डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर हे सामाजिक भान असलेले वैद्यकीय अधिकारी आणि विचारवंत होते. त्यांचे ‘ओड आणि ओढ’ हे आत्मचरित्र या महिन्यात 31 तारखेला ‘चपराक प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यांचे नुकतेच म्हणजे 25/06/2024रोजी निधन झाले. त्यांना ‘चपराक’तर्फे श्रद्धांजली म्हणून हा विशेष विभाग देत आहोत. हे पुस्तक आपण ‘चपराक’च्या वेबसाईटवरून घरपोहोच मागवू शकाल. शिवाय 31 ऑगस्टनंतर याचे ऑडिओ बुकही आपण ‘चपराक’च्या युट्यूब चॅनेलवरून ऐकू शकाल.
– संपादक
डॉक्टरसाहेब

माणसांच्या सततच्या मागण्यामुळे साक्षात देवही वैतागला. ‘देवा मला हे दे, देवा मला ते दे’ असं म्हणत वाटेल तसे नवस बोलणाऱ्या माणसाची अनेक रूपे पाहून त्याला या माणसापासून दूर कुठेतरी पळून जावेसे वाटले. त्या दृष्टीने त्याने तसे प्रयत्न केलेही पण माणूस महा चलाख! त्याने त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन देवाला शोधून काढलेच. शेवटी कंटाळलेल्या देवबाप्पांनी सर्व देव-देवतांची एक सभा बोलावली आणि यातून मार्ग काढण्याची विनंती केली.
अनेक देवी-देवतांनी त्यांना अनेक मार्ग सुचवले पण ते काही त्याला पसंत पडेनात. या प्रत्येक ठिकाणी माणूस नक्की पोहोचेल आणि पुन्हा त्याच्यापुढे गाऱ्हाणे गाईल याची त्याला खातरी होती. त्यावेळी एक वृद्ध देवता उठली आणि म्हणाली, “देवा तुम्ही असं करा, माणसाच्याच हृदयात जाऊन बसा. तो तुम्हाला सगळीकडे शोधेल पण स्वतःमध्ये कधीही शोधणार नाही.” देवाला ती युक्ती आवडली. तेव्हापासून त्याने सामान्य माणसाच्या हृदयात घर केले. माणूस सगळीकडे देवाला शोधतो पण स्वतःमधले दिव्यत्व कधीही पाहत नाही. स्वतःमधील देवत्वाचा शोध घेऊन समाजासाठी योगदान देणारे फार थोडके लोक जगात असतात. त्यापैकी एक होते डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर सर.
गेल्या काही महिन्यांपूर्वी ते आमच्या ‘चपराक’च्या कार्यालयात आले. त्यांना त्यांचं आत्मकथन प्रकाशित करायचं होतं. आधी एक-दोन प्रकाशकांच्या वाईट अनुभवामुळे ते नाराज होते. माझ्या कार्यबाहुल्यामुळे मलाही हे पुस्तक प्रकाशित करणं शक्य नव्हतं पण ते म्हणाले, “हे पुस्तक प्रकाशित व्हावी अशी माझ्या पत्नीची शेवटची इच्छा होती. गेल्या वर्षी तिचं निधन झालं. आता तुम्ही नकार दिला तर ही कलाकृती तशीच राहिल.”
मी त्यांचं कार्य आणि जीवनप्रवास ऐकून घेतला. लोक शून्यातून प्रवास सुरु करतात. यांनी तर ते शून्य फोडून स्वतःला सिद्ध केलं होतं. आम्ही त्यांचे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले आणि कामाला गती दिली.
दरम्यान माझे एक आजारपण आणि काही कौटुंबिक व्याप यामुळे आमच्या टीमकडे ही जबाबदारी देऊन मी थोडा बाजूला झालो होतो. त्या दिवशी कोल्हापूरला असताना त्यांचे चिरंजीव श्री. विवेक यांचा दूरध्वनी आला. डॉक्टरसाहेबांची तब्येत बिघडल्याचे त्यांनी सांगितले. या वयात आरोग्याच्या काही कुरबुरी असतातच असे वाटल्याने मी ते गांभीर्याने घेतले नाही. तरीही पुस्तक वेळेत पूर्ण करायचे म्हणून मी कोल्हापूरहून थेट पुण्याला आलो. कार्यालयात पोहोचलो तर डॉक्टरसाहेबांचा फोन आला. ते म्हणाले, “मी आयसीयूमध्ये आहे. बोलायला त्रास होतोय. कोल्हापूरातील तुमच्या डॉक्टरांचे संपर्क क्रमांक द्या.”
त्याचे कारण मला कळले नाही पण मी माझ्या पत्नीला त्यांना कोल्हापूरातील डॉक्टरांचे तपशील द्यायला सांगितले. दुसऱ्याच दिवशी ती दुःखद वार्ता आली की ‘डॉक्टर आपल्याला सोडून गेले!’
पुढचे चार दिवस मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यांनी ‘चपराक’च्या कार्यालयात बसून सांगितलेले अनेक किस्से, घटना पुन्हा पुन्हा आठवत होते. दैनिक ‘पुण्य नगरी’च्या सर्व आवृत्त्यातून मी ‘किस्सा ए इलेक्शन’ हा राजकीय स्तंभ रोजच्या अंकात लिहित होतो. ते वाचून डॉक्टरसाहेब त्यावर मला न विसरता प्रतिक्रिया द्यायचे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मला व्हाटसॲपवर संदेश पाठवला की, “आम्ही हे किस्से वाचले, त्याचा आनंद घेतोय. आता ‘किस्सा ए देगलूरकर’ लिहा!”
दुर्दैवाने ही वेळ इतक्या लवकर येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांचे देगलूरचे प्राथमिक शाळेतील दिवस, तिथली जातीय अवहेलना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केलेले शिक्षण, नांदेड, लोहा, संभाजीनगर, नगर अशा विविध ठिकाणचे त्यांचे अनुभव, शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन लाख समाजबांधवांचा घेतलेला मेळावा, बीडमध्ये पत्रकारांकडून झालेला त्रास हे सगळे आठवत होते. त्यांचे चिरंजिव विवेक यांना एका व्यावसायिक प्रकरणात मदत करावी हे मला सांगताना त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते. तो सर्व विषय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत मी घेऊन जाईन आणि विवेकदादांना शक्य होईल ते सहकार्य नक्की करेन असे म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जग जकल्याचा आनंद होता. या वयातही आपल्या समाजाच्या, आपल्या मुलाच्या कल्याणाचा विचार करणारा बाप जणू आपल्या संस्कृतीचेच दर्शन घडवित होता.
वैद्यकिय सेवा करताना त्यांनी अनेक गरीब, गरजू, वंचित, उपेक्षितांचे प्राण वाचवले होते. नोकरीत काही मर्यादा असतानाही त्यांनी त्यापुढे जाऊन माणूस म्हणून यथायोग्य निर्णय घेतले होते. जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. देगलूरसारख्या ठिकाणी सरकारी रुग्णालयाचा विस्तार करणे असेल कवा अनेक परिचारिकांना न्याय देणे असेल त्यांचे काम अफाटच होते.
वडार समाज, सावळा रंग, समाजातील काही कुप्रथा, व्यसनाधीनता, गुन्हेगारीचा शिक्का यामुळे आम्हाला न्यूनगंड वाटतो असे ते नेहमी सांगायचे. समाजाला यातून बाहेर काढायचे तर त्यांचा शैक्षणिक विकास व्हायला हवा, त्यांचे आरोग्याचे प्रश्न सुटायला हवे आणि केंद्र शासनाने इतर राज्यात ज्या प्रमाणे वडार समाजाला आरक्षण दिले त्याप्रमाणे महाराष्ट्रात घडायला हवे, असे ते नेहमी म्हणायचे. यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. 25 जून 1994 ला नगरमध्ये हे घडले असते. तशी सगळी तयारीही झाली होती मात्र शरद पवार यांचे सरकार गेले आणि नंतर आलेल्या युती शासनाने त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, असे ते सांगायचे. वडार समाजाच्या विकासासाठी किमान ज्या आश्रमशाळा मंजूर झाल्या होत्या त्या तरी परत मिळायला हव्यात असे त्यांना वाटे. गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यावर वडार समाजाच्या आश्रमशाळा वंजारी समाजासाठी पळवल्या असा त्यांचा आक्षेप होता.
शालेय जीवनात डुक्कर खात नसतानाही देगलूरमधील शिक्षकांनी आणि वर्गातील अन्य विद्यार्थ्यांनी डुक्कर कसे पकडतात, ते कसे मारतात आणि खातात हे त्यांना दरडावून विचारले. ‘आमच्याकडे सगळे वारकरी आहेत’ हे सांगूनही ते त्यांना पटत नव्हते. हे सांगितल्याशिवाय वर्गात बसता येणार नव्हते. शेवटी त्यांनी आपल्या अन्य समाजबांधवांचे अनुभव सांगितले आणि यातून आपली सुटका करून घेतली. असे अनेक प्रसंग त्यांच्या मनावर बबले असले तरी कुणाविषयीही त्यांच्या मनात द्वेष नव्हता. आपल्या दोन ब्राह्मण शिक्षकांनी आपल्या जीवनाला दिशा दिली हे देखील ते मोकळेपणाने सांगायचे.

