गुलाबी वर्तमानाचं वास्तव…

गुलाबी वर्तमानाचं वास्तव

काल कॉलेजच्या कॅपसमध्ये कुणीतरी पेरलं माझ्या न्हाल्या उरात चिमण्यांचे गुंंज… मी दिवसभर सजत राहिलो सुरात… भिजत राहिलो. आतल्या आत मनातल्या आभाळाच्या मिठीत… मी सहजपणे वावरातल्या फुलांंना अत्तराची स्वप्नंच बहाल केली… सारं काही स्वप्नातलं. तिचं मन… त्याचं मन… वार्‍यावर डोलत राहतं… हळूहळू कमी होतं दोन मनांचं.. दोन देहांचं एकमेकातलं अंंतर! मग काय…? आणाभाका हातात हात घेऊन… भविष्यकाळ एकमेकांच्या श्‍वासात श्‍वास सांडून निरंतर जगण्याचा… वयाच्या उमेदीने आणि एकमेकांबद्दल असणार्‍या आकर्षणातून जगण्याच्या वाटेवर बरंच काही घडून जातं… मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही…! तिही माझ्याशिवाय जगुच शकणार नाही.. हाच विचार घेऊन कॉलेजमधल्या चार भिंतीच्या आत आमचं प्रेमाचं शहाणपण हळूहळू वाढत जातं. एखाद्या दिवशी ती नाही आली कॉलेजला तर वर्गाच्या भिंतीच कोसळू लागतात आमच्या अंंगावर… तो दिवस… म्हणजे जीवघेण्या यातनांची परिक्षाच असते… आम्ही आमची ध्येय तिच्या मनाप्रमाणेच  बदलून टाकतो… ती म्हणेल त्याच हॉटेलात आमचा खिसा रिकामा होतो… कॉलेजची तीन वर्षे संपता संपता आमचं ध्येयही कुणाच्या तरी वाटेने संपून जातं… पण तिला भेटताना आमच्या मनात भविष्याचा प्रश्‍न कधीच उभा राहत नाही… गुलाबी वर्तमानात जगणार्‍या या पोरांच्या मनात भविष्याचं भयाण वास्तव कधी समजणार…? की केवळ एका गुलाबी दिवसाच्या साक्षीने असंच आम्ही वाहवत जाणार?
बेधुंद गाणे माझे, तुही बेधुंद जगण्याचा श्‍वास,
गुलाबी धुक्यात सार्‍या, तुझ्या मिठीचा भास!
अशा सगळ्या आभासी जगात जगताना  आमच्या मनात सहजपणे हिरव्यागार स्वप्नांचा माहोल तयार होतो. विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही सतत संर्पकात राहतो. आम्ही आमच्या गुलाबी स्वप्नांपासून जराही बाजूला हटत नाही. निसर्गत: वयात आल्यावर आपल्याला आवडणारी व्यक्तीच आपल्या जगण्यातील सर्वस्व असल्याचा ठाम विश्‍वास आपल्या मनात तयार होतो. एका बाजूला आपल्या जगण्यावर, आपल्या चांगुलपणाच्या अस्तित्वावर जीवापाड प्रेम करणारे आपले आईवडील असतात तर दुसरा बाजूला केवळ नजरेच्या टप्प्यात आल्यावर वयाच्या चुंबकत्वाने जवळ येणारा एक वादळी हुंकार असतो. त्या हुंकाराला अजून जगण्याचा नीटसा आकारही आलेला नसतो.

समाजात जगणं म्हणजे काय हे न समजताही तिच्यासाठी मरण्याची तयारी सुरू होते. वयात आल्यावर केवळ शारीरिक ओढ निर्माण होते, त्या ओढीला आम्ही गफलतीने प्रेम समजतो. त्याचबरोबर आपल्या लाडक्या मुलाच्या हातात जगाला जोडण्याचा एक धागा बापाने दिलेला असतो. त्या इंटरनेटच्या धाग्यातूनच तो त्याला जी पाहिजे तशी प्रेमाची व्याख्या शोधून काढतो. या अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुलाबी स्वप्नांच्या रात्री या केवळ कॉलेजपुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत तर त्या माध्यमिक शाळांपर्यंत पोहचल्याचे भयानक सत्य नाकारू शकत नाही. इयत्ता नववी, दहावीतील मुलं-मुली प्रचंड वेगाने या गुलाबी स्वप्नात आईवडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करीत आहेत. खरं तर ते असे करणारच नाहीत! अजून काय कळतंय या मुलांना? अशा प्रकारच्या अतिशय गोड समजुतीत सगळा पालकवर्ग असतो. या गोड समजूतीतून आपण बाहेर पडलं पाहिजे. घरात असणारा मोबाईलही सातत्याने तपासला पाहिजे. शाळेत जादा तास नसतानाही मुलगी शाळेत जात असेल तर तिच्या मनात नक्की कोणतं वादळ घोंगावत आहे याचा विचार करायलाच हवा. त्या मुलीचा मनाचा तळ गाठता आला पाहिजे. केवळ मुलीच्याच पालकांनी नाही तर मुलांच्याही पालकांनी आपल्या मुलांमध्ये होणारा बदल जाणून घेतला पाहिजे.. नाहीतर आपल्याच पोरांची पळून जाण्याची बातमी कुठून तरी आपल्यालाच ऐकावी लागणार यात कसलीच शंका नाही. तंत्रज्ञानाचं वास्तव हे विस्तवापेक्षाही भयानक आहे.

