महिलांच्या विकासाचा निर्धार हाच खरा पुरुषार्थ

सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तर आजची स्त्री ही दिवसेंदिवस नुसती शिकत नाही तरी ती सुशिक्षित होऊन आपल्या समाजाला निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते आहे हे चित्र आज सर्वदूर पहायला मिळते आहे.  ह्याची पाळेमुळे एकोणविसाव्या शतकातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांनी समाजात रुजवून आपल्या समाजावर फार मोठे उपकारच केले आहेत असे नमूद करणे गरजेचे वाटते. ज्या काळी स्त्री ही फक्त चूल आणि मूल ह्यासाठीच जन्माला आली आहे असा प्रघात असताना त्यांनी केलेले हे धाडस आज एकविसाव्या शतकात महिलांच्या विकासाकडे पाहिले की जाणवते की त्यांचा स्त्रीशक्तीचा हा विचार किती दूरदृष्टीचा होता आणि आपल्या देशासाठी किती महत्वाचा होता. हे सकारात्मक चित्र जरी आज आपण पहात असलो तरी त्यासाठी आपल्याला जवळ जवळ दोन शतके वाट पहावयाला लागली आहे त्याचे मूळ कारण आपली बुरसटलेली पुरुषी मनोवृत्ती हे होय.


मुळातच निसर्गाने स्त्रीला पुरुषांपेक्षा सबल बनवले आहे, परंतु आपल्या स्वार्थी पुरुषी समाजव्यवस्थेने त्याच्याकडे कानाडोळा करत तिला अबला बनवून एका दृष्टीने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे असे वाटणे स्वाभाविकच आहे.  एक म्हण फार प्रचलित आहे की पहिली बेटी ही धनाची पेटी, पण आपल्या विक्षिप्त स्वभावाने आणि कुलदीपकाच्या अघोरी हव्यासापायी राजरोसपणे ह्या धनाच्या पेटीचे मातेच्या उदरातच गळे घोटले जाऊ लागले आणि मुलांच्या विरुद्ध मुलींचे प्रमाण विषम होऊन बसले.  ह्या सगळ्याचे इतके विपरीत परिणाम जाणवू लागले की शेवटी न्यायालयाला हस्तक्षेप करून समलिंगी कायद्यास संमती देण्याची दुदैवी वेळ येऊन ठेपली. ही तर आपल्या समाजाची एक शोकांतिकाच म्हणावी लागेल नाहीतर काय!

आज एकंदरीत अशी परिस्थिती आहे की मुलगी जर शिकली सवरली तर ती संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते. ज्या समाजाने तिच्यावर अनन्वित अत्याचार केले आहेत त्यांनाच मोठ्या मनाने माफ करून पुन्हा त्याच समाजाला उभारण्याचे थोर कार्य करते आहे. हे समजूनही उमजून अजूनही काही समाजकंटक स्त्रीवर अत्याचार करत राहतात आणि तिला दुर्बल करण्याचा केविलवाणा प्रयत्नही करतात. माझे ह्या सगळ्या प्रवृत्तींना एकच सांगणे आहे की ज्या स्त्रीला निसर्गानेच इतके सबल बनविले आहे की तिला दुर्बल बनवून स्वत:ची नालस्ती का करून घेता! हे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करण्यासारखेच आहे हो.

काही नकारात्मक बाजूंची खंत आजही मनाला खात राहते, ती म्हणजे अजूनही काही समाजकंटक उजळ माथ्याने वावरत आहेत की त्यामुळे कोपर्डी सारख्या अनेक घटना घडताना आपल्याला पहावयास मिळतात. त्यात भर की काय म्हणून स्त्रीभ्रुणहत्येसारखे अनंत प्रश्न समाजाला भेडसावत राहतात.  वास्तविक पाहता हे आपलेच नाहीतर कोणाचे दुर्दैव आहे !  दुर्दैवाचे हे घडे महिलांच्या सबलीकरणामुळे लवकरच भरतील आणि पुन्हा आपल्याला उन्नतीकडे घेऊन जातील असा विश्वास मला सध्याच्या धडाडीच्या महिलांकडे पाहून वाटतो.

समाज परिवर्तनाची ही प्रक्रिया गेली कित्येक दशके वेगवेगळ्या स्तरांवर महिलांच्या अथक प्रयत्नांनी होते आहे हे सत्य नाकारून कसे चालेल. महिलांचा सर्वांगीण विकास आता होतो आहे. त्यांच्या कर्तृत्वानेच त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर पुरुषांच्या एक पाऊल पुढेच वाटचाल करत आहेत.  मातृत्व आणि दातृत्वाचे निसर्गतः लाभलेल्या वरदानामुळेच की काय महिलांनी आज प्रत्यके क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेऊन पुरुषांपेक्षा काकणभर सरसच कामगिरी केल्याची अनंत उदाहरणे आपल्याकडे आहेत. पुरुषी अहंकार हळूहळू स्त्रियांच्या स्वाभिमानापुढे लोटांगण घालू लागला आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे.  समाज प्रबोधनातून आणि थोर समाज सुधारकांच्या प्रयत्नांना येत असलेले यश पाहून एक आशावादी चित्र डोळ्यांसमोर उभे राहते व महिलांच्या अबलतेकडून सबलतेकडे चाललेल्या ह्या वाटचालीस मनोमन सफलतेचे प्रमाणपत्रच द्यावयास भाग पाडते.

तुम्ही म्हणाल की हे फारच आशावादी चित्र किंवा स्वप्न तुम्ही पाहता आहात. परंतु मला तुम्हांला परत एकदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आठवण करून द्यावीशी वाटते की अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून जो काही निर्धार केला होता तो किती दूरगामी परिणाम साधणारा होता व अशाच निर्धाराचा आधार घेऊन आपण हा वसा पुढेही असाच चालू ठेवूयात हाच खरा पुरुषार्थ आहे.

सुदृढ समाजाचे लक्षण हे महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या प्रती आदरार्थी भावना हेच होय.

रविंद्र कामठे

पुणे 9822404330

हे ही अवश्य वाचा