चोपडी ते मुंबई - 'काळीजकाटा' कादंबरीचा अनोखा प्रवास

चोपडी ते मुंबई – ‘काळीजकाटा’ कादंबरीचा अनोखा प्रवास

Share this post on:

लहानपणापासून विविध प्रकारच्या संघर्षानं जगण्याचं बळ दिलं. सकाळी बारा वाजेपर्यंत नाझरा विद्यामंदिर येथे कॉलेज करायचं आणि दुपारी एकनंतर चोपडी येथे त्यावेळी असणार्‍या गुंडा चव्हाण यांच्या हॉटेलमध्ये पाच वाजेपर्यंत पडेल ते काम करायचं. दहावीत एकदा नापास झालेल्या विद्यार्थ्यानं बारावीत फक्त पास व्हावं एवढीच सगळ्यांची अपेक्षा! परिस्थिती माणसाला प्रत्येक वादळ झेलायला शिकवते. समाजाच्या वेदनांचे असंख्य डंख सोसायला शिकवते. याच परिस्थितीच्या शिकवणीतून मी खूप काही शिकलो. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची शाखा असणार्‍या नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी अतिशय तळमळीनं परिस्थितीचे चटके सोसणार्‍या माझ्यासारख्या अतिशय सामान्य मुलाला खूप काही दिलं. सर्वात मोठा आत्मविश्‍वास दिला. त्याच आत्मविश्‍वासानं मला बारावीत 73.17% गुण मिळाले. तो निकालाचा दिवस अजूनही मला आठवतो. कै. बी. जी. बाबर सर यांनी मला सांगितलं की, तुला 73.17% गुण मिळाले आहेत.’’

मला माझ्या कानावर विश्‍वास बसेना. मी दोन-तीन वेळा सरांना विचारलं, ‘‘सर खरं सांगा की किती मार्क मिळाले? मी पास तर आहे ना?’’

तेव्हा सरांनी पाठीवरती हात टाकला आणि म्हणाले, ‘‘खरंच तुला चांगले मार्क मिळाले आहेत.’’

मी मार्कलिस्ट हातात घेतली आणि कित्येकदा त्या मार्कांवर नजर फिरवली. मी व माझा मित्र सत्यवान कदम आम्ही दोघंही दहावी नापास व बारावी पास झाल्यामुळं खूप आनंदात गावाकडं येण्यास निघालो. नाझरा ते चोपडी 5 कि.मी.चे अंतर. कसंतरी आम्ही काझी वस्ती या ठिकाणी पोहचलो. हातात मार्कलिस्ट होती. सतत त्या मार्कलिस्टकडं पाहत होतो. मी थोडा वेगात चालायला लागलो. माझा मित्र मागे पडला. गाव दोन कि.मी. अंतरावर आल्यावर मी धावू लागलो. मला कधी एकदा गावात पोहोचेन असं झालं होतं. मी पळत होतो आणि समोरून एक दुचाकी आली. त्यावर गावचे सरपंच आप्पासाहेब बाबर होते. मी हात करून त्यांना थांबवलं आणि मार्कलिस्ट दाखवली. माझे मार्क पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला. माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली व म्हणाले, तू पुढं शिक. कसलीही अडचण आली तर मला सांग.’’

मी गावात पळत आलो. तो दिवस गुरूवारचा होता. गावात बाजार भरला होता. मी बाजारात दिसेल त्या माणसाला माझी मार्कलिस्ट दाखवू लागलो. कुणाला आनंद व्हायचा तर कुणी हिरमुसून जायचा. काहीजण माझी मार्कलिस्ट नक्कीच ओरीजनल आहे का? हे पाहण्यासाठी हातात घेत होते. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा तो दिवस होता. घरी आलो. आई-वडिलांना मार्कलिस्ट दाखवली. घरात सगळ्यांना प्रचंड आनंद झाला. बारावीत असताना ज्या हॉटेलमध्ये मी काम केलं त्याच हॉटेलच्या मालकाकडून मी पेढे घेतले. गावातील हनुमान मंदिरात ठेवले व सगळ्यांना वाटले. पुढं अनेकांच्या मार्गदर्शनानं मी शिक्षक व्हायचं ठरवलं. सोलापूर येथील चंद्रभागाबाई यलगुलवार अध्यापक विद्यालयात डी. एड. करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी असणारे शिक्षक सुरेश काळे, सिद्धेश्‍वर उकळे यांनी व इतर अनेक मित्रांनी माझ्या परिस्थितीचा विचार करून खूप सहकार्य केलं.

