1990 ला मी जसा महिन्यातून एकदा चंद्रपूरला जायचो तसाच महिना-दीडमहिन्यातून एकदा नाशिक जवळील ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स ह्या मिग विमानांच्या कारखान्यात जात असे. आमच्या कंपनीला हिंदुस्थान एरोनॉटिक्स (एचएएल) ह्या कंपनीचे त्यांच्या विमानांच्या सुट्या भागांच्या रासायनिक प्रक्रिया करायच्या टाक्या बनवण्याचे व बसवण्याचे कंत्राट मिळालेले होते. त्यामुळे मला ओझर येथील एचएएलच्या कारखान्यात जावे लागायचे. मला माझ्या कंपनीने ह्या कामासाठी मोठ्या विश्वासाने मुखत्यारपत्र देऊन माझी ह्या प्रकल्पाचा मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक केलेली होती व माझ्यावर ह्या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी टाकलेली होती. माझ्या आयुष्यातला हा खूप अभिमानाचा क्षण होता, जो मी आयुष्यात कधी विसरूच शकत नाही.
ह्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, आमच्या आकुर्डीच्या कारखान्यात वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करण्याच्या विविध आकाराच्या, लोखंडी व त्यावर शिश्याचा लेप असलेल्या, तसेच काही फायबर ग्लासच्या टाक्या तयार केल्या जायच्या व त्या ह्या ओझरच्या कारखान्यात नेऊन बसवल्या जायच्या. त्यासाठी आधी एचएएलकडून आलेल्या रेखाचित्रावर आमच्याकडील आरेखन तज्ज्ञांच्या चर्चा घडवून आणायच्या, त्याचे सगळे सोपस्कार एचएएलच्या नियमाने करून घ्यायचे व त्यांच्या आरेखन विभागाची रीतसर कागदोपत्री संमती मिळवायची. ही संमती मिळवली की आमच्या कारखान्यात ह्या टाक्या बनवण्यास प्रत्यक्ष कामाला सुरवात व्हायची. ह्या टाक्या बनवत असताना वेगवेगळ्या वेळी (कंत्राटात ठरल्याप्रमाणे) एचएएलच्या अधिकार्यांना ओझरहून आमच्या आकुर्डीच्या कारखान्यात आणणे, त्यांची राहण्या, खाण्याची व्यवस्था करणे, टाक्यांची गुणवत्ता तपासणी करून झाल्यावर त्यांना परत ओझरला पोहचवणे हे सगळे मलाच करावे लागायचे. अर्थात ती माझी जबाबदारीच होती म्हणा!
पुन्हा एकदा अंतिम गुणवत्ता तपासणीसाठी काही अधिकार्यांना आकुर्डीला आणावे लागायचे. गुणवत्ता तपासणीतून पास झाल्यावर आमचे 60% काम पूर्ण व्हायचे. हे काम पूर्ण झाल्याचा अहवाल भरून त्यावर ह्या अधिकार्यांची सही-शिक्का घेऊन त्याला आमच्या कामाचे 60% चे बिल तयार करून घेऊन ते ओझरच्या कारखान्यात लेखा विभागात जमा करायला जायचे. लेखा विभागात हे बिल जमा करायच्या आधी तीन ते चार वेगवेगळ्या विभांगामध्ये जाऊन त्यांच्या संमतीच्या सह्या व शिक्के घेणेही जरुरी असायचे. हे करताना कधी कधी दोन दिवस तर कधी कधी तीन-चार दिवसही लागत असत. शेवटी ते त्या त्या विभागातील अधिकार्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असायचे. त्यांच्या समंतीनंतरच हे बिल लेखा विभागात घेतले जायचे. एकदा का ते जमा केले की ते पुढे लेखा-परीक्षा विभागाकडे सुपूर्द व्हायचे. अर्थात हे सगळे त्यांचे अंतर्गत काम असायचे पण मी निर्माण केलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे मला आमच्या बिलाचा लेखा विभाग ते धनादेश पर्यंतचा सर्व प्रवास सुरळीत पार पडायचा. जर का कुठे अडथळा आला असेल तर तो मला तत्काळ समजण्याची सोय होती व आलेला अडथळा पार करण्याची सोयही होती. अर्थात त्यासाठी मी कारखान्याच्या समोरच्याच बाजूला असलेल्या अधिकारी वर्गाच्या वसाहतीत आपुलकीची आणि जिव्हाळ्याची एक चक्कर नक्की मारलेली असायचीच. साधारणपणे हे 60% पैसे, बिल जमा केल्यापासून 15 दिवसांमध्ये आम्हाला मिळून जायचे.
हे झाले 60% कामाचे. त्यानंतर खरी मजा असायची. ह्या तयार टाक्या ट्रकने ओझरला न्यायच्या. त्याच्यासाठी ओझर कारखान्यातून त्या आत घेण्यासाठीची परवानगी घ्यावी लागायची, कारण ह्या टाक्या आकाराने मोठ्या म्हणजे 9-10 फूट व्यासाच्या व वजनाने खूप जड म्हणजे 3-4 टन असायच्या. त्यांच्या सुट्टीच्या दिवशीच रविवारीच ही परवानगी मिळायची व ती सुद्धा काही तासांचीच असायची. त्या दिलेल्या नियोजित वेळेतच आम्हाला ह्या टाक्या ट्रकमधून उतरवून त्यांनी ठरवून दिलेल्या रासायनिक प्रक्रियेच्या गाळ्यात त्या नेऊन ठेवाव्या लागायच्या. ह्या कामासाठी क्रेन आणि जवळच्या गावातील काही माथाडी कामगार लागायचे व ह्या सगळ्याची पूर्वपरवानगी त्यांची सुरक्षारक्षक चाचणी वगैरे सर्व सोपस्कार मला योग्य वेळात पूर्ण करून ठेवावे लागायचे. परत एकदा सगळे सोपस्कार म्हणजे टाक्या मिळायची पोच, त्या बसवल्याचे पत्र व गुणवत्ता चाचणीत पास झाल्याचे पत्र हे सगळे मिळावयाचे. हे सगळे बाड घेऊन परत आकुर्डीला यायचे. उरलेल्या 40% रकमेचे बिल बनवायचे व 60% बिलाच्या वेळेस केलेले सगळे सोपस्कार पुन्हा एकदा करायचे व ओझरला जाऊन बिल जमा करायचे आणि पैसे मिळवायचे. उगाच नव्हते काही मला मुखत्यारपत्र दिले होते ते!
ह्या सगळ्यात माझी फार शारीरिक आणि मानसिक दमणूक व्हायची. त्याचे कारण ह्या ओझरच्या कारखान्यात एका विभागातून दुसर्या विभागात फिरायचे म्हणजे पायाचे तुकडे पडायचे. अहो, विचार करा मिग विमानांच्या सुट्ट्या भागांची जुळवाजुळाव करून ते बनवण्याचा तसेच तयार झालेल्या व वापरात असलेल्या ह्या मिग 21 विमानांची देखभाल करण्याचा हा कारखाना म्हणजे अजस्त्र प्रकरण होते. त्यात त्यांचा स्वत:चा एअर पोर्टही आहे हो. एक ते दोन किलोमीटर अंतरावर एक एक विभाग होता व त्याच्या त्या अवाढव्य शेडस. असे किती तरी न मोजता येणारे विभाग होते ते मला आता आठवतही नाहीत. येथील निम्नअधिकारी वर्ग मात्र आतमधील प्रवासासाठी लम्ब्रेटा नावाची स्कूटर तर उच्चवर्गीय अधिकारी जीप वापरत असत. नशीब फळफळले तर माझी ही पायपीट वाचायची, तर कधी कधी त्यांच्या कँटीनमध्ये जेवणाचा आस्वादही घेता यायचा.
एक सांगतो, ह्या काळात मी ओझरच्या ह्या कारखान्यात शेकड्याने रशियन बनावटीची मिग 21 विमाने पहिली आहेत. कधी कधी तर ती जीपला आकडी लावून एका विभागातून दुसर्या विभागात नेताना सुद्धा पहिली आहेत. आकाशात आवाजाच्या दुप्पट तिप्पट वेगाने धावणारे हे विमान असे ह्या कारखान्यात अगदी आपल्या खेळातल्या विमानासारखे भासायचे. मला कामानिमित्ताने मिग 21 चे कॉकपिट अगदी जवळून पहायची संधी मिळायची. दरवेळेस मी धन्य होऊन मनातल्या मनात मिग 21 मधून एक भरारी मारून यायचो. मला खरं तर माझ्या शाळेतील आठवी-नववीचे ते दिवस आठवायचे जेव्हा मी शाळेतल्या एनसीसीत होतो आणि एअरफोर्सचा कॅडेट होतो ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझ्या उंचीने मार खाल्ला हो, नाही तर आज मी नक्की एअरफोर्समध्ये वैमानिक होऊन खरेखुरे मिग 21 उडवले असते, कागदी नव्हे! काही गोष्टी घडायला नशीब तर असायला लागतेच पण कर्तृत्वही तेवढेच महत्त्वाचे असते!
ह्या ओझरच्या कारखान्यात जाण्याचा मला कधी कंटाळा आलाच नाही. तसाही मला माझ्या कामाचा कधीच कंटाळा येत नाही. नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे व नेटाने करणे हा तर माझा मूळ स्वभावच आहे.
मी पुण्यातून सर्वात शेवटच्या म्हणजे रात्री 11.30 च्या एशियाडने नाशिकला जात असे. जी भल्या पहाटे कधी 4 तर कधी 5 वाजता नाशिकला पोहचवत असे. नाशिक एसटी स्थानकात उतरले की समोरच चालत अंतरावर ‘बसेरा’ नावाचे जरा चांगले लॉज आहे. तिथे कधीही गेले तरी मला एक खोली नेहमी मिळायची. सामान टाकायचे. एक तासभर झोप काढायची. प्रवासाचा व जागरणाचा शीण घालवायचा. सकाळी 7 वाजता उठून, आवरून, नाष्टा, चहा उरकून पुन्हा नाशिक बसस्थानकात यायचे. येथून सकाळी दर अर्ध्या तासाने ओझरला जाणारी बस असायची. मिळेल ती बस (लालडबा) पकडायची आणि तासाभरात ओझरला पोहोचायचे. एक मात्र आहे की ह्या गाड्यांना कायमच खूप गर्दी असायची व त्यात प्रवेश मिळवणे महाकठीण असायचे पण मला तर आत इतक्या वर्षांनी ह्या सगळ्याची सवयच झालेली होती व हे सगळे इतके अंगवळणी पडले होते की, गर्दी नसेल तरच चुकल्यासारखे वाटायचे. कधी कधी एका दिवसात काम व्हायचे तर कधी तीन ते चार दिवसही लागयचे. तेव्हा बर्याच वेळेचा माझा ‘सवेरा’ ह्या ‘बसेरा’तच व्हायचा आणि आमची स्वारी कायमच स्वप्नवत मिग 21 च्या भरारीतून जमिनीवर यायची!
रविंद्र कामठे
पुणे
9822404330
घनश्याम सर. मला अनुभवाची शिदोरी हे सदर लिहिण्याची संधी देवून माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकलीत त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक धन्यवाद. व्यक्त होण्याची आणि सतत लिहित राहण्याची ही एक उत्तम योजना माझ्यातल्या साहित्यिकास फार मोलाची साथ देते आहे व मला रोज काहीतरी नवीन लिहिण्यास उद्युक्त करते आहे ह्याचे सगळे श्रेय तुम्हांला आहे व तुमच्या ह्या संकल्पनेला आहे. पुन्हा एका आभार.
रविंद्र कामठे.