प्रकाशनविश्वाला संजीवनी

प्रकाशनविश्वाला संजीवनी

Share this post on:

मराठी प्रकाशनविश्वावर सध्या मरगळ आली असल्याने हजाराची आवृत्ती पाचशेवर आणण्याची, नव्या लेखकांना संधी न देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे एकुण पुस्तक प्रकाशन संख्याही मर्यादित होण्याचा धोका उभा ठाकला आहे. किंबहुना प्रकाशकांनीच निरुत्साही धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. बरे, असा निरुत्साह दाखवणारे प्रकाशक आजच उगवताहेत असे नाही. पंचविसेक वर्षांपूर्वी ’श्रीविद्या’च्या मधुकाकांनीही ‘तीनशेच्या वर आवृत्ती विकली जाणे अशक्य झाले आहे,’ अशा स्वरुपाची मुलाखत वृत्तपत्रांत दिली होती. सरकारी पुस्तक खरेदी आणि टेंडर्स यात यश मिळवण्यात पटाईत झालेल्या प्रकाशकांना आवृत्ती बाजारात विकली जाते की नाही याच्याशी काही घेणेदेणे नसल्याने पुस्तकाचा साहित्यिक अथवा माहितीपर दर्जा सांभाळण्याचीही गरज पडत नाही. कारण ही पुस्तके शेवटी गोदामातच धूळ खात पडत उंदीर-घुशींच्याच उदरभरणाची सोय करणार हे माहितच असते. दहा कोटींच्या मराठी भाषकांच्या राज्यात हजाराही आवृत्ती जेमतेम खपावी आणि तीही आता खपत नाही म्हणून आवृत्तीच कमी पुस्तकांची करावी लागावी हे साहित्यरसिकांसाठी काही भूषणावह म्हणता येणार नाही! पण याला जबाबदार वाचक अहेत की निरुत्साही प्रकाशक याचाही विचार करणे गरजेचे आहे. कारण पुस्तकनिर्मिती करणारेच निर्मिती आणि वितरण या आघाडीवर अपयशी ठरत असतील, त्यांच्या कार्यात जोम आणि उत्साह नसेल तर वाचकांनी उत्साहाने त्यांच्या पुस्तकांकडे का वळावे हाही प्रश्न निर्माण होईल.

या प्रश्नाचे उत्तर काय तर तरुण आणि जोम-उत्साहाने यंदाच्या वर्षी दिवसाला एक याप्रमाणे तब्बल 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा ‘चपराक प्रकाशना’चे घनशाम पाटील यांनी हाती घेतलेला विक्रम घडवणारा प्रकल्प. बाजारपेठच नसेल तर एवढा मोठा महत्त्वाकांक्षी, प्रचंड गुंतवणुकीचा प्रकल्प कोणीही हाती घेणार नाही हे उघड आहे. बरे, या पुस्तकांचे लेखक म्हणजे जुन्या-नव्याचा संगम आहे. म्हणजे नवोदितांना स्थान दिले तर आपले व्यावसायिक गणित कोलमडेल अशी व्यावहारिक भीतीही घनश्याम पाटील यांना शिवलेली दिसत नाही. मग बाकी प्रकाशक जी निरुत्साही आणि निराशावादी भाषा करतात ती खरी का खोटी हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

बरे, पाटील हे नुसते पुस्तक प्रकाशक नाहीत; ते साप्ताहिक चपराक तर चालवतातच पण साहित्य चपराक हे मासिकही गेली 15-16 वर्ष नियमितपणे आणि यशस्वीपणे चालवत आहेत. एकीकडे भली-भली मासिके बंदची पाटी लावून मोकळे होताहेत तर काही त्या वाटेवर आहेत. मग ही मासिके बंद पडली त्याला वाचक जबाबदार आहेत की स्वत: अव्यावसायिक असलेले, नव्या पिढीची साहित्यिक भूक भागवण्यात अपयशी ठरलेले संपादक/प्रकाशक? प्रकाशन बंद पडले की हमखास वाचकांवरच त्याचे खापर फोडण्यात ही मंडळी तरबेज झाली आहेत हे एक वास्तव आहे पण वाचक कमी झालेत काय? चांगले नवे लेखक खरेच आता दुर्मीळ झालेत काय? या प्रश्नांवर घनशाम पाटील यांच्याशी वेळोवेळी जी चर्चा झाली आहे ती सर्वांचेच डोळे उघडणारी आहे.

वाचक कमी झालेला नाही तर त्याच्या जागतिकीकरणाच्या काळातील वातावरणाने बदललेल्या सांस्कृतिक व साहित्यिक अभिरुची सकसपणे भागवणारे लेखन फारसे येत नाही ही खरी अडचण. असे लेखन करणार्‍या लेखकांना प्रस्थापित नाही म्हणून नाकारणारे प्रकाशक असल्याने ते वाचकांपर्यंत पोचण्याचा मार्ग बंद होतो. नवलेखकही वैतागून लेखनाचा तसा कष्टप्रद उद्योग थांबवून आपापल्या कामांना लागतो. जुने प्रस्थापित लेखक अजूनही त्यांच्याच जुन्या काळात अडकत आपल्या जुन्या यशांची आणि कथानकांची फिरवाफिरव करत लेखन देत राहतात. आधीच्या लेखनावर प्रेम करणारे वाचक मग हळूहळू दुरावत जातात आणि शेवटी त्या लेखकांना गुडबाय करतात. हे लेखक फक्त माध्यमांत आपले प्रसिद्धीवलय मिरवण्यात धन्यता मानत राहतात पण वाचक दूर जातो आणि नवेही काही मिळत नाही म्हणून पुस्तकांपासूनच दुरावत जातो. या चक्रव्यूहात वाचक अडकलेत आणि नवी दृष्टी असलेले प्रकाशक दुर्मीळ असल्याने तेही निराशेच्या गर्तेत अडकलेत.

घनशाम पाटील यांचा वर्षात 365 पुस्तके प्रकाशित करण्याचा उपक्रम या मरगळलेल्या वातावरणाला संजीवनी देणारा ठरतो. 365 पुस्तके वर्षात प्रकाशित करण्याचे आव्हान त्यांनी घेतले ती केवळ प्रकाशनांची संख्या वाढवण्यासाठी नाही. आजच्या वाचकाला प्रगल्भ करेल, जाणिवा विस्तारेल आणि साहित्यिक भान देईल अशाच पुस्तकांची निवड ते करत आले आहेत. जवळपास दीडशेहून अधिक पुस्तके त्यांनी तयार करुन ठेवलीत. त्यातील काही यंदा वर्षारंभीच प्रकाशितही झालेली आहेत. यामागे मागील त्यांची काही वर्षाची तपश्चर्या आहे. काव्य ते कादंबरी हे सर्व साहित्यप्रकारही त्यात सामील आहेत. जुने लेखक असले तरी त्यांच्याकडून साहित्य मिळवताना ते वर्तमानाशी सुसंगत असेल याचेही भान ठेवले आहे. नव्या लेखकांकडून उत्तम ते काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात ज्यामुळे मराठी प्रकाशनविश्वाची कोंडी झाली आहे ती फोडण्यासाठी योग्य ती दूरदृष्टी दाखवली आहे. ही पुस्तके इ-बुक आणि श्राव्य माध्यमातूनही प्रकाशित केली जाणार आहेत कारण आजची पिढी या नव्या वाचन-माध्यमांना सरावत चालली आहे. थोडक्यात एका तरुणाने तरुणांच्या साहित्यविषयक गरजा ओळखून हाती घेतलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे असे म्हणावे लागेल.

समस्या वाचक किंवा लेखक नसून स्वत: प्रकाशकच आहेत. प्रकाशकांनाच बदलावे लागेल नाहीतर त्यांना या व्यवसायातूनच बाहेर पडावे लागेल हा इशारा वाचकांनीच दिलेला आहे. या इशार्‍याला समजावून घेण्याची कुवत बव्हंशी प्रकाशकांत नाही. घनशाम पाटील यांनी तो ओळखून हा प्रकल्प हाती घेतला आहे तो अभिनंदनीय ठरतो तो यामुळेच!
(पूर्वप्रसिद्धी – दै. संचार, सोलापूर)

– संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक
९९६०९९१२०५

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!