शाळेतून आलेली ओजस्वी हातपाय धुऊन तयार झाली. ती तिची मैत्रीण लेशाची वाट पाहत होती. दोघी एकाच इमारतीत आणि शेजारच्या सदनिकेत राहत होत्या. लहानपणापासून त्यांची घनिष्ठ मैत्री होती. दोघीही एकाच शाळेत तिसर्या वर्गात शिकत होत्या. शाळेत एकत्र जाणे, शाळेतून आल्यावर दोघीही एकत्र गृहपाठ करीत. दोघीही अभ्यासात खूप हुशार होत्या. प्रत्येक परीक्षेत दोघींनाही ए+ गुण मिळत. त्या दिवशी ओजस्वी लेशाची वाट पाहत होती परंतु लेशाला उशीर होत असल्याचे पाहून ओजस्वी आईला म्हणाली, ‘‘आई, मी लेशाकडे जात आहे. आज अजून ती आली नाही. आत्तापर्यंत यायला पाहिजे होती. आज गृहपाठही थोडा जास्त दिला आहे बाईंनी.’’
आई म्हणाली, ‘‘अगं, बहुतेक तिची आजी आली आहे. दुपारपासून त्यांचा आवाज येत आहे.’’
‘‘बरोबर आहे. म्हणूनच ती आली नसेल. जाऊन बघते…’’ असे म्हणत ओजस्वी बाहेर पडली. काही सेकंदात ती लेशाच्या घरी पोहोचली. आतून खळाळून हसण्याचे आवाज येत होते. दार उघडेच असल्याने दिवाणखान्यातील दृश्य दिसताच ती पुटपुटली, ‘‘खरेच की, लेशाबाईची आजी आलीय म्हणून ती आली नाही…’’
दिवाणखान्यात लेशा आजीच्या गळ्यात पडली होती. तिची आजी तिचे पापे घेत होती. आत जावे का नाही या विचारात ती असताना लेशाच्या आईने तिला पाहिले आणि ती म्हणाली, ‘‘ओजू, तिथे का उभी आहेस? ये ना, आत ये.’’ कुणी काही बोलण्यापूर्वीच लेशा आजीला सोडून धावतच ओजस्वीकडे आली. तिचा हात धरुन तिला आत घेऊन येत म्हणाली, ‘‘ओजू, माझी आजी आलीय. आत्ता येणारच होते. थोडा उशीर झाला. ये…’’ असे म्हणत लेशा ओजस्वीला घेऊन आत आली. ओजस्वीला सोफ्यावर बसवून ती पुन्हा आजीच्या मांडीवर बसली. ओजस्वी का कोण जाणे पण थोडी उदास दिसत होती.
‘‘ओजू बाळा, कशी आहेस?’’ आजीने विचारले.
‘‘आजी, मी मस्तच…’’ ओजस्वी म्हणाली खरी परंतु तिचा आवाज भरुन आला होता. तितक्यात लेशाची आई तिथे आली. तिच्या हातात फराळाच्या बशा होत्या.
‘‘लेशू, आता नीट बस. आजीने तुला आवडणारे बेसनाचे लाडू आणले आहेत. चला. ओजूसोबत खा. ओजस्वी, तुला बेसनाचे लाडू आवडतात का?’’ असे म्हणत लेशाच्या आईने दोघींच्या हातात बशा दिल्या. लाडू खात असताना लेशाने विचारले, ‘‘ओजू, तुझी आजी कुठे असते गं?’’
‘‘माझी आजी देवाच्या घरी गेली आहे…’’ ओजस्वी भरलेल्या गळ्याने म्हणाली. कुणी काही बोलणार त्यापूर्वीच दारावरची घंटी वाजली. लेशाची आई दारात गेली. दारात उभ्या असलेल्या मुलाकडून तिने पार्सल घेतले. आत येत असताना तिने ते उघडले. त्यातील शॉल काढून आजीच्या हातात देत आई म्हणाली, ‘‘आई, ह्यांनी ही शॉल तुमच्यासाठी ऑनलाईन बोलावली आहे. बघा. आवडली नसेल तर पुन्हा मागवता येईल.’’
आजीने ती शॉल हातात घेऊन पाहिली आणि आनंदाने म्हणाली, ‘‘खूप छान आहे गं. आवडली मला.’’
तितक्यात लेशाचे बाबा कार्यालयातून परतले. त्यांना पाहताच लेशा त्यांच्याजवळ जात म्हणाली, ‘‘बाबा, तुम्ही ऑनलाईन सारं मागवता ना, मग माझ्यासाठी…’’ लेशाला थांबवून आई म्हणाली, ‘‘नाही हं लेशा, आता काही मिळणार नाही. रोज तुला काही ना काही ऑनलाईन मागविण्याची सवय लागली आहे…’’
‘‘आई, मी माझ्यासाठी म्हणत नाही तर ओजस्वीसाठी मागवायचे म्हणते…’’ लेशा बोलत असताना ओजस्वीसह सारे तिच्याकडे आश्चर्याने पाहत असताना ओजस्वीने विचारले, ‘‘माझ्यासाठी? अगं, पण…’’ तिला थांबवून लेशा म्हणाली, ‘‘बाबा, ओजस्वीची आजी देवाघरी गेली आहे. तुम्ही ऑनलाईन सारं काही मागवता! मग माझ्या ओजूसाठी एक आजी ऑनलाईन मागवा ना. ओजू, तुला आवडेल ना गं, ऑनलाईन आजी? हे बघ, आवडली नाही तरी परत करुन दुसरी मागवता येते. ऑनलाईनकडे बदलण्याची व्यवस्था असते…’’ लेशा बोलत असताना ओजस्वीचे डोळे पाणावलेले पाहताच आजीने तिला मायेने जवळ घेतले आणि विचारले, ‘‘ओजू, मी आणलेला लाडू छान होता ना?’’
आजीच्या स्पर्शाने सावरत असलेली ओजस्वी म्हणाली, ‘‘हो आजी, आवडला. खूप मस्त आणि गोड आहे…’’
‘‘अजून एक देऊ का? असे कर, आता काही दिवसांनी तुम्हाला सुट्ट्या लागणार आहेत. तू आणि लेशा दोघी मिळून या. तुम्हाला आवडणारे सारे पदार्थ मी करुन देईन… आमच्या शेतात मोठमोठी आंब्याची झाडे आहेत. खूप आंबे खा. येशील ना?’’ आजीने विचारले आणि आजीच्या गळ्यात पडून ओजस्वी म्हणाली, ‘‘हो आजी. मी लेशासोबत नक्की येईन…’’
‘‘चला. आता दोघी आत जाऊन गृहपाठ करा. मग आजी तुम्हाला छान-छान गोष्टी सांगतील…’’ आई म्हणाली आणि दोघी आत गेल्या.
ऑनलाईन खरेदी : बालकथा
– नागेश शेवाळकर
‘लाडोबा’ मासिक दिवाळी अंक २०२४
‘लाडोबा’ मासिकाचे सभासद होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.