सृष्टीत एकही पाण्याचा थेंब असा नाही की जो आज ना उद्या समुद्राला मिळणार नाही. अपूर्ण पूर्ण होतं, थेंब समुद्र होतो तसाच मनुष्यही परमेश्वर होतो.
तोच त्याचा स्वभाव आहे. फक्त बंधन सोडण्याची गरज आहे. तेवढाच अडथळा आहे. माणसाच्या देव होण्यात काहीच अडचण नाही. आम्हीच स्वतःच्या भोवताली एक लक्ष्मणरेषा आखून ठेवली आहे. आम्हीच तिच्याबाहेर पाऊल टाकत नाही. आम्हीच भिंती उभारल्या आहेत. ज्ञात गोष्टीतच आम्ही स्वतःला जखडून ठेवलंय. अज्ञात सतत हाकारतंय पण फक्त भीती वाटण्यामुळं आम्ही यात्रेवर निघतच नाही.
योग ही अज्ञाताची यात्रा आहे पण जो जाणण्यामुळे दमला आहे तोच अज्ञाताच्या यात्रेला निघतो. तुम्ही जे जाणलंत, तर परमात्म्यापर्यंत जाण्याचा प्रश्नच उरत नाही कारण परमात्मा तर तुम्हाला मिळालाच आहे. मन भरणं याचंच नाव तर परमात्मा मिळणं आहे.
पण आपलं मन भरत नाही. ते सदैव रिकामंच असतं. फक्त आशा वाटत राहते की आज भरेल, उद्या परवा… पण ही खोटी, पुरी न होणारी आश्वसनं-कधीच कोणाची पूर्ण झालेली नाहीत, होतही नाहीत.
काल मी एक लोकप्रिय गाणं ऐकत होतो. ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला…’ असे लोकच कधी जगात नव्हते की ज्यांना प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळालं. या जगात कोणीच तृप्त होत नाही.
असे लोकच कधी झाले नाहीत, ज्यांनी फुलं मागितली त्यांना काटेच मिळाले. या जगात काट्यांशिवाय काही नाहीच… दुरून फुलं दिसतात पण जवळ गेल्यावर पहावं तर ते काटेच असतात. जे मिळतं ते व्यर्थ ठरतं, जे मिळत नाही तेच आवडतं. अभावातच आकर्षण असतं.
ज्याला हे कळलं की इथं सुख मिळणं अशक्य आहे तोच योगाच्या यात्रेवर निघेल. संसारात सुख अशक्य आहे कारण संसाराचा अर्थच आहे बहिर्यात्रा! आपल्यापासून दूर, बाहेर जाणं. स्वतःपासून दूर जाऊन कोणाला कधीच सुख मिळणार नाही कारण स्वतःपासून दूर जाणं म्हणजे स्वार्थाविरुद्ध वागणं. स्वभाव हे सुख आहे, विभाव दुःख आहे. जेवढं तुम्ही स्वतःपासून दूर जाता-पद, पैसा, प्रतिष्ठा यात डुबता तेवढे जास्त दुःखी होता. संसार म्हणजे हे वृक्ष, चंद्रचांदण्या, नदी-पर्वत नाही तर मनाच्या बाहेर धावणं म्हणजे संसार. बहिर्यात्रा हा संसार, अंतर्यात्रा हा धर्म.
जर स्वतःच्या जगण्याकडे पाहिलंत, स्वतः विचार केलात तरच गोरखाचं म्हणणं समजेल. गोरखच नव्हे तर सगळ्याच मोठ्या लोकांचे शब्द उपयोगी पडत नाहीत. आपण आपलं आयुष्य पाहत नाही. अजून आशा जिवंत आहेत. लांबून पाणी हेलकावे घेत आहे असं वाटतं. असतं मृगजळ-जवळ गेलो तर हातही ओले होत नाहीत.
माणसाचं लक्ष नेहमी आहे त्याच्यावर नसतं, जे मिळत नाही त्याच्यावर असतं. आहे त्यात आपण अडकत नाही तर नाही त्यात आपण अडकलेले असतो. लोकांना वाटतं जवळ असलेल्या दहा हजारात आपण अडकलोत. खोटं! जे दहा लक्ष रुपये नाहीत पण नजर मात्र त्यात गुंतली आहे. त्या दहा लाखात आपण असतो.
जी बायको नांदते आहे तिच्यात आपण अडकत नाही. तिच्यापासून तर कधीच मुक्त झालोय. किती दिवस, किती वर्ष आपण तिला पाहिलंच नाही. दुसर्यांच्या बायका पुरुष पाहतात. आपण नाही त्याच्यात गुंतलोत. सद्गुरुचं कामचं जगावेगळं आहे. तुमच्याजवळ नाही ते तो हिसकावून घेतो आणि तुम्हाला तेच देतो जे तुमच्याजवळ आहे.
रामानं सीता गमावली – पण ती रावणामुळे नाही तर सुवर्णमृगाच्या मागे गेल्यामुळे. रावणानं सीताहरण केलं हे महत्त्वाचं नाही तर रामानं गमावली हे महत्त्वाचं आहे. सोन्याचं हरीण कधी असतं का? पण धनुष्यबाण उचलून गेला. जे होतं ते सोडून गेला आणि जे नसतं आणि पुढंही होणार नाही त्याच्या या गंगेला.
आपणही असंच सीतेला गमावलं आहे. सीता म्हणजे आपला आत्मा. तो आपल्याजवळच आहे पण आपण जातो मात्र पद, प्रतिष्ठा, पैसा, यश, गौरव यांच्यामागं.
हे सगळे पाण्यावरचे बुडबुडे आहेत. स्वप्न आहेत. आपण तसं मानतो म्हणूनच या गोष्टी मोठ्या वाटतात. जो मानत नाही तो हसेल.
जो माणूस पैशाच्या मागे लागला आहे, त्याला पैसा खराच वाटतो पण जो पैशाच्या मागे पळत नाही तो हसून म्हणेल ‘एवढ्या पैशाचं काय करणार? सगळं पडून तर राहील!’ पण पैशाच्या मागे असणार्याचे डोळे नशेत आहेत, जागे नाहीत. जो यातून जागा होणार नाही तो कधी स्वतःला ओळखणार नाही. स्वतःला जाणल्याशिवाय दुसरं सुख नाही. संगीत नाही. स्वतःला जाणणं हाच अमृताचा स्वाद.
गोरख म्हणतात – हे सम्राटांनो, ते तुम्हाला सम्राट म्हणतात. कारण तुम्ही आहात सम्राट! पण स्वतःलाच भिकारी समजून राहिला आहात. तुम्ही आहात मालक पण समजताय मात्र स्वतःला गुलाम.
थोड्या समजेच्या, जाणिवेच्या, बोधाच्या गोष्टी समजून घ्या. थोडा वेळ थांबून विचार करा. या सगळ्या गोष्टी माती, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश यांनी झालेल्या आहेत. त्या क्षणभंगुर आहेत. त्यानं दुःखंच मिळतात. तुम्ही जरा जे शाश्वत आहे ते शोधा ते तुमच्या हृदयातच दडलंय.
गोरखांनी सगळ्या आणि सगळ्यांच्या आयुष्याचं चिंतन फक्त चार शब्दांत मांडलंय.
पहिल्यांदा आपल्या मनाकडे परत या. हेच कन्व्हर्जन! बाहेरून आत येणं. हिंदुचा मुस्लिम, मुसलमानाचा ख्रिश्चन हे कन्व्हर्जन नव्हे.
दुसरं – शरीराचं व्यवस्थापन – शरीर हेच मंदीर आहे. पायर्या चढणं, दारातून आत शिरणं, मंडप-सभागृह, नंतर गर्भगृह-तसंच शरीर, मन, बुद्धी अहंकार ह्या सगळ्यानंतर आत्मा.
वाटेल ते खाऊ नका, देहाला पोटाला त्रास देऊ नका. उगाचच उपाशी राहू नका किंवा अति जेवू नका. काट्याकुट्यावर झोपू नका किंवा शेवरीच्या कापसाच्या गाद्या-उशा घेऊ नका. वाटेल ते ऐकू नका, डोळ्यांनी हिंसाचाराचे, मारझोड, खून-बलात्कार असे सिनेमे बघू नका.
म्हणूनच म्हणतात की – ‘भूखे पेट भजन न होई.’ गोपाल देह तृप्त असेल, अन्न, वस्त्र, निवारा असेल तरच भजनाला अर्थ आहे, तरच त्यात लक्ष लागेल.
जर तुमचं शरीर सुंदर, संगीतबद्ध, आरोग्यपूर्ण असेल तरच तुमची ओळख आत्म्याशी, चेतनेशी होईल. तुम्हाला त्याची झलक मिळेल. उदास, रडत, भुकेले असे तुम्ही मंदिरात प्रवेश करू शकणार नाही आणि देह तृप्त असेल, मनाचा भाव परिपूर्ण असेल तर आत्म्याची, देवाची प्रचिती येईलच येईल. याची खात्री त्याच्यापर्यंत पोचलेल्या प्रत्येक संतानं, महापुरुषानं दिली आहे.
मग तुम्ही स्वतःच देव आहे की नाही या निष्कर्षापर्यंत या. त्याआधी सांगू नका. त्या आधी अस्तिकही नाही, नास्तिकही नाही. आपण अनेक वेळा दुसर्यांचं ऐकून, पाहून, (सध्या व्हॉटसऍप व फेसबुक वाचून) ठरवून निर्णय घेऊन मोकळे होतो पण दुसर्यानं म्हटलंय ते योग्य की अयोग्य याचा अनुभवावरून निर्णय घेत नाही.
निदान मनुष्यानं एवढा विचार करावा की मी आपल्याच ज्ञानावर, अनुभवावर विश्वास ठेवीन, मीच स्वतःचा आधार होईन, मीच माझा मार्ग चालवीन. मग निर्णय घेईन.
देव कधी काळी एमजी रोडवर रहायचा म्हणे. मग लोक रात्री-अपरात्री दार वाजवायला यायचे. कोणी म्हणे कपडे रंगवले आहेत. भरपूर ऊन पडू दे- तर शेतकरी म्हणत-भरपूर पाऊस पाड-रोपांना, बीजांना पाणी हवंय… एक ना दोन.
देव फार वैतागले. ‘आता काय करू? कुठं जाऊ?’ कोणी म्हटलं हिमालयावर जा, देव म्हणाला ‘नको आत्ता हिलरी व तेनसिंग येतील. मग पुन्हा एमजीरोड’ दुसरा देव म्हणाला- ‘चंद्रावर जा’ देव म्हणाला- ‘तेही नको. लवकरच आर्मस्ट्रॉंग पोचेल. अमेरिकेला स्पर्धा म्हणून रशियाही पोचेल. पुन्हा त्रासाला सुरुवात होणार.’
तेवढ्यात एका वृद्ध, अनुभवी देवानं त्याच्या कानात येऊन सांगितलं आणि देव प्रसन्न झाला. क्षणार्धात तिथं गेला. तो अजून तिथंच आहे.
पण इथं आपण मात्र उगाचच वाद घालत बसतोय वर्षानुवर्षे, शतकानुशतके की तो आहे की नाही? तो आहे हे निश्चित कारण तिथं पोचणार्या प्रत्येकानं तो असल्याचा निर्वाळा दिलाय पण कोणी ऐरागैरा तिथं जाऊ शकत नाही. अगदी बुद्ध, कृष्ण, महावीर नाही तर एकनाथ, तुकाराम, रामदास आणि अब्दुल कलाम, आमटे यांच्यापर्यंत सगळेच.
त्यांच्याशी तो खेळतो, नाचगाणी होतात, मैफिल रंगते, जमते.
तुम्ही पण अहंकार सोडून, दुसर्यावरचा राग काम सोडून तिथं जाऊ शकता. आशा, स्वप्नं सोडून जाऊ शकता.
जीझसनं सांगितलंय – ‘एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढं करा, कोट हिसकावून घेईल त्याला शर्टही द्या आणि ओझं उचलून एक मैल चालायला सांगितलं तर तुम्ही दोन मैल जा.’
ज्याला इच्छाच उरली नाही त्याला दुसरा त्रास देऊ शकत नाही. पतीला पत्नीची गरज असते म्हणून ती त्रास देते. पत्नीला पतीची गरज असते म्हणून तो छळवणूक करतो. म्हणून प्रियकर-प्रेयसी प्रेम पण करतात आणि एकमेकांशी भांडतात, रूसतात पण तरी एकमेकांवर अवलंबून असतात.
पतीपत्नीतही राजकारण असतं. डावपेच, खेळ्या सगळं घराचा आणि दुसर्याचा मालक कोण हे ठरवण्यासाठी.
मुल्ला नसरूद्दीन आणि त्याच्या बायकोचं एकदा मतभेद, भांडण झालं. आता मारामारी होणार. ती टाळायला तो बाहेर गेला. खरंतर सिनेमाला जायचं की नाही एवढाच मुद्दा. ती म्हणाली जायचं, तो म्हणत होता नको जायला.
बाहेर गेल्यावर दोन-तीन तास गेले. मुल्लाला भूक लागली. शिवाय ती रात्री आदळआपट करेल, झोपू देणार या भीतीनं तो घरी परत आला.
तो म्हणाला, ‘‘चल तयारी कर, तू म्हणतेस त्या सिनेमाला दोघं जाऊ.’’
तिनं त्याच्याकडं नजर न टाकताच म्हटलं – ‘‘आता माझा विचार बदललाय. आता त्या सिनेमाला मला जायचंच नाही.’’
जेव्हा दुसर्यावर आपलं सुख अवलंबून असतं तेव्हा आपण गुलाम होतो. गुलामीचा त्रास होतो. त्यानंतर राग आणि रागातून भांडणं जन्मतं.
आणि काम आणि रागाच्या मध्येच अहंकार उभा असतो.
म्हणून मालक व्हा, स्वामी व्हा. स्वामी म्हणजेच जगाचा नाही तर मनाचा अहंकार सोडलेला. व्यवहारात स्वामी म्हणवून घेणारी अहंकारी माणसं खूप दिसतील पण तिथं खोटं वैराग्य असेल.
अहंकार, ‘मी’पणा सोडा. प्रत्येकजणच देव आहे. फक्त आज थेंबाला ते माहीत नाही की उद्या आपण समुद्रच होऊन जाणार आहोत. म्हणूनच ओशोंसारखे बुद्ध पुरुष सांगत असतात.
‘‘अहंकार सोडा- देव तिथंच आहे.’’
-स्वामी सहजानंद, पुणे