रामुला कोरोनामुळे शाळा ऑनलाईन झाल्याने त्याच्या वडिलांनी एक मोबाईल घेऊन दिला होता. तसा रामुनेही त्यांच्यामागे ‘मला मोबाईल हवाच’ असा धोशाच लावला होता म्हणा. शाळेमधील सर्व तास ऑनलाईनच होत असत. त्यामुळे रामुला इतर मुलांसारखेच घरबसल्या शिक्षण मिळे. एरवी मोबाईल फोन हातात न देणार्या वडिलांनी आता मोबाईल विकत घेऊन दिल्यामुळे मोबाईलमध्ये असणारे गेम देखील तो खेळायला शिकला होता. त्यामुळे हळूहळू मैदानी खेळाचा त्याला विसर पडला होता. त्याचे सगळे भावविश्व मोबाईलशी निगडित झाले होते. एव्हाना त्याला पडणार्या स्वप्नातही मोबाईलचा काही ना काही तरी सहभाग असेच. एकदा असेच झाले, मोबाईलवर शिक्षकांनी पाठवलेला अभ्यास पाहत असतानाच रामू झोपी गेला आणि थोड्याच वेळात त्याच्या स्वप्नाला सुरुवात झाली.
स्वप्न म्हटले की, या दुनियेत पाहणार्याच्या काहीही स्वाधीन नसते. बस्स त्याने फक्त ते पाहायचे असते! मात्र एकदम तटस्थ राहून कुणालाही स्वप्न पाहता येत नाही तर त्या स्वप्नात पाहणार्यालाही एक भूमिका असते. स्वप्नात आपणही कोणते ना कोणते तरी पात्र असतो. त्यामुळे तर स्वप्न अधिकच अद्भुत होऊन जातात. रामुला असा स्वप्नांचा अद्भुत अनुभव अधून मधून नक्की येई.
आज तर दिवसभर हातात मोबाईल घेऊन कधी अभ्यास, कधी गेम तर कधी काही-बाही शोधून तो झोपी गेला होता. त्यामुळे त्याच्या स्वप्नातही त्याचा मोबाईल त्याच्याजवळ होता. घराचा दरवाजा लावलेला होता आणि घरात रामू सोडून कोणीही नव्हते. इतक्यात दारावर टकटक केल्याचा आवाज येऊ लागला. सोबतच माणसे बोलल्याचे आणि त्यांच्या बुटांचे आवाज येऊ लागले. दारावर नेमके कोण आहे? याचा अंदाज रामुला येत नव्हता. त्यामुळे रामू मनातून घाबरला आणि त्याने हातातील मोबाईलवर वडिलांचा फोन नंबर डायल केला. फोन लागताच, ‘‘बाबा बाबा तुम्ही लवकर या…’’ रामू म्हणाला खरा त्यासरशी एक गंमत झाली आणि फोनमधून रामुचे बाबा हळूच खाली उतरले. पाहता पाहता ते मोठे झाले. रामुच्या मोबाईलला आवाज कमी जास्त करण्याचे बटन होते. त्या बटनावर त्याच्या बाबाचा आकार लहान मोठा करता येत होता. याची त्याला खूप गंमत वाटली. पुढे होत त्याने दरवाजा उघडला तर दारात चोर होते आणि त्या चोरांना भल्या उंच असलेल्या रामुच्या बाबाने परतवून लावले. नंतर रामुने मोबाईल स्वीच ऑफ करताच बाबाही गायब झाले.
रामुला आता जणू त्या खेळाचे वेडच भरले होते. स्वप्नातच तो कधी मित्रांना, कधी शिक्षकांना, कुणालाही वाटेल त्याला फोन लावत होता. कुणाला गप्पा मारण्यासाठी, कुणाला सल्ला विचारण्यासाठी, कुणाला मदतीसाठी तो बोलून घेत होता आणि त्याने बोलवलेली व्यक्ती फोन लागताच त्याच्या मोबाईलच्या स्क्रिनमधून खाली उतरत होती. खाली उतरलेल्या व्यक्तिला आवाजाचा स्विच लहान-मोठा करून रामू सहजच लहान मोठे करत होता. त्याला त्यात गंमत वाटत होती.
असा एखादा मोबाईल असावा की ज्यातून बोलणारा माणूस प्रत्यक्ष खाली उतरू शकेल अशी कल्पना त्याला खूप दिवसांपूर्वी दिवसा सुचली होती आणि आज रात्री स्वप्नात अस्तित्वात आली होती. ‘हाक मारली की संबंधित माणूस हजर’ अशी कल्पवृक्षागत मोबाईलची दुनिया पाहून आता आपल्याला कधीही काही अडचण येणार नाही अशी रामूची खातरी झाली होती. तो त्याच्या या खेळांमध्ये दंग झाला होता.
रात्र सरत होती. अचानक घरामध्ये दोन मांजरी शिरल्या. तशा त्या नेहमीच घरात येत असत. त्यातली एक कपाटावर चढली आणि एक खालूनच दुसरीवर गुरगुरु लागली. मोबाईलमध्ये दंग असलेल्या रामुने मांजरी आलेल्या पाहिल्या नव्हत्या त्यामुळे त्यांच्या आवाजाने तो घाबरला. इतक्यात वीज गेली. त्यामुळे घरात अंधार पडला. अंधार पडल्यावर अधिकच भीती वाटू लागली. नक्की घरात भुते शिरली असावीत किंवा चोर तरी शिरले असावेत असे वाटून रामुने पोलिसांनाच फोन लावला. फोन लागताच तिकडून फोन उचलला गेला असता तर फोनमधून लगेच पोलीस खाली उतरून मदतीला आला असता. आवाजाच्या स्विचने त्याला हवे तितके मोठे करता आले असते पण येथे पण आडवा आला. रामुने लावलेल्या फोनची रिंग वाजल्याचा पलीकडून आवाज येऊ लागला. त्यासरशी मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याची बॅटरी डिस्चार्ज झाली आणि फोन स्विच ऑफ झाला. त्यासरशी फोनमधून उतरणारा पोलीस उतरता उतरता अदृश्य झाला. आता कुणाचीच मदत मिळणार नाही म्हणून रामू घाबरून जागा झाला.
रामू खडबडून दचकल्यासारखा झोपेतून उठल्याचे पाहून आईही उठून बसली आणि ‘काय झालं रामू? स्वप्नबिप्न पडले की काय?’ म्हणत तिने घरातील मांजरींना काठीने हुसकावून लावले. रामुला मोबाईलमधून उतरणार्या माणसापेक्षा वेळेवर मदतीला आलेली आई खूपच ग्रेट वाटली. तो पाहतच राहीला.
-डॉ. कैलास दौंड
प्रसिद्धी : ‘लाडोबा’ मासिक दिवाळी अंक २०२४