अगतिक, वास्तविक, प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू क्षण!

Share this post on:

काही क्षण हे असे असतात की जे काळजात खोलवर रुतून बसलेले असतात. आपण जेव्हा एकांतात असतो तेव्हा हे क्षण असे काही छळतात ना की विचारू नका! ह्या क्षणांचे गणित जरा वेगळेच असते. ते काय व कसे आपल्या स्मृतीपटलावर अवचित उमटून जाते ना तेच तर कधी कधी कळतच नाही.  त्यात जर का हे क्षण प्रेमाचे असतील ना तर काही विचारूच नका. मनाची जी काही हळवी आणि केविलवाणी अवस्था होऊन जाते ना की पहायलाच नको! हेच ते क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात आधी कधी तरी येऊन गेलेले असतात; पण त्यावेळेस त्या क्षणांचे महत्त्व म्हणा अथवा त्यांची प्रगल्भता आपल्याला जाणवलेली नसते. असे हे क्षण आपल्या उतरणीला लागलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून जातात, तेव्हा मात्र मन कसे गलबलून येते. ह्या क्षणांमध्ये पुन्हा पुन्हा हरवून जावेसे वाटू लागते. परत एकदा आपण तरुण झालो आहोत असेच काहीसे वाटायला लागते.

आपले हे हळवे मन विचलित होऊन जाते. मग त्या क्षणांच्या गुंत्यात अजूनच गुरफटून गेल्यासारखे होते. त्या हरवलेल्या क्षणांची महती कळायला लागते आणि काय आश्चर्य, काही काळासाठी का होईना आपण ह्या क्षणांच्या आठवणींमध्ये इतके रमून जातो की त्यातून बाहेर येऊच नये असे वाटते. ह्या क्षणांच्या ऋणात राहणे आपल्याला सुखद वाटायला लागते.  माझ्या मनात जे काही चालले आहे ना अगदी तेच माझ्या सारख्या समवयस्क असलेल्यांच्या मनातही नक्की चालू असणार ह्याची मला खात्री वाटते. अहो, मी फक्त कागदावर उतरवण्याचे धारिष्ट्य केले आहे एवढेच. त्याचे काय आहे, की त्यामुळे आपले मन जरा हलके होते व अजून असेच काही सुखद क्षण राहिलेत की काय असे वाटायला लागते आणि आपले मन त्या क्षणांच्या शोधात भरकटायला लागते हो!

माझा एक अनुभव आहे, जो मी तुम्हाला सांगतो. ह्या क्षणांच्या ऋणात म्हणा किंवा त्यांच्या आठवणीत मन जे काही रमते ना, ते दुसर्‍या कशातही रमत नाही, बरं का!  त्यामुळे माझे तुम्हाला एक सांगणे आहे, की तुम्ही जरा तुमच्या स्मरणशक्तीला थोडासा ताण द्या आणि आठवा ते सुखद, हळवे, कोमल, मोकळे, रसिक, सुहासिक, प्रांजळ, अगतिक, वास्तविक, प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू असे काही क्षण आणि बघा ना, आपल्या मनाचे सोंदर्य कसे झळाळून निघते ते! मला तर ना, ह्या क्षणांचा मोह आवरतच नाही. जरा वेळ मिळाला की मी त्यांच्यात रममाण होऊन जातो. अगदी भान हरवून बसतो.

तसे पहायला गेले तर काही काही क्षण हे थोडेसे दुखरेही असतात हो. पण त्यांच्याही आठवणी जर का ताज्या झाल्या ना की आपल्याला आपण आयुष्यात केलेल्या चुकांची आपसूकच आठवण येते. आपल्या नकळत आपण त्यात भरडल्या गेलेल्यांची क्षमा मागून जातो. आपल्याला माहिती असते की आता फार उशीर झालेला आहे. तरी आपले मानसिक समाधान मिळविण्याचा आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न मनाला थोडासा दिलासाही देऊन जातो. शेवटी काय आहे, ह्या जन्मी केलेल्या पाप-पुण्याचे मोजमाप आणि त्याचा हिशोब येथेच द्यावा लागतो.  सगळा ठोकताळा येथेच बांधावा लागतो. हा नियतीचा नियम आहे. स्वर्ग-नरक काही नसते हो. हे सुखद क्षणच म्हणजे आपला स्वर्ग असतो तर दुखरे क्षण हा नरक असावा असे वाटते. क्षणाच्या ऋणात राहूनच कर्म करत रहायचे असते. जीवन हे असेच असते, ते हसत हसत जगायचे असते.

■ रवींद्र कामठे

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >
error: Content is protected !!