जगातलं पहिलं प्रेमपत्र

जगातलं पहिलं प्रेमपत्र

आजकाल मोबाईलच्या वापरामुळे पत्रलेखन जवळपास थांबल्यासारखेच झाले आहे. काही वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तिच्या पत्राची वाट पाहण्याचा काळ होता. पत्र लिहिणार्‍याच्या भावना पत्रात उतरत आणि ते ज्याला लिहिले आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत.

म्हणून तर प्रिय व्यक्तिची पत्रे जपून ठेवली जात. त्यांची पुन्हा पुन्हा पारायणे होत असत. हिंदी चित्रपटात तर या गोष्टीचा उपयोग करून गीतलेखकांनी अनेक गाणी लिहिली आहेत आणि ती कमालीची लोकप्रिय होऊन लोकांच्या ओठांवर आली. नायिकेने नायकाला प्रेमपत्र लिहावे, पोस्टमन हा त्यांच्यामधला पत्र पोहोचवणारा दूत. कधी कधी नायिकेला पत्र लिहिता येत नाही. मग ती पोस्टमनलाच सांगते,
खत लिख दे सावरियाके के नाम बाबू
कोरे कागज पे लिख दे सलाम बाबू
वो जान जायेंगे, पहचान जायेंगे.

त्या नायिकेला एवढा विश्वास आहे की आपले फक्त नाव असलेले पत्र त्या प्रियकराला मिळाले की बाकी सगळं तो समजून जाईल.
पण तुम्हाला माहीत आहे का की रुख्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र हे जगातील पहिले प्रेमपत्र असावे. किती बुद्धिमान म्हणावी रुख्मिणी! आणि तिच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच. मी असे का म्हणतो त्याला कारण म्हणजे त्या वेळची परिस्थिती. रुख्मिणी ही विदर्भराजा भीमकाची सुंदर आणि बुद्धिमान कन्या. लहानपणापासूनच श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या कथा तिच्या कानावर आल्या होत्या आणि त्या ‘सावळ्या सुंदरास’ तिने मनानेच वरले होते. तिचा भाऊ रुख्मी हा मात्र श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. त्याच्या मनात तिचा विवाह शिशुपालाशी व्हावा अशी इच्छा होती. शिशुपाल हा सुद्धा श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. रुख्मीने आपल्या बहिणीवर म्हणजे रुख्मिणीवर अनेक बंधने लादली होती. ती तिच्या स्वतःच्या मर्जीने कोठेही जाऊ शकत नव्हती. अशा वेळी तिच्या हातात काहीही नव्हते. तिचे आईवडील सुद्धा रुख्मीपुढे हतबल झाले होते.
त्यामुळे अशा परिस्थितीत तिच्या डोक्यात कृष्णाला पत्र लिहिण्याचा विचार येणे ही गोष्ट तिच्या बुद्धिमत्तेची निदर्शक आहे आणि ते कृष्णाला पाठवणे आणि त्याच्यासोबत पळून जाऊन विवाह करण्याची तिची तयारी ही तिची हिम्मत आणि धाडस दाखवणारी आहे. आपल्या पत्रात ती श्रीकृष्णाला म्हणते,
हे भुवनसुंदरा, जेव्हापासून मी तुझे गुण ऐकले आहेत, तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडले आहे आणि तुला समर्पित झाले आहे. तू माझे हरण करून घेऊन जा. तुझ्यासारख्या सिंहाचा भाग शिशुपालरूपी कोल्हा नेतो आहे असे कदापि होऊ नये.
साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इत्यादी धन घेऊन मी येईन. मी सतत तुझी पूजा करून काही पुण्यकृत्ये केली आहेत आणि मनाने तुला वरले आहे. आता प्रत्यक्षात माझा स्वीकार कर.
अंबेच्या देवळात मी गौरीपूजेसाठी जाईन, तेव्हा तू माझे मंदिरातून हरण कर आणि पराक्रमाने शिशुपालादिकांना हरवून राक्षसविधीने माझे पाणिग्रहण कर.
तू आला नाहीस तर मी समजेन की माझ्या साधनेत काही कमतरता राहिली असेल. तू मला या जन्मी लाभला नाहीस तर मी प्राणत्याग करीन पण जन्मोजन्मी तुझी वाट पाहीन आणि अंती तुझीच होईन!!
या पत्रातले मला आवडलेले वाक्य म्हणजे ती श्रीकृष्णाला म्हणते, साधना, संस्कार, प्रीती, भक्ती इ. धन घेऊन मी येईन! किती सुंदर विचार आणि लाख मोलाचे धन. पैसा नाही, हुंडा नाही, वस्तू नाही, तर साधना, संस्कार, प्रीती आणि भक्ती या सुंदर भावना हेच धन आणि तेच ती घेऊन येते. जिचा कृष्ण सखा आहे, पती आहे तिला आणखी काय हवे? त्या श्यामसुंदराला सुद्धा कशाची अपेक्षा असते? तुमची साधना महत्त्वाची, संस्कार महत्वाचे, प्रीती आणि भक्ती महत्त्वाची. तुम्ही भक्तिभावाने आपले हृदय त्याला अर्पण करा, म्हणजे तो रुख्मिणीप्रमाणे तुमचेही हरण करील. तुम्ही त्याचे होऊन जाल. हाच तर या पत्रातला आपल्या सगळ्यांसाठी संदेश आहे, नाही का?

-विश्वास देशपांडे
चाळीसगाव
9403749932

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा