गरीबातल्या गरीब माणसाची सर्वांगीण प्रगती करण्याचा ध्यास घेतलेले ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे नानाजी देशमुख.
त्यांच्या या कार्याचा गौरव पुणे विद्यापीठाने त्यांना डी लिट ही पदवी देऊन 1997 मध्ये केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मान बहाल केला. आता प्रजासत्ताक दिनी भारतातील सर्वोत्तम सन्मान अशी ‘भारतरत्न’ ही पदवी मरणोत्तर देण्यात आली. त्यामुळे लक्षावधी गरीबांना मनापासून आनंद झाला.
अशा नानाजींचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील कडोळी गावी झाला. त्यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याने हा बहुमान मराठवाड्यालाही मिळाल्याचा आनंद आहे. स्वावलंबनाचे धडे त्यांना बालपणापासूनच मिळाले. आपल्या शालेय शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी लहानपणीच भाजी विकण्याचे काम केले.
शालेय जीवनातच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाऊ लागले. राष्ट्रप्रेमाबरोबरच त्यांनी खूप मित्र मिळविले. दुसर्याच्या भावना समजावून घेतल्या. इतरांच्या अडचणींमध्ये लक्ष घालून त्यांना शक्य तितकी मदत करू लागले.They are the happiest who do most for the others.. या स्वामी विवेकानंदाच्या विचारांना त्यांनी कृतीशील जोड दिली. स्वामी विवेकानंदाच्या शिष्या भगिनी निवेदिता एकदा म्हणाल्या,
‘‘जर हिंदू लोक सकाळ-संध्याकाळ केवळ दहा मिनिटं नुसती सामूहिक प्रार्थना करतील तर तेवढ्यानेही त्यांचा समाज सार्या देशात अजेय ठरेल.’’
या विचारांची प्रयोगशाळा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाच्या कार्याचे ते सुरुवातीचे दिवस होते. तेव्हा त्यांच्या मनावर प.पू. श्री. गोळवलकर गुरुजींच्या विचारांचाही प्रभाव पडला.
‘‘अनुशासन बल, देशव्यापी आणि राष्ट्रचरणी समर्पित एकसूत्र भ्रातृभावना निर्माण करण्याचे संघाचे कार्य करण्यास उद्युक्त व्हावे.’’
नानाजी देशमुख संघाचे प्रचारक झाले. त्यांनी उत्तर प्रदेशात संघाचे पूर्णवेळ काम केले.
संघ विचारांची राजकीय संघटना स्थापन्याचे ठरले तेव्हा नानाजी देशमुखांनी जनसंघाच्या संघटनाच्या कार्यात लक्ष घातले. राष्ट्र विचाराच्या प्रचारार्थ सातत्याने लेखन केले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेश या नियतकालिकांचे ते संपादक होते.
संत विनोबा भावे यंाच्या भूदान योजनेने त्यांना आकर्षित केले. भारतातील गरीबी निर्मूलनासाठी हक्काची शेतजमीन मिळाली तर शेतकरी अधिक जोमाने कार्य करेल म्हणून विनोबांच्या भूदान योजनेसाठी त्यांनी काम केले. सतत दोन महिने त्यांनी विनोबांसमवेत पदयात्रा केली. समाज सुधारण्याच्या त्यांच्या मूळ स्वभावाला भूदान योजनेने अधिक चालना दिली.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. या आणीबाणी विरोधात देशभर संतापाची लाट उसळली. अनेक राजकीय नेत्यांना तुरुंगात डांबले. या संकटातून एक संधी निर्माण झाली. जनसंघ आणि समाजवादी या भिन्न विचारांचे लोक तुरुंगात एकमेकांना समजावून घेऊ लागले. ‘लोकशाहीसाठी एकत्र येऊया’ असे म्हणू लागले. त्यातूनच जनता पक्षाची स्थापना झाली. या स्थापनेत नानाजी देशमुखांचा सिंहाचा वाटा होता. सर्व पक्षातील लोक त्यांना ‘राजनीतीतील चाणक्य’ म्हणू लागले. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनता पक्ष जिंकला व मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आला. तेव्हा या सरकारचे शिल्पकार म्हणून नानाजी देशमुखांना महत्त्वाचे मंत्रिपद दिले जात होते परंतु त्यांनी नम्रपणे मंत्रीपद नाकारले.
भारतातील गरीबी दूर करण्यासाठी भारतीय वातावरण टिकवून प्रत्येक गरीबामध्ये उद्योजकता निर्माण करायला हवी, विकासाचा केंद्रबिंदू हा गरीबातला गरीब असायला हवा या विचाराने ते झपाटलेले होते. दिनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय विचाराने ते प्रभावित झाले होते. गरीबांचा विकास व्हावा, त्यातून समाजाचा विकास होईल हा विकास एकमेकांना सहाय्य करत करायचा. दुसर्याचे शोषण करत नाही करायचा. माणसातील माणूसपण शिल्लक रहायला हवे. एकात्मिक मानववाद निर्माण करायचा या विचाराने ते इतके झपाटले होते की, त्यांनी पुढ्यात आलेले राजसत्तेतील सिंहासन झुगारून दिले. सत्ता, संपत्ती, कीर्ती याचा मोह बाजूला सारला आणि राजकारणातून पूर्णपणे संन्यास घेतला.
समाज विकास करण्यास राजसत्ता हे दुय्यम माध्यम आहे. त्या मार्गातून कार्य करण्याऐवजी प्रत्यक्ष मानव विकासाचे कार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
दीनदयाळ संशोधन संस्था
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या ग्रामीण भागातील गरीबी त्यांनी जवळून पाहिली होती. तेथील ग्रामीण विकासासाठी त्यांनी प्रत्यक्ष कार्यास सुरुवात केली. दीनदयाळ संशोधन संस्थेची स्थापना केली.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात ग्रामस्थांच्या सभा घेतल्या व आपला विकास आपणच करण्याची प्रेरणा त्यांनी जनतेला दिली. त्यांना विकासाच्या योजना समजावून सांगितल्या. त्यांच्याबरोबर तेही कामाले लागले. पाणी म्हणजेच जीवन हे जाणून त्यांनी सिंचनाचे काम सुरू केले. 40.000 कूपनलिका बसविल्या. शेते हिरवीगार केली. Nothing succeeds like sucess या म्हणींप्रमाणे लोकांचा नानाजींवरील विश्वास वाढला.
मध्यप्रदेशातील चित्रकूट जिल्ह्याच्या 80 दुर्गम गावात ते प्रत्यक्ष गेले. स्वावलंबन, कष्ट व कामावरील निष्ठा हे विचार ग्रामस्थांवर बिंबवले. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजना यशस्वी केली.
Organisation is a place where capacity of persons is
multiplied हे जाणून त्यांनी संपूर्ण गावासाठी सिंचन महोत्सव योजना सुरू केली. दरवर्षी गावची जत्रा असते तसे लोक स्वतःची खोरी, फावडी घेऊन येऊ लागले. विहिरी, पाट, कालवे, बंधारे अशी तदनुषंगिक कामे त्या उत्सवात पूर्ण करू लागले.
पाण्याच्या उपलब्धतेबरोबर पारंपरिक शेतीचा विकास कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले. शेतीला सहाय्यभूत ठरावे म्हणून गोवंश संवर्धनाची मोहिम हाती घेतली. स्वयंरोजगाराला महत्त्व दिले. उद्योजकतेचे शिक्षण दिले. चित्रकूट ग्रामोद्योग विश्वविद्यालयाची स्थापना केली. हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ होय.
गावातील वस्तू व सेवांचा मागणी आणि पुरवठा हा त्याच भागातून व्हावा अशा योजना आखल्या. जनतेला आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. त्यातूनही जे आजारी पडतील त्यांना लागणारी औषधे त्याच भागात निर्माण केली. आरोग्यधाम योजना सुरू केली. आयुर्वेदिक वनस्पती संशोधन संस्था सुरु केली. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ सुरु केले. शालेय शिक्षण गुरुकुल पद्धतीने सुरू केले. गुरुकुल पद्धतीने आश्रमशाळा काढल्या. ग्रंथालय काढून मुलांना तिकडे वळविण्यात ते यशस्वी झाले. मातृसरन सुरु करून स्त्री शिक्षणाचा प्रसार सुरु केला. स्त्रियांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. शुद्ध बोलायचे कसे हे शिकविले. गृहउद्योगाचे प्रशिक्षण दिले. यामुळे स्त्रियांमधील आत्मविश्वास वाढला. धार्मिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गाव ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखविली.
सन 1990 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यसभेवरही त्यांची नेमणूक झाली होती. तरीही ती सारी सत्तास्थाने झुगारून देऊन त्यांनी ग्रामसुधारणांच्या कामाचा धडाका लावला.
समाजसेवी कामासाठी समाजसेवी वृत्तीची माणसे लागतात. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतातून कार्यकर्ते गोळा केले. घरापासून दूर एकटे फार काळ समाजसेवेसाठी राहणे जरा कठीण होते. त्यावर उपाय म्हणून समाजसेवी दाम्पत्यांना आमंत्रित केले. त्यांना प्रशिक्षण देऊन समाजशिल्पी बनविले. समाज प्रबोधन केले. 80 खेड्यातील लोकांनी 60% खटले मागे घेतले. एकोप्याची भावना वृद्धिंगत केली.
मध्यप्रदेशातील ही यशस्वी योजना भारतभर राबविण्यासाठी दीनदयाळ शोध संस्थान या संस्थेमार्फत भारतातील सर्वात मागास जिल्ह्यामध्ये काम सुरु केले. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे गुरुकुल सुरु केले. आरोग्य शिक्षण, कृषीविकास, योगाभ्यास, कलांचे शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण असे काम आजही चालते. सरकारी योजना आणि स्थानिक लोकांचा सहभाग असा मेळ घातला जातो. आज जर निःस्वार्थी समाजसेवक तयार करायचे असतील तर त्यांना नानाजी देशमुखांचे कार्य समजावून सांगायला हवं. त्यांना चित्रकूटला नेऊन तेथील यश दाखवायला हवं.
माणूस हा मर्त्य आहे पण तो अमर होतो हे त्याच्या सर्वसामान्यांसाठी निःस्वार्थपणे केलेल्या कार्यामुळे! नानाजी देशमुख यांचे निधन 27 फेब्रुवारी 2010 रोजी झाले परंतु आज ते अनेक गरीबांच्या उद्धारामुळे त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करून राहिले आहेत. अशा नानाजी देशमुखांना भारतरत्न मिळाल्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला आहे.
– प्राचार्य श्याम भुर्के
९४२२०३३५००
अतिशय प्रेरणादायी लेख…
नानाजींच्या उत्तुंग कार्याला सलाम!
आदरणीय नानाजी देशमुख यांच्यावरील प्रा.श्याम भुर्के सरांनी लिहीलेला अप्रतिम लेख वाचला . नानाजी देशमुख यांनी खरोखरच प्रचंड मोठे सामाजिक कार्य केले आहे . त्यांच्या कार्याचा सरांनी उत्तम आढावा घेतला आहे …
They are happiest who do most for the others या स्वामी विवेकानंदांच्या विचाराला कृतिशिलतेतून जोड देणारे उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय नानाजी देशमुख !! नानाजी आज शरीराने आमच्यात नसले तरी त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील . मरावे परि कीर्तीरूपे उरावे हेच खरे !!भुर्के सर अभिनंदन …लेख आवडला .