पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ

पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ
मराठेशाही व पेशवाईची विविधांगांनी भरपूर चर्चा होत असली तरी होत नाही ती रणरागिणी ताराराणी व पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथावर. तसे दोघेही समकालीन. ताराराणीने 1700 ते 1707 पर्यंत संताजी व धनाजीसारख्या वीरांच्या मदतीने मोगलांशी जी झुंज दिली तिला तोड नाही.

ताराराणी

अनेक युद्धात तिने स्वत: नेतृत्व केले. घोडदळाचे नेतृत्व करण्यात ती कुशल होती. रणनीतीत तिचा हात कोणी धरू शकले नसते. 1705 मध्ये तर तिने नर्मदा ओलांडून माळवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. जदुनाथ सरकार म्हणतात की, देशातील अत्यंत अंदाधुंदीच्या काळात ताराबाईने ज्या पद्धतीने नेतृत्व केले त्याला तोड नाही; पण मराठी इतिहास ताराराणीबाबत म्हणावा तेवढा उदार राहिला नाही हेच काय ते खरे!

बाळाजी विश्वनाथाचीही तीच गत आहे. अतिसामान्य परिस्थितीत सापडूनही आपला अपार मुत्सद्दीपणा, युद्धकौशल्य व प्रसंगी प्राणही पणाला लावून त्याने पेशवे होण्यापर्यंत मजल गाठली. दिल्लीकडे मराठ्यांचा मोहरा वळवणारा तोच पहिला मराठी राज्याचा पेशवा; परंतु मराठी इतिहासाने त्याची फारशी दखल घेतली नाही. बाजीराव पेशवा ते दुसर्‍या बाजीरावावर भरभरून स्तुतीसुमनांची व निंदाव्यंजक लेखनांची राळ उडवून देणारे मात्र पेशवाईच्या संस्थापकाची फारशी दखल घेत नाहीत हे एक वास्तव आहे; परंतु अगदी टिळकांच्याही कोकणस्थ चित्पावनप्रणित राजकारणाचा खरा पाया बाळाजी विश्वनाथानेच घातला हे लक्षात घेतले जात नाही. आपण येथे त्याच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करू!

बाळाजी विश्वनाथ :पहिला पेशवा

बाळाजी विश्वनाथ भट मूळ कोकणातील. त्याच्याबाबतची आरंभीची माहिती मिळते ती अशी – श्रीवर्धन येथील महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके 1400 पासून शके 1600 पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही देशमुखी 1478 च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथाचे वडील व आजोबा शिवाजीच्या सेवेत असावेत अशी शक्यताही रियासतकार व्यक्त करतात. किमान 1575 च्या सुमारास महादजीकडे ही परंपरागत देशमुखी होती असे दिसते. महादजीस नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी दोन मुले झाली. पैकी शिवाजीस कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी ही मुले झाली. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला चार भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. बाळाजीचे लहानपणीच लग्न झाले ते बर्वे घराण्यातील राधाबाईशी. संभाजीराजे होते तोवर कोकणात काही प्रमाणात मोगली व अन्य स्वार्‍यांचा उपद्रव असला तरी भट घराण्याची देशमुखी सुस्थिर होती; पण संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर मात्र परिस्थिती पालटली. सिद्दीने उचल खाल्ली. सिद्दी व आंग्रे परंपरागत शत्रू. त्यात आंग्रे यांना सामील असल्याच्या संशयाने त्याची वक्रदृष्टी भट घराण्याकडे वळली. बाळाजीच्या जानोजी नावाच्या भावाला सिद्दीने पकडून, पोत्यात घालून समुद्रात बुडवले असेही सांगितले जाते. काहीही असले तरी भट घराण्याचा छळ सुरु झाल्याने प्रथम बाळाजीला सपत्नीक मुरुड येथे वैशंपायन कुटुंबियांकडे आश्रय घ्यावा लागला; पण सिद्दीच्या हशमांनी तेथेही त्याची पाठ पुरवल्यामुळे बाळाजीला भानू कुटुंबियांसोबत सातार्‍याला यावे लागले.

