श्री धर्मपाल – राष्ट्र निर्मितीच्या कार्यातील उपेक्षित पान

Share this post on:

विचारशील समाज प्रगल्भ राष्ट्राची निर्मिती करीत असतो. विचारांची स्थिरता ही केव्हाही त्या राष्ट्राला घातकच असते. मग प्राचीन काळातील रोमन सभ्यता असो की आधुनिक काळातील मार्क्सवाद. यांच्या पतनाचे कारण आपल्याला त्यांच्या  विचारातील स्थितीप्रियता हेच दिसेल.

अनेक प्राचीन  सभ्यतांच्या देहावर ब्रिटिशांनी आपल्या 2000 वर्षाच्या  इतिहासाची चादर घालून तो झाकण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसेल. साधारणपणे आठशे वर्षाच्या परकीय चक्रात भारतीय जनमानस भरडले गेले. मात्र या ठिकाणी अर्नाल्ड टायनबीचे एक वाक्य उद्धृत करणे अगत्याचे आहे. तो म्हणतो, ‘‘एक संस्कृती दुसर्‍या संस्कृतीवर आक्रमण करून तिला आपल्या ताब्यात घेते. तेव्हा विजयी सभ्यतेचा प्रभाव पराजित सभ्यतेवर पडतो व पराभूत सभ्यतेची मूल्ये ढासळतात; परंतु पराजित सभ्यतेच्या मूलतत्त्वातून प्रेरणा घेऊन काही मंडळी पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करतातच; शिवाय  पराभूत सभ्यतेच्या पुनरुत्थानाचे कार्य हाती घेतात.’’  या पराभूत देशाला पुन्हा उभे करताना आपल्यातील दोष, कमतरता, विकृती यांचा विचार तत्कालीन अनेक विचारवंतानी आणि समाजसुधारकांनी सुरु केला. तशी पश्चिमी आक्रमणाची बलस्थाने देखील अभ्यासली जाऊ लागली. अनेक कटकारस्थानाचे रहस्योद्घाटन अजूनही होणे बाकी आहे. भारताच्या प्रबोधनाचा कार्यक्रम अनेकांनी हाती घेतला. महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर आणि आगरकर हे सामाजिक विषमतेच्या प्रश्नावर रान उठवत होते तर टिळक आणि सावरकरांनी राजकीय स्वातंत्र्याचा लढा आरंभिला होता. दक्षिण भारतात नारायण गुरु, रघुपती वेंकटरमन ही मंडळी अस्पृश्यांसाठी मंदिरे खुली व्हावीत म्हणून लढत होती. विवेकोदयम या मल्याळम पत्रिकेचे संपादक कुमारन अशा  जातीभेद आणि विषमतेवर प्रहार करीत होते. ओरिसात फकीर मोहन सेनापती आपल्या साहित्यातून समतेचा आग्रह धरीत होते आणि विचारीत होते, ‘‘वेदाधिकारी कोण?’’ बंगाल तर भारतीय प्रबोधनाची भूमी म्हणून ओळखला जातो. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर, देवेंद्रनाथ टागोर, अरविंद घोष आणि कितीतरी…..
उत्तर भारतात संत कबीर, दयानंद सरस्वती, गुरुनानक देव आपला प्रभाव राखून होते. या प्रबोधनकाळाचे वैशिष्ट्य म्हणजे ही आंदोलने केंद्रीकृत नव्हती; तर ती वाड्या, वस्त्या आणि अनेक गावागावामधून विखुरलेले होती. या सामाजिक आंदोलनाला योग्य दिशा देण्याचे व केंद्रीकृत करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, दयानंद सरस्वती या मंडळींनी केले. विशेष म्हणजे ज्या हिंदू समाजाला आज असहिष्णू म्हणून तथाकथित बुद्धीजीवी खिजवतात तोच हिंदू समाज आपल्यात वेगाने बदल करीत नव्याची कास धरता झाला.
मात्र आपल्यातील उणीवा दूर करण्याचा प्रयत्न होत असताना शत्रू पक्षाच्या बलस्थानांचा आणि भारताविरुद्ध पुकारलेल्या बौद्धिक आणि आर्थिक  लढ्याचा समाचार काही मंडळी घेत होती. त्यात दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम भारतीय संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडला. ज्याला ‘ड्रेन थेअरी’ असे म्हणतात. त्यांनी हे सप्रमाण  लक्षात आणून दिले की ब्रिटीश मोठ्या प्रमाणावर भारतीय संपदेची लूट करीत आहेत. पंजाब केसरी लाला लाजपत राय आपल्या ‘इंग्लंडस् डेब्ट टू इंडिया’ या पुस्तकातून भारताच्या लुटीचे चित्र तत्कालीन समाजासमोर मांडत होते. आर्थिक आणि सामाजिक प्रश्नावर घमासान चालू असताना बौद्धिक पक्षाकडे आमचे काहीसे दुर्लक्ष झाले. इंग्रजांच्या या शस्त्राचा अंदाज महात्मा गांधींना आला होता. इंग्रजांनी या देशात शिक्षणाचा प्रसार सुरु केल्यानंतर भारतीय मन आणि मस्तिष्क ताब्यात घेण्याची योजना होती. ज्यात ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिश कावा आणि जागतिक पातळीवर भारताच्या बदनामीचे षडयंत्र व त्यामागील भूमिका ब्रिटिशांच्या भूमीत जाऊन समजून घेणारे आणि उपेक्षित राहिलेले थोर गांधीवादी विचारवंत श्री. धर्मपाल यांचा उल्लेख या ठिकाणी होणे आवश्यक आहे, कारण ब्रिटिशांनी भारताविरुद्ध पुकारलेल्या बौद्धिक लढ्याचा परामर्श त्यांनी आपल्या लिखाणातून घेतला.
त्यांच्या संशोधनातून पुढे आलेला एक महत्त्वपूर्ण प्रसंग असा आहे. 20 ऑक्टोबर, 1931 मध्ये महात्मा गांधींनी लंडनच्या च्याथम हाऊस मध्ये उपस्थित समुदायासमोर भाषण करताना सांगितले की, ‘‘गेल्या पाच दहा दशकामध्ये भारतातले साक्षरतेचे प्रमाण घटले असून या परिस्थितीला ब्रिटिश सरकार जबाबदार आहे.’’ गांधीजींचा हा आरोप ब्रिटिश समर्थकांना मोठा धक्का होता. ढाका विद्यापीठाचे माजी कुलगुरू फिलीप हरटाग यांनी गांधीजींना ‘‘आपले म्हणणे सिद्ध करा वा मागे घ्या’’ असे आव्हान दिले. हा आरोप निराधार नव्हता हे सिद्ध करण्यासाठी गांधींनी प्रा. के. टी. शहा यांना विनंती केली. प्रा. शहा यांनी फिलीप हरटाग यांना पत्रे लिहून मुल्लर, थॉमस मन्रो आणि मुंबई इलाख्याचे कौन्सिल मेंबर श्री. प्रेन्डेरगाष्ट यांची  साक्ष काढली.
श्री प्रेन्डेरगाष्ट म्हणतात, ‘‘मुंबई इलाख्यात असे एकही गाव नाही जिथे शाळा नाही. शहरातून तर वस्तीमागे एकेक शाळा आहे. शाळाशाळांमधून कैक विद्यार्थी वाचन, लेखन शिकत आहेत. या इलाख्यात एकही शेतकरी वा व्यायसायिक नसेल ज्याला अचूक हिशोब करता येत नाही. हा माणूस त्याच्याच स्तरातल्या ब्रिटिश माणसापेक्षा खूप पुढे गेलेला आहे. त्यांच्या हिशोबाच्या वह्या ब्रिटिश माणसाच्या तोडीस तोड आहेत.’’
अशा अनेक विषयांचे संशोधन श्री. धर्मपाल यांनी केले आहे. भारतातील उपनिवेशवादाचा आमच्यावर झालेला गंभीर परिणाम आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण 500 वर्षाच्या इस्लामिक आक्रमणांनी भारताचे जे नुकसान केले नाही त्यापेक्षा कितीतरी पटींनी ते ब्रिटिश सत्तेने केले आहे, हे समजून घेतले पाहिजे.
धर्मपाल यांचे हे संशोधन केवळ प्रवाही नसून ते भारतीय जनमानसाला भारताचा भारतीय पद्धतीने शोध घ्यायला बाध्य करते. ते आपण पुढे बघणार आहोत. माजी पंतप्रधान श्री. चंद्रशेखर आणि धर्मपाल हे दोघे मित्र होते. भारताच्या समस्यांचे मूळ ते चंद्रशेखर यांना ‘‘आपल्या दोनशे वर्षाच्या इतिहासात सापडेल’’ असे म्हणायचे. ब्रिटिशांच्या या दोनशे वर्षाच्या इतिहासातील वैचारिक आंदोलने तपासण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

– प्रशांत आर्वे, चंद्रपूर
चंद्रपूर 8888624969
(पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ मे 2017)

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >
error: Content is protected !!