बऱ्याच दिवसांनी ‘चपराक’च्या कार्यालयात गेलो होतो. ‘चपराक’चे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी माझे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आणि नेहमीप्रमाणे गेल्याबरोबर माझ्या हातात नुकतेच मुद्रणालयातून आणलेले सातारा जिल्ह्यातील पाटणच्या श्री. सुहास कोळेकर यांचे “रॅगिंगचे दिवस” हे अनुभव कथन पुस्तक दिले आणि मी त्याचे मुखपृष्ठ पाहूनच एकदम खुश झालो. सर्वप्रथम घनश्याम सरानीच केलेली पुस्तकाची पाठराखण वाचली आणि मला कधी एकदा हे अनुभव कथन वाचतो आहे असे झाले होते.
मुळात कॉलेज मधील दिवस आणि त्या दिवसांतील अनुभव म्हणजे गत स्मृतींना उजाळा देणारे हे पुस्तक त्यात ‘रॅगिंग’ ह्या अतिशय गहन व संवेदनशील विषयातील प्रत्यक्ष अनुभव माझ्या फारसे कधी वाचण्यात आले नव्हते. त्यामुळे मला कधी एकदा घरी जातोय आणि हे सुहास कोळेकर यांनी शब्दबद्ध केलेले अनुभव वाचतो आहे ह्याची उत्कंठा लागली होती.
सुहास कोळेकर ह्यांचाशी माझा परिचय चपराक प्रकाशनच्या एका कार्यक्रमा निमित्त झाला होता. स्टेट बँकेतील एक नावाजलेले अधिकारी, अतिशय साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे आणि त्यात लेखनाची तळमळ असणारे हे व्यक्तिमत्व मला पहिल्या भेटीतच भावले होते. शेतकरी कुटुंबातील अतिशय खडतर असे जीवन त्यांनी त्यांच्या “शेतकऱ्यांची पोरं” ह्या फेसबुक वर लिहिलेल्या लेखन मालिकेत मी आवर्जून वाचली आहे व त्यांच्या रांगड्या ग्रामीण जीवनाच्या लिखाणाच्या शैलीचा चाहता आहे.
कृषी महाविद्यालय नागपूर येथील कॉलेज मधील हॉस्टेलच्या जीवनातील चार वर्षांचा काळ व त्यामधील रॅगिंगचे अनुभव वाचतांना बऱ्याच वेळा छातीत धडधड होत होती. पूर्वीच्या काळी कॉलेज जीवनात असे रॅगिंगचे प्रकार खूप होत असत. हे फक्त ऐकून होतो. प्रत्यक्ष अनुभव असा फारसा कधी वाचण्यात अथवा ऐकण्यात आलाच नव्हता, जो सुहास कोळेकरांच्या पुस्तकाने आला हे मी अगदी प्रामाणिकपणे कबुल करतो. माझे वडील पुण्याच्या कृषी महाविद्यायात नोकरी करत होते त्यामुळे मला साधारण कृषी महाविद्यालय आणि त्यातील हॉस्टेल मधील वातावरणाची साधारण कल्पना होती. त्यात मी ही माझ्या उमेदीच्या काळात एक वर्षासाठी कृषी महाविद्यालयात नोकरी केल्यामुळे मला ह्या विषयातील थोडीशी माहिती होती, परंतु फक्त ऐकीव गोष्टीमुळे ह्या विषयाची एवढी गंभीरता मला नव्हती.
सुहास कोळेकर यांनी ज्या नीडर पद्धतीने आणि त्यांच्या रांगड्या भाषेत कृषी महाविद्यालयातील हॉस्टेल मधील दिवसांचे आणि त्यात रॅगिंगचे जे काही अनुभव कथन केले आहेत ते वाचतांना मन थोडे घट्टच करावे लागते. त्यात ह्या सर्व प्रकारात कुठेही न हार मानता हे सर्व रॅगिंग सहन करत करत त्यांनी आपले कृषी क्षेत्रातील M.SC Agri चे शिक्षण जिद्दीने पूर्ण करून स्वत:ला सिद्ध केले आहे असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.
कॉलेज जीवनात हॉस्टेल मधील एकंदरीत जे काही वातावरण असते, जे तुमच्या माझ्यासारख्याला एखादवेळेस माहितीही नसेल त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप मार्गदर्शक आहे. भले आताच्या काळात रॅगिंग कमी झाले असेल तरी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुठलीही तडजोड करावी लागली तरी चालेल परंतु आपल्या उद्दिष्टापासून जराही विचलित न होता, कितीही कठीण परिस्थती आली तरी त्यावर मात करून ते कसे साध्य करायचे ह्याचा वस्तुपाठ ह्या अनुभव कथनातून मिळतो असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.
सुहास कोळेकरांनी, त्यांच्या हॉस्टेल मधील चार वर्ष्यांच्या काळातील प्रसंगात घडलेल्या घटना अतिरंजित न करता त्या जशा घडल्या आहेत त्याचे वास्तववादी लेखन केल्यामुळे त्या घटनांचे गांभीर्य वाचकाला नक्कीच जाणवते आणि आपल्या नकळत आपण आपल्या कॉलेज मधील जीवनात खेचले जातो हे लेखकाचे म्हणजेच सुहास कोळेकर यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. आपल्यापैकी फार थोड्या लोकांना हॉस्टेल मध्ये राहण्याचा आणि त्यात अशा रॅगिंगचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनुभव आला असेल. ज्यांना हा अनुभव असेल त्यांना तर हे पुस्तक म्हणजे त्यांचे अनुभव शब्दबद्ध करण्यासाठीची प्रेरणाच म्हणावे लागेल. ह्या पुस्तकातील अनुभव त्यामधील प्रसंग अथवा घटना ह्या इथे नमूद करण्यापेक्षा त्या वाचकांनी हे पुस्तक वाचवे असे मला वाटते.
पदवीधर होण्यासाठीचे शेवटच्या वर्षातील ग्रामीण कृषी कार्यानुभव काळातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आलेले अनुभव तर निर्विवादपणे, स्वत: एक शेतकरी असेलेल्या लेखकाचे संवेदनशील मन प्रतिध्वनित करतात. त्यानिमित्ताने लेखकाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या मांडलेल्या व्यथा व जीवनाची ससेहोलपट जाणवते आणि नकळत शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या विषयाला स्पर्श करून वाचकांचे मन हेलावून टाकते.
सुहास कोळेकर यांनी त्यांच्या अनुभव कथनात त्यांच्या मित्रपरिवाराचा नावासहित केलेला उल्लेख तर मला प्रंचंड भावाला. काही काही प्रसंग तर अंगावर काटा आणतात. अर्थात ते प्रसंग लिहिण्याचे लेखकाने दाखवलेले धारिष्ट्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी घडलेले प्रसंग व घटना ज्याकाही प्रामाणिकपणे मांडल्या आहेत त्यासाठी त्यांचे करावे कौतुक थोडेच आहे.
हॉस्टेल मधील असुविधांचा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार कसा चालतो ह्याचे लेखकाने वर्णन केलेल्या घटनेने, त्यांच्या एका मित्राचा शेवटच्या वर्षी ऐन परीक्षेच्या काळात अल्पशा आजाराने झालेला मृत्यू तर आपल्या मनाला चटका लावून जातो. अशा आणि अजून कितीतरी संवेदनशील प्रसंगांनी आणि घटनांनी भारावलेला हा अनुभव कथनाचा पट वाचकांना त्यांच्या गतस्मृतींना उजाळा द्यायला नक्कीच भाग पाडेल असे मला वाटते.
अरविंद शेलार यांनी विषयाला साजेसे चितारलेल मुखपृष्ठ ह्या पुस्तकाच्या वैभवात भर घालते. चपराक प्रकाशन च्या घनश्याम पाटील सरांचे ह्या अतिशय संवेदनशील विषयातील अनुभव कथन पुस्तक प्रकाशनासाठी मानावेत तेवढे आभार थोडेच आहेत. सुहास कोळेकर यांचे तर मनापासून कौतुक आहे. इतक्या गंभीर विषयाला त्यांनी ज्या प्रगल्भतेने न्याय दिला आहे तो फारच कौतुकास्पद आहे. संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे हे मात्र नक्की.
– रवींद्र कामठे
९४२१२ १८५२८
ravindrakamthe@gmail.com
पुस्तकाचे नाव : “रॅगिंगचे दिवस”
लेखक : सुहास कोळेकर
प्रकाशक : चपराक प्रकाशन
पृष्ठे : १२८
मूल्य : रु. २५०/-
खूप धन्यवाद सर.