पुलवामा -विनम्र अभिवादन

पुलवामा-विनम्र-अभिवादन

14 फेब्रुवारी. साधारण दुपारची वेळ. सी. आर. पी. एफ.च्या ताफ्यावर एक अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असा आत्मघातकी हल्ला झाला आणि त्यात भारतीय सैन्याचे 44 जवान शहीद झाले.

बातमी सोशल मीडियावर वार्‍याच्या वेगाने पसरली. दृश्ये तर काळजाचा थरकाप उडवणारी होती.

मन सुन्न करणारी घटना! देश सूडाच्या भावनेने पेटून उठलाय, सर्वांना उत्तर हवंय. सूड घ्या, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करा अशा संतप्त प्रतिक्रियांनी जोर धरलाय.

पण त्याने प्रश्न खरेच सुटतील का?

आम्ही आज सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांना पुन्हा एकदा कंठस्नान घालू, उद्या पुन्हा नवीन संघटना, नवीन संघ तयार होतील आणि पुन्हा नवीन हिंसाचाराला सज्ज.

याची पाळेमुळे शोधून काढून नष्ट करायला हवीत. 200 किलो हून अधिक स्फोटके, एका कारमध्ये बाळगून सुट्टीवरुन कामावर रुजू होण्यास जात असलेल्या सैनिकांच्या ताफ्यावर वेळ साधून निशाणा साधणे, ही बाब स्थानिकांच्या मदतीशिवाय साध्य झाली असेल का?

दहाशतवादाला खतपाणी घालणारे, नव्हे मला तर वाटते, खुद्द दहशतवादी स्वतः जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकांच्या वेशात ठाण मांडून बसले आहेत. त्यांचा शोध घेऊन, त्यांच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करायला हवा, पण देशात लोकशाही असल्याने नियमांची/कायद्यांची बंधने कायम आड येतात.

कुठून येते ही विकृती जन्माला, जिथे साधारण वीस-पंचवीसीतले सुशिक्षित तरुण, जगण्याची आस सोडून जिहादच्या नावाखाली आत्मघात करायला तयार होतात. उरीमधील आमच्या निद्रिस्त व बेसावध सैनिक बांधवांवर हल्ला करून वा स्फोटाकांनी भरलेल्या वाहनाद्वारे अशाप्रकारे भ्याड हल्ला करून कसली जन्नत यांना नसीब होत असेल हे तो एक परमेश्वरच जाणो.

शहिद जवानांच्या घरावर आज शोककळा पसरली आहे. कुणाची आई, कुणाची पत्नी, कुणाची मुले, दुःखाचा हंबरडा फोडत, पाणावलेल्या नजरेने आपल्या स्वकियांचे निदान अंतिम दर्शन तरी होईल या खोट्या आशेने पार्थिवाच्या प्रतिक्षेत आहेत. हल्ल्याची भीषणता पाहता कित्येकांची तीही इच्छा अपुरिच राहणार.

आज देश सुन्न आहे. शोक, नाराजी, अश्रू आणि सूडभावना अशा संमिश्र प्रतिसादाने.

यावर सरकारची प्रतिबंधात्मक कार्यवाही काय असेल कुणास ठाउक! पण रवीन्द्र भटांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेले हे गीत आठवल्याशिवाय राहत नाही.

उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला,
सशस्त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो
युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला
वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला
चंद्रगुप्त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला
यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला!
सर्व शहिद जवानांना विनम्र अभिवादन!

– रेणुका व्यास, पुणे
८३७८९९५५३५

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा