आठवणींची मोरपिसं

आठवणींची मोरपिसं

Share this post on:

सारा निसर्गच जणू रंगांनी भरलाय नि भारलायही. रंगांची ही जादू मनाला भुरळ घालते. नेत्रांना एक सुखद जाणीव देते. सारा निसर्ग हिरव्या रंगाची जादू तर करतोच पण त्याचबरोबर तो इतर अनेक रंगांची निर्मितीही करतो. मग ते उडते चमत्कार असतील, निळं पाणी असेल, रंगीत मासे असतील! सारी रंगांची तर दुनिया! या सार्‍या रंगांच मिश्रण असलेला एक अद्भुत पक्ष्यी इथं आहे आणि त्या पक्ष्याचं तरल, मऊ, मुलायम पीस आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे. मोरपीस!

खूप खूप वर्ष मागे गेलात ना अगदी बालपणात, तर आठवेल किती कौतुकानं, आवडीनं ते मोरपीस आपण पुस्तकात ठेवलं होतं. आपल्या बालविश्वाचं ते एक मोठं आकर्षण होतं. थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरापासून तारुण्यातल्या राधा-मोहन कथेपर्यंत, हे पीस पाठलाग करत राहतं. त्याचे रंग, त्या पिसातला तो गूढ डोळा, तो हळूवार स्पर्श सारं सारं आठवत राहतं. जसं जसं वय वाढलं, तसं त्या रंगांचं कुतूहल वाढत गेलं.

बाहेरुन आत गडद होत जाणार्‍या त्या रंगछटा पाहताना, ते रंग मनाला सुखवायचे. त्या मोरपिसातलं ते वलय गूढ वाटायचं. त्याच्याजवळ जाताना ते अधिकच खोल व्हायचं! मनाच्या त्या तरल भावनांना जणू ते सुखवायचं. लहानपणी ना एक समजूत होती. अभ्यासाच्या पुस्तकात मोरपिस ठेवलं ना की अभ्यास सुकर होतो. किती हळवं नि भाबडं असतं ना आपलं बालपण? अविश्वास हा शब्दच नव्हता कोषात. कोणी काही सांगतंय ते भल्यासाठीच हे मनावर ठसलं होतं. मग कुठून तरी प्रयत्नांती ते मोरपिस मिळवायचं. मिळवण्यातला आनंद अवर्णनीय असायचा. भाषा आवडीची. मग त्यात त्याची मनोभावे स्थापना व्हायची, मनातल्या मनात एक छानसा नमस्कार व्हायचा आणि शाळेचा तास सुरु व्हायचा.

मोरपिसाशी संबंधीत दोन व्यक्ती कधी कधी त्या बालवयात समोर यायच्या. एक म्हणजे उजाडताना येणारा वासुदेव आणि दुसरा हिरवी कफनी घातलेला, गूढ वाटणारा, अगदी तिन्हीसांजेला आठवड्यातून एकदा हजेरी लावणारा तो फकीर! सकाळची प्रसन्न वेळ आणि मोरपिसाची टोपी घालून येणारा वासुदेव लक्षात रहायचा, तो त्याच्या त्या खणखणीत आवाजातील लयकारी शब्दांमुळे. तर आवडायचा त्याच्या डोक्यावरील मोरपिसाच्या टोपीमुळे. त्यातील भरपूर मोरपिसे पाहून मन आनंदवन जायचं. फकीर मात्र गुढता वाढवायचा. त्याच्या डाव्या हातातलं ते धुपाच भांडं. उजव्या हातातला मोरपिसाचा जुडगा आणि गंभीर वाटणारी ती हाक अजून आठवते. पैसे त्याच्या भांड्यात पडले, की तो मोरपिसांचा जुडगा डोक्यावर हलकेच आपटायचा अन् मग तो मोरपिसांचा स्पर्श जाणवायचा. ही आठवणीतील मोरपिसं!

तसाच आठवतो तो देव, तो नटखट कान्हा! मोरपिस लेवून जणू जन्मलेला. अलगूज आणि मोरपिस, या शिवाय कान्हा पूर्ण होऊच शकत नाही! कृष्णाला मोरपिसाचं आकर्षण का वाटावं, हे त्यालाच माहीत पण तर्क करायचा तर मोरपिसाचे ते एकमेकात मिसळलेले रंग जणू जीवनाची भगवतगीताच सांगतात.. जीवन कधी गडद, कधी फिकट, कधी चकाकतं पण हे सगळे रंग एकत्रित झाले, की त्याचं मोरपिस होतं.. आणि म्हणूनच कृष्णाने ते शिरी बाळगलं असावं. एक संदेश देणारं मोरपिस! मोरपिस घरात ठेवण्याचे फायदेही सांगितले जातात पण तो आपल्या श्रद्धेचा, विश्वासाचा भाग असतो.

ज्याच्या स्पर्शाने मन प्रफुल्लीत होईल, मनावर सुखाचे तरंग उठतील अशा एका मोरपिसाची आपल्याला पण गरज असते जे कायम सुखाचा शिडकावा करील! काही माणसं, त्यांच्या आठवणी अशाच मोरपिस होऊन मनाशी खेळत बसतात उसंत मिळाली की!

नीता जयवंत
अंबरनाथ
9637749790

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!