मी पार्क चौकातील जवाहरलाल नेहरू वसतीगृहात राहत होतो. त्याठिकाणी असणारे रेक्टर सोमसिंग चव्हाण यांनी मला तेथील ग्रंथालयाची चावी माझ्या हातात दिली व जवळच असणार्‍या हुतात्मा स्मृती मंदिरात होणार्‍या विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी माझ्यावर सांस्कृतिक संस्कार होत गेले. त्यातूनच कवितेचा छंद लागला. शिक्षण संपल्यावर मी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांगोला विद्यामंदिर या संस्थेत नोकरीला लागलो. अर्थात मुलाखतीच्या वेळी संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी माझ्यात असलेल्या विविध प्रकारच्या गुणांची खातरजमा करून घेतली. संस्थेच्या व मान्यवर साहित्यिकांनी दिलेल्या प्रेरणेनं ‘वेदनेच्या पाऊलखुणा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहाला भोसरी येथील ग. दि. माडगुळकर शब्दसृष्ठी पुरस्कारासहित विविध ठिकाणचे तेरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.
डॉ. द. ता. भोसले, रणधीर शिंदे, पुरूषोत्तम सदाफुले, सुदाम भोरे, प्रशांत मोरे, श्रीकांत मोरे, शिक्षक-आमदार दत्तात्रय सावंत, दिगंबर ढोकळे, चंद्रकांत वानखडे, कवी उद्धव कानडे, भरत दौंडकर, शिवाजी चाळक, अनंत दीक्षित, श्रीकांत नाईक, डॉ. सुरज चौगुले, कल्याणराव शिंदे, सुरेश पवार, प्रकाश जडे, प्रा. धनाजी चव्हाण, जयवंत आवटे, अर्चना लाड, पद्माकर कुलकर्णी, बाबाराव कावळे, राजेश पवार, मुख्यध्यापक नारायण विसापुरे, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माढा या तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांनी, महाराष्ट्रातील सर्व मान्यवर कवी, विद्यामंदिर परिवारातील सर्व साहित्यप्रेमी शिक्षकांनी, गावचे सुपुत्र व कोल्हापूर येथे वरिष्ठ पोलीस निरिक्षक म्हणून काम करणारे वसंतराव बाबर, पोपट यादव (शेठ), नंदकुमार बाबर (शेठ), संतोष बाबर (शेठ), गणेश बाबर, राज यादव, चंद्रकात बाबर (फौजी) यांच्यासह सर्व चोपडीकरांनी वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं त्यामुळं मला ‘काळीजकाटा’ ही कादंबरी लिहीण्याची प्रेरणा मिळाली.

चोपडी येथे गेल्यावर्षी 3 फेबु्रवारीला डॉ. द. ता. भोसले, ग्रामीण कथाकार आप्पासाहेब खोत, संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या व असंख्य रसिकांच्या उपस्थितीत ‘काळीजकाटा’ या कादंबरीचं दिमाखात प्रकाशन झाले. अल्पावधीत ही कादंबरी अनेकांपर्यंत पोहचली. अर्थात कादंबरी पोहचवण्याचं काम ‘चपराक’च्या टीमनं केलं. बुकगंगा या ऑनलाईन पुस्तक विक्री केंद्रावर ही कादंबरी केवळ पंधरा दिवसातच बेस्ट सेलर ठरली. या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथील ग. ल. ठोकळ उत्कृष्ठ ग्रामीण कादंबरीचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर मनोरमा साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा मंगळवेढा येथील ढगे स्मृती पुरस्कार, ध्यास फाऊंडेशन पलूसचा ध्यास उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार मिळाले आहेत. या सगळ्याबरोबर महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यातून ‘काळीजकाटा’ वाचल्याचे फोन मला येतात तेव्हा वाचकांच्या अभिप्रायाचे शब्द हे माझ्यासाठी खूप मोठे पुरस्कार ठरले आहेत.

काळीजकाटा ही कादंबरी वाचून पहिली प्रतिक्रिया ‘चपराक टीम’च्या शुभांगी गिरमे यांनी दिली. त्यानंतर मोरेश्‍वर ब्रह्मेकाका यांनी तासभर या कादंबरीवर माझ्याशी चर्चा केली. आत्मिक प्रेमाचं सुंदर मंदीर म्हणजे ‘काळीजकाटा’ या ओळीच्या आद्याक्षरांनी खूप सुंदर लेख लिहून तो लॅमिनेशन करून मला भेट दिला. ही कादंबरी 3 फेबु्रवारीला प्रकाशित झाल्यावर चार-पाच फेब्रुवारीला काळीजकाटा या कादंबरीवर नीरा ता. पुरंदर येथील सुनील पांडे यांनी ‘प्रेमा तुझा रंग कसा… मी सांगेन सावली-वसंता सारखा… सुनील जवंजाळ सरांच्या सावलीनं झपाटून टाकले आहे…’ अशा अनोख्या शब्दात विस्तृतपणे आपली प्रतिक्रिया दिली. ते अजूनही म्हणतात की, ‘मी अस्वस्थ होतो तेव्हा काळीजकाटा हीच कादंबरी हातात घेतो.’ त्यानंतर 10 फेबु्रवारीला ‘काळीजकाटा म्हणजे संवेदनशील स्त्रीमनातील व्यथांचा फुफाटा’ अशा शीर्षकात आपली विस्तृत प्रतिक्रिया काळीजकाटा या कादंबरीवर जीव लावणारे पुणे येथील रविंद्र कामठे यांनी दिली. 10 फेबु्रवारीला ही कादंबरी बुकगंगा या ऑनलाईन विक्री संकेतस्थळावर आली आणि या कादंबरीनं धम्माल केली. 25 फेबु्रवारीला म्हणजे केवळ पंधरा दिवतातच ही कादंबरी बेस्ट सेलर ठरली. आजही या संकेतस्थळावर कादंबरीची मागणी सातत्यानं वाढत आहे.

या कादंबरीला जेव्हा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा ‘ग. ल. ठोकळ उत्कृष्ट ग्रामीण कादंबरी’चा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा संपादक घनश्याम पाटील सर यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला ही कादंबरी कशी भेट देता येईल याबाबत चपराककडून एक योजनाच आखली. ज्या दिवशी म.सा.प चा पुरस्कार दिला जाणार होता त्यादिवशी दैनिक पुण्यनगरीमध्ये जवळपास अर्धे पान ‘सोसण्याचं बळ देणारी काळीजकाटा’ या शब्दात प्रकाशक या नात्यानं लिहिलं होतं.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ‘वाचनकट्टा’ या उपक्रमांतर्गत गणेश गायकवाड व त्यांच्या अनेक मित्रांनी काळीजकाटा या कादंबरीचं अभिवाचन केलं. यातूनच अनेक तरूण पोरं या कादंबरीच्या प्रेमात पडली होती. बँकेत काम करणारे सुहास कोळेकर यांचा मला फोन आला व म्हणाले की, ‘‘तुमच्या पुस्तकाच्या मी कोणत्या पात्रात बसतो याचा मी विचार करतो. या कादंबरीचा शेवट मनाला अस्वस्थ करून जात असला तरी समाजाच्या अंगानं तो अप्रतिम असल्याचं ते बोलले.’’ खरं तर गावातील जाणकार वाचकांची प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वाची होती. एकाच बैठकीत ही कादंबरी पूर्ण वाचून अभिप्रायाची तीन पानं माझ्याकडं घेऊन येणारे आदर्श शिक्षक जा. ना. केंगार गुरूजी आजही मला आठवतात. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी ही कादंबरी किती महत्त्वाची आहे व युवकांपर्यंत कशी पोहचली पाहिजे यावर फोनवरून विस्तृत संवाद केला.

चोपडीतील पतंगराव बाबर, संज्योत मेखले, संजिवा कांबळे, नंदकुमार बाबर, उमेश चांडवले, हणमंत मेखले, नामदेव डोंगरे यांच्यासह अनेकांनी भेटून मला प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्रातील परळी येथील प्रसिद्ध कवी अरूण पवार यांनी तर ‘सलाम सावलीच्या प्रेमाला… सलाम सावलीच्या संयमाला… सलाम काळीजकाटा या पुस्तकाला’ अशा अनोख्या शब्दात प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर ही कादंबरी महाराष्ट्रातील युवकांनी का वाचावी यासाठी एक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. काळीजकाटा ही कादंबरी वाचली. ती कादंबरी काळजाच्या कप्प्यात खोलवर रूतून बसली आहे. ते रूतणं खूप गोड आहे. मनातल्या सगळ्याच तर्कविर्तकांना उधळून लावणारी व एका वेगळ्या वाटेनं जाणारी ही कादंबरी…! अशी वेगळी प्रतिक्रिया पुणे येथील हास्यकवी अनंत दीक्षित यांनी दिली. प्रसिद्ध लेखिका तनुजा ढेरे यांनी ‘काळजाला भिडणारा संवाद’ अशा शब्दात या कादंबरीवर विस्तृत परीक्षण लिहिले. ‘काळीजकाटा वाचताना वि. स. खांडेकरांच्या कादंबरीची आठवण होते,’ अशा उत्साही शब्दात कथाकार जयवंत आवटे यांनी आपली लेखी प्रतिक्रिया नोंदवली आहे. शेटफळ ता. मोहोळ येथील प्रा. दत्तात्रय चव्हाण यांनी ‘काळजाचा ठाव घेणारी काळीजकाटा कादंबरी’ म्हणून विस्तृतपणे या कादंबरीचं परीक्षण लिहिलं.

‘वाचकास आत्मशोधाचा विचार करायला लावणारी कादंबरी’ म्हणून उल्लेख करणारे नाशिक येथील कथा-कादंबरी लेखक संजय डी. गोराडे यांनी कादंबरीवर खूप जीव लावला. अनेकांपर्यंत ती पोहचवण्याचं काम त्यांनी केलं. मंथन पब्लिकेशन अहमदनगर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभास मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. त्यावेळी अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी काळीजकाटा या कादंबरीचे खूप कौतुक केले. प्रसिद्ध कथाकार व लेखक संजय कळमकर यांनी ‘एका वेगळ्या प्रेमाची अनोखी कथा’ अशा शब्दात या कादंबरीचा गौरव केला. रूपाली हाके या विद्यार्थीनीनं पुस्तक कसं काळजापर्यंत पोहचणारं आहे याबद्दल सविस्तर चर्चा केली. प्रेमाच्या प्रतिष्ठेचा पुरस्कार करणारी काळीजकाटा कादंबरी अशा शब्दात गणेश गायकवाड यानं विस्तृतपणे या कादंबरीवर लिहिलं तर काळीजकाटा वाचून अर्धा तास डोळ्यातील पाणी पुसत राहिल्याची प्रतिक्रिया साहित्यिक अंकुश गाजरे यानं दिली. ‘खरं प्रेम समजण्यासाठी काळीजकाटा एकदा वाचावीच’ अशी प्रतिक्रिया कवी हरिश्‍चंद्र पाटील यांनी दिली. ‘बाईपणाची जमीन’ या कवितासंग्रहातून वाचकांपर्यंत पोहचलेल्या कविता शिर्के यांनी तर ही कादंबरी रात्री अकरा वाजता सहज हातात घेतली आणि पहाटेपर्यंत संपवून टाकली. अतिशय अस्वस्थ होऊन त्यांनी मला फोन करून कादंबरीवर विस्तृत चर्चा केली आणि फेसबुकवर कशी वाचली आणि कशी वाटली यावर सविस्तर लिहिलं.

धनंजय गायकवाड यानं कादंबरी वाचून सायंकाळी सहा वाजता आपल्या बायकोला दिली. तिनं ती कादंबरी हातातून खाली ठेवलीच नाही. कादंबरी संपली तेेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. स्वयंपाक नाही.. जेवणही नाही… दोघेही रात्री चहा पिऊन झोपी गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी धनंजय गायकवाड यांचा मला फोन आला. त्यांनी रात्री घडलेला सारा प्रसंग सांगितला व म्हणाले की, ‘पुस्तक वाचूनही पोट भरतं हे रात्री मला समजलं.’ सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी पुस्तकातील काही वाक्यांश अनेकांना सांगितला. तर अनेक ठिकाणी प्रसिद्ध वक्ते प्रा. तुकाराम मस्के यांनी आपल्या मनोगतात काळीजकाटा कादंबरीतील वाक्यं पेरली. पलूस येथील ध्यास फाऊंडेशनच्या अर्चना लाड व सुनील लाड यांचा कादंबरी अप्रतिम असून ध्यास उत्कृष्ठ कादंबरीचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानीत करत असल्याचा फोन आला. आवर्जून नवीन पुस्तकं वाचणारा माझा मित्र सूर्याजी भोसले याने ‘सावलीच्या जगण्यातील एक रहस्यमय प्रवास’ अशा अतिशय मार्मिक शब्दात काळीजकाटा या पुस्तकावर लिहिलं.

या सगळ्यांसोबत चपराक परिवारातील सदानंद भणगे, गणेश आटकळे, सागर सुरवसे, संजय वाघ, विद्या बयास-ठाकुर, विनोद पंचभाई, अरूण कमळापूरकर, सागर कळसाईत यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. काळीजकाटा पुस्तक वाचून नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील उज्ज्वला सरसर हिने काळीजकाटा हे पुस्तक मला का आवडलं याबद्दल दोन पानं लिहून दिली. त्याबरोबरच नाझरे येथील माजी सरपंच विजयकुमार देखमुख, प्रा. धनाजी चव्हाण, प्रा. गंगाधर घोंगडे, विनायक पाटील, हेमंत नलवडे, सोमनाथ सपाटे, वसंत गोडसे, संभाजी सरगर, दीपक शिंदे, मच्छिंद्र इंगोले, सुनील बनसोडे, नेताजी बाबर, प्रा. इसाक मुल्ला, सत्यवान केंगार, महादेव कांबळे, प्रेमकुमार वाघमारे, शिवाजी बंडगर, संतोष जगताप अशा व सांगोला तालुक्यातील इतर काही साहित्यप्रेमी शिक्षकांनी काळीजकाटा वाचल्याची प्रतिक्रिया दिली. खरं तर महाराष्ट्रातल्या असंख्य वाचकांनी काळीजकाटा या कादंबरीवर प्रेम केलं आहे. त्यामुळेच एका वर्षात या कादंबरीची दुसरी आवृत्ती संपली आहे.

आज जागतिक मराठी दिनाच्या निमित्तानं मुंबई येथील 18.99 लॅटिट्यूड बँक्वेट या तारांकित हॉटेलमध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित होते हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. खरंतर ग्रामीण भागातील लेखकाच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघत आहे ही बाबच माझ्या लेखनाला प्रचंड स्फूर्ती देणारी आहे. काळीजकाटा या कादंबरीच्या प्रवासात आपण सगळेजण आहात. महाराष्ट्रातील विविध भागातून मला काळीजकाटा पुस्तक आवडल्याचे फोन येतात तेव्हा मला असं वाटत की त्या भागातून काळीजकाटा या पुस्तकाला मिळालेला एक पुरस्कारच आहे. वाचकांनी त्यांच्या काळजातलं बोलणं हे कोणत्याच पुरस्काराच्या तराजूनं तोलता येत नाही. या काळजातल्या पुस्तकाला खर्‍या अर्थानं अनेकांपर्यंत पोहचवण्याचं काम संपादक घनश्याम पाटील व त्यांच्या संपूर्ण चपराक टीमनं केलं आहे. त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करेन. महाराष्ट्रातल्या लिहित्या हातांना प्रोत्साहित करणार्‍या व मराठी भाषेसाठी वर्षात 365 पुस्तकांना वाचकांसमोर आणण्याचा संकल्प सोडणार्‍या चपराकच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा…!

– सुनील जवंजाळ
९८९०२८६१४६

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!