जवळपास कफल्लक झालेल्या बाळाजीला चरितार्थासाठी नोकरी शोधणे क्रमप्राप्त होते. बाळाजी हिशोबात तरबेज असल्याने त्याला रामचंद्रपंत अमात्यांच्या कोठीवर कारकुनाची नोकरी मिळाली. याच काळात धनाजी जाधवाची त्याच्यावर मर्जी बसली. धनाजीने त्याला दिवाण म्हणून आपल्या सेवेस घेतले. या काळात मोगलांशी मराठ्यांचा संघर्ष सुरुच होता. त्यात राजाराम महाराजांचाही सिंहगड येथे मृत्यू झाला व युद्धांची सर्व सूत्रे ताराराणीने आपल्या हाती घेतली. संताजी-धनाजी गनिमीकाव्याने मोगलांना त्रस्त करत होते. हे सारे बाळाजी विश्वनाथ फार जवळून अनुभवत होता. 1705 च्या दरम्यान त्याने देखील काही लढायांत भाग घेतला. त्याचेच फळ म्हणून की काय बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली. आता त्याच बाळाजीला 1705 च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखील मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे – श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।

1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि उत्तरेचे सारे राजकारणच पालटले. औरंगजेबाच्या वंशजात पातशाहीसाठी संघर्ष उडण्याची चिन्हे दिसू लागली. औरंगजेबाच्या मृत्युची बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेला आझमशहा तत्काळ अहमदनगरला आला व ईदच्या मुहूर्तावर 14 मार्च 1707 रोजी त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. शाहू महाराजांची कैदेतून सुटका हा तत्कालीन परिस्थितीत मोगलांनी टाकलेला अत्यंत मुत्सद्दी आणि यशस्वी झालेला डावपेच होता. मुअज्जम हा लाहोरला असलेला राजपुत्रही तख्तावर हक्क सांगण्यासाठी आग्य्राकडे निघाला होताच. तख्तावर कोण बसणार हे युद्धच ठरवणार होते. अशा स्थितीत रणरागिणी ताराबाई परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या सीमा वाढवेल यात शंकाच नव्हती. मराठ्यांना आपापसात झगडत ठेवणे अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे सेनापती झुल्फिकार खान व राजपूत सरदारांनी शाहजादा आझमला शाहूची सुटका करण्यास सुचवले. आझमला तो सल्ला मानण्यावाचून गत्यंतर नव्हते. शाहूच्या सुटकेमुळे मराठ्यांत सत्तास्पर्धा निर्माण होवून दोन तट पडतील व ते आपापसात लढत बसतील हा मोगली होरा मराठ्यांनीही खरा ठरवला हे वेगळे. अशारीतीने डावपेचाचा एक भाग म्हणून मोगल सत्तेशी आणि तख्ताशी इमानदार राहणे या अटींवर शाहू महाराजांना 18 मे 1707 रोजी दोराहा (भोपाळ पासून 32 किमी) येथे मुक्त करण्यात आले. मोगली सत्तेने शाहूंनाच स्वराज्याचा वारस म्हणून अधिकृत मान्यता दिली. तशा सनदाही दिल्या व त्यान्वये दक्षिणेतील सहा सुभ्यांची सरदेशमुखी आणि चौथाईचे अधिकारही शाहूंना बहाल केले. यामुळे शाहू महाराजांचे मनोबल वाढले, तशीच महत्त्वाकांक्षाही. शाहूंना मुक्त करुन आझम उत्तरेकडे तातडीने आपल्या भावाचा सामना करायला निघून गेला. अर्थात आझमने शाहूंना मुक्त केले असले तरी त्यांच्या दोन्ही पत्नी (सावित्रीबाई आणि अंबिकाबाई), येसूबाई आणि शाहुंच्या सावत्रभावाला मात्र ओलीस म्हणून आपल्याजवळच कैदेतच ठेवून घेतले.

शाहुंची सुटका झाल्याची खबर वणव्यासारखी महाराष्ट्रभर पसरली. मराठा सरदार अर्थातच द्विधेत पडले. जे गुजराथ व माळव्याच्या सीमावर्ती प्रदेशांत स्वतंत्र सैन्य उभारुन माळवा व गुजराथवर हल्ले चढवत लूट करणारे सरदार होते त्यांना ही मोठी संधी वाटली. सर्वात प्रथम सामील झाला तो बिजागढचा मोहन सिंग रावळ. तापीच्या तीरावर आला असता शाहूंना अमृतराव कदमबांडेही सामील झाला. परसोजी भोसले यांनीही तीच वाट पकडली. अशारीतीने एकामागून एक सरदार शाहुंभोवती जमायला लागले. थोडक्यात गृहयुद्धाची नांदी झाली. ताराराणीच्या सार्‍या राजकीय योजना आता शाहूंचे काय करायचे या प्रश्‍नाशी येऊन थांबल्या. युद्धाखेरीज पर्याय नव्हता. ताराराणी या रणमर्दानी व मुत्सद्दी खर्‍या; पण मराठा सरदारांना एका स्त्रीचे युद्धातील नेतृत्व मनोमन मान्य नसावे अशा घडामोडीही होत्याच. त्यात शाहू तोतया आहे अशी हुल उठली. ही हूल उठायला ताराराणी कारणीभूत होती की नाही याची शहानिशा करणे शक्य नाही; पण काहीकाळ संभ्रम निर्माण झाला हे खरे. परसोजी भोसलेने एका ताटात शाहूबरोबर भोजन करून हाच खरा शाहू व संभाजीचा पुत्र अशी ग्वाही दिली त्यामुळे अफवेमुळे साशंक झालेले मराठा सरदार जरा आश्वस्त झाले.

ताराराणीने शाहूला गादीचा एकमेव वारस म्हणून मान्य करायला नकार दिला. कारण गेली सात वर्ष तिनेच मोगलांशी अथक संघर्ष करत मराठी राज्य काही प्रमाणात का होईना वाचवले होते. ताराराणीच्या दृष्टिकोनातून विचार करता यात वावगेही काही नव्हते. स्वबळावर तिने मराठी राज्यावर अधिकार मिळवला होता; पण पातशाही सनदा शाहूच्या ताब्यात असल्याने त्याची बाजू नकळत वरचढ झाली होती. सरदारांची पुरुषी वर्चस्ववादी वृत्तीही तिच्या विरोधात होती; पण ताराराणी हार मानणार्‍यांपैकीही नव्हती. तिने शाहूशी युद्धाचा पवित्रा घेतला. तिने धनाजी जाधवला शाहू खरा की तोतया याचा अंदाज घेऊन त्याच्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. बाळाजीही त्याच्यासोबत होता.
खेड (आताचे राजगुरुनगर) येथे युद्धाच्या आदल्या दिवशी बाळाजी शाहूला धनाजीचा प्रतिनिधी म्हणून भेटायला गेला. त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील उपलब्ध नाही, पण शाहू तोतया नसून खराच आहे अशी बाळाजीची खातरजमा झाली व त्याने धनाजीला तसे सांगितले; पण धनाजीचा निश्चित निर्णय होत नव्हता. दुसर्‍या दिवशी उभय पक्षात युद्ध सुरु झाले खरे; पण ते ऐन भरात असतानाच धनाजीने युद्ध थांबवले व शाहूच्या गोटात अधिकृतपणे प्रवेश केला. यामागे बाळाजीचीच मुत्सद्देगिरी असावी असा तर्क इतिहासकार देतात. धनाजीसारखा बलदंड सरदार शाहूला सामील झाल्याने ताराराणीची बाजू लुळी पडणे स्वाभाविक होते.

बाळाजी व धनाजीचे हे कृत्य नैतिक की अनैतिक हा प्रश्न येथे निर्माण होणे स्वाभाविक आहे; पण राजकारणात नीतिमत्तेला थारा देता येत नाही हेही खरे. या प्रसंगामुळे शाहूच्या मनात बाळाजीबद्दल कृतज्ञता निर्माण होते व तसे झालेही. ताराराणीही शांत बसली नाही की खचलीही नाही. गृहयुद्ध चालूच राहिले व त्याची परिणती कोल्हापूर व सातारा अशा मराठेशाहीच्या दोन गाद्या निर्माण होण्यात झाली. परस्पर सीमाही ठरल्या. तरी घोडी-कुरघोडीचे राजकारण चालूच राहिले. ताराराणीच्याही निग्रहाचे येथे कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही. बाळाजीने अनेक सरदारांना ताराराणीच्या पक्षातून फोडून शाहूच्या दरबारी रुजू करत शाहूचे सामर्थ्य वाढवले. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की शाहूचे संपूर्ण जीवन मोगली छावणीत गेल्याने त्याला युद्धाभ्यास नव्हता तसेच राजकारणाचे डावपेचही विशेष माहीत नव्हते; पण त्याचा स्वभाव शांत व सखोल असल्याने गुणग्राहकता ही त्याच्या अंगी होती. बाळाजीला त्याने उत्तरोत्तर प्रगतीची संधी दिली. नंतर कोल्हापूर गादीसाठीही ताराराणी आणि राजसबाईत वाद पेटला. हा वाद निर्माण करण्याचे काम बाळाजी विश्वनाथानेच करुन शाहूंना जरा उसंत दिली असे जसवंतलाल मेहता आपल्या ‘एडवान्स्ड स्टडी इन द हिस्टरी ऑफ मॉडर्न इंडिया 1707-1813’ या ग्रंथात म्हणतात.

इकडे उत्तरेतही भाऊबंदकी माजलेली होतीच. शाहजादा आजम व मुअज्जम याच्यात युद्ध झाले. त्यात आझम ठार झाला. मुअज्जम बहादुरशहा नाव धारण करत तख्तावर बसला. तरी त्याला अजून कामबक्ष या आपल्या धाकट्या भावाचा काटा काढायचा होता. कामबक्ष तेव्हा हैदराबाद येथे होता. शाहूंना आझमने दिलेली चौथाई आणि सरदेशमुखीची सनद त्याच्या मृत्युबरोबरच बाद झाली होती. त्यामुळे शाहूंनी बाळाजीच्या सल्ल्याने प्राप्त स्थितीचा फायदा घ्यायचे ठरवले. नेमाजी शिंदेच्या नेतृत्वाखाली शाहूंनी नव्या बादशहाच्या मदतीसाठी कुमक पाठवली. मोगल व कामबक्षात झालेल्या युद्धात कामबक्षचा अपेक्षेप्रमाणे पराभव झाला. कामबक्ष जखमी अवस्थेत पकडला गेला व नंतर त्याचाही मृत्यु झाला. बहादूरशहा शाहूंना चौथाई आणि सरदेशमुखी द्यायला जवळपास तयार झाला होता; पण ताराराणीचा वकीलही तेथे येऊन ठेपल्याने सारा मामला बिघडला. बहादुरशहाने झुल्फिकार खान व मुनिमखान या आपल्या मंत्र्यांचेच ऐकले व उभयपक्षांना सांगितले की आधी तुमच्यातले वाद मिटवून कोण अधिकृत वारस आहे हे आधी आपापसात निश्चित करा… त्यानंतरच सनदा दिल्या जातील. मोगलांनी येथेही आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाची चुणूक दाखवली. ही घटना 1709 मध्ये घडली.
अर्थात या धामधुमीमुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नव्हता. मयत धनाजी जाधवचा मुलगा सेनापती चंद्रसेन जाधव हा अकार्यक्षम असल्याचे दिसल्याने शाहूंनी बाळाजी विश्वनाथाची सेनाकर्ते पदी नेमणूक केली. (ही पदवी म्हणजे आताच्या क्वार्टर मास्टर जनरल या पदासारखी होती.) पण याची परिणती अशी झाली की चंद्रसेन सरळ ताराराणीला जाऊन मिळाला. (1711). शाहुंनी मग त्याचा धाकटा भाऊ संताजी जाधवला सेनापती बनवले. तोही असाच चंचल असल्याने सरदार नाराज होऊ लागले आणि अनेक पुन्हा ताराराणीच्या गोटात जाऊ लागले. बाळाजीने मग स्वत:च्या जबाबदारीवर महादजी कृष्ण नाईकांसारख्या सावकारांकडुन कर्ज उचलले, स्वतंत्र सैन्य उभारले आणि शाहूंच्या शत्रुंवर तुटून पडला व त्यांची गादी शाबूत ठेवली..

शाहू महाराजांना बाळाजीची अनमोल मदत झाली नसती तर शाहू सत्ता प्राप्त करु शकले नसते असेच एकंदरीत घटनाक्रम पाहता म्हणता येते. बाळाजीने शाहूंसाठी रस्त्यातील अनेक काटे साफ केले. अनेक शत्रुंना शाहूंच्या बाजूने वळवले. स्वत:ही जिवावरची संकटे झेलली. राजसबाईला हाताशी धरुन ताराराणीला शेवटी पन्हाळ्यावर नजर कैदेत ठेवण्यात आले. पण किनारपट्टीचे आधिपत्य गाजवणारा कान्होजी आंग्रे अजूनही ताराराणीशी एकनिष्ठ राहिला. त्याला आपल्याकडे कसे वळवायचे हा शाहूसमोरील पेच होता. ती जबाबदारी शेवटी शाहूने बाळाजीवरच सोपवली; पण आंग्रे सरखेल. त्याच्याशी मी कोणत्या अधिकारात चर्चा करू असे बाळाजीने विचारल्यावर शाहूने बाळाजीला पेशवेपद दिले.
यानंतर बाळाजी आंग्रेंना भेटला. आंग्रेंबरोबर समझौता करण्यात तो यशस्वी झाला. 1714 मधील ही घटना. यामुळे बाळाजीच्या अलौकिक मुत्सद्दीपणावर शिक्कामोर्तब झाले. बाळाजीला अशाच एका संघर्षात अटक झाल्याचीही घटना घडली. संजय क्षीरसागरांच्या शब्दांत ती अशी आहे… (हुसेनअलीसोबत) तहाची वाटाघाट सुरु असताना सुपे व पाटस परगण्याचा जहागीरदार दमाजी थोराताने हुसेनअली सय्यदच्या प्रेरणेने शाहूच्या विरोधात बंडाळी आरंभली. स. 1716 मध्ये दमाजीचा बंडावा विशेष वाढल्याने शाहूने बाळाजी विश्वनाथला त्याचा बंदोबस्त करण्याची आज्ञा दिली. थोराताचे बंड आंग्य्राप्रमाणेच बोलाचालीने निकाली काढण्याच्या उद्देशाने बाळाजी त्याच्या भेटीस सहपरिवार गेला. तत्पूर्वी बेलभंडार्‍याच्या शपथक्रियेचा औपचारिक कार्यक्रम पार पडला होता. दमाजीचा मुक्काम त्यावेळी पुण्याच्या पूर्वेस हिंगणगाव येथे होता. या गावाला गढी बांधून थोरात मंडळी राहात होती. पेशवा भेटीस आल्यावर दमाजीने त्यास कैद केले. यावेळी पेशव्याने त्यास शपथेची आठवण दिली असता बेल म्हणजे झाडाचे पान व भंडारा म्हणजे हळद अशा तर्‍हेची मुक्ताफळे दमाजीने उधळल्याचे सांगतात. पेशव्याला कैद केल्यावर दमाजीने त्याच्याकडे जबर आर्थिक दंडाची मागणी केली. बाळाजीने आर्थिक दंड भरण्यास तयार व्हावे म्हणून त्यास उपाशी ठेवण्यात आले. खेरीज राखेचे तोबरे भरण्याचा धाकही दाखवण्यात आला. अखेर बाळाजीने आपले सर्व कुटुंब, मुतालिक अंबाजी पुरंदरे व धडफळे कुटुंबातील दोन इसम ओलीस ठेऊन सुटका करून घेतली आणि शाहूकडे धाव घेतली. बिचारा शाहू! कान्होजीने बहिरोपंतास पकडले म्हणून त्याची पेशवाई काढून त्याने बाळाजीस दिली होती तर त्याची ही तर्‍हा!! मात्र, यावेळी शाहूने आपल्या पेशव्याची पाठराखण करून सावकार आणि इतर मुत्सद्द्यांच्या मार्फत द्रव्याची जुळणी करून पेशव्याची माणसे सोडवली. पेशव्याच्या कुटुंबाची सुटका होताच शाहूने सचिव नारो शंकर यास थोराताचा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली. सचिव अल्पवयीन असल्याने ही कामगिरी त्याच्या कारभार्‍याने उचलली पण थोराताने याही वेळेस शाहूवर मात केली. सचिवाची फौज थोरातावर चालून जाण्यापूर्वीच रोहिडा किल्ल्याखाली सचिवाचा मुक्काम असल्याची बातमी मिळवून दमाजीने नारो शंकरास कैद केले आणि आपल्यावर चालून आल्यास तुमच्या पुत्रास ठार करू अशी धमकी त्याने नारो शंकरच्या आईस दिली. त्यामुळे सचिवाची स्वारी सुरु होण्यापूर्वीच संपुष्टात आली. थोराताच्या कैदेत नारो शंकर चार आठ महिने राहिला. शाहूने सचिवाच्या सुटकेसाठी परत एकदा भला मोठा आर्थिक दंड थोरातास दिला. दरम्यान, हुसेन सय्यद सोबत चाललेल्या तहाची वाटाघाट फळास येऊन उभयतांमध्ये सख्य होताच बाळाजी विश्वनाथने मोगलांचा तोफखाना सोबत घेऊन हिंगणगावावर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या संघर्षात थोराताचा पराभव झाला. बाळाजीने त्यास पुरंदरावर कैद करून ठेवले. थोराताची हिंगणगावची गढी खणून काढली आणि पांढरीवर गाढवाचा नांगर फिरवून आपल्या अपमानाचा सूड उगवला. अशा प्रकारे थोराताचे बंड निवळले…

1718 मध्ये बाळाजीने सय्यद हुसेनकडून चौथाईचे व सरदेशमुखीचे हक्क शाहूसाठी मिळवले. जेवढा प्रदेश शिवाजी महाराजांच्या अंकित होता जवळपास त्या सर्व प्रदेशावरील चौथाईचे हक्क मिळवणे ही बाळाजीची मोठीच कामगिरी आहे. अर्थात या मोबदल्यात पातशाहीची सार्वभौमता मान्य करावी लागली; पण पातशहाने ही योजना फेटाळून लावली व युद्धाची तयारी सुरु केली. त्यामुळे सय्यद हुसेन तातडीने बाळाजी विश्वनाथासह दिल्लीकडे ससैन्य रवाना झाला व सरळ फरुकसियर बादशहाची उचलबांगडी करुन नामधारी पातशहाची स्थापना केली. या वेळीस बाजीरावही बाळाजीसोबत होता. सय्यद हुसेनने बाळाजीचे ऐकले याचा हा परिणाम होता. या संधीचा फायदा घेऊन बाळाजी विश्वनाथाने मोगली कैदेत असलेल्या सावित्रीबाई, येसूबाई व इतरांची सुटका मार्च 1719 मध्ये करुन घेतली. अंबिकाबाई मात्र पूर्वीच मोगली कैदेतच वारली होती.

इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन म्हणतात की, यामुळे आपणही पातशाही कधीही हलवू शकतो याचा विश्वास आला. बाजीरावाने जे उत्तरेबाबत धोरण ठरवले त्याला ही मोहीम कारणीभूत झाली. या मोहिमेतच तरुण मल्हारराव होळकर एक स्वतंत्र पथक्या म्हणून सामील झाला होता. या दरम्यान एका भांडणानंतर मल्हारराव व बाजीरावात मैत्र निर्माण झाले व त्याची परिणती पुढे मल्हाररावाने बाजीरावाला साथ देण्याचे ठरवले व मराठेशाहीची सरदारकी स्वीकारली. पुढे या दोघांनी काय पराक्रम गाजवले हा इतिहास सर्वज्ञात आहे.

या मोहिमेनंतर पुण्याला परत आल्यानंतर काही काळातच, 2 एप्रिल 1720 रोजी, बाळाजीचा मृत्यू झाला. त्यावेळीस त्याचे वय 58 वर्षांचे होते. पेशवेपदी बाळाजी केवळ अपार मुत्सद्देगिरी, साहस आणि धोरणीपणाने चढला. त्याचे आयुष्य तसे संघर्षातच गेले. जिवावरच्या जोखमी घ्याव्या लागल्या. तो युद्धात कुशल नव्हता, पण कोणाचाही विश्वास संपादन करून राजकीय कार्य पुढे नेण्याची अचाट क्षमता त्याच्याकडे होती. मराठ्यांच्या इतिहासात पेशवाईचे पर्व आणण्याचे संपूर्ण श्रेय त्याचे जसे आहे तसेच उत्तर हेच मराठ्यांचे लक्ष्य असले पाहिजे हे त्याने ओळखून आधीच्या दक्षिणकेंद्रित राजकारणाला बदलवले. त्याचीच परिणती पुढे उत्तरेत मराठ्यांचे अधिपत्य निर्माण होण्यात झाली. अर्थात नंतरचे सर्वच पेशवे लायक निघाले असे नाही. इतिहासाने त्यांचे मूल्यमापन वेळोवेळी केलेले आहेच. पहिल्या पेशव्याबाबत इतिहासाने कृपणता दाखवली एवढे मात्र खरे. त्याच्याबाबत बरे वाईट शेरे मारण्यापलीकडे त्याच्या पेशवेपदापर्यंतच्या प्रवासाचे आणि 1713 ते 1720 या अल्पावधीच्या पेशवेपणाचे मात्र सखोल विवेचन राहूनच गेले आहे.

संजय सोनवणी
9860991205
(पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’, एप्रिल 2017)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा