आजची सामाजिक, राजकीय परिस्थिती; आणि देशाचे भवितव्य!

आजच्या सामाजिक, राजकीय वास्तवाचा द. ता. भोसले यांनी घेतलेला आढावा.

आजचा समाज कसा आहे, याची अनेक उत्तरे संभवतात. आजच्या काळाकडे आपण कसे पाहतो, ते पाहत असताना कोणत्या गोष्टींवर भर देतो आणि आपली मनोधारणा कशी आहे यावरही उत्तरे अवलंबून असतात पण तटस्थ वृत्तीने पाहिले तर स्थूलपणे असे म्हणता येईल की, आजचा समाज तंत्रज्ञानाचा झपाट्याने गुलाम होत चाललेला आहे. परग्रहावर निवासस्थान, सागरतळाशी वसतिगृहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम होत चालला आहे आणि दिशाहीन गरगरणे ही आजच्या समाजाची ठळक ओळख झालेली आहे. गतिमान काळाची शिकार, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेच्या आसक्तीची शिकार, जगण्यासाठी कराव्या लागणार्‍या स्पर्धेशी शिकार आणि कुटुंब, नाती, निसर्ग, भूमी आणि आत्मिक समाधान यापासून तुटत चाललेले वैयक्तिक जीवन हे आजच्या समाजाचे ठळक वैशिष्ट्य झालेले आहे. त्यामुळे आजचा आपला समाज दिवसाचा हिशेब करणारा; परंतु आयुष्याचे गणित विसरलेला बनला आहे. तो एकविसाव्या शतकात जगतो आहे; मात्र विसाव्या शतकाकडे भले-बुरे संकेत, निरर्थक प्रथा याचा वारसा सांभाळणारा झाला आहे. तो शरीरसुखाला शरण जाणारा पण आयुष्याला गहाण टाकणारा झाला आहे. वरून सजलेला नि ‘आतून’ कुजलेला बनतो आहे. पैशाला सर्वस्व मानणारा आणि म्हणूनच पैशाचा विकला गेलेला, जाणारा बनला आहे. शाश्वत मूल्यांचा गौरव करणारा पण त्याचवेळी क्षूद्र स्वार्थापोटी त्या मूल्यांना पायदळी तुडविणारा झाला आहे. अविश्‍वास, अशांती, असुरक्षितता यामुळे पाठीवर अग्नी बांधून एखाद्याने वावरावे तसा तो अस्वस्थ मनाने वावरतो आहे. पाण्यात पडलेला पाचोळा प्रवाहाबरोबर वाहत जावा आणि नामशेष व्हावा, तशी आजच्या समाजाची अवस्था-नव्हे दूरवस्था झालेली आहे.
आजच्या समाजाचे एकाच शब्दात वर्णन करायचे झाले तर त्यासाठी ‘विकणे’ एवढा एकच शब्द पुरेसा आहे. कारण आज आम्ही नद्या विकतो आहे. आज आम्ही डोंगर विकले आहेत. समुद्राचा किनारा विकतो आहे. एवढेच नव्हे तर आमचे रक्त विकायला घाबरत नाही. आम्ही आमचे गर्भाशय विकतो आहे. कोवळ्या व तरूण मुलींचे शरीर विकतो आहे, विकत घेतो आहे. आम्ही आमचे मतही विकायला कमी करीत नाही. नव्हे आम्ही स्वतःची विक्रीही करीत जगतो आहे. या विक्रीची आम्हाला लाज न वाटता धन्यताच वाटते आहे.
त्यामुळे झाले काय? त्यामुळे जिवंत माणसाचे वस्तुकरण झाले. माणसाच्या जीवनाला व्यवहारी साधनाचे रूप प्राप्त झाले. आमच्या नात्यांचे व्यापारीकरण झाले. मूल्यांचे विद्रूपीकरण झाले. जगण्याचे यांत्रिकीकरण झाले; आणि मानवतेचे विकृतीकरण झाले. पशू-पक्ष्यी, नद्या, जंगल यांच्याशी असलेले आपले स्नेहबंध नष्ट झाले. आजच्या आपल्या समाजाची तटस्थपणे केलेली ही नोंद नाकारता येणार नाही, हे तितकेच खरे!
आजच्या आपल्या समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कसलीही पूर्वतयारी न करता आम्ही एकविसाव्या शतकात प्रवेश केला; आणि जागतिकीकरण स्वीकारले. पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा आपण जागतिकीकरण स्वीकारले तेव्हा या आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अज्ञान होते. रोजच्या रोज भुकेशी लढणार्‍या दरिद्री माणसांची संख्या कोटीत मोजावी लागत होती. कुपोषणामुळे आपल्या देशात दरवर्षी सुमारे सहा लाख बालके मरण पावत होती. निरर्थक प्रथा-परंपराचा पगडा फारसा कमी झालेला नव्हता. धर्मकल्पनेला विकृत रुप आलेले होते. त्यातील सर्वस्पर्शी विचारांचा लोप पावून आचरणालाच कर्मकांडाचे रूप आलेले होते. अंधश्रद्धेतून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले होते. देशात भीषण दारिद्य्र नांदत होते. दिसणार्‍या आणि न दिसणार्‍या गुलामगिरीचे पाश आवळलेले होते. समाजात वर्णभेद, वंशभेद, जातिभेद, श्रेष्ठ-कनिष्ठ भाव अभिमानाने मिरविला जात होता; आणि भूक, भय, भेद आणि भोग यांनी समाजाला पार गिळून टाकलेले होते. ही सारी ओझी घेऊनच आम्ही या नव्या शतकात प्रवेश केला.
या जागतिकीकरणाने शेती आणि शेतकरी यांच्यावर अरिष्ट कोसळले. शेत-शिवारावर मिळणार्‍या शासकीय अनुदान आणि सवलती जागतिकिकरणामुळे बंद कराव्या लागल्या. रासायनिक खते आणि फवारणीची औषधे पाच पटीने महाग झाली. अधिक उत्पन्नासाठी या खतांचाच डांगोरा पिटला गेला. त्यातून पिकावू जमिनीचा कस कमी झाला. पैसा देणार्‍या पिकांना प्राधान्य मिळत गेले. त्यामुळे पिकांची विविधता धोक्यात आली. पर्यावरणाचा तोल बिघडला. विषारी द्रव्याच्या पिका-फळावर आणि भाजीपाल्यावर फवारणी केल्यामुळे मानवी आरोग्याला ती बाधक ठरली आणि मुळातच गळ्याइतक्या कर्जानं बुडालेला शेतकरी मरणाचे आनंदाने स्वागत करू लागला. शासकीय अहवाल असे सांगतो की; गेल्या दहा वर्षात फक्त एका महाराष्ट्रात सोळा हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. रोजचे जगणे मरणाहूनही अधिक वेदनादायी होत असेल तर कोणालाही मरण प्रियच वाटणार! एका महाराष्ट्रात जर एवढ्या आत्महत्या झाल्या असतील; तर संपूर्ण भारत वर्षात त्या किती झाल्या असतील, याचा अंदाजच करता येत नाही. या जागतिकीकरणाच्या नियमातली  लफडी अशी की, चार एकरांच्या फळबागेवर फवारणी करण्यासाठी सवलत नाही; पण अमेरिकेत चार हजार एकर शेतीवर अमेरिकन सरकार विमानाद्वारे मोफत फवारणी करू शकते. फवारणीचा तो खर्च तेथील शेतकर्‍यांना उचलावा लागत नाही. शेतमालाच्या आयात-निर्यात धोरणातही आपल्या देशाचे फायदे बघण्यात प्रगत राष्ट्रे पुढाकार घेऊ लागली. आपला शेतमाल अधिक दराने विकला जावा; आणि इतर देशातील शेतमालास मोठा आयात कर लावून घ्यावा, ही पद्धत रूढ झाली. त्यामुळे गरीब देश अधिकच गरीब झाले आणि तितकेच परावलंबी बनले. अदृश्य स्वरूपाची ही शोषण प्रक्रिया अनेक राष्ट्रांच्या लक्षात आल्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून या जागतिकीकरणाला कडाडून विरोध होऊ लागला आहे.


जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, उद्योगशीलता, विज्ञान-तंत्रज्ञानाची आवेगी प्रगती यामुळे झालेला दुसरा अनिष्ट परिणाम म्हणजे संस्कृतीचे झपाट्याने होणारे सपाटीकरण हे होय. या सपाटीकरणाबरोबरच समाजामध्ये आर्थिक विकासाचा वेग खूप वाढीस लागला. त्यामुळे समाजातील मध्यमवर्गीयांची संख्या झपाट्याने वाढली. हा मध्यमवर्ग पूर्वी समाजाचे नेतृत्व करीत होता. समाजाचे प्रबोधन करीत होता; ते पूर्णतः बंद झाले आणि तो आर्थिक अभिसरणाचे साधन बनला. त्यातूनच सार्‍या समाजाचे झपाट्याने नागरिकरण होत गेले. ग्रामोद्योग मागे पडले नि तंत्रज्ञानाला महत्त्व येऊ लागले. या क्षेत्रात निपूण असलेल्या अभियंत्यांना मोठी मागणी निर्माण झाली. त्यांना अतिशय चांगले वेतन मिळू लागले. या जागतिकीकरणामुळे भारतीय तंत्रज्ञ जगामध्ये कोठेही जाऊ लागला. या जागतिकीकरणामुळे आणि गॅट करारामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कोठेही जाता आले. जिथे कमी वेतनावर मोठ्या प्रमाणात मजूर मिळतील आणि जिथे आपल्या उद्योगाला भरपूर शासकीय सवलती मिळतील, अशा देशात या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले साम्राज्य निर्माण केले. त्यामुळे छोट्या छोट्या कंपन्या आणि उद्योगधंदे मरणपंथाला लागले. पार गिळले गेले. अधिक सोयी असणारे कॅमेरे, आलिशान अशा किंमती गाड्या, दूरदर्शन संच, भारी किंमतीचे भ्रमणध्वनी, धुलाई यंत्रे, तसेच इतर विकासी साधने यांच्या उत्पादनावर अकारण भर देण्यात आला. त्यासाठी नव्याने गिर्‍हाईक तयार केली. सामान्य माणसाच्या गरजेचा विचार न करता त्यांच्या गळ्यात ही साधने मारण्यात आली. एवढेच नव्हे तर अशी साधने असणारा माणूसच प्रतिष्ठित व मान्यवर मानण्यात येऊ लागला. या साधनांच्या उपलब्धीवर त्याचे मोठेपण सिद्ध होऊ लागले आणि व्यापारकेंद्रित समाजव्यवस्था निर्माण झाली. पूर्वी शाश्वत मूल्यांवर असणारी समाजव्यवस्था आता स्वार्थावर आणि श्रीमंतीवर उभी राहिली. स्वाभाविकच माणूस हा खरेदी-विक्रीची वस्तू बनला.
समाजजीवनावर झालेल्या विपरित परिणामाबरोबरच व्यक्ती जीवनावरही या जागतिकीकरणाचा व तंत्रज्ञानयुगाचा परिणाम झाला. त्याचाच एक भाग म्हणजे या सामान्य माणसाची जीवनशैली बदलली. ‘उगवणारा दिवस आपला, उद्याचे काही खरे नाही’ या विचारसरणीमुळे शरीर सुखोपभोगांचा तो शिकारी बनला. हे सुखोपभोग तात्कालिक असतात; माणसाला गुलाम बनवितात; हे दुःखाच्या गर्तेत लोटतात. नव्हे दुःखच सुखाचे रुप पांघरूण आपणाला दंश करीत असते याचे त्याला आज पार विस्मरण झालेले आहे. अधिक सुख हवे असेल तर अधिक पैसे मिळविले पाहिजे, हेच माणसाचे ध्येय ठरले आणि त्यासाठीच तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करू लागला. तुमच्याजवळ धनसंपदा किती आहे, कोटी कोटी किंमत असलेल्या आलिशान गाड्या किती आहेत, तुमच्या अंगावर किती किलो सोने आहे आणि कमरेत झुकून नमस्कार करणारे लाचार किती आहेत यावरच समाजात माणसाचे मूल्यमापन होऊ लागले आहे.
या जागतिकीकरणाचा अप्रत्यक्ष झालेला परिणाम असा की, व्यक्ती आणि व्यक्ती, व्यक्ती कुटुंब, व्यक्ती आणि समाज यांच्यात असणारे आंतरिक भावपोषण कमी होत गेले. दुसर्‍या शब्दात बोलायचे झाले तर यांच्या नात्यात कमालीचा कोरडेपणा निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर आदर्श जीवनमूल्यांची झपाट्याने पडझड होऊ लागली. त्यांचा क्रमही बदलला गेला. देशप्रेमाची जागा देहप्रेमाने घेतली, स्वार्थत्यागाची जागा शरीरभोगाने घेतली. सहकार्याची भूमिका स्वाहाकार्यात रुपांतरीत झाली. स्वतःपुरते पाहण्याची भूमिका इतक्या टोकाला गेली की, त्याशिवाय दुसरे जग अस्तित्वात नाही, असेच मानण्यात येऊ लागले. आत्मप्रेम, आत्मगौरव, आत्मस्वार्थ आणि आत्मसन्मान हेच एकमेव जग अशी समाजातल्या माणसाची वृत्ती बनली. याबरोबरच आपला अवघा समाज चंगळवादी जीवनशैलीचा गुलाम झाला. नव्हे गुलाम होण्यात त्याला धन्यता वाटू लागली. मद्य, मदिराक्षी, जिभेची आकंठ तृप्ती करणारे खाद्यपदार्थ यातच जीवनाचे सारसर्वस्व सामावले आहे अशी धारणा निर्माण झाली. जिभेसारखी चंचल आणि चवचाल गोष्ट दुसरी नाही. तिला शरण जाणारा माणूस उन्नत आणि कृतार्थ जीवन कधीच जगू शकत नाही हे सनातन सत्य आजच्या समाजाने अव्हेरले आहे. ते त्याला निरर्थक वाटते आहे. पैसा टाकून विकत घेता येणारी प्रत्येक गोष्ट माणसाला शाश्वत आनंद कधीच देत नसते. विकत घेतलेल्या वस्तूपासून मिळणारे सुख शरीराशी निगडीत असते. शरीरापुरतेच असते म्हणून ते वरवरचे असते. तात्कालिक सुख देणारे असते आणि अतृप्तीच्या चिरकालीन दुःखात टाकत असते. हे शरीराचे गुलाम झालेल्या माणसाच्या लक्षातच येत नाही. चंगळवादी जीवनशैलीचा तृप्त उपभोग घेणारी प्रगत राष्ट्रातील जनता आता स्वाभाविक, साध्या आणि निसर्गसन्मुख जीवनशैलीकडे वळू लागलेली आहे. रोज आठ ते दहा बाटल्या कोकाकोला पिणारी ही माणसे आता नारळपाण्याचा आनंद घेत आहेत. त्यांनाही या चंगळवादी जीवनशैलीची व्यर्थता जाणवू लागली आहे. आजचा समाज कसा जगतो आहे, कशाला महत्त्व देतो आहे आणि त्याचे भले-बुरे काय परिणाम होत आहे याचे हे दर्शन म्हणता येईल.
जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, तंत्रज्ञानाने आपल्या मुठीत आलेले जग आणि फाजील अस्मितांचा अतिरेक यासारख्या गोष्टींमुळे आपल्या संस्कृतीवरही फार मोठा परिणाम झालेला आहे. पाश्चात्य संस्कृतीचे आंधळे अनुकरण करण्यात आपणाला मोठेपणा वाटतो आणि ते झपाट्याने होऊ लागले आहे. आपल्या संस्कृतीमध्ये धार्मिक कर्मकांड, विद्येची मक्तेदारी, वर्गश्रेष्ठता, स्त्रियांवर घातलेली बंधने, निरर्थक प्रथा-परंपरांचा अभिमान यासारखे काही दोष आहेत, हे खरे असले तरी तिला फार मोठी वैभवशाली परंपरा आहे. अशी ही संस्कृती कोणत्याही समाजाला जगण्याची ऊर्जा देत असते. समाजाला उबदार पांघरूण पुरवित असते. माणसाला माणसाशी जोडण्याचे काम करीत असते. त्यातूनच समाज स्वतःची ओळख सिद्ध करीत असतो. त्यामुळे प्रत्येक समाजाची संस्कृती ही समाजाची दौलत मानली जाते. आपली ही संस्कृती श्रीमंत व समृद्ध असताना आपण पाश्चात्य संस्कृतीचे आंधळे अनुकरण का करतो, हेच समजत नाही. त्यातही पुन्हा पाश्चात्य संस्कृतीमधील चांगल्या गोष्टींचे आपण अनुकरण करीत नाही, पण निरर्थक गोष्टींचा मात्र स्वीकार करतो याची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी असली तरी विस्तारभयास्तव ती देत नाही. मुख्य म्हणजे या दोन्ही संस्कृतीत मूलतः खूप मोठा फरक आहे. पाश्चात्य संस्कृती देहाला महत्त्व देते, तर आपली संस्कृती मनावर भिस्त ठेवते. पाश्चात्य संस्कृती शरीरसुखाला महत्त्व देते, आपली संस्कृती मानसिक आनंदाला महत्त्व देते. पाश्चात्य संस्कृती पंचेंद्रियांना प्रमाण मानते तर आपली संस्कृती पंचमहाभूतांशी मैत्री करते. पाश्चात्य संस्कृती क्षणाचा विचार करते तर आपली संस्कृती युगाचा विचार करते. पाश्चात्य संस्कृती निसर्गाला आपल्या सुखाचे साधन मानते तर आपली संस्कृती चराचरामध्ये ईश्वराचे दर्शन घेते. पाश्चात्य संस्कृती स्त्रीला भोगसाधन मानते, तर आपली संस्कृती तिला आदिशक्तीच्या रूपात पूजते. पु. ल. देशपांडे यांच्या शब्दात शेवटी असे म्हणता येईल की, ‘ती द्राक्ष संस्कृती आहे आणि आपली रूद्राक्ष संस्कृती आहे.’ पाश्चात्य संस्कृती प्रभावामुळे स्वतःचा चेहरा हरवलेला समाज आज पहावयास मिळतो आहे. संस्कृतीचे सपाटीकरणही आजच्या समाजाची शोकांतिका आहे.
त्यातूनच भाषा आणि साहित्यावर मर्यादा येत आहेत. संस्कृतीचा प्राणभूत घटक असतो भाषा आणि साहित्य यांच्या निर्मितीमुळेच संस्कृतीला बळ मिळत असते. चैतन्य लाभत असते. सार्‍या जगाचे एका खेड्यात रूपांतर होऊ लागल्यामुळे आपली मातृभाषा आणि तिच्या बोलीभाषा झपाट्याने नामशेष होऊ लागल्या आहेत. भाषा साहित्याचा अंत हा पर्यायाने संस्कृतीचा अंत असतो. सार्‍या जगामध्ये अस्तित्वात असलेल्या 670 भाषांपैकी 234 भाषा नष्ट झालेल्या आहेत आणि येत्या पंचवीस वर्षात निम्म्या भाषा नष्ट होण्याची भीती विचारवंतांनी व्यक्त केलेली आहे. भाषा नष्ट झाली की, इतिहास नष्ट होतो. वारसा लोप पावतो. चांगल्या परंपरा नष्ट होतात. पूर्वपुण्याई विसरली जाते. नवनिर्मितीला पायबंद बसतो आणि संवाद-सहजीवनावर मर्यादा पडतात. मातृभाषेच्या वापराशिवाय माणूस पूर्णतः व्यक्त होऊ शकत नाही. तृप्त जीवन जगू शकत नाही. साल काढून टाकलेले झाड जसे जीवनरसाअभावी सुकून जाते; तशी भाषेअभावी माणसाची अवस्था होते. झपाट्याने बंद पडणार्‍या मराठी माध्यमाच्या शाळा आणि दरवर्षी शेकड्यांनी निर्माण होणार्‍या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही याचीच परिणती आहे. कौशल्याचा विकास आणि व्यक्तीमत्वाची समृद्धी यासाठी आम्हाला म्हणजे समाजाला शिक्षण नकोच आहे. मोठ्या पगाराची नोकरी मिळविण्यासाठी आणि भौतिकसुखाची रेलचेल होण्यासाठी आम्हाला शिक्षण हवे आहे. त्यामुळे आपली मराठी काही वर्षांनी केवळ ग्रामीण माणसाची बोलीभाषा म्हणून टिकेल असे अनेकांनी बोलून दाखविले आहे. तिच्यातून लेखन करणे अप्रतिष्ठेचे मानले जाते आहे; हे वास्तव नाकारता येत नाही.
भाषा आणि साहित्याप्रमाणेच या जागतिक झंझावातात शिक्षणाचेही स्वरूप बदलले आहे. त्याचेही पूर्णपणे व्यवसायिकरण झाले आहे. कमीत कमी भांडवलात, कमीत कमी वेळात व कसलीही जोखीम न स्वीकारता भरपूर पैसा मिळविण्याचा एकमेव ‘धंदा’ म्हणजे शिक्षणसंस्था स्थापन करणे हा झाला आहे. शिक्षण हा आता ‘धर्म’ राहिला नाही तो आता ‘धंदा’ झाला आहे. मद्यसम्राट, पेट्रोलसम्राट, वाळूसम्राट, माफियासम्राट याप्रमाणेच आता शिक्षणसम्राटांची निर्मिती झपाट्याने झाली आहे. होत आहे. पैसा, प्रतिष्ठा, निवडणूक, तालुका राजकारण, अधिकार आणि हक्काचा सेवकवर्ग यासाठी स्वतःची शिक्षणसंस्था असणे आजच्या समाजाला गरजेचे वाटू लागले आहे. आपल्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग यातून जातो, अशी समाजाची धारणा झालेली आहे. समाजाची म्हणण्यापेक्षा कष्टाशिवाय पैसा मिळविणार्‍या आणि सेवेशिवाय सत्ताकांक्षा असलेल्या महत्त्वाकांक्षी पुढार्‍याची धारणा झालेली आहे. एके काळी स्वार्थी वर्गश्रेष्ठत्व असलेल्या मंडळींनी सार्‍या समाजाला अज्ञानात ठेवले. ज्ञानाचा शब्द ऐकला तरी त्याच्या कानात तापलेल्या शिशाचा रस ओतण्याची शिक्षा फर्मावली. देवधर्म, विद्या आणि पाप-पुण्याची भीती दाखवून या चार बाबींचा शोषणासाठी वापर केला. त्यांना अज्ञानात ठेवून आपल्या चार पिढ्यांच्या सुखविलासाची सोय करून ठेवली. त्यामुळे सामान्य निरक्षर पशू पातळीवर जीवन जगू लागला. याउलट आजच्या काळी या शिक्षणसम्राटांनी गरिबांना शिक्षण घेणे दुरापास्त केले आहे. प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी फार मोठी रक्कम देणगी म्हणून द्यावी लागते. नपेक्षा भारी फी भरावी लागते. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब माणसाचा हुशार मुलगाही मनासारखे शिक्षण घेऊ शकत नाही. ज्यांच्याजवळ उदंड पैसा आहे अशाच श्रीमंताची निर्बुद्ध मुले शिक्षणाला पात्र ठरत आहेत आणि दारिद्री घरातील मुले या श्रीमंताच्या घरी किंवा शेतावर मजूर म्हणून राबत आहेत. शिवाय आज दिले जाणारे शिक्षण संस्कारसंपन्न शिक्षण नसल्याने नागरिक निर्माण करण्याच्या दृष्टीने ते कुचकामी ठरले आहे. ते फक्त मतदार निर्माण करीत आहे.
या लेखाचे शीर्षक आहे ‘आजची सामाजिक-राजकीय परिस्थिती व देशाचे भवितव्य’ हे. आत्तापर्यंतच्या विवेचनामध्ये आमच्या सामाजिक स्थिती, गतीचा आणि अधोगतीचा परामर्श घेतला आहे. आजची आपली राजकीय स्थिती कशी आहे यावरही सूत्ररुपाने चार ओळी लिहिणे गरजेचे आहे. आजची स्थिती अशी आहे की ‘राजकारण आणि राजकारणी’ हे दोन शब्द इतके बदनाम झालेले आहेत की, त्यांचा वापर शिवीसारखा होऊ लागला आहे. नव्हे शिवी म्हणूनच वापरला जातो आहे. एका मान्यवर संस्थेनेच सखोल चौकशीद्वारे जाहीर केलेली आकडेवारी अशी आहे की लोकसभेसारख्या सर्वोच्च मंडळात 268 खासदारांवर गुन्हेगारी केसेस दाखल झाल्या आहेत. हा आकडा कदाचित यापेक्षाही मोठा असू शकेल. पूर्वी राजकारणाला त्यागाचे अधिष्ठान होते; आता ते भोगाचे झालेले आहे. पूर्वी रयतसेवेतून राजसत्ता हे सूत्र अस्तित्वात होते; आज सत्तेतून सेवाकार्य असे सूत्र तयार झाले आहे. पूर्वी राजकीय मंडळींना कारागृहाची पदवी मिळालेली असायची. आज विरोधकांना कारागृहात घालणार्‍या दहशतवादी माणसाचा उमेदवारीसाठी विचार केला जातो. पूर्वी सत्तेच्या सिंहासनाकडे पैसा यायचा. आता पैसा टाकून सत्ता संपादन करावी लागते. पूर्वीचे राजकारणी स्वतःला जनतेचे सेवक समजायचे, आत्ताचे राजकारणी स्वतःला जनतेचे मालक समजतात. पूर्वी निवडून येण्यासाठी जाती-पातीचा आधार घेतला जात नव्हता. आता तो आधार घेतल्याशिवाय उमेदवार निवडूनच येऊ शकत नाही. कोणताही धर्म पूर्वी राजकारणात वापरला जात नव्हता; आता धर्माच्या आधारेच मतदान करण्याचे आवाहन केले जाते. पूर्वी सेवा, सचोटी आणि समर्पण यावर राजकारणी व्यक्तीची थोरवी मोजली जायची; आता स्वार्थ, संपत्ती, मॅनपॉवर, मसलपॉवर आणि दहशत यावर त्या व्यक्तीची थोरवी मोजली जाते. म्हणून थोर नाटककार बर्नार्ड शॉ यांनी असे म्हटले आहे.
‘‘बदमाशगिरी करण्याची सारी क्षेत्रे संपल्यावर राजकारणात प्रवेश करावयाचा असतो.’’
तरीही या माझ्या देशाचे भवितव्य निराशजनक नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मोठ्या संख्येने असलेला कर्तबगार तरूणवर्ग. हा तरूणवर्ग देशामध्ये झपाट्याने वाढतो आहे. एवढेच नव्हे तर तो तितकीच कर्तबगार आहे. या तरुणांनी नव्या संशोधनात मोलाची भर घातली आहे. नवे शोध लावले आहेत. भौतिक जीवन उन्नत होण्यासाठी हे सामाजिक कार्यात झोकून देत आहेत. गतार्थ रुढी-परंपरांचा त्याग करून इथेच स्वर्गीय सुख निर्माण करण्यासाठी झटत आहेत. पंचमहाभूतांच्या म्हणजे भूमी, जल, हवा, प्रकाश इ.च्या संशोधनाला त्यांनी वाहून घेतले आहे. मंगळावर उपग्रह नेण्यासाठी लागणारे संशोधन त्यांनी याच मातीवर उभे केले आहे. नानाविध रोगांवरचे संशोधन ते निष्ठेने करीत आहेत. त्यामुळेच येत्या काही वर्षात आपली भारतभूमी सुवर्णभूमी म्हणून जगामध्ये मान्यता पावेल यात शंका नाही. फक्त त्यांना वाव दिला पाहिजे. त्यांना सुखसोयी पुरविल्या पाहिजेत आणि त्यांच्या कार्यात लुडबूड करायचे बंद केले पाहिजे. त्यांच्या कर्तृत्वाला अष्टदिशा मोकळ्या करण्याचे काम या जुन्या पिढीने करावयास हवे इतकेच!

  • द. ता. भोसले, पंढरपूर
  • चलभाष – ९४२२६४६८५५

admin

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा