’गर्भ भाड्याने देणे आहे!’

घर भाड्याने देणे आहे, सायकल भाड्याने देणे आहे, टीव्ही भाड्याने देणे आहे, या श्रेणींत मानवी अवयवाने केव्हा स्थान मिळवले, कळलेही नाही. गर्भ भाड्याने देणे आहे किंवा गर्भाशय भाड्याने देणे आहे, काही वर्षांपूर्वी विचित्र वाटलेली या संकल्पना हळूहळू कळत नकळत आमच्या विचारात रुजू लागली आहे, नव्हे समाजात बर्‍यापैकी प्रस्थापित होऊ लागली आहे. कोणत्याही कारणाने स्त्री बाळाला जन्म देण्यास असमर्थ असेल व इच्छा असूनही तिला किंवा एखाद्या जोडप्याला स्वतःच्या अपत्याचे सौख्य लाभू शकत नसेल, अशा वेळेस त्या स्त्रीचे किंवा दुसर्‍या स्त्रीचे बीजांड व पुरुषाच्या शरीरातील शुक्राणू याचे प्रयोगशाळेत फलन घडवून आणले जाते. त्यातून निर्माण झालेला गर्भ त्याच किंवा दुसर्‍या स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो, ही झाली सरोगसी. बरेचदा गर्भाची काही कारणाने वाढ होत नाही, वारंवार गर्भपात होतो, अशा वेळेस गर्भधारणा झाल्यानंतर ते मूल दुसर्‍या बाईच्या गर्भाशयात वाढवतात. अशा प्रकारे अपत्यहीन जोडप्यांना अपत्याचे सुख लाभावे याकरिता जी स्त्री पैशाच्या मोबदल्यात तिचे गर्भाशय 9 महिन्याकरिता वापरायला देते म्हणजे डोनेट करते, ती म्हणजे सेरोगेट मदर. अर्थात प्रत्येक वेळेस सरोगसी पैशांच्या मोबदल्यात केली जात नाही तर अनेकदा नात्यातील स्त्रिया मदत म्हणूनही सरोगसीला तयार होतात! याबाबतीत आई/बहिणीने मदत केल्याची देखील उदाहरणं आहेत.

सरोगसी! विज्ञानाने केलेला किती सुंदर आविष्कार आहे हा! अनेक घरात नंदनवन फुलवण्याचा आधुनिक उपाय वैद्यकशास्त्राने शोधला आहे. स्वतःच्या अपत्यासाठी तरसलेल्या कितीतरी जोडप्यांना मातापिता होण्याचा अधिकार प्राप्त करवून दिला आहे. यासाठी विज्ञानाचे उपकार मानावे तितके थोडेच आहे. सरोगसीमध्ये गर्भ भाड्याने घेतलेले जोडपे नऊ महिने सेरोगेट मदरची पूर्ण काळजी घेतात. आपले बाळ त्या स्त्रीच्या पोटात वाढतंय, त्याला काही कमी पडू नये, ते निरोगी राहावे, याकरीता ते प्रयत्नशील असतात. अर्थात सेरोगेट मदर होणेही सोपे नसते. सेरोगेट मदर होऊ इच्छिणार्‍या स्त्रीचे वय साधारण 25 ते 35 पर्यंत अपेक्षित असते, तिचे लग्न झालेले असणे तसेच तिला स्वतःची एक किंवा दोन मुले असणे जरुरी असते. त्याचप्रमाणे या कामात तिच्या पतीची संमतीही आवश्यक असते. तिला काही आजार आहे का, हेही तपासले जाते. याशिवाय प्रत्येक जोडप्याच्या वैयक्तिक अटीही असू शकतात.

सरोगसीतून जन्मणारे बाळ साधारण आठ दिवसात त्याच्या नैसर्गिक मातापित्यांकडे सोपवले जाते. प्रत्यक्ष जन्म देणार्‍या आईचं म्हणजे सेरोगेट मदरचे दूध मिळते तेवढाच काळ त्या मदरचा आणि बाळाचा संबंध असतो. बरेचदा, विशेषतः भारतीय जोडप्यांच्या बाबतीत आपण कुणाचे मूल आपल्या पोटात वाढवतो, याची त्या स्त्रीला कल्पनाही नसते तर बरेचदा तिला जन्म दिलेल्या बाळाचे दर्शनही दिले जात नाही. नऊ महिने ज्या बाळाला आपल्या शरीरात वाढवले, असंख्य कळा सोसून जन्म दिला त्याबाबतीत या स्त्रिया इतक्या कोरड्या कशा राहू शकतात, याचे आश्चर्य वाटते. हे बाळ आपले नाही, हा फक्त एक सौदा आहे, याची त्या मदरला पूर्णपणे कल्पना असल्याने बहुतांश वेळेस या प्रकारात भावनिक गुंतागुंत नसते. याकरिता सेरोगेट मदर होऊ इच्छिणारी स्त्री भावनिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का, हे पाहिले जाते. तिचे कौन्सेलिंग केले जाते. तरीही अमेरिकेतील सेरोगेट मदरसारखी एखादी स्त्री असू शकते जिने बाळाच्या जन्मानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक पालकांकडे सोपवायला नकार दिला! प्रकरण न्यायालयात गेले आणि करारांचा संदर्भ देत, न्यायालयाने बाळ नैसर्गिक मात्यापित्यांकडे सोपवले. थोडेफार असेच एका हिंदी चित्रपटात दाखवले आहे. एक तरुण जोडपे मुल होत नाही म्हणून सेरोगेट मदरचा पर्याय निवडतो. यात तरुण पुरुषाचे दुसर्‍या एका स्त्रीशी मिलन घडवून आणायचे व तिला मूल झाल्यानंतर तिने ते त्या जोडप्याला देऊन आपले पैसे घेऊन तिथून कायम निघून जायचे असे ठरले असते; मात्र मूल पोटात वाढवताना, त्या स्त्रीचे पोटातील बाळाशी भावनिक बंध जुळतात व बाळाला जन्म दिल्यानंतर ती बाळाला सोडून जायला नकार देते! अशा वेळी सहजच वाटून जाते..

वेदना ‘सेरोगेट’ आईच्या, जाणील्या ना कुणी,
पैशापरी विकले उदर, बोच ठेविली जनी…
आधार होता तो कुणाचा, तुकडा तिच्या काळजाचा…
होती ती जन्मदाती, रुपात भास देवकीचा…
सोडता नव्हती सोडत, नाळ छोट्या जीवाची…
उदराचे होते फुल ते, नाती होती रक्ताची…
अश्रू दाटले लोचनी, घालमेल उरी भावनेची…
चुलीकरीता पेटविलेली, मोल उजविलेल्या कुशीची…
बोचरे शल्य अंतरीचे, कळा जिव्हारी जीवनी…
वेदना ‘सेरोगेट’ आईच्या, जाणील्या ना कुणी…

परंतु बरेच परदेशी जोडपे सेरोगेट मदरच्या भावनांचा आदर करतात. अधूनमधून तिला फोन करतात. तिची, तिच्या कुटुंबाची चौकशी करतात. तिच्या त्यागाची जाण ठेवतात.

वैद्यकशास्त्राने केलेल्या या संशोधनाने अनेक घरांचे गोकुळ झाले.  हॉलिवूड तसेच बॉलिवूड मधील अनेक सुप्रसिद्ध तारे तारकांनी पुत्रप्राप्तीकरिता सरोगसीचा पर्याय निवडला आहे. महाराष्ट्र सरकारने तर सरोगसी मदरला सहा महिन्यांची सुट्टी मंजूर केली आहे. परंतु प्रत्येक गोष्टीत स्वार्थ पाहणारी व्यक्ती ही संधी तरी कशी चुकवेल? या आविष्काराचेही तसेच काहीसे झाले आहे. इतर विकसित देशांपेक्षा आपल्या देशात सरोगसी स्वस्त पडते, या कारणाने आपल्या देशात येऊन मुले मिळवण्याचे प्रमाण जास्त आहे. एका संशोधनानुसार देशात पाच हजारावर ‘फर्टिलिटी सेंटर्स’ असून दर वर्षी रुपये 10 करोड इतका सरोगसीचा व्यवसाय होतो. यात भरपूर पैसा मिळत असल्याने बर्‍याच स्त्रिया या व्यवसायाकडे आपणहून वळताना दिसतात तर काहींच्या बाबतीत त्यांच्या नवर्‍यानेही पुढाकार घेतलेला आढळतो. काही स्त्रिया बाळंतपणामुळे करिअरवर परिणाम होऊ नये म्हणूनही सरोगसीचा पर्याय निवडताना आढळून आल्या आहेत; मात्र याबाबतीतले अनेक प्रश्न अजूनही उत्तरांच्या प्रतीक्षेत आहेत, विशेष करून सेरोगेट मदरच्या भावनिक नात्याचे काय? मूल जन्मतः विकलांग असले आणि त्याची जबाबदारी त्याच्या आईवडिलांनी नाकारली तर त्याचे पुढे काय? मूल जन्मतःच मृत्यू पावले किंवा बाळ जन्माला यायच्या मधल्या काळात त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला तर बाळाचे काय? प्रसुतीच्या वेळेस किंवा गर्भधारणेच्या दरम्यान सेरोगेट मदरचा मृत्यू झाला तर काय? वगैरे वगैरे.. यात फसवणूक झाली तर ती स्त्री किंवा ते जोडपे न्याय मागायला कायद्याचा आधार मागू शकत नाहीत. याकरिता कायद्यात सुधारणा आवश्यक आहे. ज्यात आई, बाळ आणि सेरोगेट आई तिघांचाही विचार होण अपेक्षित आहे. एकाच वेळेस दोन स्त्रियांचे गर्भाशय भाड्याने घेणे आणि वेळेवर एकीला काही कारणास्तव गर्भपात करायला लावणे किंवा अपंग मूल जन्माला आले तर त्याला सोडून देणे, असे प्रकारही या व्यवसायात घडतात. या विषयावरील ऍड. समृद्धी पोरे निर्मित ’मला आई व्हायचंय’, हा हृदयस्पर्शी चित्रपट सुरेख संदेश देऊन जातो.

स्त्रियांचा मान सन्मान कायम राहावा या दृष्टीने भारत सरकारने या व्यवसायावर नियंत्रण आणण्याचे ठरवले आहे. त्याकरिता सरोगसीकरिता भारतात येणार्‍या विदेशींना व्हिसा न देण्याचे तसेच सरोगसीतून जन्मलेल्या बाळांना भारताबाहेर जाऊ न देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्याचप्रमाणे एक विधायक केले गेले आहे, ज्यात फक्त विदेशींना भारतात सरोगसीकरिता बंदी घातली आहे. तसेच एक महिला एकापेक्षा अधिक वेळेस तिचे गर्भाशय भाड्याने न देऊ शकण्याबद्दल नमूद केले आहे. गर्भ भाड्याने देणार्‍या महिलेचा मृत्यू झाल्यास डॉक्टरांना 5 वर्षांचा कारावास व रुपये 10 लाख दंडाची कठोर कारवाई होऊ शकते; मात्र विदेशींना भारतात सरोगसी प्रतिबंधित करणे तसेच व्यावसायिक सरोगसी बंद करण्याच्या विरोधात 70 महिला कोर्टात गेल्या आहेत!

व्यवसाय आला म्हणजे पैसा आला आणि पैशाच्या मागोमाग कमिशन खाणारे दलालही ओघाने आलेच. या कारणाने हळूहळू गर्भ भाड्याने देणे हा सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीसारखा व्यवसाय ठरतो आहे. बरेचदा यात स्त्रीची होणारी शारीरिक व मानसिक कुचंबणा दुर्लक्षित केली जाते. वारंवारच्या बाळंतपणामुळे त्यांना शारीरिक व्याधी जडू शकतात परंतु आर्थिक परिस्थिती तसेच कुटुंबातून येणारा दबाव यामुळे त्या सरोगसीच्या बाळंतपणाला सामोर्‍या जातात. हे वाचून तीव्र दुखः होते! पैशाच्या हव्यासापायी गर्भाशयाचा बाजार मांडला जाऊ नये, स्त्री मुलं जन्माला घालण्याचे मशीन ठरू नये तसेच विज्ञानाचे हे वरदान शाप ठरू नये, एवढीच इच्छा आहे.

■ आसावरी इंगळे
65- सी, सेक्टर 21, रिलायंस ग्रीन्स, मोटी खावडी, जामनगर – 361 142 (गुजरात)
मो. : +91 9662043611 / 9998973611

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा