पिंपळ : कथा

Share this post on:

स्मिताची सकाळपासूनच धावपळ चाललेली होती. तिने अर्ध्या तासात दहा वेळा अमरला हाक मारून ‘लवकर तयार हो’, असे वेगवेगळ्या भावछटांच्या आवाजात सांगितले. शेवटी खर्जापासून सुरू झालेले नावांचे हे आवर्तन अखेरीस तारसप्तकाला पोचले तेव्हा मात्र अमरला पुढच्या धोक्याची जाणीव झाली.
त्याने लगबगीने बाथरूमकडे धाव घेत हिटरचे बटण दाबले. दार लावून घेत त्याने दाढीचा तयार फेस गालावर चोळला. रेझरचे चार-सहा फटकारे मारून चेहर्‍यावर पाण्याचे हबके मारायला सुरूवात केली. अमरने आपले बूड हलवल्याने स्मिताच्या कपाळावरच्या आठ्यांची संख्या झपाट्याने कमी होत गेली आणि समाधानाच्या भावाने हलकेच तिच्या चेहर्‍याचा ताबा घेतला. तिने टीपॉयवरच्या वहीतला कागद फाडला, ‘आम्ही बाहेर जातो आहोत, तू जेवून घे’, अशी आपल्या मुलासाठी म्हणजे अनिकेतसाठी चिठ्ठी लिहून तिने ती डायनिंग टेबलवर ठेवली आणि कपडे बदलायला आतल्या खोलीत गेली.
अर्थात अमरची आंघोळ आटोपणे, तिचे कपडे बदलून होणे, चेहर्‍यावर मॉयश्चरायझरचा हात आणि ओठांवर हलक्या रंगाच्या लिपस्टिकची कांडी फिरवणे या सार्‍याला आणखी पाऊण तास लागला. त्यानंतर मात्र ती दोघे झपाट्याने लिफ्टमधून पार्किंगमध्ये आली.
‘‘अरे, पुढे परत यायला वेळ होईल, म्हणून मी घाई केली अन तुझ्यावर रागावले…’’ मघाच्या ओरडण्याबाबत स्मिताने सारवासारव केली. वास्तविक ‘परत यायला वेळ होईल’, हे तिने दाखवलेले कारण होते कारण तो रविवार होता आणि ते दुपारी जरी परतले असते तरी पुढे आख्खा दिवस त्यांच्या हाती होता. त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत नुकताच इंग्लंडहून इंजिनियरिंगची पदवी घेऊन परतला आणि आता तो त्याच्या मावशीकडे मुंबईला गेलेला होता. त्यामुळे तसे लवकर परतायला विशेष कारण नव्हते. तिच्या घाईचे खरे कारण म्हणजे तिला त्या प्लॉटवर पोचायची घाई होती. अमर आणि स्मिता गेले वर्षभर नव्या घराच्या शोधात होते. कधी ते फोर बीएचके डुप्लेक्स फ्लँट पाहात तर कधी कुणाचा बांधून बरीच वर्षे पडून असलेला बंगला. घरांचे अक्षरश: पंचेचाळीस प्रस्ताव त्या जोडीने धुडकावले होते. पुण्यातला असा एकही भाग शिल्लक राहिला नाही, की ज्या भागात त्यांनी घर बघितले नाही. कधी त्याला एखादे घर पसंत पडे, पण तिला ते लांब वाटे तर कधी तिला एखादा फ्लँट चांगला वाटे तर त्याचे ‘छ्या… तो कोंदट आहे, उजेडही नीट धड येत नाही’, असे नाके मुरडणे होई. एजंट मंडळींच्या नावा-नंबरांनी तर अमरचे फोनबुक बरेच भरले. एक दिवस असा जायचा नाही की एखाद्या एजंटाचा नवी जागा सुचवण्यासाठी फोन आला नाही.
सुरूवातीसुरूवातीला दोघे जण मिळून नवे घर बघायला जायचे, पण नंतरनंतर त्याचा कंटाळा येऊ लागला. मग आधी अमर जाऊन घर बघे आणि त्याला पटले तरच तो स्मिताला बोलावे. असेच आजही झाले होते. अमरला जागा आवडली होती आणि ते दोघे ती बघायला जायला निघाले होते, पण आजची परिस्थिती थोडी वेगळी वाटत होती, कारण अमरने जागा बघून आल्यापासून तोंड फाटेपर्यंत तिचे वर्णन करायला सुरूवात केली होती. ‘ही जागा आपण आतापर्यंत बघितलेल्या जागांमधली नंबर एकची जागा आहे, अडीचशे सुबक, छोटेखानी बंगल्यांची सोसायटी आहे आणि त्यातले काहीच प्लॉट्स आता रिकामे राहिले आहेत. ‘निसर्गाच्या कुशीत… दाट हिरवाईमध्ये… टेकडीवर… शांत वातावरण… सोसायटीमध्ये काम असेल तरच त्या रस्त्यावर वाहन येणार, त्यातही हा प्लॉट ज्या लेनमध्ये आहे, त्या लेनमध्ये तर पाचच बंगले आहेत, त्यामुळे त्या पाच घरांत येणार्‍यांच्याच गाड्या समोर येणार… शांतता… प्रदूषण नाही…’ एक ना दोन. किती बोलू आणि किती नको?, असे त्याला झाले होते, मात्र स्मिता काहीतरी खुसपट काढते की काय ? अशी भीतीयुक्त शंकाही त्याला वाटत होती. तिला कधी ती जागा दाखवेल, असे त्याला झाले होते. इकडे स्मिताचे कुतूहल वाढू लागले होते, अमरकडून एवढे वर्णन एैकल्यावर ती जागा कधी एकदा बघीन, असे तिलाही होऊ लागले होते. त्यामुळेच आज सकाळपासूनच ती अमरच्या मागे लागली होती. शेवटी ती दोघे तयार होऊन गाडीत बसले.अमरच्या कारची चाके कोथरूडच्या दिशेकडे वळली. कोथरूडही मागे पडले आणि बावधनचा रस्ता सुरू झाला. बावधनही आता मागे पडू लागले होते, तितक्यात गाडीचे स्टिअरिंग अमरने गर्रकन वळवले आणि गाडी लयबद्ध वळण घेत आतल्या रस्त्याला लागली. आता झाडी वाढू लागली होती आणि वस्ती कमी होत चालली होती. एका वळणावर गाडी वळली आणि ‘विश्राम सहकारी गृहरचना संस्था’ अशी पाटी शिरावर धारण करणारी उंचच उंच कमान समोर आली. ती बंगल्यांची सोसायटी होती. सोसायटीच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लहान लहान गल्ल्या होत्या. या प्रत्येक गल्लीत डाव्या बाजूला पाच आणि उजव्या बाजूला पाच असे छोटेखानी बंगले होते. साधारणत: तीन हजार चौरसफुटांचे ते प्लॉट्स असावेत, असा अंदाज येत होता. सोसायटीतील साधारणत: ऐंशी टक्के प्लॉट्सवर घरे उभारली गेली होती, मात्र काही मधलेच प्लॉट्स रिकामे होते. लेन नंबर सतरा या पाटीजवळ गाडीचा वेग कमी झाला आणि त्या लेनमध्ये गाडी जाऊन एका रिकाम्या प्लॉटसमोर थांबली.
अमरपाठोपाठ स्मिताही गाडीतून उतरली. तिची नजर भिरभिरत होती. आजूबाजूला सुंदर बांधलेले बंगले, त्यांच्या भोवती लावलेली देशी-विदेशी झाडांची, शोभिवंत फुलांची बाग, बंगल्यांना दिलेले नानाविध रंग आणि त्यांची अर्थपूर्ण नावे… सर्वात महत्त्वाची बाब तिच्या काही मिनिटांतच लक्षात आली. ती म्हणजे तिथली शांतता. बाहेरच्या दुनियेतल्या वाहतुकीचा आवाज या सोसायटीपर्यंत पोहोचतच नव्हता. शांतता आणि झाडांवरच्या फुलांभोवती रूंजी घालणारे सूर्यपक्ष्यांसारखे चपळ पक्षी लक्ष वेधून घेत होते. त्या रिकाम्या प्लॉटमध्ये त्या दोघांनी प्रवेश केला. आजूबाजूच्या घरांवर नजर गेल्यावर स्मिताची नजर मूळ प्लॉटकडे आली. तिने नजरेनेच प्लॉटचा आकार जोखला. ती पुढे सरकली मात्र… ती एकदमच थबकली. त्या प्लॉटच्या मागच्या टोकाला पिंपळाचे झाड उभे होते. त्याच्या हिरव्याकंच पानांची सळसळ त्याचा जिवंतपणा दाखवून देत होती. आपला पर्णसंभार डौलाने मिरवत, सळसळत उभे असलेला तो पिंपळ आणि त्यातून व्यक्त होणारे व्यक्तिमत्त्व पाहणार्‍याला खिळवून टाकत होते. स्मिताला स्त्रीसुलभ कल्पना सुचली. पिंपळपानांचे हेलकावे पाहून तिला वाटले की एखादी युवतीच आपला भलामोठा घेर असलेला ड्रेस सावरत उभी आहे. त्याचा बुंधा चांगलाच जाडजूड होता, म्हणजे ते झाड बरेच जुने असणार.
हा पिंपळ खूप वर्षांपासनं या प्लॉटवर आहे, स्मिताची पिंपळावर खिळलेली नजर पाहून अमर म्हणाला, ‘‘खूपच चांगला वृक्ष आहे, वेगळीच भावना येते त्याच्याकडे पाहताना…’’
स्मिता अजून पिंपळात हरवली होती.
‘‘हो स्मिता, पण आता आपल्याला तो काढावा लागेल…’’
‘‘म्हणजे ?’’ अमरचे वाक्य अर्धवट तोडत स्मिता घाईघाईने उद्ग्गारली.
‘‘म्हणजे स्मिता, हा पिंपळ काढावा लागेल,’’ अमरने पुन्हा तेच वाक्य उच्चारले.
‘‘एवढा चांगला, जिवंत वृक्ष तोडायचा ? मला नाही पटत.’’
‘‘अग, त्याशिवाय आपल्याला आपलं घर कसं बांधता येईल ? प्लॉटवर आपण जो प्लँन केलाय ना, त्याच्या आड येतोय तो. आणि आपण तो काढला तरी नियमानुसार दुसर्‍या ठिकाणी अनेक पटीनं झाडं लावणार आहोतच ना. त्यामुळे निसर्गाला हानी पोचणार नाही तर उलट झाडांची संख्या आपण वाढवणारच आहोत.’’
अमर समजुतीच्या स्वरात बोलला. तो बोलला खरे, पण त्याचे म्हणणे स्मिताला पटले असल्याचे तिच्या चर्येवरून तरी वाटत नव्हते. अमरने स्मिताचे लक्ष दुसरीकडे वळवले आणि निळ्या कागदावरचा प्लँन उलगडून तिला दाखवायला सुरूवात केली. तिने तो प्लँन बघितला, शेजारी राहणार्‍या देशपांडे दांपत्याची ओळख त्यांनी करून घेतली. ‘विणीच्या हंगामात अनेको पक्ष्यांची घरटी त्या पिंपळावर बांधली जातात आणि त्यांचे संसार पिंपळाने फुलत राहतात,’ अशी माहिती देशपांडे काकूंनी स्मिताला दिली. त्यामुळे आता पिंपळ तोडल्यावर या पक्ष्यांचे कसे होणार ? या विचाराने ती आणखीनच हिरमुसली.
‘‘घरासाठी जागा एकदम एक नंबर आहे, तिथला निसर्ग, शांतता…, पण तो पिंपळ काढावा लागणार, एवढी एकच गोष्ट माझ्या मनाला लागून राहिलीये रे…’’
परतीच्या प्रवासात स्मिताने आपले मन मोकळे केले. अमरने  कौशल्याने तो विषय बदलला आणि गाडी घरी पोचली. स्मिताचा मूड बदलल्याचे लक्षात आल्याने त्या दिवसापासून घराबाबत घडत असलेल्या गोष्टी अमर तिला सांगत नव्हता. वकिलाकडून त्या जागेचा काढलेला सर्च रिपोर्ट, पेपरात दिलेली ना हरकतची जाहिरात, बंगला बांधण्यासाठी महापालिकेकडून मिळालेली लेखी परवानगी म्हणजेच कमिन्समेंट सर्टिफिकेट…
हा तपशील तो सांगत नव्हता. ‘‘कामं होताहेत…’’ असे तो मोघमपणाने, ओझरते सांगे आणि विषय बदली.
अखेरीस बंगल्याचा पाया खोदण्याचे काम झाले आणि कॉलम वर आल्यावर पहिला स्लँब टाकायची वेळ आली. पहिल्या स्लँबला स्मिताला बरोबर न्यायचे, असे त्याने ठरवले होते. त्यानुसार तो तिला घेऊन पुन्हा त्या सोसायटीत पोहोचला. गाडीतून उतरल्यावर स्मिताला दिसले ते वर आलेले कॉलम. ती प्लॉटच्या पलिकडच्या टोकापर्यंत गेली आणि एकदम तिला जाणीव झाली की आता पिंपळ दिसत नाहीये.
‘‘अरे अमर, पिंपळाचं काय झालं ?’’
‘‘अग, तुला सांगितलं होतं ना, तो काढायची परवानगी आपण मागतोय. ती मिळाली आणि त्यामुळंच तर आपण आज पहिला स्लॅब टाकू शकतोय…’’
तिची नजर चुकवत अमर म्हणाला, मात्र त्याच्या बोलण्यात नेहमीचा आत्मविश्वास नव्हता.
‘‘अरे रमेश भाऊ, सिमेंटची पोती आली नाहीत अजून ?…’’ अमरने तिथल्या सुपरवायझरला हाक मारली आणि स्मिताजवळून तो सटकला. स्मिताची पिंपळाशी पहिली आणि एकमेव भेट झाली होती, त्या भेटीतच पिंपळाने तिचे मन मोहून घेतले होते. तिने मोबाईलने पिंपळाचे खूप सारे फोटोही काढले होते आणि आता पिंपळ नसल्याची पोकळी तिला जाणवू लागली होती. नकळत तिचा हात मोबाईलकडे गेला, फोटोतही तो पिंपळ सळसळत असल्याचा भास तिला झाला.
… दिवसामागून दिवस उलटू लागले आणि घर जवळपास पूर्ण झाले होते. आता फर्निचर कसे करायचे ? घरात नव्या कोणत्या गोष्टी घ्यायच्या ?, त्याची चर्चा अमर-स्मिता करू लागली. अमरने इंटिरियर डेकोरेटर असलेल्या आपल्या मित्राला सपत्नीक रात्री जेवायला घरी बोलावले. घराची सजावट कशी असावी ? याचा आराखडा तो सांगणार होता. सुरेंद्र त्याच्या बायकोसह अमरच्या घरी पोचला आणि मग गप्पांना सुरूवात झाली. थोड्या वेळाने ताटे घेण्यासाठी स्मिता किचनमध्ये गेली. तिच्या पाठोपाठ सुरेंद्रची बायको करूणाही आत गेली. मग काय? बाहेरच्या दिवाणखान्यात दोन मित्रांच्या गप्पा होतच होत्या आणि किचनमध्ये वाढण्याची तयारी करताना दोन मैत्रिणींच्या गप्पाही सुरू झाल्या.
‘‘अग करूणा, एक गोष्ट फक्त माझ्या मनाला लागून राहिली आहे…,’’ असे म्हणून स्मिताने सुरूवात केली.
‘‘काय सांगू ? त्या घराच्या प्लॉटवर मोठाथोरला पिंपळ होता, पण परवानगी घेऊन अमरनं तो काढला. मला खूपच वाईट वाटलं तेव्हा…’’
स्मिताचे हे वाक्य संपत असतानाच करूणा एकदम मोठ्याने म्हणाली,
‘‘काय सांगतेस काय स्मिता ?…’’ करूणाचे डोळे एकदम मोठे झाले आणि आवाजही कापरा झाला.
‘‘अग स्मिता, पिंपळ असा काढणं बरोबर नसतं. अपशकुन असतो तो… तुम्हाला कुणीच काही सांगितलं नाही का ग ?…’’
‘‘नाही…’’ स्मिता एकदम गोंधळली. पिंपळाचे झाड म्हणजे निसर्ग आणि तो काढणे पर्यावरणाच्या दृष्टीने चुकीचे वाटते, त्यामुळे आपण हळहळत होतो, पण आता ही अपशकुनाची भानगड काय आली नवीन ? अशा विचारांनी तिच्या मनात गर्दी केली.
‘‘नाही, नाही…, मला वाटतं तू तुमच्या गुरूजींना विचारावंस. शांती करून घ्यायला हवी का काय ? ते तेच सांगतील.’’
ती त्यावर काहीतरी बोलू जाणार तोच अमरने बाहेरून हाक मारल्याने तो विषय तिथेच थांबला. तिने ताटे टेबलावर ठेवली आणि भूक लागल्याने सगळेच जण ताटांना भिडले. त्यानंतर पुढचे काही दिवस मात्र खूप घाईत गेले. फर्निचर तयार करवून घेणे, ते जागच्या जागी लावणे, जुन्या घरातल्या जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावणे यांमध्ये ती दोघे गढून गेली. आता महिनाभरात
नव्या घरात आपल्याला जाता येईल, असे त्यांना वाटू लागले…. त्या दिवशी संध्याकाळी कामावरून स्मिता नुकतीच परतली होती आणि गँसवर चहासाठी आधण ठेवते न ठेवते तोच तिचा मोबाईल वाजू लागला….
‘‘तुम्ही अनिकेत नाईकच्या नातलग का ?’’
‘‘हो…, मी त्याची आई. का हो ?’’
‘‘तुम्ही ताबडतोब वझे हॉस्पिटलमध्ये या…, घाबरू नका, अनिकेतला अँक्सिडेंट झालाय, पण तो वाचलाय…’’
ही वाक्ये स्मिताच्या कानात घुसली तेव्हा पहिल्यांदा तिला त्यांचा अर्थच कळत नव्हता. चार-पाच सेकंदांनी ती भानावर आली आणि एकदम हालचाली करू लागली. तिने पहिला फोन अमरला लावला, गँस तसाच बंद केला आणि पर्स हाती घेऊन ती दाराबाहेर पळत सुटली. लिफ्टमध्ये भेटलेल्या ओव्हाळ काकांनी तिचा चेहरा पाहिला तेव्हा काहीतरी गडबड असल्याचे त्यांना जाणवले. त्यांच्या प्रश्नांना अर्धवट शब्दांची उत्तरे तिने दिली तेव्हा वझे काकांना प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले. तेही तसेच खाली उतरले आणि त्यांनी आपली कार बाहेर काढली.

हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर परिस्थिती उलगडत गेली. अनिकेत बाईकवरून औंधला मित्राकडे जात असताना त्याला एका मोठ्या टेंपोने उडवले होते. त्याच्या डोक्याला मार बसल्याने तो बेशुद्ध झाला होता. बाकी अवयवांना मात्र इजा झाली नसल्याचे सकृतदर्शनी तरी वाटत होते.
… महिना लोटला तरी अनिकेत शुद्धीवर आलेला नव्हता. पंधरा दिवसांनी अमर आपल्या ऑफिसमध्ये थोडाथोडा वेळ जाऊ लागला, पण स्मिताने ‘गरज पडली तर नोकरीच सोडीन,’ असा निर्धार करून हॉस्पिटलमध्येच बैठक मारली होती. अमर ऑफिसात जायला लागल्यावर तिसर्‍याच दिवशी त्याला त्यांच्या मुंबईतल्या मेन ऑफिसचे पत्र आले… अमरची नोकरी संपली होती. तो ज्या विभागासाठी काम करत होता, त्या विभागाला येणार्‍या कंपन्यांच्या ऑर्डरी एकदम मंदावल्याने कंपनीला हे पाऊल उचलावे लागले होते…
… एकामागून एक अशी संकटे नाईक कुटुंबापुढे उभी राहू लागली होती. अमरच्या नोकरीची बातमी स्मिताला समजली तेव्हा ती धक्का बसण्याच्या पलिकडे पोचली होती. बधिर डोळ्यांनी ती अमरकडे पाहू लागली…… ती रात्र तशीच संपली तरी स्मिताच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता… पहाटे-पहाटे तिला गुंगी आली आणि त्या गुंगीतून ती हळूच स्वप्नात शिरली. स्वप्नात तिच्या समोर हिरव्याकंच फांद्यांनी फेर धरला होता. त्या फांद्या तिच्या अंगात मुरत चालल्या होत्या आणि त्यांच्या त्या लयबद्ध आवर्तनांचे झोके स्मिताच्या अंगातून आरपार जात होते. तिचे अंग मासोळीसारखे हलू लागले अन एकदम दचकून तिला जाग आली… पहाटेचा प्रकाश खिडकीतून डोकावू लागला होता. तिला त्या तोडलेल्या पिंपळाची आठवण आली आणि त्यानंतर आठवण आली ती सुरेंद्रची बायको- करूणाच्या शब्दांची… ‘पिंपळ तोडणं म्हणजे अपशकून असतो, स्मिता…’
डोक्यात झगझगीत प्रकाशझोत पडल्यासारखी स्मिता ताडकन उठून बसली… पिंपळ तोडल्यापासून आपल्यामागे अशी शुक्लकाष्टे लागताहेत… पिंपळ तोडला… जिवंत व्यक्तिमत्त्वच आपण धुळीला मिळवलं…… विचारांचा तो फेर डोक्याची मंडई करू लागला… अचानक तिचे डोळे चमकू लागले… ती धावतच दाराकडे निघाली. हॉस्पिटलच्या त्या वेटिंग रूमच्या फरशीवर दुलई अंथरून पडलेल्या अमरला जाग आली आणि तो ओरडला, ‘‘कुठे पळत चाललीये स्मिता ?…’’
‘‘मी… मी आलेच…’’
स्मिताने अर्धवट पुटपुटत उत्तर दिलं, अमरने तिथल्या छोट्या टेबलावर ठेवलेली गाडीची किल्ली तिने उचलली अन ती तडक हॉस्पिटलच्या पार्किंगकडे निघाली…
… तिची गाडी भरधाव वेगाने आधी कोथरूड आणि नंतर बावधनच्या रस्त्याकडे जाऊ लागली. बावधन ओलांडत असताना तिने गाडी वळवली आणि विश्राम सोसायटीच्या आवारात शिरली. त्यांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या घरासमोर तिने गाडी लावली. तिने घराभोवती फेरी मारायला सुरूवात केली, घराच्या मागच्या भागात स्मिता पोचली आणि तोडलेल्या पिंपळाच्या जागेवर तिची नजर गेली. इथेच तो उभा होता… त्याला आपण तोडला आणि त्यामुळेच आपल्यावर अशी आपत्ती एकामागून एक अशी येऊ लागलीये… आज पिंपळ उभा असता तर ?… तर आपण असे संकटात सापडलो नसतो… पिंपळा, ये ना रे परत… स्मिताची नजर पिंपळाच्या मुळाकडे गेली आणि… आणि ती चपापली. त्या मुळातून एक नाजूक फांदी बाहेर आली होती आणि तिला इवलाली तांबूस पाने लागली होती. ती पाने वार्‍यावर खेळत होती, हसत होती, डोलत होती. स्मिता एकदम मांडी घालून बसलीच. तिने त्या फांदीला स्पर्श केला. त्यांच्या घराच्या जोत्यापासून पाच-सहा फूट अंतरावर ही फांदी होती. याचाच अर्थ थोडे मोठे झाड होईपर्यंत ते तिथे वाढू शकणार होते. त्यानंतर अलगद त्या झाडाचे पुनर्रोपण दुसर्‍या चांगल्या जागी करता येणार होते. एआरएआयच्या टेकडीवर हा पिंपळ लावला तर ? … तर काय ? आपण लावूचयात… ती धावत कारकडे गेली. पिण्याच्या पाण्याची बाटली तिने घेतली, त्या फांदीच्या बुडाशी तिने बाटली उपडी केली. पिंपळाची पाने आता स्मिताला लडिवाळपणे खेटली. तिने नाजूकपणे त्या पानांवरून हात फिरवला… बराच वेळ स्मिता तिथेच बसून राहिली… थोड्या वेळाने ती भानावर आली आणि जड पावलांनी पुन्हा कारकडे वळली. तिची कार सोसायटीच्या कमानीबाहेर जाते न जाते तोवर तिचा मोबाईल वाजला. गाडी बाजूला घेत तिने मोबाईल कानाला लावला.
‘‘अग स्मिता, कुठे आहेस तू ?’’ अमर बोलत होता.
‘‘मी ना… अरे मी…’’
अमरला खरे सांगावे का नाही, असा प्रश्न तिला पडला, पण तिला बोलू न देता अमरच पुढे बोलत राहिला…
‘‘अग, लवकर ये हॉस्पिटलमध्ये, अनिकेत शुद्धीवर आलाय, पहिल्यांदा त्याने तुझंच नाव घेतलंय…’’
अमरचे ते शब्द सोन्याचे होते, रूप्याचे होते, चंदनाचा सुगंध होता  त्याला… कपाटातल्या आपल्या सर्व सोन्याच्या दागिन्यांची सराफाकडून नाणी करवून घ्यावीत आणि त्या सुवर्णमुद्रा ते शब्द उच्चारणार्‍या अमरच्या अंगावर उधळाव्यात, अशी वेगळीच कल्पना तिच्या मनात आली. तिने गाडीचा वेग वाढवला. .. अमर-स्मिताने पंधरा दिवसांनी अनिकेतला घरी नेले. ते घरात पोचले. स्मिताने केलेल्या चहाचा पहिला घोट घेत असतानाच सहजच अमरने मोबाईलवर मेल चेक केले… त्याच्या ऑफिसातून आलेला मेल होता… तो काम करीत असलेला विभाग ऑर्डरी नसल्याने बंद झालेला असल्याने त्याला दुसर्‍या विभागात हलवण्यात आले होते, त्याला कामावरून काढून टाकण्याच्या आदेशात बदल झालेला होता… … स्मिताने शांतपणाने पिंपळाच्या फांदीला दिलेल्या शब्दांबाबत अमरला सांगितले. ते दोघे आता अनिकेतला घेऊन विश्राम सोसायटीत गेले…
… पिंपळाची नवी फांदी आणखी तरारली होती…

– सुनील माळी

ज्येष्ठ संपादक, पुणे

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!