अटकपासून कटकपर्यंत’ झेंडे फडकविणार्या मराठ्यांनी रूढ अर्थाने दिल्लीवर राज्य केले नसेल परंतु ‘दिल्लीचे रक्षणकर्ते आणि आधारस्तंभ’ म्हणून लौकिक मिळविला होता. मराठी माणूस आणि दिल्ली यांचे नेमके ऋणानुबंध काय आहेत, दिल्लीतील मराठी माणसांनी काय योगदान दिले, याविषयी दिल्लीत दीर्घकाळ वास्तव्य केलेल्या आणि पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटविणार्या ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी लिहिलेला हा विशेष लेख खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी!
मराठी साहित्य संमेलन होत असलेले तालकटोरा स्टेडियम हे स्थान ऐतिहासिक आहे. त्याच्या ऐतिहासिकतेशी मराठी इतिहासही जोडलेला आहे हा एक योगायोग आहे. कारण पहिल्या बाजीरावांनी दिल्लीपति मुघल राज्यकर्त्यांबरोबर युद्ध छेडले होते. उत्तर प्रदेशातील जलेसर (जलेश्वर) येथे मराठी सैन्याचा दिल्लीच्या मुघल सरदाराकडून (सादत अलि खान) झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी थेट दिल्लीवर चाल केली होती. ते युद्ध किंवा चकमक तालकटोरा या ठिकाणी झाली. 28 मार्च 1737 ही ती तारीख होती. याच ठिकाणी मराठी सैन्याचा तळ पडलेला होता. त्यावेळी हा भाग लहनमोठ्या टेकड्यांनी वेढलेला होता आणि त्याच्या बरोबर मध्यभागी खोलगट वाटीसारखा (कटोरा) भाग होता आणि तेथे जलाशय (ताल किंवा तलाव) तयार झालेला होता. या युद्धात मराठ्यांनी दिल्लीचा पराभव केला होता. तत्कालीन मुघल राज्यकर्त्यांनी दक्षिणेतील निझाम (हैदराबाद) आणि भोपाळच्या नबाबांना मदतीसाठी पाचारण केले होते परंतु भोपाळ येथे झालेल्या लढाईत या दोघांचाही पराभव करण्यात आला होता आणि दिल्लीत येऊन बाजीरावांनी मुघल सैन्यालाही मात दिली होती. यावेळी मराठी साम्राज्य यमुना नदीच्या तटापर्यंत येऊन पोहोचले होते.
इतिहासकारांच्या मते बाजीराव पेशव्यांना दिल्ली पूर्णत्वाने काबीज करण्याची इच्छा होती परंतु व्यावहारिकदृष्ट्या त्यांनी ती शक्यता तोलूनमापून पाहिल्यानंतर आणि तत्कालीन छत्रपति शाहू महाराजांबरोबरच्या सल्लमसलतीनंतर दिल्लीवर सत्ता स्थापन करण्याऐवजी दिल्लीपतींचे रक्षणकर्ते म्हणून भूमिका स्वीकारली होती. हा विचार त्यावेळची भू-राजनैतिक परिस्थिती लक्षात घेऊन करण्यात आला होता आणि त्यामध्ये राष्ट्रीय विचार अधिक होता. ब्रिटिशांनी भारतात हातपाय विस्तारण्यास सुरुवात केल्याचा तो काळ होता आणि त्यामुळे या परकी शत्रुसमोर स्वकीयांमध्ये अधिक फाटाफूट होऊन दुर्बळता वाढायला नको हा त्यामागील हेतू असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. अर्थात या ठिकाणी ऐतिहासिक विश्लेषणाचा हेतू नाही परंतु संमेलन स्थानाचे महत्त्व विषद करण्याच्या हेतुने हा एक दाखला दिलेला आहे.
मराठ्यांचा इतिहास आणि पानिपत यांचे नातेही अतूट ठरले आहे. परकी शत्रुंच्या मुकाबल्यासाठी दिल्लीपतींनी मराठ्यांची मदत मागितलेली होती. दुर्दैवाने उत्तर हिंदुस्थानातील मैदानी युद्धाचा पुरेसा सराव नसल्यामुळे मराठ्यांना पराभव पत्करावा लागला होता मात्र यानंतर पानिपत आणि त्या परिसरात महाराष्ट्रातून गेलेले सैनिक परतले नाहीत आणि ते तेथील समाजातच सामावले गेले. आजही त्यांचे वंशज या परिसरात आहेत. प्रामुख्याने त्यांना ‘रोड’ म्हणून ओळखले जाते; कारण गेलेली ही मंडळी लढवय्यी होती. सध्याच्या हरयाणातील जाट समाजही लढवय्या समाज म्हणूनच ओळखला जातो आणि त्यांनाच तुल्यबळ अशी ही लढवय्यी मंडळी होती. त्यांना सामावून घेताना त्यांना ही संज्ञा देण्यात आली. कर्नाल व कुरुक्षेत्र, रोहतक, भिवानी, पानिपत या ठिकाणच्या सुमारे 80 खेड्यांमध्ये हा समाज आढळतो. आता मात्र त्यांचा एकेकाळी मराठी संस्कृतीशी काही संबंध होता हे जाणवत नाही. आता ते हरयाणवी संस्कृति व समाजात पूर्णपणे मिसळले गेले आहेत मात्र काही मंडळी आवर्जून त्यांच्या पूर्वजांचा इतिहास सांगत असतात. आता काळाच्या ओघात रोड समाजातील काहींनी शीख धर्माचा स्वीकार केलेलाही आढळतो. होळी आणि दिवाळी हे दोन सण या समाजातर्फे प्रामुख्याने साजरे केले जातात. हा एक मराठी धागा त्यांच्याकडे जपला जाताना दिसतो. कदाचित पूर्वापार चालत आलेल्या रीतीरिवाजांनुसार हे घडत असावे. रोड महासभा ही या समाजाची सार्वजनिक संस्था आहे. दाहिया, चारटाण, कादियान, लाथेर, मलिक, महाला, सांगवान ही त्यांची काही आडनावे आहेत. सध्याची या समाजाची लोकसंख्या जवळपास सात लाखांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. आता काही प्रमुख मंडळींनी आपले मराठीपण किंवा मराठी इतिहासाशी असलेल्या नात्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कर्नाल येथे मराठा जागृति मंचाची स्थापना देखील झालेली आहे. आता ही मंडळी स्वतःला ‘रोड-मराठे’ म्हणवून घेतानाही आढळतात. पानिपतला जेथे अब्दालीबरोबर युद्ध झाले तेथे युद्धस्मारकही उभारण्यात आले आहे. काही ठिकाणी पवार, पाटील, चव्हाण, भोसले, सावंत अशा आडनावांची कुटुंबेही अस्तित्वात आहेत. अलीकडच्या काळात या परिसरात गणेशोत्सवही सुरु करण्यात आल्याची माहिती मिळते. थोडक्यात या ठिकाणीही मराठी इतिहासाचे पुनरुज्जीवन होताना आढळते आणि आपल्या पूर्वीच्या मराठी संस्कृतीशी पुन्हा जोडले जाण्याचे प्रयत्न या मंडळींनी सुरु केलेले आढळतात.
मराठी शूरवीर आणि लढवय्यांनी अटकेपार झेंडे लावल्याच्या कथा ऐकत आपण मोठे होत आलो. अटक हे गाव आणि तेथील किल्ला आताच्या पाकिस्तानात आहे. ‘अटक खुर्द’ असे या गावाचे नाव आहे. तेथे अकबराने हा किल्ला बांधला. पेशावरला जाणारा महामार्ग आणि सिंधु नदी यांच्या मध्ये हे गाव आणि किल्ला आहे. सिंधु नदी पार करुन कुणी पुढे येऊ नये यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. सामरिकदृष्ट्या अत्यंत मोक्याचे स्थान म्हणून या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. याचे कारण या स्थानापासून अफगाण सीमा जवळ आहे. अटक नंतर अगदी सीमेजवळ असलेले मोठे शहर म्हणजे पेशावर आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानातून आक्रमकांनी भारतात घुसखोरी करु नये यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. मुघल साम्राज्याची ही सीमा मानली जात होती परंतु 1739 मध्ये नादिरशहाने याच मार्गाने भारतात प्रवेश करुन मुघल साम्राज्य खिळखिळे केले. कर्नाल येथे झालेल्या युद्धात मुघलांचा पराभव केला. त्यानंतर दिल्लीत येऊन त्याने निव्वळ लुटालूट आणि दिल्लीकरांचे हत्याकांड केले. सुमारे तीन महिन्यांनी तो पुन्हा इराणला गेला. यानंतर 1758 मध्ये रघुनाथराव पेशवे (राघोबा दादा) आणि तुकोजीराव होळकरांनी अफगाण शासक अहमदशहा दुराणी याच्याबरोबर लढाई करुन अटक किल्ल्यावर मराठा निशाण फडकविले. अर्थात हा विजय अल्पजीवि ठरला होता कारण यानंतर दुराणीने प्रतिचढाई करुन पहिल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांना पराभूत केले मात्र काही काळासाठी का होईना मराठा साम्राज्याची उत्तर सीमा ही अटकेपर्यंत होती. त्यावेळी अटकपासून कटक (ओडीशा) पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार झाला होता आणि तसे म्हणण्याची पद्धत झाली होती. 