एकविसावे शतक आणि छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज.

छ. शिवरायांसाठी ‘युद्ध’ हे साधन होते, आणि स्वराज्य निर्मिती हे त्यांचे ‘साध्य’ होते. त्या स्वराज्य निर्मितीचा उद्देश, छ शिवरायांच्या भूमिका काय होत्या ? यासंदर्भाने आम्ही शिवचरित्राकडे पाहतो का ? खरेतर आज लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असताना अशा २१ व्या शतकात सुद्धा त्यांचा उदोउदो का व्हावा ? जेव्हा की ते सरंजामशाहीतील राजे होते, आणि आज तर सर्वदूर लोकशाही व्यवस्था आहे. लोकांच्या हातात सत्ता असूनही स्वतःच्या निर्मित व्यवस्थेपेक्षा सरंजामशाहीतील राजाच्या व्यवस्थेचा उदोउदो का व्हावा? तेव्हा याचाही आपल्याला विचार करावा लागेल. आजही स्वातंत्र्यकांक्षेचे ठसठशीत प्रतीक तेच का असावेत ? भारताच्या इतिहासातील ६०% संशोधन आजही त्यांच्या भोवतीच का असावे ? टिळकांना स्वातंत्र्यासाठी सार्वत्रिकपणे शिवजयंती का साजरी करावी वाटली ? या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला पूर्वग्रहदूषितपणा दुर सारून डोळसपणे त्यांच्या चरित्रात डोकवावे लागेल. म्हणून शिवजयंतीचे महत्व असेल. त्यानिमित्ताने घेतलेला हा धांडोळा…..

बारा मावळच्या व्यवस्थेत स्वराज्य निर्मितीची प्रेरणा.

छ. शिवाजी महाराजांना लोकांनी आग्रह केला म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन केले नाही. ज्या मुरार जगदेवाने बारा मावळ व संपूर्ण पुणे उध्वस्त केले होते आणि तिथे कुणीच येऊन रहायला तयार नव्हते तो भाग शहाजी राजा यांच्या जहागिरीचा भाग होता. तर १६३६ मध्येच पुणे-सुपे भागाचा पोटमोकासा बाल शिवबा यांच्या नावे शहाजी राजे यांनी लावला होता. तेव्हा जिजाऊ साहेब आपल्या बाल शिवबा यांना घेऊन पुण्यात येतात आणि पुन्हा पुणे वसवतात. लालमहाल उभा करून आजूबाजूला लोकांना घेऊन राहू लागतात. तेव्हा ‘बारा मावळ’ या भागात बाल शिवबा राजे यांनी स्वतः फिरून, व्यवस्था लावून उभा केला. तेथील लोकांना जीवित्वाची हमी देणे, लागवडीस बी-बियाणे देणे, सुगी येईपर्यंत अन्नधान्याची तजवीज करणे, शेतीस अवजारे पुरविणे, जंगली जनावरांपासून शेती आणि जीवित्वाच्या संरक्षणाची हमी देणे, त्यांचा आत्मविश्वास प्रबळ करणे, स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे ही सर्व व्यवस्था करण्यातून बाल शिवबा यांना स्वराज्य निर्मितीची खरी प्रेरणा मिळाली. म्हणून स्वराज्य निर्मितीची बीजे बारा मावळच्या त्यांनी केलेल्या व्यवस्थेत होती.

बाल्यावस्थेतच बुध्दीचातुर्याची चुणूक.

२५ जुलै १६४८ रोजी आदिलशाह दरबारात शहाजी राजांना साखळदंड बांधून हजर करण्यात आले. हे कळताच हताश न होता अवघ्या १८ वर्षाच्या शिवबांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करीत दिल्लीत मोगल बादशहा शहाजहान यांना दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे आपल्या अधिपत्याखाली काम करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. महाराजांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची १६ मे १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. त्या बदल्यात महाराजांना आपल्याकडे असलेला सिंहगड आदिलशाहास द्यावा लागला. तेव्हा बाल्यावस्थेतील त्यांच्या बुद्धीचातुर्याची चुणूक आपणास येथे लक्षात येते.

नेमका दगा कुणी केला ?

कुरुंदकर लिहितात “खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला? राजांनी की खानाने? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला… नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खान वधा पाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल – शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर छ. शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजय उत्सव साजरे करत बसत नाहीत. खान वधा पाठोपाठ कोल्हापुर – पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून त्यांची लूट करणे व फौजा दुप्पट करण्यात शक्ती वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य.”

“स्थायी यश मिळणार्‍या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपती शिवराय होत … ”

छ. शिवाजी राजे फक्त ‘हिंदू’चे राजे नसून जुलमी वतनदाऱ्या कुणाच्या होत्या ?

“छ. शिवाजी महाराजांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला वाव नाही.” शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष हिंदू विरुद्ध मुसलमान अशा स्वरुपात नाकारताना कुरुंदकर मार्मिकपणे म्हणतात – “परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही.”

छ. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का उभे राहिले, या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे. छ. शिवाजी महाराजांनी जिद्दीने घडवून आणलेला हा वतनदारीचा वध सर्वात महत्त्वाचा आहे. याच जोडीने सर्वसामान्यांच्या स्त्रियांची अब्रू वतनदारांच्या पुंडांपासून वाचवून तिला कुठेही निर्भयपणे फिरता येईल असे राज्य छ. शिवाजी महाराजांनी निर्माण केले, असे कुरुंदकर म्हणतात. छ. शिवरायांनी आपल्या म्यानातून पहिल्यांदा तलवार काढून ती कुणावर चालवली असेल तर रांझ्या गावच्या पाटलावर. त्यावेळी महाराज अवघे १५ वर्षाचे होते. बलात्काराच्या कारणावरून त्या पाटलाचा चौरंग करण्याचे आदेश दिले ते बाळ राजांनी. यामुळे पुढे चालून मावळ प्रदेशात कुठल्याही माणसात कुण्याही महिलेकडे तिरकस नजरेने बघण्याची हिंमत राहीली नाही. ज्यावेळी महाराजांनी आप्तस्वकीय लोकांची वतनं खालसा केली तेव्हा रयतेला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. कारण हे गावोगावचे पाटील देशमुख वतनदार कर वसूलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनातील अर्ध्यापेक्षा अधिक अन्नधान्य गोळा करायचे. या जुलमी वतनदारांच्या जोखडातून रयतेला मुक्त केल्यामुळेच छ. शिवाजी महाराजांना ‘रयतेचे राजा’ असे म्हटले जाते. पण आजही सर्वत्र वतनदाऱ्या चालूच आहेत ? अवैध धंद्यांना संरक्षण कुणाचे आहे ? दर महिन्याला मुंबई सारख्या एका शहरातून १००-१०० कोटींचा अवैध सारा (पैसा) गोळा केला जातो. असे असताना देशात सर्वत्र परिस्थिती काय असावी ? ह्या वतनदाऱ्या कोण चालवतो ? तेव्हा यांच्या विरुद्ध आजही शिवरायांचा लढा चालूच आहे….

प्रजादक्ष, दूरदृष्टीचा जाणता राजा.

“छ. शिवाजी राजे धार्मिक होते, पण देवभोळे नव्हते. कठोर होते पण क्रूर नव्हते. साहसी होते, पण अतातायी नव्हते. व्यवहारी होते, पण ध्येयशून्य नव्हते. उच्च ध्येयाची स्वप्ने पाहणारे स्वप्नाळूही होते आणि ती स्वप्ने वास्तवात उतरवणारे कठोर वास्तववादी असे त्यांचे स्वरूप होते. ते साधे राहत नसे. डौलदार, वैभवसंपन्न अशी त्यांची राहणी, पण ते डामडौलात उधळे नव्हते. परधर्म सहिष्णुता त्यांच्या जवळ होती. इतक्या लढाया ते लढले पण त्यासाठी प्रजेवर नवे कर त्यांनी कधीही लादले नाहीत. असा हा आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, दूरदृष्टीचा असा हा जाणता राजा!” प्रामाणिकपणा, देशप्रेम, साधेपणा, निस्वार्थ देशसेवा, स्वाभिमानी वृती, स्त्रीचा आदार, सहिष्णुता, वस्तुनिष्ठता, रयतेबद्दल कणव, धर्मनिरपेक्ष वृत्ती, अष्टावधानी, प्रचंड मेहनत, असामान्य हिंमत, अन्याया विरुद्ध अविरत लढा, विज्ञानवादी विचार, कनवाळूपणा, दूरदृष्टी, निष्कपटता, उदारता इत्यादी अनेकविध वैशिष्ट्ये असणारा हा रयतेचा राजा.

छ. शिवरायांचे गुप्तहेर खाते.

आग्र्याला नजर कैदेत असताना छ. शिवाजी महाराजांनी ६०० मावळ्यांच्या परतीच्या परवान्यात मोठ्या शिताफीने औरंगजेब बादशाह कडून स्वताचाही एक परवाना बनवून घेतला होता. तो परवाना मोगल चौकीत दाखवूनच नरवर घाटी ओलांडून ते राजगडावर सुखरूप आले. परंतु पुढे नेमक्या कोणत्या मार्गाने ते महाराष्ट्रात येतात हे आजही संशोधकांना स्पष्ट झालेले नाही.. यातच त्यांच्या गुप्तहेर खात्याचं सर्वात मोठं यश आहे. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात रामोशी लोकांचे आणि बहिर्जी नाईकाचं सर्वात मोठं योगदान होतं. यातून भारतीय गुप्तहेर खात्यांनी खुप काही शिकण्याजोगे आहे.

आरमार उभे केले.

गडांची डागडुजी, नवीन गडांची उभारणी आणि आरमाराच्या बांधणीकडे लक्ष हा छ. शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन होता. यासाठी महाराजांना दर्यासारंग दौलतखान यांची फार मोठी मदत झाली. ते स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख होते. महाराजांनी अत्यंत अल्पावधीत उभारलेल्या आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज व फ्रेंच यांनी चांगलीच धसकी घेतली. पुढे पेशव्यांनीच आरमार नष्ट करुन मराठी साम्राज्याचा पाया खिळखिळा करण्यात मोठा हातभार लावला. जर पेशव्यांनी ही आरमारं नष्ट न करता या आरमारांचा वापर साम्राज्य विस्तारासाठी केला असता तर कदाचित इंग्रजांना देशावर सत्ता मिळवणे कठीण होऊन बसले असते. कुठलाही अनुभव नसताना महाराजांनी जी भक्कम आरमारे उभी केली त्यातून आज भारतीय नौसेनेला आजही खुप काही शिकता येते.

अपराजित मन पराजित राजकारणाला नविन जिद्द देते.

पुरंदरच्या तहातून छ. शिवाजी महाराज पुन्हा उभे राहतात ते स्वातंत्र्यकांक्षेच्या जोरावर, हे सामर्थ्य तलवारीतूनीच उगवत नाहीतर मनातून उगवणारे असते. मनगटात कर्तृत्व निर्माण करण्यापूर्वी ते मनात रुजवावं लागतं, तेच छ. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्यं होत. नियोजनपुर्वक साहस हीच छ. शिवाजी राजांची प्रकृती होती.

‘सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर’

एकवेळ महाराजांनी हिरोजी इंदलकर यास जबाबदारी दिली ती ‘रायरी’चा ‘रायगड’ बनवला जावा. तिकडे राजे पुरंदरच्या तहात व्यस्त होते आणि इकडे बांधकाम करण्यासाठी पैशाची कमतरता भासू लागली. त्यामुळे स्वताचं शेत आणि राहाता वाडा विकून हिरोजी इंदलकरांनी अविरतपणे किल्ले रायगडाचे बांधकाम चालू ठेवले आणि स्वराज्याची राजधानी बांधून काढली. वाडा विकल्यामुळे सर्व कबिल्यासह ते रायगडावर आले आणि एक झोडपी उठवून तिथेच राहायला लागले. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी बोलावले. महाराज म्हणतात, हिरोजी तुम्ही आपल्या परिवाराची काळजी न करता घरदार, शेत-शिवार विकून राजधानी बांधून काढलीत. बोला तुम्हाला काय हवयं….? त्यावेळी हिरोजी मान झुकवून म्हणतात, महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरांत टाकलायं, आम्हाला आणखी काय हवयं ? महाराज म्हणाले नाही हिरोजी, तुम्ही काही तरी मागितले पाहिजे. त्यावेळी हिरोजी म्हणाले महाराज एक विनंती आहे – या रायगडावर आम्ही जगदीश्वराचे मंदिर बांधले आहे त्या मंदिराच्या एका पायरीवर आमचे नाव कोरण्याची अनुमती हवी आहे.

“राजे तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावर असाल तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल आणि तेव्हा तेव्हा तुमच्या पायांची धूळ आमच्या मस्तकी लागावी एवढीच आमची इच्छा आहे.”

लगेच महाराजांनी होकार दिला आणि हिरोजीने जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर ‘सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर’ अशा नावातील दगड बसवला. तो दगड आजही आपली साक्ष जगाला देतो. त्यातून आपण काही शिकणार आहोत का नाही ? आज करोडोंच्या निविदा निघतात त्यातील टक्केवारी आणि भ्रष्टाचार पाहिला तर आम्हाला थोडीशीही लाज वाटत नाही.

छ. शिवाजी महाराजांना आपली पत्नी सईबाई, वडील शहाजीराजे आणि आयुसाहेब जिजाबाई यांच्या स्मरणार्थ स्मारक, स्मृतिस्थळ बांधावे हे कधी मनी आलचं नाही आणि येण्याचं कारणही नव्हतं. सततच्या दुष्काळामुळे अन्नान करून रयत त्रस्त असतांना करोडो रुपयांचा कर वसूल करून आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ‘ताजमहल’ बांधणाऱ्या शाहजहान सारखी ‘रसिकता’ छ. शिवाजी राजांकडे असण्याचे कारणच नव्हते. तितकी श्रीमंती छ. महाराजांकडे कधीही नव्हती. रयतेवर जुलूम करून, कर आकारून साम्राज्य वाढवणे आणि ताजमहल सारख्या वास्तु उभ्या करणे मग यात नवल करण्यासारखं काय ? स्मारके , विलासी राजवाडे, स्मृतिस्थळे यांसारख्या वास्तु उभारण्याची वृत्ती, श्रीमंती आणि रसिकता महाराजांकडे असण्याचे कारणच नव्हते. आपल्याच मुलुखात बाह्य आक्रमणे आणि स्वकीय वतनदारांची अरेरावी यामुळे त्रस्त असणाऱ्या बहुजन रयतेला एकत्र करून त्यांच्या अंगी पिचलेला स्वाभिमान पुनश्चः जागृत करणे आणि खऱ्या अर्थानं ‘रयतेचं राज्य’ उभं करणं हेच छ. शिवाजी महाराजाच्या जीवनाचं उदिष्ट होतं.

अभेद्य व चिवट महाराष्ट्र निर्मिती:

छ. शिवाजी महाराजांना केवळ ५० वर्ष आयुष्य लाभले असतांना त्यापैकी ३० वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शिल्लक राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य म्हणता येईल. औरंगजेब मैदानात उतरण्यापुर्वी छ. शिवाजी राजांसारखे असामान्य नेतृत्व संपुष्टात आले होते. महाराजांसारखे कुठलेही नेतृत्व नसताना देखील औरंगजेब बादशाहच्या लाखोंच्या फौजांच्या विरुद्ध तुटपुंजी मराठी सेना आणि येथील जनता २०-२५ वर्षे अखंड झगडत राहिली. औरंगजेब लाखोचे सैन्य घेऊन महाराष्ट्राच्या छाताडावर वर्षानुवर्षे उभा आहे. छ. शिवाजी महाराजांनी पेटवलेली ज्योत पुढे छ. संभाजी महाराजांनी काही काळ तेवत ठेवली. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या तेही नंतर निखळून पडले. अशा अवस्थेत महाराष्ट्र २७ वर्षे लढला. छ. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले ‘स्वराज्य’ इथल्या जनतेस प्राणपणाने टिकवण्या इतके मोलाचे वाटले म्हणून ही जिद्द निर्माण झाली. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत टिकणारे आणि योग्य वेळ काळ येताच पुन्हा उफाळून येणारे राजकारण महाराजांनी निर्माण केले. मोगलांचा मोठा पराभव कधीच न करू शकणाऱ्या महाराजांनी मात्र अजिंक्य महाराष्ट्र निर्माण केला. ज्याला पराजित करता करता औरंगजेब स्वत:ची बलाढ्य मोगल सत्ता मात्र खिळखिळी करून बसला व वेगाने विनाशाकडे वळला. आणि अखेरला औरंगजेब सारख्या बलाढ्य बादशाहाचा शेवट महाराष्ट्राच्याच मातीत झाला. दिल्ली वरून देशाचा बादशाह दक्खनमध्ये उतरतो आणि छ शिवाजी महाराजा सारखा कुठलाही मोठा राजा नसतांना येथील जनता २७ वर्षे झगडत राहते, अखेरला येथेच औरंगजेब बादशहाचा शेवट होतो परंतु तो काही महाराजांनी निर्माण केलेले राज्य जिंकू शकत नाही यातच छ. शिवाजी महाराजांचे खरे यश आहे.

राज्याभिषेक

“महाराजांनी स्वत:ला छत्रपती होण्यासाठी नव्हे तर आपल्या प्रदेशा व्यतिरिक्त हिंदूस्तानातील इतर एतदेशीयांना मी तुमचा रक्षणकर्ता आहे याची ग्वाही द्यावयाची होती व त्यांना आश्वस्त करावयाचे होते म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.”

“पराभवाचे तडाखे खात नसल्याचे आस्ते करणारा, सतत प्राणांतिक झुंज देत सिध्दांचे रक्षण करत राज्याबाहेर स्वत:चा दरारा निर्माण करणारा व राज्यातील जनतेत चिवट अजिंक्यपणा निर्माण करणारा हा छत्रपती शिवाजी राजा होय.” त्यांच्यात भारतभर आपले स्वराज्य निर्माण करावयाची जिद्द होती म्हणून तर राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकाच्या माध्यमातून राज्या बाहेरील जनतेस त्यांना आश्वस्त करावयाचे होते की मी तुमचा रक्षणकर्ता आहे, पालनकर्ता आहे. ते एक दक्ष आणि नेहमी सावध असलेले राजे होते. सर्वांगीण व्यक्ती होते. कुठे चढाई तर कुठे माघार घ्यावयाची याचा अचूक वेध घेणारा चाणाक्ष राजे होते. महाराज धर्माभिमानी, धार्मिक औदार्यवादी होते परंतु धर्मभोळे आणि अंधश्रद्धाळू नव्हते. मुस्लिम संत याकुब बाबा यांच्यावर त्यांची मोठी श्रद्धा होती. याकुब बाबांना त्यांनी शेकडो एकर जमीन आणि संपत्ती दान म्हणून दिली. लुटारू स्वकीय वतनदारांवर त्यांनी टाच आणून आणि रयतेस त्यांच्या जाचापासून मुक्त केले. महाराजांनी माणसे बांधली, फौजा बांधल्या, राज्य बांधले, किल्ले बांधले, आरमार बांधले, भाषा बांधली, बाजारपेठा वसवल्या. त्यांनी वतनदारीचा नाश करून चोख शासन आणि नैतिक निर्दोष बैठक आपल्या आदर्श राज्यसाधनेत निर्माण केली. म्हणून हे निर्माण झाले ते रयतेचे राज्य जे रयतेला आपलं वाटायचं. आज २१ व्या शतकातही त्यांच्या विचारांची पूर्वी पेक्षा अधिक गरज वाटते आहे ह्यातच आमचा पराजय नाही का? याचे आत्मचिंतन या शिवजयंती निमित्ताने होईल का?

प्राचार्य नरहर करुंदकर यांनी छ शिवाजी राजांचे यथार्थ वर्णन करताना म्हटले की, “छ. शिवाजी राजाचे व्यक्तित्व पाऱ्यासारखे चकाकणारे आहे. साच्यात बसवता येईल इतके ना घन; फुंकर मारुन उडवावे इतके ना हलके पण चिमटीत मात्र सापडत नाही आणि बोटांच्या फटीतून ओघळून जावे असे.”

छ. शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांचे एक शिवसूक्त आठवते…….

“दिशांना निराशेनेच घेरलेले
गुलामीत लाचार होती घरे
असा घोर काळोख भेदून त्याने
विझवली निराशा, उजवले चिरे.”

✍ प्रा. संदीप बालासाहेब देशमुख (नांदेड)
संपर्क : ९९२३९०९१७५

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “एकविसावे शतक आणि छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज.”

  1. रविंद्र कामठे

    जय शिवराय

  2. Anil parbhani

    खुपच सुंदर लेख आहे, अप्रतिम। , धन्यवाद,

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा