाट्सऍपवरील इमोजीद्वारे व्यक्त करतात. एक संदेश एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी त्वरित पाठवता येतो. त्यामुळं वेळेची बचत होते. आता बरेच बदल झाले आहेत. पत्रांची जागा आता मेसेजने घेतली पण मायेचा ओलावा मेसेजमध्ये दिसतो का? सोशल मीडियामुळे कुणी पत्रच लिहित नाहीत. त्यामुळे ‘पोस्टमन काका’ पत्र घेऊन येत नाहीत.
सध्या कुरिअर सेवा उपलब्ध आहेत पण कुरिअरद्वारे लोक डॉक्युमेंट, वस्तु, सामान पाठवतात. पत्र नाही पाठवत. जग बदलत आहे. प्रगतीच्या दिशेने भरधाव जाताना आपण संवेदनशून्य होत आहोत. लहाणपणी आपण सगळ्यांनी हा खेळ खेळला असेल, मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. खरंच मामाचं ते पत्र हरवलंय. ते सापडतच नाही.
प्रिय… अशी पत्राची सुरुवात वाचल्यावर किती आनंद होतो.. आता लोक प्रिय ऐवजी डिअर लिहायला लागली. पत्राचे कवर गुलाबी असल्यास लोकांना कळायचं, हे प्रेमपत्र आहे… त्या गुलाबी पत्राची मजाच वेगळी. दुराव्यातही जवळ असण्याचा आभास निर्माण करायची ही पत्रे. ज्यांना मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहीत, ते सुद्धा पत्रांचा आधार घेतात. पूर्वीच्या प्रेमात ‘पत्र’ हा महत्त्वाचा घटक असायचा. आता व्हाट्सऍप मेसेज अग्रस्थानी आहे. त्यामुळं पत्र लिहून व्यक्त व्हा आणि भावना व्यक्त करण्याचा आनंद घ्या. तुम्ही लिहिलेले पत्र वाचून तुमच्या प्रिय व्यक्तीच्या चेहर्यावर येणार्या स्मितहास्यातच पत्राची खरी मजा आहे.
अस्मिता येंडे
मुंबई
9619035195