1750 मध्ये मराठ्यांनी कटकवरही नियंत्रण प्रस्थापित केले होते. त्यामुळेच मराठी साम्राज्य ‘अटकपासून कटकपर्यंत’ असल्याचे म्हणण्याची पद्धत रूढ झाली होती. महाराष्ट्रातही आपण ‘चांद्यापासून (चंद्रपूर) बांद्यापर्यंत’ (गोवा) महाराष्ट्राचा विस्तार असल्याची घोषणा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देत होतो. थोडक्यात मराठी माणसाने आपल्या लढवय्येपणाचा व शौर्याचा ठसा इतिहासातही उमटविला होता. उत्तर दिशा मराठ्यांना वर्ज्य नव्हती. छत्रपति शिवाजी महाराजांनी दिल्लीतल्या म्हणजेच भारतातल्या मोठ्या भूभागावर सत्ता असलेल्या मुघल सत्ताधार्यांना आव्हान दिले होते. छत्रपतींना त्यांचे कर्तृत्व दाखविण्याची पुरेशी संधी मिळाली नव्हती कारण दुर्दैवाने ते अवघे पन्नास वर्षांचे असतानाच काळाने त्यांना हिरावून नेले. ते अधिक काळ हयात राहिले असते तर इतिहास वेगळा झाला असता. महाराजांची दृष्टी आणि स्वप्न हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. महाराष्ट्र ही त्यांच्यासाठी केवळ सुरुवात होती. त्यांनी महाराष्ट्राप्रमाणेच भारतातही एका सर्वसमावेशक, स्वाभिमानी राजवटीचे आणि राज्यकर्त्यांचे स्वप्न मनाशी ठेवले होते. औरंगजेबानंतर दिल्लीतली मुघल सल्तनत खिळखिळी व दुर्बळ झाली होती. ब्रिटिश साम्राज्यवादी आपले हातपाय पसरु लागले होते. असे असले तरी दिल्लीपतींना आव्हान देण्याची क्षमता, कर्तृत्व त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केले ही त्यांनी महाराष्ट्राला व मराठी जनतेला दिलेली देणगी आहे परंतु मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर बसण्याचा फार प्रयत्न केल्याचे आढळत नाही. त्याऐवजी त्यांनी दिल्लीतल्या बादशहाचे तारणहार किंवा त्याचे रक्षक म्हणून भूमिका निभावण्यात धन्यता मानली. येथे लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की दिल्ली आणि मराठी माणसाचे संबंध ऐतिहासिक राहिले आहेत. मराठी साम्राज्याने दिल्लीच्या बादशहाच्या रक्षणाची जबाबदारी महादजी शिंदे यांच्यासारख्या शूरवीर सेनानीकडे सोपविली होती. शिंदे यांनी ग्वाल्हेरला आपले स्थान प्रस्थापित केले. आजही ग्वाल्हेरची गादी ही शिंदे घराण्यामुळेच ओळखली जाते. ग्वाल्हेरहून दिल्ली केवळ साडेतीनशे किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे दिल्लीला मराठी माणसाचा सहवास विविध कारणांनी लाभत आलेला आहे. मराठ्यांनी रूढ अर्थाने दिल्लीवर राज्य केले नसेल परंतु दिल्लीचे रक्षणकर्ते आणि आधारस्तंभ म्हणून मराठ्यांनी लौकिक मिळविला होता हे कुणालाच विसरुन चालणार नाही. त्यामुळेच जेव्हा यशवंतराव चव्हाण यांना पंडित नेहरूंनी भारत-चीन युद्धानंतर संरक्षणमंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीला पाचारण केले तेव्हा ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्रि धावला’ असे म्हटले जाऊ लागले होते. महाराष्ट्राने व मराठी माणसांनी नेहमीच दिल्लीला आधार दिला असे म्हटले तर वावगे ठरु नये.
जाताजाता काही प्राचीन उल्लेख करणेही उचित ठरेल. त्यावरुन महाराष्ट्र आणि उत्तर भारतामधील संपर्काची कल्पना येऊ शकेल. श्रीकृष्णाचा जन्म मथुरेतील आणि वृंदावन व गोकुळात त्याचे बालपण गेले. कौरव-पांडवांबरोबरच्या नातेसंबंधांमुळे हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ (दिल्ली) या राजघराण्यांशी संबंधित व्यक्तिमत्त्व म्हणून त्याचा अधिक परिचय आहे मात्र उत्तर आयुष्यात त्याने यमुना नदीचे सन्निध्य सोडून समुद्रकिनारी असलेल्या द्वारकेला आपले आश्रयस्थान केले मात्र श्रीकृष्णाची पट्टराणी मानली जाणारी रुक्मिणि ही विदर्भातील होती. तिला वैदर्भी म्हणूनही ओळखले जात असे. याच विदर्भाने भारताला भवभूतीच्या रुपाने महान लेखक व नाटककार दिला. भवभूतीचा जन्म सध्याच्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील होता. भवभूतीचे शिक्षण ग्वाल्हेरला झाले. त्याने त्याच्या वाङ्मयीन कलाकृतींची निर्मिती काल्पी येथे केली होती. त्यामुळे मराठी माती आणि उत्तर हिंदुस्तानाचे संबंध कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कायम राहिले हे उल्लेखनीय मानावे लागेल.
पानिपत युद्धाच्या निमित्ताने मराठी माणसांचे उत्तरेतील अस्तित्व हे वास्तव्यात रुपांतरित झाले. ज्याप्रमाणे महादजी शिंदे यांनी ग्वाल्हेरला आपले स्वतंत्र संस्थान उभारले त्याचप्रमाणे त्यांनी व त्यांच्या संबंधितांनीही उत्तरेत आपले अस्तित्व प्रस्थापित केले. महादजींचे वंशज दौलतराव यांचे मेहुणे राजा हिंदुराव यांनी त्यांचे वास्तव्य दिल्लीत ठेवले होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांच्याकडे देखील त्यांची नियमित ऊठबस होती अशी माहिती ब्रिटिश कागदपत्रांवरुन मिळते. दिल्लीत त्यांचे वास्तव्य ज्या आलिशान राजवाडा सदृश्य हवेलीत होते ती वास्तू मूलतः ब्रिटिश नागरिकांनी विकसित केलेली होती. ती राजा हिंदूराव यांनी घेतली. तेथे त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केल्यानेच त्यास बाडा हिंदुराव असे नामाभिधान चिकटले ते कायमचे. आज त्या जागेत दिल्ली महानगरपालिकेचे रुग्णालय आहे. हे सर्वात मोठे रुग्णालय आहे.
इतिहासाच्या रम्य आठवणी आळविणे रंजक असते परंतु अर्वाचीन काळात आणि वर्तमानात राहणेही तेवढेच आवश्यक असते. स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान किती व्यापक होते हे सांगण्याची गरज नाही. त्याचबरोबर सामाजिक सुधारणांच्या चळवळीचे देखील महाराष्ट्र केंद्र राहिले ही बाबही आता सर्वमान्य झालेली आहे. महाराष्ट्राने देशाला असंख्य नररत्ने दिली. लोकमान्य टिळक, नामदार गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे, दादाभाई नौरोजी अशी नावांची यादी न संपणारी आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी होते. स्वातंत्र्यानंतरच्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पुण्याच्या न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा समावेश झाला होता. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, खाण व ऊर्जा अशी महत्त्वाची खाती देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्या अंतर्गतच त्याकाळी रस्तेबांधणी केली जात असे. त्यांनी पठाणकोट ते श्रीनगर (जम्मू मार्गे) हा लष्कराला उपयोगी पडेल असा लष्करी दर्जाचा हमरस्ता बांधला. 1947 मध्ये पाकिस्तानने काश्मीर खोर्यात केलेली गडबड लक्षात घेऊन त्यांच्या पुढाकाराने हा हमरस्ता तयार करण्यात आला होता. संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे मोठे महत्त्व होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला स्वावलंबी करण्याच्या ध्येयाने त्यावेळची नेत्यांची पिढी झपाटलेली होती. त्यामुळेच पाटबंधारे आणि जलविद्युत प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले होते. भाक्रा, कोयना, हिराकुड यासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या धरण प्रकल्पांची जबाबदारी काकासाहेबांनी कार्यक्षमतेने पार पाडली. काकासाहेब जसे राजकारणी होते तसेच ते साहित्यिकही होते. राजकारणात राहूनही त्यांनी सभाशास्त्र, ग्यानबांचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र विचार असे गंभीर विषयांची सोप्या भाषेत माहिती देणारे ग्रंथ लिहिले. पथिक हे त्यांचे त्रिखंडात्मक आत्मवृत्त आजही त्या काळातील घटनांचा एक विश्वासार्ह दस्तावेज मानला जातो. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत असल्यानेही काकासाहेबांचा उल्लेख अनिवार्य आहे कारण सत्तर वर्षांपूर्वी म्हणजेच 1954 मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि दिल्लीत मंत्री असलेले काकासाहेब त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.
मराठी माणूस स्वाभिमानी असतो. त्याचा एक दाखला काकासाहेबांचे चिरंजीव व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. विठ्ठलराव गाडगीळ यांनी खासगी गप्पात सांगितला होता. एकदा काही मुद्यांवरुन जवाहरलाल नेहरू यांनी काकासाहेबांच्या सल्ल्याबाबत उदासीनता दाखवली होती. आता नेहरूंना बहुधा आपली गरज नसावी अशी काकासाहेबांची समजूत झाली आणि त्यांनी त्या कारणास्तव केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा नेहरूंना पाठवून दिला. ही बाब नेहरूंच्या लक्षात आली. त्यांनी काकासाहेबांचा राजीनामा स्वीकारला नाही आणि तसे त्यांना कळविले आणि राजीनामा मागे घेण्याची त्यांनी विनंती केली. काकासाहेबांनी नम्रपणे त्यास नकार दिला. नेहरूंना प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले. काकासाहेबांची समजूत कशी काढायची याची शक्कल त्यांना सुचली. पंतप्रधान असूनही नेहरू काकासाहेबांच्या घरी गेले. आता खुद्द पंतप्रधान घरी आले म्हटल्यावर काकासाहेबही चकित झाले. त्यांनी त्यांचे शिष्टसंमत स्वागत व आदारतिथ्य केले. नेहरू कशासाठी आले हे त्यांच्याही लक्षात आले होते. नेहरूंनी त्यांचा राजीनामा खिशातून काढला आणि सांगितले की ‘‘आता मी तुमच्या घरी येऊन तो मागे घेण्याची विनंती करीत आहे आतातरी तो मागे घ्या.’’
काकासाहेबांनी त्यांना पुन्हा नम्रपणे सांगितले की ‘‘राजीनाम्याच्या निर्णयाचा अधिकार पंतप्रधानांचा असतो आणि ते काम तुम्हीच करा.’’
आता पेच निर्माण झाला होता. माघार कोण घेणार? तेथेच लहानगे विठ्ठलराव खेळत होते. नेहरूंनी त्यांना ‘‘विठ्ठल इकडे ये’’ म्हणून हाका मारली आणि त्यांच्या हातात राजीनाम्याचे पत्र देऊन ते फाडून टाकण्यास सांगितले. क्षणात निर्माण झालेला तणाव दूर झाला. काकासाहेब मंत्रीपदी कायम राहिले. काकासाहेबांचा करारीपणा आणि नेहरूंचा दिलदारपणा व मनाचा मोठेपणा हे दोन्ही गुण यातून दिसतात. आजचे किती नेते असे करु शकतील असा प्रश्न मनात आल्याखेरीज राहत नाही.
काकासाहेबांप्रमाणेच चिंतामणराव देशमुख यांचा उल्लेखही अपरिहार्य ठरेल. मूळ आयसीएस अधिकारी असलेले चिंतामणराव देशमुख हे अर्थतज्ज्ञ होते. 1943 ते 1949 या काळात ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी नेमलेले ते पहिले भारतीय रिझर्व बँक गव्हर्नर ठरले. 1950 ते 1956 या काळात त्यांनी देशाच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी पाहिली. 1952-57 या काळात ते लोकसभेचे सदस्यही होते. अत्यंत कुशाग्र बुद्धिचे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात. दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर (आयआयसी) या संस्थेची स्थापना त्यांनी केली. दिल्लीच्या अत्यंत उच्चभ्रू अशा लोदी गार्डन परिसरात ही संस्था स्थापन आहे. अध्ययन संस्था म्हणून ती स्थापन करण्यात आली. आजही हे स्थान दिल्लीतल्या बुद्धिवंतांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. आजही या केंद्राच्या सदस्यांमध्ये सर्व आजीमाजी उच्चपदस्थ, विद्वान, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, पत्रकार, परराष्ट्र, अर्थ, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील धुरीणांचा समावेश आहे. या ठिकाणी ज्ञानाचे मुक्त आदानप्रदान केले जाते. दिल्लीच्या बौद्धिक क्षेत्रात या केंद्राने आपली एक विशिष्ट प्रतिमा, प्रतिष्ठा स्थापित केली आहे. येथील मंडळी देशातील घडामोडींचा स्वतंत्रपणे आणि तटस्थपणे विचार करुन स्पष्ट मते देत असतात. त्यामुळे अनेक प्रस्थापित राजकारण्यांना आणि सरकारांना येथील मंडळींची स्पष्टोक्ति पचनी पडत नाही. त्यामुळेच वर्तमान पंतप्रधानांनी या केंद्रातील विद्वानांची टिंगल व हेटाळणी करताना त्यांचा उल्लेख ‘खान मार्केट गँग’ असा केलेला आहे. याचे कारण या केंद्रापासून जवळच खान मार्केट नावाचे एक मोठे मार्केट आहे. कोणत्याही राजसत्तेला स्वतंत्र वृत्तीचे बुद्धिवादी रुचत नसतात आणि त्या नियमाला वर्तमान राज्यकर्ते अपवाद नाहीत परंतु देशमुखांनी त्या काळात अशा एका अध्ययन संस्थेची कल्पना केली आणि ती प्रत्यक्षात आणली ही त्यांची दूरदृष्टीच मानावी लागेल. चिंतामणराव अर्थमंत्री असतानाच संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु झालेला होता. त्या मुद्यावर त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. ही त्यांची कृति प्रतिकात्मक होती. तरीही ती परिणामकारक होती कारण आपला मुद्दा किंवा भूमिका मांडण्यासाठी टोकाची भूमिकाच घेतली पाहिजे असे नसते. तुमच्या एका कृतीने तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करु शकता. चिंतमाणरावांनी तेच केले.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांनी अभिनव, आधुनिक आणि प्रागतिक विचारांच्या आधारे महाराष्ट्र राज्याची जडणघडण सुरु केली. आधुनिक महाराष्ट्र निर्मितीचा त्यांनी पाया घातला. त्यांची ती कामगिरी दिल्लीतील मंडळींच्या डोळ्यात भरली नसती तरच नवल होते. त्यामुळेच 1962 मध्ये चीनबरोबरच्या युद्धात भारताच्या पदरी पराभवाची नामुष्की आल्यानंतर संरक्षण खात्यासाठी नेहरूंनी यशवंतरावांना दिल्लीला पाचारण केले. हा महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा गौरव होता. मराठी माणूस आणि शौर्य आणि वीरता असे जे समीकरण होते बहुधा ते लक्षात ठेवूनच नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षण खाते दिले असावे. यशवंतरावांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीला पुरेपूर न्याय दिला. संरक्षण खात्यात त्यांनी नव्या व आधुनिक काळाला साजेसे बदल केले आणि संरक्षण साधनसामग्री उत्पादनात भारत स्वयंपूर्ण कसा होईल यासाठी प्रयत्न केले. या मूलभूत गोष्टींचा पाया त्यांनी घातला. सैन्य प्रशिक्षणाचे आधुनिकीकरण केले. त्यामुळेच लगेचच 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानला धूळ चारली. तेव्हा संरक्षण विभागाचे नेतृत्व यशवंतरावच करीत होते.