 

1990 च्या दशकात काही गोष्टी कळायला वयाची 25 वर्षे लागायची. त्याच गोष्टी केवळ 12 व्या वर्षी मुलांपर्यत पोहचतायत व त्यांना योग्य पद्धतीने कळत आहेत. नुकत्याच वयात आलेल्या या गुलाबी वर्तमानाचं काय करायचं? प्रचंड वादळात असलेल्या या मुलांच्या मानसिकतेला कशा पद्धतीचा आधार द्यायला हवा, याचा विचार पालकांनी केलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला या पाश्‍चात्य संस्कृतीने लादलेल्या आहेत. त्या आपण संपवू शकत नाही पण यातून आपण आपल्या मुलांना वाचवू तरी शकतो ना…! बर्‍याचवेळा शेतकरी शेतात असलेल्या डाळींबावर कोणता रोग आला आहे हे जाणतो व त्यापद्धतीने औषधांची फवारणी करतो. सध्या मनाचे विद्रुपीकरण करणारे विविध प्रकारचे रोग समाजात पसरत आहेत. या रोगाची सगळ्यांनाच माहिती आहे पण परंपरेने आलेल्या संस्कारांची योग्य मात्रा या मुलांपर्यंत पोहचत नसल्याने विविध प्रकारचे रोग बळावत चालले आहेत. गुलाबी थंडी घेऊन आलेल्या फेब्रुवारी महिन्यात पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायलाच हवे. नाहीतर ही मुलं आपल्यालाच थंडीतही घाम फोडतील आणि सहज एकच वाक्य म्हणून जातील.. ‘‘तुमच्या काळात तसं नव्हतं, आमच्या काळात आहे.’’

काळाच्या अशा एखाद्या प्रश्‍नाने निरूत्तर करायला भाग पाडतील. मुलं मोबाईलपासून कशी लांब राहतील याकडे जाणीवपूर्वक आपण लक्ष द्यायला हवं. जरी सातत्याने मोबाईलमध्ये असतील तरी आपण मोबाईलची तपासणी सातत्याने करायला हवी. आपला आपल्या मुलांवर प्रचंड विश्‍वास असतो. ते कोणतेही वाईट काम करणार नाहीत. मुलांवर विश्‍वास ठेवायला अडचण नाही पण त्यांच्या वादळी वयावर कुणी ठेवायचा विश्‍वास… वादळ कोणतंही असो त्या वादळाचे काय परिणाम होतात हे आजपर्यंत कुणालाच सांगता आलं नाही. या वादळी वयात मुलांच्या मनात नक्की कोणतं वादळं चाललेलं असतं…?
मुलांच्या मनातलं हे वादळ  थोडं लक्षपूर्वक वाचायला हवं. कारण ंहे वादळ वाचूनच तुम्हाला तुमच्या मुलांमधील वादळ समजणार आहेे…
तारूण्याच्या उंबरठ्यावर आमचंं खूपच वेगळं जगणं असतं… तिच्या पैजणांची रूणुझुणु आमच्या काळजाच्या गाभार्‍यात अलगदपणे पेरली जाते… तिच्या डोळ्यांच्या अबोल कडांनी जगण्याचे सूर गवसल्याचा भास होतो… सुगंधाचा सडा टाकून गेलेली तिच्या अस्तित्वाची झलक आम्ही रात्रभर विसरत नाही… तिच्याच तालात बोलत राहतो… तिच्या जगण्याचे सूर… हळूहळू तिची पेरणी आमच्या धडधडत्या काळजात अलगदपणे होते. कळत नाही आम्हालाही… तिचे अधुनमधुन हसणे… लाडिक लाडिक बोलणे… खतपाणीच असते आमच्या काळजात वाढणार्‍या प्रेम नावाच्या अंकुराला…
तीही फसते… विनाकारण हसते… सकाळच्या कोवळ्या उन्हात कारण नसताना कोणत्यातरी विषयाच्या नोटस् मागते… आम्ही भरभरून देतो… तिला जे पाहिजे ते… मग काय.. आमच्या  ध्येयाची स्वप्नं पेरणारा आमचा वर्गच कधीकधी गुलाबांनी नटलेली बाग होतो. काहीच कळत नाही… आम्हाच्या जगण्याचं सगळं शहाणपण केवळ तिच्याच भोवती फिरते… प्रेम करणं म्हणजे आपल्याच आत असलेल्या उजेडाची उंची वाढवणं असच काहीतरी वाचत राहतो आम्ही… आणि ध्येय बाजूला सारून तिच्याच मनाला मिठी मारून बसतो आम्ही. तीही तशीच. बावरत बावरत, स्वत:ला सावरत सावरत हिमालयाचा एखादा कडा कोसळल्यागत कोसळून जाते आमच्या जगण्यात…
मग रोज रोज गुलाबी वर्तमानकाळात जगताना आमचं भविष्य मात्र अंधाराकडं सरकत जातं… ध्येय सोडून आम्ही डोळस अंाधळ्याच्या पंगतीला बसलो आहे हे कधी उमगत नाही आम्हाला… फुलायचे.. उलायचे… खोलायचे वयच आहे आमचे! असं सतत कुणीतरी सांगत राहतं आम्हाला… मग काय… आम्हीही बेधुंद होऊन फुलून जातो… यौवनात आलेल्या फुलासाठी… रोजचा दिवस सुखाचे सदर घेऊन येतो आणि काळजाचं आभाळ व मूठभर चांदण्यांचा आनंद देऊन जातो… या सगळ्या गुलाबी मखमली स्पर्शात आमच्यातून ध्येय कधी गळून पडतं हे आम्हालाही कळत  नाही… कॉलेजच्या पहिल्या दिवशीच ‘मी अमूक होणार’ हा आशावाद आपले नाव टाकताना वहीच्या पानावर कोरला जातो पण… हळूहळू सारंच बदलत जातं… आमच्या गुलाबी वर्तमानाला स्पर्शाशिवाय काहीच कळत नाही…
दररोज तिचे दिसणे हवे… दररोज तिचे हसणे हवे… या सगळ्यात आमच्या पावलांच्या ठशांचे भविष्य अंधाराकडे झुकत जातं… गुलाबी वर्तमानाला भविष्याचं वास्तव कधीच कळत नाही… एकात गुंतून पडणारं आमचं मन… वर्तमानातल्या सुखासाठी भविष्याचा गळा घोटतं त्याचं काय? किती लोकांनी कॉलेजमधलं प्रेम आयुष्याच्या शेवटपर्यंत निभावलं…? काहींनी निभवलंही असेल पण त्यांच्या मनाच्या तळ्यात ते सतत ढवळत राहीलं असेल.. याउलट कॉलेजमधली मैत्री मात्र शेवटपर्यंत निभावल्याचे आपल्याला माहीत आहे… घटका दोन घटका देहभान विसरायला लावणारं प्रेम म्हणजे आमच्याच ध्येयाला लावलेला सुरूंग असतो…. गुलाबी वर्तमानाने आमच्या भविष्यात भयानकता येणार असेल तर प्रेमाचा हा दिवस साजरा न केलेला बरा की… फेबु्रवारी महिन्याच्या चौदा तारखेला आम्ही प्रपोज करायलाच हवं. निश्‍चितपणे करायलाच हवं… पण कुणाला…? प्रपोज स्वत:लाच करायला हवं…! प्रपोज स्वत:च्या ध्येयाला करायला हवं…! स्वत:च्या आत असणार्‍या चैतन्याला प्रपोज करायला हवं…! गुलाबी स्वप्नांच्या पाऊलवाटेतून चालणार्‍या मनाला नाही तर बापाची स्वप्नं उरात घेऊन असंंख्य संकटांच्या भर  उन्हात चालणार्‍या माझ्याच तळव्यांना मला प्रपोज करता आलं पाहिजे….! ती नाही म्हटली तरीही माझ्याच उत्तुंग जगण्याला माझ्या श्‍वासांचा जाहीर पाठींबा असायला हवा… म्हणूनच माझ्या श्‍वासांवर माझे प्रेम पाहिजे..
सुविचारांची बांधिलकी जपत मनातल्या हैदोसाला लगाम घालण्यासाठी मला पुस्तकातल्या अक्षरांवर प्रेम करता आलं पाहिजे… पानापानावर असलेल्या अक्षरातल्या आशयला मला प्रपोज करता आलं पाहिजे… प्रेम कराच दुसर्‍यावर… पण पहिल्यांदा स्वत:वर कराता आलं पाहिजे… म्हणून मित्रांनो, आजच्या या गुलाबातल्या वर्तमानात जगताना… भविष्याच्या उन्हाचा विचार जरूर करा… कारण आपल्या ध्येयाच्या वडाला गर्द सावली असते… लक्षात राहू द्या आपलं ध्येय म्हणजे वडाचं झाडं आहे आणि हां, हेेही लक्षात ठेवा की  गुलाबाच्या झाडात उन्हाळा झेलण्याची ताकद  निसर्गानेच दिली नाही… प्रेमाऐवजी जपता आली तर मैत्री जपूया… पुस्तकांवर प्रेम करूया… येणार्‍या गुलाबी दिनाच्या निमित्ताने…!

सुनील जवंजाळ
नाझरा विद्यामंदिर प्रशाला, नाझरा, ता. सांगोला, जि. सोलापूर
चलभाष – 9404692662

admin

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा