1969 साली राजेश खन्ना यांचा ’आराधना’ चित्रपट आला. 1973 साली ’नमकहराम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन होते. त्याच वर्षी म्हणजे 1973 साली ’जंजीर’ चित्रपट आला, ज्याचे हिरो अमिताभ बच्चन होते. 1991 साली ’हम’ चित्रपट आला, ज्याचे हिरोही अमिताभ बच्चन हेच होते. हे लिहिण्याचे कारण म्हणजे 1969 साली ’आराधना’ हा चित्रपट आल्यानंतर राजेश खन्ना यांनी ’सुपरस्टारडम’ची सुरुवात केली. मोतीलाल यांच्यापासून ते दिलीपकुमार, देवआनंद यांच्यापर्यंत कुणालाही अप्राप्त असे लोकांचे प्रेम आणि आकर्षण राजेश खन्ना यांना प्राप्त झाले. 1969 ते 1973 ही चार वर्ष फक्त राजेश खन्ना यांची होती.
1973 साली ’जंजीर’ चित्रपटापासून अमिताभ बच्चन त्याच ’सुपरस्टारडम’च्या धावपट्टीवर उतरले, पण 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ’दीवार’ चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी ’सुपरस्टारडम’चा मुकुट खर्या अर्थाने आपल्याकडे खेचून घेतला. 1975 पासून 1991 च्या ’हम’ या चित्रपटापर्यंत अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार होते पण 1975 नंतरही बरीच वर्षं म्हणजे जवळपास 1987 पर्यंत राजेश खन्ना यांचं ’स्टारडम’ टिकून राहिलं. ’सुपरस्टारडम’चा हिंदी चित्रपटसृष्टीतला कालखंड एवढाच. मानधनाच्या दृष्टीने पाहिलं, तर 1969 ते 1978 पर्यंत राजेश खन्ना हेच सर्वात अधिक मानधन घेणारे ’स्टार’ होते (जरी त्यांचे ’सुपरस्टारडम’ लौकिकार्थाने संपले तरी). 1979 ते 1987 पर्यंत राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या मानधनाचा आकडा सारखाच होता. 1987 नंतर अमिताभ बच्चन मानधनाच्या आकड्याच्या बाबतीत राजेश खन्ना यांना पार करून पुढे निघून गेले. 1990 साली प्रदर्शित झालेला ’अग्निपथ’ हा चित्रपट अमिताभ यांच्या ’सुपरस्टार’ पदावर कोंदण बसवणारा ठरला, जसा 1971 चा ’आनंद’ हा चित्रपट राजेश खन्ना यांच्या ’सुपरस्टार’ पदाला कोंदण देणारा होता.
अगोदर म्हटल्याप्रमाणे मोतीलाल यांच्यापासून दिलीपकुमार यांच्यापर्यंत आणि त्यानंतर तिन्ही खान (आमीर, शाहरुख, सलमान) यांच्यापासून ते हृतिक रोशनपर्यंत (अगदी त्यात कुमार गौरवचा एक चित्रपटही आला!) अनेक स्टार्स आले, त्यांनी अनेक अव्वल चित्रपटही दिले. परंतु, लोकांची मानसिकता कब्जात घेण्याची आणि आतडं पिळवटून टाकणार्या ऑक्टोपसी मोहिनी सामर्थ्याची जी ’लार्जर दॅन लाइफ’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची किमया साधली, ती राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या त्यांच्या काळात. त्यातही राजेश खन्ना यांचं ’सुपरस्टार’ पद हे पहिलंच होतं. त्यांनी सलग 15 हिट चित्रपट ओळीने दिले, जो विक्रम अमिताभ यांनाही मोडता आला नाही. परंतु अमिताभ बच्चन कालमान मोजता प्रचंड काळ टिकून राहिले, अगदी आजपर्यंत! पण पडदा व्यापून टाकण्याची क्षमता असलेला अमिताभ बच्चन यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे ’हम’.
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांची तुलना करणं शक्यच नाही, इतके ते भिन्न प्रकृतीचे नट होत. परंतु, वर उल्लेखलेल्या ’सुपरस्टारडम’च्या कालखंडात त्यांनी समाजमानसाचं नेमकं काय केलं, जे अगोदर आणि नंतर कुणीही करू शकलं नाही ते आश्चर्यकारक होतं. मुख्य म्हणजे हे दोन सुपरस्टार त्यांच्या त्यांच्या कालखंडामध्ये प्रत्येक प्रेक्षकाचा ’स्व’ व्यापून उरायचे. राजेश खन्ना हे ’रोमँटिक सुपरस्टार’, तर अमिताभ बच्चन हे ’अँग्री यंग मॅन सुपरस्टार’ होते. रोमँटिक सुपरस्टार असल्यामुळे स्वाभाविकच राजेश खन्ना यांची लोकप्रियता स्त्रियांमध्ये हृदयाच्या रक्तातल्या धमन्यांमध्ये पोहोचणारी होती. दुसरीकडे अमिताभ बच्चन हे अँग्री यंग मॅन असल्यामुळे प्रत्येक पुरुषाला ते पुरुषार्थाचं पडद्यावरचं रुप वाटत असत. पण याचा अर्थ राजेश खन्ना पुरुषांमध्ये आणि अमिताभ बच्चन स्त्रियांमध्ये कमी लोकप्रिय झाले, असाही होत नाही. राजेश खन्ना यांच्यासारखे आपण व्हावे, असे त्यांच्या काळातल्या प्रत्येक पुरुषाला वाटत असे आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखा पुरुष आपल्याला प्राप्त व्हावा, असं प्रत्येक स्त्री प्रेक्षकाला वाटत असे. इथे पुरुष याचा अर्थ बाप, मुलगा, प्रियकर, नवरा असा काहीही असू शकत होता. हा संपूर्ण कालखंड भारतीय इतिहासातला अतिशय महत्त्वाचा कालखंड होता. लायसन्स राज, पाकिस्तानबरोबरचे युद्ध आणि बांगलादेशचा उदय, इंदिरा गांधी यांची महानायिका पदाकडे होणारी वाटचाल आणि पतन, जनता पक्षाचा उदय, जयप्रकाश नारायण यांचा संघर्ष, जनता पक्षाचे पतन, इंदिरा गांधी यांचा पुन्हा उदय, संजय गांधी यांचा कालखंड, त्यांचा अकाली अस्त, खलिस्तानी चळवळ, सुवर्णमंदिरात घुसवलेली सेना आणि त्यामुळे इंदिराजींची झालेली हत्या, त्या हत्येमुळे राजीव गांधी यांना 400 हून अधिक जागेवर मिळालेलं पाशवी बहुमत, ते बहुमत राजीव गांधी टिकवू न शकल्याने व्ही. पी. सिंग आणि जनता दलाचा झालेला उदय, राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण या दोघांच्या समाजवादी स्वप्नाचे उत्तर भारतात झालेलं यादवीकरण, इंदिरा गांधी यांनी अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे उभी राहिलेली श्रीलंकन तामिळींची त्यावेळची जगातील सर्वात खतरनाक अशी एलटीटीई ही संघटना (काही वर्षांपूर्वी श्रीलंकन सेनेने या संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन याच्यासहीत या संघटनेचा अस्त घडवून आणला) विरोधात गेल्यामुळे राजीव गांधींची झालेली क्रूर हत्या, त्यामुळे गांधी घराण्यापासून मुक्त होऊन कॉंग्रेसची सत्ता नरसिंहरावांकडे येणे आणि त्या सत्तेचा कुशल वापर करून अगोदरच्या राजीव गांधींच्या शेवटच्या पर्वातील कॉंग्रेसच्या समर्थनाने पंतप्रधानपदावर असणार्या चंद्रशेखर यांच्या काळात सोने गहाण ठेवणार्या भारताला उदारीकरणाच्या नव्या धोरणाने जगातल्या एका प्रमुख अर्थव्यवस्थेकडे नरसिंहरावांनी नेण्याची सुरुवात एवढ्या सगळ्या घटना या दोन सुपरस्टार्सच्या काळात घडलेल्या आहेत. गंमत म्हणजे, या दोन्ही सुपरस्टार्सनी या कालखंडात कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. 1984 साली अमिताभ बच्चन अलाहाबादमधून विजयी झाले, तर राजेश खन्ना यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावरून दिल्लीतून निवडणूक लढवताना लालकृष्ण अडवाणी यांना कडवी टक्कर देऊन त्यांच्या तोंडाला फेस आणला होता. या संपूर्ण कालखंडात मुंबईत एक मोठी घटना घडली. ती म्हणजे 1982 चा गिरणी संप. त्या काळात एकंदरीतच कामगार वर्ग अशांत होता आणि गिरणी कामगार पराकोटीचा अस्वस्थ आणि ज्वालाग्राही होता. या कामगारांनीच दत्ता सामंत नावाच्या एका महानायकाचा उदय घडवला. गिरणी संपाने दत्ता सामंत हे नाव जगभर गेले आणि गिरणी संपाच्या पतनाने गिरणी कामगार आणि दत्ता सामंत हे दोघेही कोसळले ते कायमचेच. त्यातूनच पुढे मुंबईतल्या अतिरक्तरंजित गँग्जचा आणि गँगवॉर्सचा उदय झाला, ज्याचा सर्वात मोठा खलनायक दाऊद इब्राहिम कासकर ठरला. ज्या गँग्ज आणि गँगवॉरवर आधारित अनेक चित्रपट अलीकडच्या काळात येऊन गेले.
या सार्या प्रचंड कॅनव्हासच्या पार्श्वभूमीवर राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन सुपरस्टार्स उभे आहेत, ही समाजमनाशी संबंधित गोष्ट फारशा बारकाईने कोणीच अभ्यासलेली नाही. राजेश खन्ना यांच्या रुपाने सामाजिक ’स्वप्नाळू रोमँटिसिझम’ शिखरावर पोहोचला आणि राजेश खन्ना यांच्या महानायक पदाच्या उतरणीवर येता येता तो अस्त पावला. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन यांच्या रुपाने ’सामाजिक वास्तववादी रोमँटिसिझम’ शिखरावर गेला आणि 1991 साल होता होता तो अस्ताला गेला. त्यानंतर नव्या डिजिटल यंत्रयुगाचा मल्टिप्लेक्सचा, मल्टी स्क्रीन्सचा आणि 100 ते 300 करोड क्लबचा उदय झाला. चांगले सिनेमे आले आणि गेलेही. महाहिरोंचे ग्रुप्स तयार झाले, पण राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या ’सुपरस्टारडम’च्या काळातल्या लोकांच्या हृदयातील वीणा थेट छेडण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते आणि ते स्वाभाविकही होते.
सिनेमा आणि समाज यांचा एवढा टोकदार संबंध भारताच्या इतिहासात अगोदर आणि नंतर कधीही जमून आलेला नाही. वेगवेगळ्या प्रकारची जादुई संमोहिनी या दोन्हीही महानायकांनी भारतीय समाजावर घातली. हळुवारपणे फुलत जाणार्या एखाद्या फुलासारखे मुलायम स्वप्न भारतीय समाजाने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या आयुष्यासंबंधी कल्पिलेले होते. ते सर्वोच्च आविष्कार म्हणून पडद्यावर राजेश खन्ना यांनी साकार केले. ते स्वप्न भंगले. स्वातंत्र्याच्या फळाची अपेक्षा समाजाला दुरापास्त आहे, याची जाणीव जनमानसाच्या काळजात घुसू लागली आणि तेव्हाच अमिताभ बच्चन यांचा उदय झाला. त्यांनी वेगळ्या प्रकारच्या रोमँटिसिझमचा सर्वोच्च आविष्कार केला, जो रोमँटिसिझम राकट, रासवट, व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, लढणारा, साध्यसाधनशुचितेला न मानता विजयी होण्याचे स्वप्न दाखवणारा होता. 1991 नंतर तो रोमँटिसिझमही अस्ताला गेला. त्यानंतर भारतात उदारीकरणाचा प्रथमच प्रवेश झाला. पाठोपाठ डिजिटलायझेशनही. स्वातंत्र्योत्तर काळातल्या पाहिलेल्या स्वप्नांना हाक देण्याची आणि ती विफल झाली तर त्याविरुद्ध बंड करण्याची सारी शक्यता भारतीय समाज गमावत गेला. प्रेक्षक महाहिरोंच्या काळामध्ये मल्टिप्लेक्सची तिकीटे काढणार्या रोबोटसारखा झाला. आपली आवडनिवड ही आपण ठरवत नसून मोठमोठे कॉर्पोरेट्स ठरवतात हेही त्याला कळेनासे झाले आणि कळले तर त्याचेही त्याला काही वाटेनासे झाले.
’’पुष्पा, आय हेट टीयर्स’’ किंवा ’’पीटर मैं यहॉं हूँ’’ यांसारखे संवाद राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या तोंडून ऐकताना त्या काळातल्या प्रेक्षकाने सिंगल स्क्रीनवर कसे पैसे उधळले असतील, याची कल्पना करणंसुद्धा हास्यास्पद वाटते. माझ्याही पिढीने यातले वास्तवात काहीच पाहिलेले नाही, फक्त ऐकलेले आहे. फिल्म्स तेवढ्या पाहिल्या. राजेश खन्ना यांच्या गाडीवर रक्ताने ’आय लव्ह यू’ असं मुली लिहित असत किंवा अमिताभ बच्चन यांना पडद्यावर बघून समोरच्याच्या आणि स्वत:च्या ताकदीचा अंदाज न घेता बेलबॉटममधला तरुण सरळ संघर्षाचा पवित्रा घेत असे, हे आज खरे वाटत नाही. खरे तर हे इतके जुनेही नाही. आई मरणासन्न अवस्थेत असताना देवाला उद्देशून बोललेले अमिताभ यांचे संवाद आता कुठच्या चित्रपटात टाकले, तर तद्दन हास्यास्पद वाटतील किंबहुना 1991 नंतर अमिताभ यांच्या मधल्या उतरत्या काळात असेच संवाद त्यांच्याच ’नास्तिक’ या चित्रपटात हास्पास्पद वाटले होते. हिरो तोच होता, पण काळ बदलला होता. राजेश खन्ना नव्या युगाशी ऍडजस्ट करू शकले नाहीत, अमिताभ बच्चन ऍडजस्ट करू शकले, पण ते महानायक नव्हते, तर एक कुशल कारागीर होते. राजेश खन्ना आपले उर्वरित आयुष्य (अलिकडेच त्यांचा मृत्यू होईपर्यंत) आपल्या महानायकपदाच्या नॉस्टॅल्जियामध्येच जगले. बोलताना ते आपण नॉस्टॅल्जिक होत नाही, असं वारंवार सांगत आणि हाच त्यांच्या नॉस्टॅल्जियाचा पुरावा होता. ते कधीच आपल्या जुन्या बुटातून आपला पाय काढू शकले नाहीत.
खरे तर हे दोन वेगवेगळ्या ताकतीचे नट. त्यांच्या मागे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, संगीतकार, संवाद आणि पटकथा लेखक, निर्माता आणि प्रचंड मोठी टीम काम करत होती. त्यांच्या यशात या सार्यांचाच वाटा तेवढा होता. परंतु आपल्या मागच्या अजस्र टीमला लोकांच्या हृदयात थेट नेण्याचं किंवा लोकभावना पडद्यावर जोडून घेण्याचं कसब या दोघांनी दाखवलं. यांच्या योग्यतेचे इतर कुणी देशात त्या काळी नव्हते किंवा नसतीलच असे नव्हे पण नियतीने त्यांनाच ती संधी दिली, जी स्वप्नवत होती आणि स्वप्नं ही एके दिवशी तुटतातच. भारतीय समाजाचीही ती तुटली. अजून 25 वर्षांनी या दोघांच्या अद्वितीय सुपरस्टारडमच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना 1969 ते 1991 या काळात भारत घडता घडता बिघडत गेला आणि त्याच वेळी बिघडतानाच घडत गेला, हे नमूद करावे लागेल. या तुटलेल्या स्वप्नाचे संपूर्ण सामाजिक आणि राजकीय विश्लेषण हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे (लेखक ते पुस्तक लिहितो आहे). परंतु एक मात्र नक्की, याच सार्या काळामध्ये चित्रपटाच्या पडद्याशी भारतीय प्रेक्षकाचे सर्वात जवळचे नाते जडले आणि तुटले. जसे, भारतीय समाजाचे देशातल्याच राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेशी नाते तुटले. उदाहरणार्थ, आता आपल्या आयुष्याशी संबंधित काही नकारात्मक घडत असेल, तरी लोक रस्त्यावर उतरत नाहीत. हे सर्व उकलत जाताना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे स्वप्न आणि पतन आणि त्याच वेळी उभे राहता राहता लोकांचे मोडून जाणे याच्या एका प्रक्रियेचा मागोवा घ्यावा लागेल, ज्यात काळ हा किती बलवान असतो आणि तो लोकभावनांशी कसा खेळतो त्याची एक निष्ठुर जाणीव वाचणार्याच्या मनाशी ठसठसत आतपर्यंत जाईल; पण तोंडातून आवाज निघणार नाही!
कारण आता संवाद संपले आहेत!!