काकासाहेब आणि यशवंतराव यांनी त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाच्या जबाबदार्या कार्यक्षमतेने पार पाडल्या होत्याच परंतु त्याच्याच जोडीला त्यांना दिल्लीतील मराठी माणसांचे संघटन करण्याच्या दृष्टीने अनेक पुढाकार घेतले होते. दिल्लीत 1929 मध्ये नूतन मराठी विद्यालयाची स्थापना झाली. यामध्ये काकासाहेब गाडगीळांचे योगदान होते. आजही ही शाळा चालू आहे आणि महाविद्यालयही आहे. काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे शालेय शिक्षण याच शाळेत झाले होते आणि आजही ते या शाळेशी निगडित आहेत. या शाळेच्या वास्तूतच एक मोठे प्रेक्षागृह आहे. तेथे मराठी नाट्यस्पर्धा होतात, मराठी सांस्कृतिक कार्यक्रम होतात, मराठी नाटक-सिनेमांचे महोत्सवही होत असतात. यानंतर बर्याच उशीराने म्हणजे 1973 मध्ये आणखी एका मराठी शाळेची स्थापना झाली. मराठा मित्र मंडळाला शाळेसाठी जागेची आणि आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यावेळी उद्योगपति चौगुले यांनी पन्नास हजार रुपयांची देणगी दिली आणि त्या देणगीतून चौगुले शिशुविहार ही शाळा सुरु करण्यात आली होती आणि आज त्याचा विस्तार महाविद्यालयापर्यंत झाला आहे.
महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्यांमध्ये प्रामुख्याने केंद्रीय शासनात काम करणार्या कर्मचार्यांचा समावेश होता. स्वातंत्र्यानंतर ही संख्या वाढली परंतु ब्रिटिश काळात जी मराठी कुटुंबे दिल्लीला आली त्यामध्ये रेल्वेत काम करणार्यांचा समावेश अधिक होता. त्यामुळेच दिल्ली रेल्वे स्थानकाच्या आजुबाजुच्या परिसरात ही मंडळी निवासी होती. लाहोरी गेट परिसरातच 1919 मध्ये या कुटुंबांनी एकत्र येऊन महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाजाची स्थापना केली होती. 1950 मध्ये दत्तात्रेय महादेव जोशी या मराठी व्यक्तिने बाँबे स्टोअर्स दुकान करोल बागेत सुरु केले. याठिकाणी मराठी माणसांचा राबता असे कारण येथे मराठी नियतकालिके, वृत्तपत्रे मिळत. त्याचबरोबर मराठी खाद्यपदार्थ, मसाले, लोणची वगैरे गोष्टी तेथे मिळत असत. आता हे दुकान बंद झाले आहे. 1951 मध्ये पहाडगंजमध्येच म्हणजे आता नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आहे तेथून अगदी पायी अंतरावर असलेल्या ठिकाणी बृहन्महाराष्ट्र भवनाची स्थापना झाली. महाराष्ट्राबाहेरच्या मराठी माणसांचे संघटन करणार्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे ते सुरु करण्यात आले आहे. ते आजही सुरु आहे. तेथे अत्यंत रास्त दरात निवास व भोजनाची सोय केले जाते.
दिल्लीत मराठी माणसांनी आले पाहिजे आणि आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटविला पाहिजे यासाठी सर्वच मराठी नेत्यांनी प्रयत्न केले. दिल्लीत आलेल्या मराठी माणसाला मार्गदर्शन मिळावे या हेतुने यशवंतरावांच्या पुढाकारने दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करण्यात आली. भा. कृ. केळकर या केंद्राचे पहिले संचालक झाले. याचेच पुढे महाराष्ट्र माहिती केंद्रात रुपांतर झाले परंतु दिल्लीतील लोकाना महाराष्ट्राची माहिती मिळावी किंवा उत्तरेतल्या लोकाना महाराष्ट्रात पर्यटनासाठी जाताना मार्गदर्शन मिळावे यासाठी या केंद्रात पर्यटन विभागही सुरु करण्यात आला. मराठी पुस्तकांचे ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. थोडक्यात दिल्लीत येणार्या मराठी माणसाला सर्व माहिती मिळावी यासाठी हे केंद्र कार्यरत असते. काकासाहेब, चिंतामणराव, यशवंतराव अशी कितीतरी नेत्यांची नावे घेता येतील. नंतरच्या काळात वसंत साठे (मराठी वर्तुळात सर्व जण त्यांना बापू म्हणत), विठ्ठलराव गाडगीळ, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांनीही दिल्लीत आपला ठसा उमटविला. देशात टीव्हीच्या रंगीत प्रसारणाचे शिल्पकार म्हणून वसंत साठे यांना ओळखले जाते. देशातली जी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी खाती मानली जातात त्या गृह, परराष्ट्र, संरक्षण आणि अर्थ खात्यांमध्ये या नेत्यांनी आपल्या नावांचा ठसा उमटविला. यशवंतरावांनी संरक्षणसिद्धतेत स्वयंपूर्णतेचा मंत्र दिला तर शरद पवार यांनी संरक्षणमंत्री पदाच्या काळात या देशातील महिलांना लष्करात प्रवेश देऊन स्त्री-पुरुष समानतेचा खर्या अर्थाने पाया घातला. पायदळात आणि हवाईदलात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कामगिरी करताना आढळतात त्याची सुरुवात शरद पवारांच्या काळात झाली होती. विठ्ठलराव गाडगीळ संरक्षण उत्पादन मंत्री होते आणि त्यांनी यशवंतरावांच्या स्वयंपूर्णतेच्या स्वप्नाचा विस्तार केला. वर्तमानात नितिन गडकरी यांनी दिल्लीत आपले अस्तित्व उल्लेखनीय केले आहे. मंत्री म्हणून त्यांनी कार्यक्षमता सिद्ध केली आहे परंतु मराठी माणसाचे अस्तित्व दिल्लीत ठळक करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी अनेक पुढाकार घेतले आहेत.
केवळ राजकीय पातळीवरच नव्हे तर प्रशासनाच्या पातळीवरही अनेक मराठी व्यक्तिंनी उच्च पदे भूषविली आहेत. भालचंद्र देशमुख (बी. जी. देशमुख) हे देशाचे कॅबिनेट सेक्रेटरी किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव होते. देशातील सर्व नोकरशाहीचे प्रमुख पद म्हणून या पदाचे महत्त्व आहे. नंतर देशमुख राजीव गांधी यांचे प्रधान सचिव म्हणूनही होते. राम प्रधान हे गृहसचिव होते आणि त्यांच्याच काळात पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुढाकाराने झालेले तीन महत्त्वाचे समझोते झाले होते. पंजाब करार, आसाम करार आणि मिझो करार या नावाने ते ओळखले जातात. माधव गोडबोले हे देखील गृहसचिव होते आणि अत्यंत कार्यक्षम अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. येथे एका योगायोगाचा उल्लेख करावा लागेल. शंकरराव चव्हाण हे गृहमंत्री होते, त्यांचे गृहसचिव माधव गोडबोले होते आणि त्यावेळी इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) म्हणजेच गुप्तचर विभागाचे मुख्य संचालक म्हणून विद्याधर गोविंद वैद्य हे होते. गृहखात्याच्या तीन अत्यंत निर्णायक पदावर तिन्ही प्रमुख मराठी होते. मोहन कात्रे हेही सीबीआयचे महासंचालक होते. परराष्ट्र सेवेतही मराठी माणसे आघाडीवर राहिली. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे परराष्ट्र सचिव असलेले विजय गोखले यांचे देता येईल. त्यापूर्वी राम साठे हे परराष्ट्र सचिव होते. अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, श्रीरंग म्हणजेच एस.पी. शुक्ला यांच्यासारख्या मराठी मंडळींनी देशाचे अर्थसचिवपद, वाणिज्य सचिवपद भूषविले होते. केळकर यांनी करविषयक अनेक अहवालांचे संपादन करुन देशाच्या कररचनेला दिशा दिलेली आहे. डॉ. वसंत गोवारीकर हे पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार राहिले. राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव या दोन पंतप्रधानांच्या काळात त्यांनी त्यांचे सल्लागार म्हणून काम केले होते. भारताच्या मान्सून पावसाचा अचूक अंदाज वर्तविणारे गोवारीकर मॉडेल त्यांचेच होते. त्यांच्यानंतर रंजन केळकर यांनीही हवामान विभागाची जबाबदारी तेवढ्याच क्षमतेने पार पाडली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे हे अनेक वर्षे जलसचिव होते आणि देशातल्या जलनीतीचे ते शिल्पकार राहिले आहेत. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सीएसआयआर या विज्ञान संस्थेचे यशस्वी नेतृत्व केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर हळदीच्या पेटंटबाबत (स्वामित्वहक्क) वाद निर्माण झाल्यानंतर जागतिक व्यापार संघटनेत भारताच्या बाजूने निकाल लागण्यामध्ये माशेलकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. लष्करातही मराठी व्यक्तिंनी उच्च पदे भूषविलेली आहेत. जनरल अरुणकुमार वैद्य यांचे स्मरण कुणाला होणार नाही? हवाईदलातही हृषिकेश मुळगावकर, अनिल टिपणीस यांनी सर्वोच्च पदे भूषविली. अॅडमिरल जयंत नाडकर्णी यांनी नौदलाचे नेतृत्व केले होते. लष्कराच्याच गुप्तचर विभागाचे मुख्य संचालक म्हणून दीपक सुमनवार या मराठी व्यक्तिनेच काम केले होते. मराठी माणसांची ही यादी न संपणारी आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही (जेएनयू) अनेक मराठी मंडळी नावाजलेली आहेत. गोविंद पुरुषोत्तम देशपांडे (गोपु देशपांडे) हे चिनी भाषा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विषय शिकवीत असत. आशयगर्भ नाटके त्यांनी लिहिली होती. गोपाळ गुरु हे अलीकडचे एक नामवंत प्राध्यापक आहेत. आणखीही तरुण मराठी मंडळी आहेत जी तेथे काम करीत आहेत.
दिल्लीची नगररचना तसेच वास्तू व स्थापत्यरचना याचा आराखडा तयार करण्यासाठी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नामवंत वास्तू व स्थापत्य तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. त्यामध्ये अच्युत पुरुषोत्तम कानविंदे यांचा समावेश होता. स्वतंत्र भारताची राजधानी असलेल्या दिल्लीची रचना कशी असावी यासाठी नेहरूंनी या तज्ज्ञांचा सल्ला मागितला होता. त्यांनी केंद्र सरकारच्या राजधानी विभागाचा म्हणजे ज्याला नवी दिल्ली म्हणतात त्या भागाच्या नगररचनेचा आराखडा सादर केला आणि त्यानुसार या नगराची रचना करण्यात आली. यासंदर्भात एकदा सहज बोलताना कानविंदे यांनी नवी दिल्लीच्या बदलत्या क्षितिजरेषेबद्दल आणि बहुमजली इमारतींच्या जाळ्याबद्दल अत्यंत समर्पक अशी टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की, त्यांनी जेव्हा नवी दिल्लीची रचना केली होती तिचे स्वरुप समांतर म्हणजे बसक्या किंवा बैठ्या (हॉरिझाँटल) स्वरुपाचे होते परंतु आता दिल्लीने उंच हवेत झेप (व्हर्टिकल) घेण्याचे ठरविलेले दिसते व त्यामुळे दिल्लीची क्षितिजरेषा आणि मोकळी हवा यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यांचे हे शब्द आज दिल्लीतले भीषण प्रदूषण अनुभवताना आठवतात. प्रख्यात शिल्पकार राम सुतार हेही दिल्लीनिवासीच आहेत. ते शंभरीत आहेत परंतु दिल्लीतले अनेक पुतळे हे त्यांच्या शिल्पकलेची साक्ष देत उभे आहेत. संसदगृहातील छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांचे पुतळे हे त्यांनीच केलेले आहेत. दिल्लीतील शिवाजी मार्ग (कॅनॉट प्लेस) येथील शिवाजी महाराजांचा पुतळा व टिळक पुलाजवळचा सर्वोच्च न्यायालयाच्या जवळचा लोकमान्य टिळकांचा पुतळा सदाशिवराव साठे यांनी तयार केलेला आहे तर गणेश भिकाजी देवळालीकर हे केंद्रीय बांधकाम विभागाचे पहिले संचालक व मुख्य वास्तूशिल्पकार (आर्किटेक्ट) होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ति किंवा सरन्यायाधीश म्हणून पी. बी. गजेंद्रगडकर, यशवंत विष्णु चंद्रचूड, शरद बोबडे, उदय लळित व नुकतेच निवृत्त झालेले धनंजय चंद्रचूड यांची नावे घेता येतील. याखेरीज हेमंत गोखले, मदन लोकूर यासारख्या कायदेपंडितांनीही सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ति म्हणून काम पाहिले आहे. सर्वोच्च न्यायालयात अनेक मराठी वकील सक्रिय आहेत. नारगोळकर कुटुंब, मकरंद आडकर, दिलिप तौर अशी नावे घेता येतील. इतरही अनेक जण आहेत व सर्वांचाच उल्लेख अशक्य आहे.
दिल्ली आणि महाराष्ट्र यातले भौगोलिक अंतर एक हजार किलोमीटरच्या आसपास असले तरी मराठी माणसाने ते अंतर कधीच पार केलेले आहे. दिल्ली मराठी माणसासाठी नवखी नाही मात्र दिल्लीच्या संस्कृतीशी मिळतेजुळते घेणे मराठी माणसाला काहीसे अवघड जाते हेही खरे आहे कारण मराठी माणूस हा सरळसोट असतो. त्याला छक्केपंजे येत नाहीत. अर्थात ही परिस्थितीही बदलत आहे. दिल्लीत अनेक वर्षे स्थायिक झालेली मराठी मंडळी आता राजमा चावल, छोले भटुरे आणि पनीर प्रेमी किंवा सरसों का साग व मक्के की रोटी ही वरणभात किंवा पोळीबाजीप्रमाणे समान आपुलकीने खाताना आढळतात. आता असंख्य मराठी तरुण केंद्रीय भारतीय व प्रशासकीय सेवांच्या माध्यमातून दिल्लीत कार्यरत आहेत. ही सर्व मंडळी उच्चविद्याविभूषित आणि कार्यक्षमता असलेली आहेत. ही मंडळीही मराठी माणसांचे संघटन करताना आढळत आहेत. एकेकाळी दिल्लीत गणेशोत्सव अगदी तुरळक असत. करोल बाग वगैरे ठिकाणी! परंतु आता जवळपास शंभर किंवा जास्तच ठिकाणी गणपतीचे मंडप आढळतात. लक्ष्मी नगर येथे महेंद्र लड्डा हे गेली अनेक वर्षे गणपति उत्सव साजरा करीत आहेत. महाराष्ट्र सदन आणि गेल्या काही वर्षापासून दिल्ली हाट येथे गणपतीची स्थापना आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे केले जात आहेत. दिवाळी पहाट म्हणून इंडिया गेट जवळ गेल्या काही वर्षांपासून मराठी कलाकारांतर्फे संगीत पहाट साजरी केली जाऊ लागली आहे. वैभव डांगे आणि त्यांचे सहकारी यात पुढाकार घेत आहेत.
दिल्ली आणि मराठीचे नाते पूर्वापार आहे. ते टिकले पाहिजे. ‘दिल्ली दूर है’ हा वाक्प्रचार आता कालबाह्य झाला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाने अंतरावर केलेली मात लक्षात घेऊन मराठी माणसाने कोषातून बाहेर येऊन नवनव्या आव्हानांना सामोरे जाऊन कर्तृत्व व कर्तबगारीची आपली क्षितिजे विस्तारण्याची वेळ आली आहे. तात्कालिक अपयशाने खचुन न जाता जिद्दीने त्यावर मात करण्याची क्षमता मराठी मंडळींनी दाखविण्याची वेळ आली आहे. अटकेपार झेंडा आता लावता येणार नसला तरी त्याचा मतितार्थ लक्षात घेऊन मराठी माणसाने आता भरारी मारण्याची वेळ आली आहे.
– अनंत बागाईतकर
ज्येष्ठ पत्रकार
9818808549
पूर्वप्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’ फेब्रु. २०२५