शिशिरातील पानगळी पाठोपाठ नवांकुरांसाठी अवकाश निर्माण होते. फांद्याफांद्यावर पानांचे नवे कोंब दिसायला लागतात. एरवी बोचणारी थंडी जरा कमी होऊ लागते. वातावरण उबदार होते. थंडीने आखडलेले शरीर देखील हळूहळू मोकळे व्हायला लागते. धमन्यांमधून रक्ताच्या रुपाने वाहणारा जीवनरस वसंतऋतुच्या आगमनाबरोबर मनालाही प्रफुल्लित करतो. त्यातच भर पडते ती वसंतऋतुमधे फुलणार्या निरनिराळ्या रंगीबेरंगी फुलांची. निसर्गातील हा रंगोत्सव, आनंदाचा संदेश घेऊन येतो. आपल्या ‘आरोग्यतरंग’ या सदराची सुरुवात मार्च 2018 मधे वसंत ऋतुच्या स्वागताने झाली. वर्षभरात आपण वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या सहा ऋतुत मानवी शरीराचा निसर्गाशी असलेला संबंध आणि आपले आरोग्य यांचा विचार केला. व्यायाम, उपवास, डाएट या विषयांवरही चर्चा केली. कामगारांच्या आरोग्यविषयी बोललो. हे सर्व लिहिताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. शेवटी आपले स्वतःचे आरोग्य राखायचे असेल तर मनही तेवढेच सुदृढ हवे. मन आनंदी असेल तरच शरीरात आरोग्यतरंग निर्माण होतात.
इ.स.पूर्व काळात निर्माण झालेल्या चरकसंहितेमध्ये चरकाचर्य म्हणतात, ‘विषादो रोगवर्धनाम्… (अग्य्रम्)। म्हणजे कोणत्याही शारीरिक वा मानसिक रोग ज्या कारणांनी वाढतो त्या कारणांमध्ये ‘विषाद’ म्हणजे खेद-दुःखः शोक वशिीशीीळेप हे सगळ्यात वरचढ कारण आहे. थोडक्यात काय तर केवळ मानसिकच नाही तर शारीरव्याधी देखील ‘विषाद’ या मानसिक कारणामुळे बळावतो. दीर्घकाळ जर मन दुःखी असेल अगदी कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह यासारख्या व्याधींना आमंत्रण देते. मन दुःखी असेल तर शरीरामध्ये काही हानिकारक रसायने तयार होतात व शरीरातील पेशींवर हल्ला चढवतात. शरीर अवयवांना ती दुर्बल बनवतात. हे आता विज्ञानाने सिद्ध केले आहे. आयुर्वेदाने मनाचा खूप सखोल विचार केला आहे. रोगांचे वर्गीकरणच मुळात शरीर आणि मानस या दोन प्रकारात केले आहे. मानसिक कारणांमुळे शरीर रोग बळावतात व शरीररोगांमुळे मानसिक रोगाची उत्पत्ती होते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य आपल्या पूर्वसुरींनी 3000 वर्षांपूर्वी अधोरेखित केले आहे. (आधुनिक विज्ञानाने मानसशास्त्राचा विचार गेल्या 2-3 दशकांपासूनच करायला सुरुवात केली आहे.) आधुनिक शास्त्र ‘मन’ हा वेगळा घटक मानायला तयार नव्हतं तेव्हा साधुसंतांनी लिहिलेलं मानसशास्त्र हे परमोच्च अवस्थेला पोहोचलं होतं आणि त्यानेच भारतीय मनांना आत्तापर्यंत तारलं आहे. सुखाची दिशा दिली आहे.
तर या मनाचे पोषण कसे होते? आपण दैनदिंन जीवनात जे अन्न खातो त्याच्यामुळे. आश्चर्य वाटलं ना? विचार करा… सात्विक अन्न खा, ताजे अन्न खा, संस्कारीत अन्न खा असे का म्हणतात तिखट, झणझणीत, मसालेदार पदार्थ खाल्ल्यावर आक्रमकता का येते? गोडधोडाचे जेवण जेवल्यावर मनाला सुस्ती का येते? शरीर खूप थकलेले असताना, किंवा भर उन्हातून आल्यावर वाळा घातलेले माठातील पाणी किंवा कैरीचे पन्हे शरीराबरोबर मनालाही तरतरी का आणते? एखाद्या नावडत्या किंवा नासलेल्या, आंबूस वास येणार्या पदार्थामुळे उद्वेग का निर्माण होतो? (शेवटी उद्वेग मनाचाच गुणधर्म आहे ना!) याचाच अर्थ असा की, आपण खाऊ ते अन्न मनाचेही पोषण करत असते. जसे सुविचार, ज्ञान, सज्जन व्यक्तींचा सहवास, उत्तम साहित्य हे मनावर संस्कार करत असतात तसेच अन्न देखील मन घडवत असते आणि म्हणूनच वदनी कवल घेताना त्या श्रीहरीचे नामस्मरण करण्याची आपली प्रथा आहे. जेणेकरून प्रसन्न मनाने ग्रहण केलेले अन्न शरीर व मन दोहोंचे पोषण करेल.
आयुर्वेद शास्त्राने आहारविधी जो वर्णन केला आहे त्यामध्ये ताजे अन्न खावे, गरम खावे इ. सूचनांबरोबरच ‘तन्मना भुजीत’ म्हणजे मन लावून एकाग्र चित्ताने जेवावे असे सांगितले आहे. आजच्या घाईगर्दीच्या काळात भराभर, अन्न व्यवस्थित चावून न खाता, फोनवर बोलताना, टीव्ही पाहताना किंवा बर्याच वेळा उभ्या उभ्या अन्न प्राशन केले जाते. असे कधीतरी नाही तर वारंवार होताना दिसते. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये दिसणारी आक्रमकता, वैफल्य, गोंधळ, असमाधान, अस्वस्थता याची संगती लावता येते.
मन हे पंचज्ञानेंद्रियांशी व पंच कर्मेद्रियांशी संलग्न आहे. म्हणजे काय? तर आपल्या नाक, कान, जीभ, त्वचा आणि डोळ्यांद्वारे मन हे ज्ञानग्रहण करते. त्यावर साधक बाधक विचार करते. त्यानंतर बुद्धीच्या जोरावर योग्य-अयोग्य निर्णय घेतला जातो. त्यानंतर मनाच्या माध्यमातून कर्मेंद्रियांना म्हणजे हात-पाय-जिहवा (वाणी) इ.ना वेगवेगळी कर्मे करण्याचा आदेश मिळतो. अशा प्रकारे मन हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दोहोंची भूमिका पार पाडत असल्याने त्याला ‘उभयात्मक इंद्रिय’ असे म्हटले आहे. बर्याच वेळा बुद्धीला एखादी गोष्ट पटलेली असते परंतु मनाला प्रेरणा मिळाल्याशिवाय ती गोष्ट हातून घडत नाही. रोज व्यायाम करणे आवश्यक आहे, खाताना तोंडावर ताबा ठेवायला हवा, व्यसने करणे वाईट असते हे बुद्धीला पटलेले असते पण… कळतं पण वळत नाही. योग्य गोष्टींकडे वळायला शेवटी मनालाच वळवता आलं पाहिजे ना! मग कसं वळवायचं मनाला? याचेही उत्तर आयुर्वेदाने दिले आहे. ‘‘धी-धैर्य-आत्मादि विज्ञान…!’’ म्हणजे बुद्धीमधे उहापोह करण्याची शक्ती वाढवायची. त्यासाठी ज्ञान मिळवायचे चांगल्या-वाईट परिणामांची कल्पना मनात रुजवायची. आपोआपच धैर्य अंगी बाणवले जाते. मनोनिग्रहाची सवय करून घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सतत स्वतःचा शोध घ्यायचा! मी कोण आहे? माझी पात्रता काय आहे? कोणत्या गोष्टींमुळे मी दीर्घकाळ खराखुरा आनंदी व समाधानी राहू शकेन हे आपले आपण जाणून घ्यायचे. चिंतन करणे, बर्यावाईटाचा उहापोह करणे, त्यावरून ध्येयनिश्चिती करणे व त्यानंतर एखादी कृती करण्याचा संकल्प करणे. चित्यं-विचार्यं-उहयं-ध्येयं-संकल्प या मनाच्या 5 शक्ती आहेत. याचा पुरेपूर उपयोग करून घेऊ या!
आता एखाद्याला वाटेल, आरोग्याविषयी सल्ले देण्याऐवजी ही सर्व चर्चा तत्त्वज्ञानाकडेच वळत आहे! परंतु शेवटी आरोग्य तरी कशावर अवलंबून आहे? मनोनिग्रहावर आणि आनंदी मनावरच ना? आरोग्य तरी कशासाठी राखायचे? व्याधींना दूर ठेवण्यासाठी. मिळालेल्या शरीराचा सदुपयोग करण्यासाठी.
आनंदी जीवन जगण्यासाठी आणि खरं म्हटलं तर आपल्या या देहावर खरोखरच आपला अधिकार असतो का? मला वाटतं की हा देह म्हणजे आयुष्यात निरनिराळी कर्मे करण्यासाठी परमेश्वराने काही काळापुरती दिलेली देणगी आहे. त्या देणगीचा रास्त उपयोग करता यावा यासाठी त्याचा संभाळ करणे हे आपलं कर्तव्यच नाही का? शेवटी त्याच्याच तर माध्यमातून आपण आपल्या आयुष्यात वसंतोत्सव साजरा करू शकतो. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे आपली संस्कृती आपल्याला सांगते. असे हजारो-लाखो वाल्मिकी समाजात तयार झाले… नव्हे समाजच वाल्मिकीमय झाला नाही. त्याची सुरुवात मात्र होईल मनामनातील वसंतोत्सवामधून!
ज्योति शिरोडकर
एम. डी, पीएच. डी (आयुर्वेद)
चलभाष – 9822352497
Very nice ??
As usual loved reading it?