पुणे, (चपराक प्रतिनिधी) ः पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ‘तो पुतळा संभाजी उद्यानात परत बसवू’ हा भाजपचा निवडणुकीतील प्रचारातला प्रमुख मुद्दा होता. पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पक्षाला या मुद्याचा सोयीस्कर विसर पडलेला असतानाच ‘संभाजी उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवणे हा औचित्यभंग आहे.
तेव्हाच्या काळात महाराजांविषयी जे गैरसमज रूढ होते त्यानुसार गडकरींनी अय्याशी आणि रंगेल संभाजीचे चित्रण त्यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकात रंगवले. बा. सी. बेंद्रे यांच्यासारख्या अभ्यासकाने राजांवरील बदनामीचा हा डाग धुवून काढला. त्यामुळे या उद्यानात संभाजीराजांचाच पुतळा असायला हवा,’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक डॉ. सदाशिव शिवदे यांना ‘स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी मोरे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मंदिरस्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, संजय चिटणीस उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘ज्यांना सरळ राजकारण करता येत नाही ते इतिहासाचे राजकारण करतात. आपल्याकडे गेल्या काही दिवसांपूर्वी दुर्दैवी वाद झाला. त्यात पुढे काय झाले हे अजून कळले नाही. संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचाच पुतळा असायला हवा. गडकरींनी ‘राजसंन्यास’मध्ये संभाजी महारांजानबद्दल जे लिहिले तेच तेव्हाच्या महाराष्ट्राचे मत होते. त्यात त्यांनी वेगळे असे काही लिहिले नाही. गडकरी हे भाषाप्रभू होते, नाटककार होते यात वाद नाही; पण लोकांना आता खरा इतिहास कळू लागला आहे. संभाजीराजांची बदनामी दूर करण्याचा पाया बेंद्रे यांनी खोदला आणि डॉ. सदाशिव शिवदे यांनी त्याचा कळस रचला.’
पुढे बोलताना मोरे म्हणाले, ‘गडकरींचा पुतळा हटवल्याने कायस्थ प्रभूंच्या अस्मितेला तडा जाता कामा नये. गडकरींनी महाराजांची बदनामी करायची म्हणून हे लेखन केले नाही, पण ज्या संभाजीरांबद्दल अपसमज प्रचलीत होते ते दूर करण्याचं पहिलं काम कुणी केलं? ते काम वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी केलं; की जे स्वतः कायस्थ प्रभू आहेत! ज्यांनी अभ्यासपूर्वक संभाजीराजांविषयीचे अपसमज दूर केले त्या बेंद्रेंचा पुतळा संभाजी उद्यानात बसवायला हवा. मुख्य पुतळा संभाजीराजांचा आणि बाजूला बेंद्रेंचा पुतळा जोपर्यंत बसवला जात नाही तोपर्यंत या उद्यानाला पूर्णत्व नाही. गडकरी हे जगन्मान्य नाटककार होते; मात्र महाराजांची बदनामी दूर न करता त्या काळात जे प्रचलीत होते तेच त्यांनी मांडले.’