संवेदनशील उद्योजक राजीव कुलकर्णी

संवेदनशील उद्योजक राजीव कुलकर्णी

आपले आयुष्य केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठीही अर्थपूर्ण ठरेल असा निर्णय घेणे सगळ्यांना जमतेच असे नाही. पुण्यातील ‘कुलकर्णी इंजिनिअर्स’च्या राजीव बळवंत कुलकर्णींना मात्र हे जमलंय!

सीओइपीतून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर राजीव कुलकर्णींनी 7-8 वर्षे नोकरी केली खरी पण स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर खिशात फक्त हजार रुपये असताना त्यांनी आपल्या घरात व्यवसाय सुरू केला. ते वर्ष होतं 1985. ऑटोमोबाईल प्रेस कॉम्पोनंट्स तयार करणार्‍या ‘कुलकर्णी इंजिनियर्स’ची स्थापना झाली. आपण करू ते काम अचूक आणि उत्तम दर्जाचेच असले पाहिजे, या ध्यासामुळे त्यांना अधिकाधिक ऑर्डर्स मिळत गेल्या आणि लवकरच म्हणजे 1992 साली घरातली जागा अपुरी पडू लागल्याने गांधी भवन औद्योगिक वसाहतीत व्यवसायाचे स्थलांतर झाले. थोड्याच दिवसात भोसरीच्या औद्योगिक वसाहतीत दुसरे युनिटही सुरु झाले. या युनिटमध्ये डेअरी, फुड अँड वॉटर इंडस्ट्रीला लागणार्‍या उपकरणांच्या फॅब्रिकेशनची कामे होऊ लागली. दर्जेदार कामामुळे ऑर्डर्स वाढत होत्या.

अशातच एके दिवशी कुलकर्णींचे मामा गजानन ठकार आपल्यासोबत विशेष मुलांसाठी कार्य करणार्‍या वैजयंती ओक यांना घेऊन ‘कुलकर्णी इंजिनिअर्स’मध्ये आले. त्यावेळी ओकबाईंनी ‘प्रौढ विशेष’ व्यक्तींना काही काम देऊ शकाल का? अशी विचारणा राजीव कुलकर्णींकडे केली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी होकार दिला. वास्तविक अशा व्यक्तींना काम करण्यास शिकवण्याचा कोणताही पूर्वानुभव त्यांच्याकडे नव्हता, तरीही त्यांच्यातील संवेदनशील मनाने त्यांना सामावून घेण्याची तयारी दाखवली. या प्रौढ विशेष व्यक्तींना काम शिकवण्यास सुरवातही केली. या मुलांना हाताळण्यास सोपी आणि सुरक्षित मशिनरी त्यांनी आपले सहकारी एस. आर. खांडेकर यांच्याकडून तयार करवून घेतली.

तेव्हा त्यांच्या असे लक्षात आली की, ही मुले काम शिकून घेण्यास सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा थोडा जास्त वेळ लावतात पण एकदा का त्या मुलांनी काम समजून घेतले की, जास्तीत जास्त अचूक आणि तन्मयतेने काम करतात! या मुलांच्या क्षमता जाणून घेत त्यांना झेपेल, करता येईल असे काम शिकवताना कुलकर्णींच्या संयमाची व चिकाटीची कसोटीच होती पण या कसोटीत उतरताना ते या मुलांचे मित्र, मार्गदर्शक आणि पालक कधी झाले हे त्यांनाही समजले नाही. आज गेली 25 वर्षे एकूण कामगारांपैकी 25% विशेष मुले आणि जन्मजात एच. आय. व्ही. पॉझिटिव्ह असणार्‍या मुलांना सामावून घेणारी ‘कुलकर्णी इंजिनियर्स’ म्हणूनच इंजिनिअरिंग विश्वात मानाचे स्थान मिळवून आहे.

विशेष मुलांना आपल्या कंपनीत नोकरीसाठी सामावून घेण्याचा आपला निर्णय संपूर्ण देशात अनुकरणीय आणि समाजातील अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो याची कल्पनाही कुलकर्णींना व त्यांच्या व्यवसायात त्यांना सक्रिय साथ देणार्‍या त्यांच्या पत्नी डॉ. अमिता यांना नसेल पण भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन 2012-13 या वर्षीचा ‘स्पंदन-स्पेशल परफॉरमन्स पुरस्कार’ त्यांना प्रदान केला. किर्लोस्कर कमिन्सनेही सन 2014 मध्ये सप्लायर डायव्हर्सिटी लीडरशिप ऍवॉर्ड देऊन सन्मानित केले, तर नुकतेच म्हणजे जानेवारी 2019 मध्ये पुण्यात ‘ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ऍक्मा)च्या टेक्नॉलॉजी समिट अँड एक्स्पो 2019’ या देशभरातील इंजिनियर्सच्या परिषदेच ‘अवजड उद्योग व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम’ या विभागाचे केंद्रीय मंत्री मा. अनंत गीते यांच्या हस्ते ‘कुलकर्णी इंजिनियर्स’च्या राजीव कुलकर्णींना ‘क्वॉलिटी प्रॉडक्टस बाय टॅपिंग पोटेन्शियल डिफरंटली’ असा विशेष उल्लेख असलेली ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

सध्या कंपनीत 100 ग्राहकांना 200 प्रकारचे 1 कोटीपेक्षा जास्त कॉम्पोनंट्स पुरवले जातात. विशेष मुलांना नोकरीत सामावून सामाजिक ऋण फेडतानाच कुलकर्णी निसर्गाचे ऋण मान्य करत पर्यावरण रक्षणही करत आहेत! कमिन्स इंडियाकडील प्लास्टिक आणि लाकडी स्क्रॅप विकत घेऊन त्यातून अंध मुलींच्या शाळेसाठी लाकडी बेंचेस, पक्ष्यांसाठी लाकडी घरटी, टाकाऊ प्लास्टिकपासून पॅकिंग मटेरियल आदी असंख्य पुनर्वापराच्या वस्तू तयार करत पर्यावरण जपताहेत!

समाजातील विशेष व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी इंजिनिअरिंग क्षेत्रातील इतर कंपन्यांनीही या मुलांना सामावून घेण्याची तयारी दर्शवल्यास मार्गदर्शन करण्याची कुलकर्णींची इच्छा आहे. आपल्या शिक्षण आणि व्यवसायाद्वारे केवळ स्वतःची उन्नतीच नव्हे तर समाजाचीही उन्नती होण्यासाठी मदतीचा हात पुढे करणारे असे अनेक राजीव कुलकर्णी आज आपल्याला हवे आहेत!
– राधिका कुलकर्णी
चलभाष – 9049861344

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “संवेदनशील उद्योजक राजीव कुलकर्णी”

  1. डॉ.भाग्यश्री काळे पाटसकर

    खूपच छान आणि प्रेरणादायी जीवनकार्य साध्या सोप्या भाषेत मांडले आहे. अभिनंदन!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा