खरंतर मी मनात गुंफलेला हा सुंदर आठवणींचा सुंदर गोफ आहे का? हा माझा मलाच पडलेला प्रश्न! जेव्हा मी उत्तर शोधायला जाते तेव्हा जगण्याचे अनेक पदर उलगडतात. मला तो काळ अजूनही पुसटसा आठवतोय. जास्त काही नाही पण पंधरा ते वीस वर्षापूर्वीचा! तेव्हा मी चौदा ते पंधरा वर्षांची असेन. त्यावेळी सुट्टी असली की मी आजोळी रहायला आजीकडे जायचे. आजीचं गाव माझ्या गावापासून जेमतेम सात-आठ किलोमीटर अंतरावर होतं. मामा-मामी, मामाची मुलं असं कुटुंब. आजोबांचा मोठा टोलेजंग वाडा होता! त्या वाड्यात सगळे भाऊ एकत्र रहायचे… त्याला घोलकर वाडा म्हटलं जायचं. गावाच्या वेशीतून आत गेल्यावर समोरच पांडुरंगाचं मंदीर होतं. समोर मोठा चौक व त्या चौकासमोर मोठा पार होता. मुख्य चौकातच वाड्याचा मुख्य दरवाजा उघडायचा. आईबरोबर आम्ही दोघी बहिणी, भाऊ व दादा मामाकडे सुट्टी असली की जायचो. तेव्हा एस. टी. गावाच्या बाहेर थांब्यावर थांबल्यावर तिथेच लिंबोणीच्या झाडाखाली आजोबा बसलेले असायचे. लगेच यायचे घ्यायला. वेशीपर्यंत पोहचलो की आई म्हणायची, ‘‘पोरींनो, आपण मागून जायचं मंदिराच्या. वेशीतून नाही जायचं.’’ दादा- भाऊ, आजोबा मात्र गावच्या चौकातून वेशीतून जायचे. मला कळायचेच नाही. आई डोक्यावरून चापूनचोपून पदर घ्यायची. मी आपलं आईचं बोट धरुन तुरुतुरू चालायचे; पण मन त्या पारावर मात्र धावत रहायचे. विचार करायचे, आम्हाला का नाही त्या वेशीतून जाता येत. आई का जाऊ देत नाही? आई म्हणायची, ‘‘इकडं तिकडं भटकू नकोस, जास्त बडबड करू नकोस.’’ मी आपलं आई जे म्हणेल ते करायचे. आईचा धाक, संस्कार! जुन्या रूढी-परंपरात बांधली गेलेली माझी आई आम्हाला तेच सांगायची…
आई आम्हाला आजीकडे सोडून परत जायची तेव्हा आजी पहिलीच ताकीद द्यायची, ‘‘चार दिवसांसाठी आलात पोरांनो गोडीनं र्हावा. नसते उद्योग नका करू! पोरींनो त्या मागल्या देशमुखाच्या बुरूजावरच्या वाड्यात, इकडं तिकडं आम्हाला विचारल्या शिवाय जायचं नाही. पारावर जाऊन बसायचं नाही, पोरांबरोबर खेळायचं नाही, दरवाजात, सज्ज्यावर जाऊन बसायचं नाही, हे काही शहर नाही. लोकं नावं ठेवतात.’’ आम्ही फक्त ऐकायचो, हसायचो. ‘‘कपडे पण जरा चांगले घाला. ते गुडघ्याच्या वर जाणारे तुमचे स्कर्ट, फ्रॉक नाही चालणार. ते चांगलं दिसत नाही पोरींनो तुम्हाला’’ तेव्हा नवीनच जीन्स पँट, शर्टची फॅशन आलेली. आम्ही आजीला घाबरुन गप्प बसायचो, कारण मामाचा गाव खूप आवडायचा. आम्हाला वाड्यातल्या सज्ज्यावर, पारावर जायची बंदी असायची. मग आम्ही पोरी… मी, जमू, यमी, सुमी, पारू वाड्याच्या वरच्या महाडीतल्या कमानीतून चोरून चोरुन त्या पारावर काय काय चाललंय ते बघत असू… चावडीत, पारावर पुरुषमंडळी, गावातले सरपंच, देशमुख, पाटील, पारावर बसलेली पोरं सगळी मोठमोठ्याने हसताहेत, खेळताहेत. चौकात मुलं विट्टी-दांडू, हुतूतू खेळताहेत. आम्ही मात्र फक्त पाहत असायचो. त्यांना तिथे खेळायची परवानगी; आपल्याला मात्र नाही. वाड्याचा दरवाजा बंद करुन खेळायला लागलो तर आजी म्हणायची, ‘‘काय हुंदडताय गं पोरींनो, जरा दमानं. पोरीची जात हाय तुमची. जरा हळू. बास झालं. आता खेळायचं दिवस हायत का तुमचं? जरा भाजी-भाकरी, जेवण बनवायला, करायला शिका.’’
खरंतर आजोळी आजी, मामी आम्हाला असं बोलायची; पण आईने आम्हा मुलींना घरी अशी बंधनं घातली नाहीत. आजी तर घरी कोणी आलं तरी बाहेर येऊ द्यायची नाही. काय तर घरंदाज कुळाचा वारसा होता… घोलकर घराण्याला! पण ह्या चार टोलेजंग भिंतींच्या आत फक्त संसार एके संसार जगलेल्या आजीचं व वाड्यातील स्त्रियांचं आयुष्य फक्त चूल व मूल! या प्रतिष्ठित संस्कृतीचा हेवा वाटावा का? पण काळानुसार हे बदलत गेलं, मुलींना हक्क मिळाले, शिक्षणाचे दरवाजे खुले झाले… ती परंपरागत श्रीमंती काळाच्या ओघात निसर्गाच्या कोपाने म्हणा लोप पावली. शेती हा व्यवसाय असणारी ही लोकं शेतात कामासाठी बाहेर पडली. मुलींनाही शिक्षणाची सोय व परवानगी मिळाली. मुली घराबाहेर पडल्या, शिकल्या; मात्र कितीही सुसंस्कृत व सुशिक्षित झाली पुढची पिढी तरी अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच्या बेड्यात स्त्रीला मिळालेले स्वातंत्र्य हे नामधारीच आहे असं म्हणावं लागेल. नाही का? कारण वेशभूषा बदलली, राहणीमान बदलले, कितीही आधुनिकतेच्या बेगडी अलंकारांनी स्त्रीला सजवले तरी रुजलेली पाळंमुळं, रुढीपरंपरांच्या कासर्यांनी स्त्रियांची मुस्काटं बांधूनच ठेवली जातात. हे सत्य आहे. जरी मी एक स्त्री म्हणून लिहीत असले तरी!
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. खूप कोडकौतुक ही व्हायचं. ‘पोर लय गुणी आहे, दिसायला छान आहे, जास्त त्रास नाही होणार लग्नाला, नवरदेव शोधताना, हुंडा मात्र द्यावा लागेल, पोर देखणी पण मोठ्याच्या घरी द्यायची म्हटल्यावर कौतिक तर किती नं कुठल्या गोष्टीचं; मात्र एका गोष्टीचं समाधान आहे! असं काही झालं नाही! एक रुपया हुंडा व सोनं-नाणं न घेता आहे तसं मला स्वीकारणारा नवरा मिळाला… आणि माझ्या व्यक्तिमत्त्व विकासाला, माझ्या आवडी-निवडीला, व्यासंगाला पोषक असं वातावरण मिळालं. ही दुसरी जमेची बाजू!!
हे जसं आईकडे आजोळला वातावरण होतं, तसंच वडिलांकडे. गावातील मुख्य रस्त्यावरून बायकांना जायची बंदी होती. पाठीमागच्या पांदीच्या वाटेने गावाबाहेर पडायचं व आत यायचं, असा नियम स्त्रियांना होता; पण मला हे पटायचं नाहीच मुळी… खरंतर.
गावाच्या बाहेर वेशीवर
मारुतीचं देऊळ…
चिरेबंदी दगडांनी बांधलेलं,
आत काळोख दाटलेला
गाभार्यात…
एकच दिवा दगडाचा
मिणमिणता
ज्योत कापडी वळलेली
अहोरात्र जळणारी…
सर्वत्र काजळी दाटलेली,
आत ती मारुतीची..
दगडाची कोरलेली मूर्ती
तेलाचे बोट बोट चढलेले थर,
तो शेंदुर कापराचा दर्प,
देवळाच्या मध्यभागी
लटकणारी भलीमोठी पितळी घंटा,
अजूनही आठवतंय मला
लहानपणी मला मात्र
वेशीवरच्या त्या देवळात जायची बंदी,
कळतच नव्हतं तेव्हा
का कुणास ठाऊक…
माझं मन राहून राहून विचार करी,
अन् सारखं सारखं,
वेशीवरच्या त्या चावडीकडे,
पारावर जमलेल्या,
त्या थोर लोकांमध्ये गावातील,
काय विशेष आहे या…
विचारात वेशीवरच धावे,
अन् सारखं सारखं त्या पारावर,
वेशीमधल्या देवळाकडं
का नाही जायचं?
हे विचार करत राही…
अन् मग भरदुपारी रस्ते पांगलेले,
चावडीत लोक झोपलेले,
पार शांत, गावही निःशब्द
सर्व दूर दूर, रस्तेही शांत,
मी हळूच, गुपचूप,
त्या वेशीवरच्या रस्त्याहून
त्या देवळात जाई,
एक एक गोष्ट निरखून पाही,
विचारत राही,
त्या चिरबंदी दगडाच्या भिंतींना,
एक एक पायरी चढताना,
डोळे भरुन आलेले मनातील असंख्य प्रश्न,
मी देवळात पाऊल,
ठेवता क्षणी गाभार्यात न जाता
दरवाजाच्या बाहेरुनच,
बोलू लागे पूर्वजांपासून…
तेवत आलेल्या त्या दगडी दिव्याशी,
जणू प्रत्येकानं आपलं,
मनातलं व्यक्त केलं होतं
देवाजवळ हात जोडताना
दिव्यात तेल घालताना,
तो दिवा गाभार्यात
तेवत ठेवण्यासाठी…
मी मात्र त्या देवळाशी
माझं जणू पूर्वजन्मीचं नातं…
बोलू लागे मन भरभरुन…
आजही जपलेलं माझं नातं
नकळत सर्वांच्या, माझ्या मनातील
असंख्य प्रश्न…
काकूआजी ही वडिलांची आई. खूप खूप मायाळू होती. खूप सहनशीलही. आम्ही भावंडं आजोबांना अप्पा म्हणायचो. अप्पा तसे खूप तर्कटी स्वभावाचे होते. काकूआजी घरातलं काम करून थोडीशी मोकळीक हवी म्हणून दुपारच्या वेळेत शेतातलं पहायची. कधी स्वतः काम करायची. खूप कष्टाळू होती काकूआजी. आम्हा पोरांचे लाडही करायची. आम्हाला वाड्याबाहेर जायची परवानगी नव्हती. वाडा तसा मोठा होता. मग वाड्यात दुपारी जमलेल्या बायका, पोरी गजगे, कचकवड्या, चिंचोके खेळायचो. फक्त सातवी, पाचवीतून अर्ध्यावर शाळा सोडलेल्या बानी, तानी या कोवळ्या पोरी कडेवर इवली इवली लेकरं घेऊन पाहत रहायच्या. हातात गाई, शेरडाचा कासरा पकडलेल्या छोट्या छोट्या पोरी डोक्यावर, कडेवर भरलेल्या पितळी घागरी, शेणाच्या गोवर्या थापून चिरलेले कोवळे हात, रापलेले कोवळे पण राठ केस, कोवळ्या वयातही निबर झालेला चेहरा व भावना, माहेरपणासाठी आलेल्या या कोवळ्या पोरी, आईच्या तोंडी मात्र ‘त्यांचं नशीब घेऊन जन्माला आल्यात त्या, आपण काय करणार?’ एका एका बाईला चार-चार, पाच-पाच पोरी. घरात खायची आबाळ, डोक्यावर नीट झोपायला छप्पर नाही! कुडाचं, फाटक्या चिंधीचा आडोसा करुन बांधलेलं उघड्यावरचं न्हाणीघर! बाप काबाडकष्ट करुन झिजलेला, आई दुसर्यांच्या शेतात मोल मजुरी करुन राबणारी, मुली घरकाम करताहेत, आम्ही पोरी आनंदानं खेळतोय… तेव्हा मन एक क्षण स्तब्ध व्हायचं अन् पुढे चालायचं. करता येईल तेवढं केलं. त्यांना खेळण्यासाठी, त्यांच्या चेहर्यावर हसू पाहण्यासाठी जरी प्रयत्न केला तरी मन मात्र सतत कुठेतरी टोचत रहायचं. ती खंत अजूनही मनात आहे. भिंतीचे पापुद्रे निघावे तसे सोललेले आयुष्य उभे! खपल्या धरलेले, उसवलेले, सारवलेले! परत परत झालेल्या जखमा बुजवल्यागत! चुलीला पोतेरा दिल्याप्रमाणे! दिलेला मुलामा देहावर! असं लिहित गेलं की भळभळत्या जखमेतून वाहणार्या रक्तासारखी वेदना वाहत राहते. शब्दातून आपण फक्त मुलामा देत राहतो. वरवरचं बेगडी हास्य व कोरडीच माया लावून जगायचं…!!
याउलट आजच्या परिस्थितीचा विचार करता गावकुसाच्या आतली ग्रामीण स्त्री! एका मर्यादेपर्यंतच तिचा विकास झाला व वलयातून बाहेर आली खरी; पण तिचा विकास मर्यादितच राहिला… तर गावाबाहेरची स्त्री म्हणजेच नागरीकरण झालेल्या भागातील स्त्रियांना स्वातंत्र्य जरी मिळाले तरी नेमके काय व किती कशाच्या मोजपट्टीत मोजायचं…? जरी या स्त्रिया सुशिक्षित असल्या, घराबाहेर पडत असल्या तरी किती प्रमाणात त्यांना, त्यांच्या विचारांना न्याय मिळतो…? भारतात आज काही नामांकीत शासकीय व निमशासकीय विभागात महिला उच्चपदावर काम करतात… पण तो वर्ग, त्यांची विचारसरणी, राहणी व व्यक्ती स्वातंत्र्याची मूल्ये ही मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रियांना लागू पडतात का? त्यांना विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वांतत्र्य आहे का? जरी थोड्या प्रमाणात बंधने शिथिल झालीयेत तरी! त्या अजूनही मनाला मुरड घालूनच जगताहेत का?
खरंतर स्त्री शिक्षणाचे दरवाजे ज्योतिबा फुले यांनी उघडले. पहिली मुलींची शाळा काढली व स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची ज्योत पुढे नेली. त्यांनी अपमानकारक वागणूक सहन करुन त्या काळात कट्टर पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीच्या खंद्या समर्थकांना निर्भिडपणे सामोरे जात हे स्त्रियांचे नवे युग निर्माण केले. अनेक महिलांनी प्रत्येक क्षेत्रात एक आदर्श स्थापन केलेला आहे. पहिली अंतराळ वीर कल्पना चावला, आय. पी. एस किरण बेदी, भारतरत्न लता मंगेशकर, डॉ. आनंदीबाई जोशी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पी. टी. उषा इ. अनेक नावे मान उंचावून घेता येतील व आपण यांचे आदर्श लोकांसमोर ठेवतो.
असे हे आदर्श समोर असताना अजूनही आधुनिक स्त्री ही मनापासून आनंदी जीवन जगतेय का? गावकुसातील किंवा गावाबाहेरची ती या बेड्यातून किंवा दडपणातून तेव्हाच बाहेर पडू शकेल जेव्हा तिला निखळ, आनंदी, उत्साही व प्रोत्साहनात्मक वातावरण मिळेल. तिच्या विचारांची पाळेमुळे खोडली जाणार नाहीत! जर तिच्यावर मर्यादांचे कुंपण घातले गेले तर ती व्यक्त होणार नाही. ती आनंदी जीवन जगू शकणार नाही. म्हणून तिला जर आनंदी जीवन जगायचंय तर तिला जे काही आवडतं ते निखळ मनाने व आनंदाने करु द्यायला हवं. तिला तिच्या आवडीनुसार थोडं तरी जगू द्यायला हवं. पहा मग कसं तिचं जीवन निरागसपणे फुलेल, उमलेल व रंग भरतील तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात. स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी सुरक्षित वातावरण व एक मंच मिळणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी एक मुक्त व्यासपीठ नाही जरी मिळालं तरी तिचं मन जाणून तिला काय आवडतं, नाही आवडत एवढं पाहिलं, विचारलं तरी पुष्कळ मनमोकळेपणाने स्त्रिया आपलं जगणं आहे तेच आनंदानं जगतील. रोजचा संसार सांभाळत, रोजच्या जीवनात चैतन्य येईल! तेच तेच रोजचं जगणं त्यंाना रटाळवाणं वाटणार नाही. चौकटीतलंच जगणं पण सुसंवादात्मक झालं तर त्या त्यांचे प्रश्न मांडतील, विचार, अनुभव व मतं मांडतील व त्यांच्या वैचारिक विश्वाला एक सुंदर आकार येईल… अर्थ प्राप्त होईल!!
■ सौ. तनुजा ढेरे, ठाणे
9930174010