भूखंड खरेदीचा कानाला खडा

भूखंड खरेदीचा कानाला खडा

ह्या गोष्टीला आता 15 वर्षे झाली असतील. अचानक मला माझ्या एका भूखंड व्यवहाराची आठवण झाली व तो एक विलक्षण अनुभव शब्दबद्ध करावासा वाटला कारण आपल्या प्रारब्धात जे असते तेच घडते. ते कसे…

2003ला मी पुण्यातल्याच एका छोट्याशा कारखान्यात नोकरी करत असताना काहीसे वेगळे करायची इच्छा होती आणि सहज विचार करता करता माझ्या सुपिक डोक्यात एक कल्पना आली की आमच्या शेजारचा भूखंड सद्य स्थितीत असलेल्या घरासहित विकत घ्यावा व त्याचे रुपांतर एका हॉस्टेलमध्ये करावे किंवा अगदीच काही नाही झाले तर भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न घ्यावे. हे सगळे डोक्यात यायचे कारण आमच्या येथे भारती विद्यापीठ जवळ असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी भाड्याने खोली मिळेल का? अथवा कॉट बेसिसवर रहायची सोय होईल का? असं विचारायचे.

माझ्या डोक्यात एकदा का किडा वळवळायला लागला की काही विचारू नका! माझ्या स्वभावानुसार, जोपर्यंत तो विचार एकतर पूर्णत्वास जाईपर्यंत अथवा तो अयोग्य आहे हे सिद्ध होईपर्यंत मी काही शांत बसत नसे! झालं, मी लगेचच त्या दृष्टीने कामाला लागलो. सर्वप्रथम ही कल्पना बायकोच्या कानावर घातली. अर्थातच तिचा होकार मिळवला! पण तिने योग्य असा ‘‘राहत्या घरावर कुठलाही बोजा न करता, तुला जे काही करायचे आहे ते कर’’ असे बजावले होते.

सगळ्यात पहिल्यांदा शेजारच्या भूखंडांच्या मालकास गाठले कारण त्यांनी ते घर भाड्याने दिलेले होते! पण एक सांगतो, इच्छा तिथे मार्ग, ह्यावर माझा तरी विश्वास बसला होता. ह्या भूखंडाचे मालक गेली कित्येक वर्षे त्यांचे घर भाड्याने देत आले होते, कारण का तर ते त्यांना लाभत नव्हते. त्यामुळेच मी जेव्हा त्यांना भेटून माझी इच्छा, त्यांचा भूखंड, सद्यस्थितीत असलेल्या घराच्या योग्य किमतीसहित म्हणजे साधारण 8 लाखांना विकत घ्यायची तयारी दाखवली होती. त्यांचा मी सहा महिने पिच्छा पुरविला होता आणि शेवटी तो भूखंड 10 लाखांना द्यायला तयार केले.

हे सगळे उपद्व्याप चालू असताना माझ्या खिशात एकही दमडी नव्हती, ह्यावर तुमचा विश्वास बसणार नाही! मला नोकरीत मिळत होते महिना रुपये 15000/-. समजा 8-10 लाखांचे कर्ज काढले तर महिना साधारण 8-10 हजार रुपये तरी हप्प्ता बसणार होता. आधीच राहत्या घरावर दुरुस्तीसाठीचे दीड लाखाचे कर्ज होते. त्यात मारुती800 चा हप्ता होता. माझ्या पगारातून जेमतेमत 2-3 हजारच उरायचे व मी नोकरीच्या जोडीला आयुर्विम्याचा अधिकृत विक्रेता म्हणून काम करत होतो. त्यातून मला 4-5 हजार महिना उत्पन्न मिळत होते. असे मिळून माझे 7-8 हजारच उरणार होते घर खर्चाला. बायकोची नोकरी असल्यामुळे फार ओढाताण होणार नव्हती पण ते म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाटच फार! माझ्या नोकरीच्या पगारावर (जिची शाश्वती नाही) मी ही जोखीम घेऊ शकत नव्हतो. परंतु सरतेशेवटी ही जोखीम मी स्वबळावर घ्यायची ठरवले कारण एकच होते की असा माझ्या घराला लागूनचा हा भूखंड परत मिळणे शक्य नव्हते. पुढे-मागे दोन्ही भूखंड एकत्र करूनही काहीतरी करता येण्यासारखे होते. असेही तो सद्यस्थितीत असलेल्या घरासहित घेणार असल्यामुळे त्यातून लगेचच भाड्याचे अथवा हॉस्टेलचे उत्पन्न सुरु करता येणार होते. शेवटी अगदी काही नाहीच जमले तर हा शेजारचा भूखंड विकता येऊ शकत होता. फार नफा नाही झाला तरी नुकसान तर नक्की होणार नव्हते! शेवटी स्थावर मिळकत होती आणि ती ही आमच्यासारख्या सुनियोजित सोसायटीत होती; म्हणजे तिला दिवसेंदिवस चांगलीच किंमत येणार होती हे निश्चितच होते. शक्यतो ही मालमत्ता विकायची नाही पण तशी वेळ पडली तर मात्र राहत्या घरावर कुठल्याही परिस्थीतीत आच येऊ द्यायची असं ठरलं होतं.

मी एका बँकेला त्या घराची कागदपत्रे आणि मला कंपनीतून मिळणार्‍या पगाराचे पत्र दाखवले आणि काय सांगू, त्या अधिकार्‍याने मला चक्क 8 लाख रुपये कर्ज देण्याची ग्वाही दिली. 8 हजार हप्ता बसेल सांगितले. माझ्या मार्गातील फार मोठा अडसर ह्या कर्जाने दूर झाला होता. प्रश्न उरलेल्या 2 लाखांचा होता. थोडीफार शिल्लक होती आणि उरलेली गरज माझ्याच एका मामेभावाला, आम्ही माझी मारुती 800, दीड लाखाला विकून भागवली. बँकेचे कर्ज घेतले. रीतसर करार केले. ते लुघुनिबंध कार्यालयात नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क भरून, सोसायटीची हस्तांतरण वर्गणी इत्यादी भरून, कायदेशीर मार्गाने सर्व करारांची पूर्तता केली. घराचा ताबा घेवून काही किरकोळ दुरुस्त्या करून, ते भाड्याने देण्यासाठी तयार करून घेतले. नेमके त्याच वेळेस पलीकडच्या काकांनी त्यांचे राहते घर पाडून तिथेच दोन मजली घर बांधायचे ठरवले व मला माझे हे नवीन घर भाड्याने देतोस का विचारले. हे म्हणजे ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे’, असे झाले. लगेच व्यवहार ठरवला. महिना 5 हजार भाडे ठरले. माझ्या ह्या नवीन मिळकतीतून, माझ्यावर लक्ष्मी प्रसन्न होवून, लगेच अर्थार्जनही सुरु झाले. मला माझे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल असे वाटूही लागले!

शेजारच्यांच्या घराचे एक वर्षात काम झाल्यावर त्यांनी घर सोडले आणि मी माझे घर ताब्यात घेवून तिथे माझ्या आईवडिलांच्या हस्ते गृहप्रवेशही केला. अहो, आमच्या घरच्यांना माझ्या ह्या यशामुळे इतका आनंद झाला होता म्हणून सांगू! कौतुक करून करून सगळे थकले होते व माझ्या दूरदृष्टीला दाद देवून माझी वाहवा केली होती पण हे सुख सगळे किती क्षणभंगुर होते हे काही दिवसातच जाणवले.
कोणाची दृष्ट लागली माहीत नाही पण गृहप्रवेश केल्यानंतर आठच दिवसात माझी नोकरी गेली व मी अक्षरश: फार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो. त्यात नवीन वास्तूत भाडेकरीही मिळण्यास अडचण यायला लागली. सोसायटीने विद्यार्थी ठेवण्यास मनाई केली. ते म्हणतात ना, वाईट काळ आला की सगळीकडूनच कोंडी होते. शेवटी माझ्या अडचणी काही संपेनात आणि त्यात नवी नोकरीही मिळेना. असेच त्याच घराच्या पायरीवर बसून सिगरेटी फुकत 4-5 महिने कसेबसे काढले. ही वास्तू त्याच्या मालकाला लाभतच नाही असे काहीसे आधीच्या मालाकांडूनच ऐकले होते, त्यावर माझा विश्वास बसू लागला होता. त्यात ह्याच्याकडून, त्याच्याकडून हातउचल करून मी इतके दिवस कसबसे भागवले होते पण असे किती दिवस ढकलायचे हा माझ्यासमोर गहन प्रश्न होता! माझ्या स्वाभिमानाने आता मला डिवचले होते. एक तर मी हा सगळा उद्योग स्वत:च्या उन्नतीसाठी केला होता; त्यात माझ्या घरच्यांचा व बाकीच्यांचा काहीच दोष नव्हता. त्यांना अडचणीत आणण्याचा मला काहीएक अधिकारही नव्हता.

झालं, एकदा का आपली सटकली की विषय संपतो…

जसे हा भूखंड घेताना तत्परतेने विचार केला होता तसाच तो विकण्याचाही निर्णय घेतला. जसा घेतला तसा दोन वर्षात परत 11 लाखाला विकून टाकला. अर्थात पुन्हा एकदा सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करूनच.. ह्या भूखंडाचे एक लाखाचे श्रीखंड खायला मिळाले; पण माझी भविष्यातील योजना धुळीला मिळाली ह्याचा मनस्ताप फार होता. त्यामुळे डोक्याला व्यखंड लावायची वेळ आली होती. आपल्या नशिबात आणि पत्रिकेत स्थावर-जंगम बाळगण्याचा योग नाही असे समजून तो विषय कायमचा डोक्यातून काढून टाकला होता. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे मला फारसा त्रास होत नाही व मी करूनही घेतला नाही. चक्क झालेल्या एक लाखाच्या नफ्यात चौगुलेमध्ये जावून नवी कोरी मारुती झेन बुक केली. बाकीच्या रकमेचे कर्ज घेतले आणि इथून पुढे भूखंडाच्या खरेदीविषयी कानाला खडा लावून मोकळा झालो.

रविंद्र कामठे
पुणे
9822404330

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “भूखंड खरेदीचा कानाला खडा”

  1. Arum Kamalapurkar

    छान अनुभव कथन

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा