या वर्षी गणेशोत्सव 11 दिवसांचा – मोहनराव दाते – पंचागकर्ते

दिनांक 7 सप्टेंबर रोजी शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4:50 ते दुपारी 1:51 पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना माध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते. भारतात आणि विशेषत्वाने महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकष्टीचे व्रत करतात, विनायकाची पूजा करतात. विनायक हे गणेशाचे एक लोकप्रिय नाव आहे. विघ्नहर्ता म्हणून पूजल्या जाणाऱ्या विनायकाला वास्तविक दुर्जनांच्या कार्यात विघ्ने उत्पन्न करण्यासाठी विधात्याने उत्पन्न केले, अशी कथा पुराणात आहे. मित, संमित, शाल, कटंकट, कूष्मांड व राजपुत्र या नावाचे सहा विनायक गण याज्ञवल्क्यस्मृतीत सांगितले आहेत. हे विनायकगण विघ्नकारी, उपद्रवकारी आणि क्रूर असे आहेत. त्यांचा उपद्रव सुरु झाला, की माणसे वेड्यासारखी वागू लागतात. त्यांना वाईट स्वप्ने पडतात व सतत कसली तरी भीती वाटत राहते. गणपती हा विनायक म्हणजेच या विनायक गणांचा अधिपती मानला जातो. या संदर्भात वराहपुराणात एक कथा दिली आहे. सज्जनांच्या कार्यात विघ्ने येतात आणि दुष्टांची कार्ये निर्विघ्न पार पडतात, यावर काय उपाय करावा अशी चिंता एकदा देवांना व ऋषींना उत्पन्न झाली. मग ते रुद्राकडे गेले आणि त्यांनी आपली चिंता सांगितली. ती ऐकून रुद्रांनी विनायक आणि विनायकगण उत्पन्न केले. त्यांनी विनायकाला वर दिला ‘तुला गजमुख, गणेश व विनायक अशी नावे प्राप्त होतील. क्रूर असे हे विनायकगण तुझे सेवक होतील. यापुढे यज्ञादी कार्यात तुझी पूजा प्रथम होईल. जो कोणी ती करणार नाही, त्याच्या कार्यसिद्धीत तू खुशाल विघ्ने आण.’
त्या दिवसापासून कार्यारंभी गणपतीपूजन होऊ लागले. विनायकगण हे विघ्नरूप होते; पण विनायक हा विघ्नहर्ता ठरला. भक्तांना विविध प्रकारच्या सिद्धी प्राप्त करून देणारा तो सिद्धिविनायक बनला. अशा या सिद्धीविनायकाच्या पार्थिव मूर्तीची पूजा भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी केली जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. ज्या गणेशाचे आवाहन आपण ‘सुमुहूर्तमस्तु’ म्हणजे तू स्वतःच एक सुमुहूर्त आहेस असे म्हणून करतो त्याचा पूजनासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टि करण तसेच राहूकाल, शिवालिखित इत्यादी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. प्रात:कालापासून माध्याह्नापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. दुकानातून गणपतीची मूर्ती 8-15 दिवस आधी आणून घरामध्ये ठेवता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी. उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत आहे ती देखील चुकीचीच आहे. समर्थ रामदासांनी गणेशाचे वर्णन करताना आरतीमध्ये ‘सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना’ असे म्हटले आहे.
वेदकाळापासून विविध नावांनी ओळखला जाणारा आणि तेव्हापासून उपास्य देवता म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी त्याचे पूजन करण्याची परंपरा आहे. वर सांगितलेल्या कथेप्रमाणे अगदी या सिद्धिविनायक गणेशाचे पूजन करण्यापूर्वी देखील विघ्नहर्त्या गणपतीचे पूजन केले जाते. या गणपती पूजनामध्ये मूर्तीऐवजी सुपारी ठेवून तिच्यावर गणपतीचे आवाहन केले जाते. काही ठिकाणी सुपारीऐवजी नारळ ठेवण्याची प्रथा आहे. या सुपारीच्या गणपतीची पूजा करून मग पुढील मंत्राने प्रार्थना करतात –
कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि |
विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक ॥
अर्थ – हे विधात्या देवनायका गणपती, तू प्रसन्न होऊन माझे कार्य सिद्धीस जावो. तसेच सर्व विघ्ने नष्ट होवोत.
अशाप्रकारे सुपारीच्या गणपतीचे पूजन करून नंतर आपण आणलेल्या गणेशाच्या मूर्तीच्या पूजनास सुरुवात करावी.
प्रथेप्रमाणे गणेशोत्सव काही जणांकडे दीड दिवस, 5, 7 तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज गणेशाची सकाळी व संध्याकाळी पूजा, आरती अवश्य करावी. गणपती पूजन 10 दिवस करणे शक्य नसेल तर पूजनाचे दिवस कमी करून 1॥, 5, 7 दिवस गणपतीपूजन करून विसर्जन करता येते. काही जणांकडे गौरी / महालक्ष्मी बरोबर गणपती विसर्जन करण्याची परंपरा असते. अशा वेळेस तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार असताना त्या दिवशी विसर्जन करता येते. तसेच काही जणांकडे घरामध्ये गर्भवती असताना गणपती विसर्जन न करण्याची पद्धती आहे पण ती बरोबर नाही. घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांची मूर्ती नसावी. तसेच मातीची किंवा शाडूची लहान मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून पूजन करता येईल आणि कोणत्याही धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सव मूर्ती म्हणून पूजन करता येईल आणि आरास करता येईल. पाण्यात विसर्जन मात्र लहान मूर्तीचे करावे आणि धातूची श्रीगणेश मूर्ती पुन: शोकेसमध्ये ठेवून द्यावी.
गणेशोत्सवा दरम्यान येणारे काही महत्त्वाचे दिवस –
दिनांक 10 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री 8 वाजून 04 मिनिटांपर्यत कधीही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र माध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने दिनांक 11 सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दिनांक 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री 9:53 पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.
यावर्षी दिनांक 17 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून 11 वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीचे दिवशी विसर्जन केले जाते त्यांच्याकडे 11 दिवसांचा उत्सव असेल तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे. या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी पावणे बारा वाजताच संपत असली तरीही त्या नंतर देखील विसर्जन करता येईल. विसर्जनाच्या वेळेस ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा आरोळ्या देणाऱ्या आपल्या सर्वांच्या आग्रहाचा मान ठेवून पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे 27 ऑगस्ट 2025 रोजी येणार आहेत.

  • मोहनराव दाते
    पंचागकर्ते | 9822659771

साहित्य चपराक सप्टेंबर २०२४ (गणेशोत्सव विशेषांक)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा