माझा गणेश – जयेंद्र साळगांवकर

माझा जन्मच मालवणचा! माझे वडील स्व. जयंतराव साळगांवकर हे लहानाचे मोठे मालवणमध्येच झाले. पुढे ते नोकरीकरिता मुंबईला आले आणि येथेच स्थायिकही झाले. तरी दरवर्षी गणेश चतुर्थीला आम्ही सर्व कुटुंबीय मालवणला जाऊन घरी गणेशाची मूर्ती आणून, तिची यथासांग पूजा करून आणि पाचव्या दिवशी विसर्जन करूनच मुंबईला परतत असू. अनेक वर्षे हे सुरू होते. मुंबईला जेव्हा त्यांनी एक इमारत विकत घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या आई म्हणजे आमच्या आजी स्व. इंदिराबाई साळगांवकर यांच्याशी विचारविनिमय करून गणपती मुंबईत आणावयास सुरुवात केली. तीच प्रथा अजूनही आमच्या कुटुंबात सुरू असून आमच्या समस्त साळगांवकर कुटुंबाचा तो एकच गणपती होय!
लहानपणी गणेश चतुर्थीसाठी मालवणला जाणे म्हणजे पर्वणीच होती. माझ्या आठवणीत आमच्याकडे ‘स्टँडर्ड व्हॅनगार्ड’ ही गाडी होती. मालवणचाच अनंत नावाचा चालक! मालवणला प्रवासाला निघण्याअगोदर गाडीची संपूर्ण तपासणी (दुरुस्ती) करून घेतली जायची. तरीही गाडी वाटेत कुठे ना कुठे बंद पडायचीच! म्हणूनच आम्ही मनाची तशी तयारी करूनच निघायचो. कधीतरी गाडीत मोठा बिघाड असल्यावर आम्ही नजिकच्या शहरात मुक्काम केल्याचे मला स्मरते परंतु असे क्वचितच घडत असे. नंतरच्या काळात आमच्याकडे ‘डॉग्ज किंग्जवे’ ही आलिशान गाडी आली आणि चालकही बदलला. त्या गाडीने प्रवास करण्याची मजाच काही और होती. गजानन मड्ये हा चालक आम्हाला त्या गाडीने आणि त्या काळचे अरुंद रस्ते असतानाही चक्क आठ तासात मालवणला पोहोचवायचा, यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही.
मालवणला आमची गणेश चतुर्थी फार उत्साहात साजरी केली जायची. माझ्या वडिलांनी चतुर्थीसाठी म्हणून खास आरत्या रेकॉर्ड करून घेतल्या होत्या. त्या तिथे वाजविण्याकरिता ते ‘ग्रुडिंग’चा एक मोठ्ठा टेपरेकॉर्डर सोबत घ्यायचे. गाडीतल्या डिकीमधली जवळजवळ पन्नास टक्के जागा तो टेपरेकॉर्डर व्यापून टाकायचा. आम्ही मालवणला एक दिवस आधी पोहोचायचो आणि तयारीला लागायचो. विशेषत: डेकोरेशनच्या. बाकी जबाबदाऱ्या मोठी मंडळी घ्यायची. चतुर्थीच्या दिवशी चित्रशाळेत जाऊन गणपती आणणे हा एक अतिशय आनंदाचा व उत्साहाचा कार्यक्रम! मी व भावंडे आमच्या आजोबांसोबत मूर्तिकाराकडे जाऊन आमची मूर्ती एका जाळीदार कपड्यात झाकून घेऊन यायचो. तिचे शास्त्रोक्त पद्धतीने घरात स्वागत व्हायचे. मग आत्माराम भटजींची वाट बघणे आणि नंतर पूजा व आरती. आरतीच्या वेळी टेपरेकॉर्डवर मोठ्याने आरत्या वाजविल्या जायच्या. त्या वेळी अनेक मंडळी उत्साहाने आरत्या म्हणायला आमच्या घरी यायची. मग सायंकाळी दर्शनाला माणसे व नंतर पुन्हा आरती. असे पाच दिवस चालायचे आणि पाचव्या दिवशी सायंकाळी विसर्जन. विसर्जनावेळी आम्ही बरेच जण असायचो. वडील आम्हा मुलांना फटाके आणून द्यायचे आणि ते फटाके फोडत फोडत ‘गणपती बाप्पा…. मोरया!’ या गजरात आमच्या गणपतीचे थाटामाटात विसर्जन पार पडायचे.
पाच दिवसांत मासे पोटात न गेल्याने, विसर्जन झाल्या-झाल्या तिथूनच आमचे आजोबा अथवा कोणीतरी बाजारात जाऊन मासे घेऊन यायचे. रात्री आम्ही सगळे त्या मांसाहारी जेवणावर तुटून पडायचो. दुसऱ्या दिवशी पुन्हा मुंबईला निघायची तयारी. इथेच राहावे, मुंबईला जाऊच नये, असे वाटायचे परंतु शाळा आणि वडिलांचा व्यवसाय यामुळे वेळेत येणे क्रमप्राप्तच होते. जसजसे आम्ही भावंडे मोठी होत गेलो तसतसा या कार्यक्रमात थोडा थोडा बदल होत गेला. फटाके कमी झाले. टेपरेकॉर्डर नेणेही थांबले! उत्साह मात्र तसाच होता.
मला नेमके आठवत नाही, मी बहुधा चौथी किंवा पाचवीत होतो तेव्हाची गोष्ट. आम्ही मालवणहून परत येत होतो. आमची गाडी संगमेश्वरजवळ आली असता अचानक बंद पडली. गाडी धक्का देऊन पुन्हा स्टार्ट करायचे ठरले म्हणून आम्ही गाडीतून उतरून धक्का मारू लागलो. गाडी एका छोट्या चढावावर आली असता आमच्या सगळ्यांचा दम गेला. गाडी पुन्हा ढकलण्यासाठी, ती पाठी येऊ नये म्हणून चाकाच्या पाठी दगड लावण्यासाठी एक दगड मी उचलला असता त्याखालून एक विंचू आला आणि मला डसला! मी पुरता घाबरून गेलो. मला वाटले आता मी मरणार! संगमेश्वर जवळपास एक किलोमीटर अंतरावर होते. माझ्या वडिलांनी मला खांद्यावर उचलून घेतले आणि झपझप पावले टाकीत शहरात नेले. तेथे डॉक्टरकडे नेऊन उपचार करेपर्यंत उशीर झालेला. त्यामुळे आम्ही रात्री संगमेश्वरातच मुक्काम केला. “याला उद्या सकाळपर्यंत प्यायला मी जे औषध देतोय तेच द्या, पाणीही देऊ नका” असे डॉक्टरांनी ठासून सांगितले होते. रात्रभर मी पाण्यासाठी उठायचो. माझी आई मला डॉक्टरांनी दिलेले होते तेच औषध थोडे थोडे करून द्यायची. सकाळपर्यंत माझी गादी पूर्णपणे घामाने भिजलेली होती. पुन्हा डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना आम्ही सर्व प्रकार सांगितला असता त्यांनी आम्हाला विंचवांच्या प्रकारांविषयी भरपूर माहिती दिली. मला चावलेल्या विंचवाचे विष शरीरातून भरपूर घाम बाहेर टाकते आणि माणसाला नंतर पुढे नेहमीपेक्षा जास्त घाम येतो. दुसऱ्या प्रकारचा विंचू चावला तर अंगाची लाही लाही होते. अजून एका वेगळ्या प्रकारचा विंचू चावला तर शरीरातील रंध्रारंध्रातून थेंब थेंब रक्त निघत राहते! नशिबाने मला ‘घाम’वाला विंचू चावलेला. नंतर आम्ही सुखरूप मुंबईस पोहोचलो परंतु त्यापुढे कधीही गाडी बिघडली की, मी किंवा माझ्या भावांपैकी कुणीही दगड उचलायच्या भानगडीत पडत नाही, असे ठरवूनच मालवणचा प्रवास करू लागलो!
1988 पासून आम्ही आमचा गणपती मुंबईत आणावयास सुरुवात केली. पहिली जवळजवळ अकरा वर्षे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे गायन गणपतीच्या तिसऱ्या दिवशी व्हायचे! राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच सिने-नाट्य क्षेत्रातील अनेक नामवंत गणपतीबाप्पाच्या दर्शनाला आवर्जून येत असत. हे वडील असताना दरवर्षी व्हायचे. सुप्रसिद्ध विजय खातू हे आमचे मूर्तिकार.
आता आमचा गणपती दीड दिवसाचा असतो. ‘साळगांवकरांच्या गणपतीला दशर्नाला जाण्याची’ प्रत्येकाच्या मनात इच्छा असते परंतु दीड दिवसाच्या अवधीत आम्हा कुटुंबीयांच्या मनात असूनही सर्वांना गणपतीबाप्पाच्या दशर्नासाठी आमंत्रित करणे शक्य होत नाही. आमची श्रीगणेश चतुर्थी अजूनही त्याच थाटामाटात साजरी होत असते.
मालवणला ज्या घरी वडील लहानाचे मोठे झाले त्या घरी आम्ही साळगांवकर एक भाडेकरू म्हणून राहत होतो. आमच्या आजीने ते घर विकत घेण्याची वडिलांकडे इच्छा व्यक्त केली आणि वडिलांनी काही कालावधीत तिची ती अपेक्षा पूर्ण केली. त्यानंतर आजीच्या शेवटच्या काळात तिने मुलाला म्हणजेच स्व. जयंतरावांना सांगितले, “जयंता, या जागेवर एक गणपतीचा मंदिर बांध हां!” आईची ही इच्छा शिरसावंद्य मानून माझ्या वडिलांनी, आजी निवर्तल्यावर त्या जागेवरील घर पाडून एक छानसे ‘जय गणेश मंदिर’ बांधले. आज या मंदिराला महाराष्ट्र शासनाने ‘पर्यटनस्थळ’ म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रातून तसेच परदेशस्थ भारतीय आमच्या मंदिरात खास दर्शनासाठी येत असतात. सध्या मी ‘अखिल महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचा’ अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मला परोपरी आमच्या मालवणच्या गणेश चतुर्थीचीच आठवण येत असते.

जयेंद्र साळगांवकर
अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळ
9820225889

साहित्य चपराक सप्टेंबर २०२४ (गणेशोत्सव विशेषांक)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा