‘‘…आणि आम्हाला खातरी आहे की, आपण यापुढे ज्यांची मुलाखत घ्याल, तेव्हा हा महाराष्ट्र म्हणेल, या माणसाची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली म्हणजे हा माणूस निश्चितच मोठा आहे’’ असे गौरवोद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्याविषयी काढले ते सुधीर गाडगीळ आज (दि. 25) पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. ‘मुलाखतींचा बादशहा’ अशी ओळख सार्थ ठरविणार्या सुधीर गाडगीळ यांच्याविषयीचा हा लेख.
सूत्रसंचालन हा पूर्णवेळचा व्यवसाय होऊ शकतो, हे सिद्ध करणारे भारतातील पहिले व्यावसायिक मुलाखतकार म्हणजे सुधीर गाडगीळ. यंदा त्यांच्या वयाची पंचाहत्तर आणि सूत्रसंचालनाच्या कारकिर्दीची पन्नास वर्षे पूर्ण होतील. वाणिज्य शाखेत पदवी मिळवूनही नोकरी करायची नाही, असा निर्णय घेणं हा पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय असलेल्या गाडगीळ कुटुंबियांसाठी धक्का होता. हा विचार ऐकल्यानंतर त्यावेळी त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं, ‘तुला जे योग्य वाटतं ते कर. आमची काहीच हरकत नाही.’ पत्नी शैलावहिनी यांनीही सांगितलं, ‘तुझा नोकरीचा पिंडच नाही. घरात काही लागलं तर मी बघेन. तू कुटुंबाची काळजी करूच नकोस.’ म्हणूनच सुधीर गाडगीळांच्या आजच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
सर्व क्षेत्रातल्या चार पिढ्यांच्या मुलाखती घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आजपर्यंत त्यांनी साडे सहा हजार लोकाच्या मुलाखती घेतल्या. त्याशिवाय त्यांचे साडे सात ते आठ हजार कार्यक्रम झाले. कन्नमवारांचा अपवाद वगळता यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती घेणारे सुधीर गाडगीळ हे एकमेव असावेत. हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे यांच्यापासून ते आत्ताच्या नाट्यगीत गाणार्या मुलींपर्यंत, क्लासिकलमध्ये पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे ते आत्ताच्या गायकापर्यंत सर्वांना त्यांनी बोलतं केलं.
गेल्या पन्नास वर्षापासून ते दैनंदिनी लेखन करतात. दिवसाची नोंद लिहून ठेवल्याशिवाय ते झोपत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्राचा पन्नास वर्षाचा साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक इतिहास आहे.
शंतनूराव किर्लोस्कर सहसा कुणाला मुलाखती द्यायचे नाहीत. गाडगीळांना ते ज्ञात असल्याने त्यांना भेटायला गेल्यावर त्यांनी मुलाखतीचा विषयच काढला नाही. त्यापूर्वी इतर चार उद्योजकांच्या मुलाखती काळजीपूर्वक वाचून शंतनूरावांविषयी कुतूहल असणारे प्रश्नही त्यांनी काढले होते. ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांच्या भोवतालचे लोक, त्यांचा मित्रपरिवार, त्यांच्या संस्थेतले कर्मचारी अशा अनेकांशी गप्पा मारून संबधितांच्या वैयक्तिक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे यात तर त्यांची खासियत. त्यामुळे अशी सगळी तयारी करून शंतनूरावांच्या लकाकीच्या बंगल्यावर गेल्यावर गाडगीळांनी प्रथम त्यांना ‘तुम्ही उद्योजक कसे झालात?’ असे विचारले नाहीत तर ते म्हणाले, ‘तुम्ही फोटोग्राफी चांगली करता ना! मला ते बघायला आवडेल.’ मग शंतनूराव खुलले. फोटो दाखवत त्यांनी उत्तम मुलाखत दिली. मुलाखत झाल्यावर ते म्हणाले, ‘तू माझं सगळं समजून घेत बोलतोस याचा अंदाज मला आला पण माझ्या आवडीचा विषय काढून तू मला बोलतं केलंस असं समजू नकोस. तुझा अंदाज आवडल्यानं मी तुला मुलाखत दिली.’
गाडगीळ म्हणतात, या लोकानी वेळोवेळी असं सावध केल्यानं मी समोरच्याला कधीच कमी लेखलं नाही.
संपूर्ण मंगेशकर परिवाराच्या मुलाखती घेणारे सुधीर गाडगीळ हे एकमेव मुलाखतकार आहेत. आशाबाईंची 29 वेळा मुलाखत घेण्याचा उच्चांक त्यांच्या नावावर नोंदवला गेला. लताबाईंची तीन वेळा, मीना खडीकर, उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ या सगळ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. हृदयनाथ यांचा तर ‘भावसरगम’ हा कार्यक्रमच ते करायचे. जितेंद्र अभिषेकी यांचाही असाच कार्यक्रम त्यांनी केला. ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ असं त्याचं शीर्षक होतं. यातून त्यांच्या नाट्यसंगीताचा धावता आढावा ते घ्यायचे.
पु. ल. देशपांडे आणि बासु भट्टाचार्य असे दोघे एका चित्रकला प्रदर्शनाला पाहुणे म्हणून गेले होते. ज्यांनी बोलावलं तो सहजपणे बोलून गेला, ‘तुम्ही एक नाटकातले, एक सिनेमातले! हातात कधी ब्रश धरला नसेल.’ त्यावर कोरलेल्या दाढीकडे हात दाखवत पुलं म्हणाले, ‘ब्रश तर रोजच हातात धरतो की!’ त्यावर हशा पिकल्यानंतर ते म्हणाले, ‘तुम्ही माझी अशी खोड काढलीय तर आता मी भाषण करणारच नाही. त्या ऐवजी चित्रच काढणार!’ त्यांनी तिथे ठेवलेला ब्रश उचलला आणि महात्मा गांधींचे सुंदर चित्र काढले. त्यावरही खुलासा करत ते म्हणाले, ‘मी गांधींचंच चित्र काढण्याचं कारण असं की, कमीत कमी रेषा आहेत आणि चुकलं तरी कोणी नाव ठेवणार नाही.’
ते चित्र त्याच कार्यक्रमात त्यांनी सुधीर गाडगीळांना भेट दिलं. गाडगीळांनी आजही ते त्यांच्या घरात दर्शनी भागात लावून ठेवलं आहे. राज ठाकरे यांनीही सुधीर गाडगीळांना त्यांचं चित्र काढून भेट दिलं. यात अनेकांना फारसा परिचित नसलेला भाग म्हणजे सुधीर गाडगीळ हेही उत्तम चित्रकार आहेत. त्यांनी आजवर हजारहून अधिक चित्रे काढली असून फावल्या वेळेत ते त्यांची ही आवड जोपासतात.
1974 पासून गाडगीळांचा अमेरिकेशी संबंध आहे. तिथल्या मराठी माणसांशी संवाद साधून त्यांना बोलतं करणारेही ते एकमेव आहेत. अमेरिकेतील मराठी माणसांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या. पाकिस्तानचा अपवाद वगळता संपूर्ण जगाची भ्रमंती त्यांनी केली. देश-विदेशातली माणसं समजून घेणं, त्यांना बोलतं करणं हीच त्यांना साधना वाटते.
बोलण्याबरोबरच त्यांचा हातही लिहिता आहे. त्यांची 14 पुस्तकं प्रकाशित आहेत. या प्रत्येक पुस्तकातून अनेकांचं अंतरंग उलगडतं. त्यांच्या उत्तुंगतेचं दर्शन घडतं. वलयांकित लोक काय खातात, त्यांच्या खाण्याच्या सवयी, आवड-निवड हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याशी चक्क खात-खात गप्पा मारल्या आणि त्यातून ‘मानाचं पान’ सारखं सर्वांगसुंदर पुस्तक वाचकांच्या भेटीस आलं.
रस्त्यावरच्या भंगार विक्रेतीपासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सर्वांच्या मुलाखती घेणार्या सुधीर गाडगीळांची शासनानंही योग्य ती दखल घेऊन त्यांना किमान पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करावं असं आमच्यासारख्या अनेक चाहत्यांना वाटतं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सुधीर गाडगीळांना पद्मश्री मिळावा इतक्याच माफक अपेक्षेसह त्यांना शुभेच्छा देतो.
-घनश्याम पाटील
लेखक आणि प्रकाशक
प्रसिद्धी – दै. सकाळ, 24 नोव्हेंबर 2024