त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकातही त्यांच्या जगण्याची प्रेरणा दिसून येते. ओड म्हणजे वडार! मूळच्या ओडचे ओड्र आणि नंतर अपभ्रंशाने वडार झाले. या समाजाची अव्याहत असणारी ओढ त्यांना महत्त्वाची वाटायची. म्हणून त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक ‘ओड आणि ओढ’ असे ठेवले.
‘चपराक’ने हे पुस्तक आमच्या परंपरेप्रमाणे प्रिंट, इ-बुक आणि ऑडिओ बुक अशा तिन्ही स्वरूपात प्रकाशित केल्याने ते जगभरातील मराठी वाचकांसाठी उपलब्ध आहे.या निमित्ताने देगलूरकर सरांसारख्या एका प्रेमळ, कर्तव्यकठोर आणि खमक्या अधिकाऱ्याची ओळख मराठी वाचकांना होणार आहे. हे पुस्तक प्रकाशित करायची संधी मला प्रकाशक या नात्याने मिळाली ही माझ्यासाठी अतीव आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टर देगलूरकर सर या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत आहेत, याची जाणीव आहे. त्यांच्या स्मृतना भावपूर्ण आदरांजली.
–घनश्याम पाटील
संपादक, चपराक प्रकाशन
माझे उत्तुंग बाबा

छोटं संकट आलं की आपण ‘आई गं’ म्हणतो आणि मोठं संकट समोर दिसलं की ‘बाप रे!’ असे शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात. उदाहरणार्थ, खेळताना आपल्याला काही लागलं, खरचटलं तर ‘आई गं’ हे शब्द येतात पण रस्त्यावरून जाताना एखादा ट्रक जोरात आला आणि त्याची कुणाला धडक होणार असं वाटताच आपल्या तोंडून आपसूक ‘बाप रे!’ असे शब्द बाहेर पडतात. जगात आईवर खूप साहित्य लिहिलं जातं मात्र बाप कायम दुर्लक्षित राहतो. मी काही कवी-लेखक नाही की ज्याने आईवर महाकाव्य लिहावं, वडिलांची कीर्ती शब्दबद्ध करावी! पण माझं नशीब खूप चांगलं आहे की मला आईचं भरभरून प्रेम मिळालं. बाबा नावाच्या माझ्या सुपरहिरोनं माझ्यावर माणूस म्हणून जगण्याचे उत्तम संस्कार केले. माझ्या वडिलांची ही चरित्रगाथा वाचकांपर्यंत यावी, अशी माझ्या आईची प्रचंड इच्छा होती. दुर्देवानं तिला त्याच्या आधीच देवाचं बोलावणं आलं. खूप प्रयत्नानं ‘चपराक प्रकाशन’पर्यंत ही संहिता पोहोचली, त्यांनी पुस्तकाचं काम सुरू केलं आणि ते सुरू असतानाच बाबाही आम्हाला पोरकं करून गेले. त्यामुळे दोघांचीही महत्त्वाकांक्षा असलेली ही कलाकृती आपल्यासमोर सादर करताना त्याला एक दुःखाची, वेदनेची झालर आहे.
आज बाबा आमच्यात नाहीत, असं म्हटलं तर ते अर्धसत्य ठरेल. ते शरीरानं आमच्या सोबत नाहीत. त्यांनी दिलेले संस्कार, त्यांचे आदर्श आणि बालपणापासूनच्या असंख्य आठवणी आज मला समृद्ध करतात. भगवद्गीतेत म्हटलंय की, ‘समय से पहले और भाग्य से जादा कभी किसी को कुछ नही मिलला.’ मला मात्र नेहमी वाटतं की, माझ्या आईनं नऊ महिने बाळाला पोटात वाढवणं हे ‘समय से पहले’ खूप काही देणारं आहे आणि आई-वडिलांनी आपल्यावर उत्तम संस्कार करणं, निरपेक्ष प्रेम देणं, जगण्याला दिशा देणं आणि एक माणूस म्हणून घडण्यासाठी जे काही करता येईल ते करणं हे ‘भाग्य से जादा’ आहे. आईवडिलांच्या या त्यागाची, समर्पणाची जाणीव कुणाला असते, कुणाला नसते! माझ्या आयुष्यात आणि माझ्या जडणघडणीत माझे आईबाबाच माझे सर्वस्व आहेत.
माझे बाबा वडार समाजाचे पहिले सिव्हिल सर्जन ठरले. इथं ‘समाज’ यासाठी महत्त्वाचा की, आपलं मूल्यमापन करताना, आपण आज कुठं आहोत हे पडताळून पाहताना आपली सुरूवात नेमकी कुठून झाली हे महत्त्वाचं असतं. घरात अठराविश्वे दारिद्य्र असताना देगलूरमधील डबक्यात सुरू झालेला त्यांचा जीवनपट पुढे इतका विस्तारत गेला की त्याला आकाशासारखे विराट स्वरूप प्राप्त झाले. स्वतःबरोबरच समाजाच्या भल्याचा अव्याहत विचार करणारे माझे बाबा नारळा-फणसासारखे होते. वरून रुक्ष, कठोर वाटले तरी आतून अतिशय गोड, मधुर, रसाळ! ते एक नाटककार होते, रसिक होते, खेळाडू होते. संगीताची, नाटकाची आणि दिग्दर्शनाची आवड असणारे हरहुन्नरी कलावंत होते. नोकरीच्या आणि समाजकार्याच्या व्यापात त्यांचे हे गुण कधी फारसे चर्चेला आले नाहीत पण त्यांचं जगणं कायम जदादिल होतं.
माझे बाबा जितके उत्तुंग होते तितकेच लहानासोबत लहान होणारे होते. अतिशय शांत, संयमी, निगर्वी असूनही ते तितकेच कठोर प्रशासक होते. संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मेणाहून मऊ आणि कठीण वज्रासही भेदण्याइतके कणखर. शिक्षणामुळे त्यांनी स्वतःच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवले. हे करताना कधीही, कसलाही मोठेपणाचा बडेजाव मिरवला नाही. आजकाल समाजासाठी एखादं छोटं काम जरी कोणी केलं तरी ते लगेच ‘मला पाहा आणि फुले वाहा’ म्हणत त्याची जाहिरातबाजी करतात. बाबांनी मात्र कधीही स्वतःचा मोठेपणा मिरवला नाही. इतरांना देत जाणे हाच त्यांचा स्थायीभाव होता. माणूस घेतल्याने नाही तर दिल्याने मोठा होतो हे त्यांनी आयुष्यभर त्यांच्या कृतीतून दाखवून दिले.
एकीकडे वैद्यकीय पेशाच्या माध्यमातून शब्दशः हजारो गोर-गरिबांचे प्राण वाचवणारे माझे बाबा दुसरीकडे सुट्ट्यात आम्हा भावंडासह आणि मित्रमंडळीसह नाटक बसवायचे. आम्हा बच्चे कंपनीशी एकरूप होताना त्यांनी कधीही आपल्या ज्येष्ठत्वाची झूल अंगावर पांघरली नाही. सुनील गावसकर, थॉमसन इत्यादींच्या व्हिडिओ कॅसेट पाहून ते क्रिकेट शिकले. इतक्यावरच न थांबता त्यांनी नगरला क्रिकेटची एक टीमच तयार केली. या टीमने क्रिकेटमधील अनेक महत्त्वपूर्ण पारितोषिकेही पटकावली.
या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडीविषयी फारसे काही लिहिले नाही पण आमच्यावर त्यांचे ते संस्कार आपसूक झाले आहेत. धाराशिवला असताना त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून नाटककार म्हणून ओळख मिळवली होती. मला तिथे त्यांनी शेरलॉक होम्सच्या नाटकाच्या माध्यमातून स्टेज करेज दिले. सिव्हिल सर्जन डॉक्टर गायकवाड यांनी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धामधील बॅडमटन फायनल जकणारे, अशीही त्यांची ओळख आहे.
बारावीच्या वर्गात असताना माझ्या शैक्षणिक भूमिका चुकत गेल्या. मित्रांच्या संगतीने पुढे काय करायचे याचे धोरण मी बदलत गेलो. एका अपयशाने तर एकटाच रडत बसलो. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, की अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आयुष्यात कधीच रडायचे नाही. जे आहे त्याला धीराने सामोरे जायचे आणि आपले ध्येय साध्य करायचे. त्यांनी माझ्यावर कधीच कसली सक्ती केली नाही. मला पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि मी जे करीन त्याला पाठबा देत ते माझ्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले. कितीही बाका प्रसंग असला तरी कधीही खचायचे नाही, हार मानायची नाही याची शिकवण देणारे माझे बाबा हे या व्यवस्थेचे एक खंबीर आधार होते. त्यामुळेच त्यांनी ज्यांना ज्यांना उभे केले असे असंख्य समाजबांधव आज त्यांची देवासारखी पूजा घालतात.
माझी आई ही सुद्धा मायेचा सागर होती. तिला आम्ही सगळे ‘माई’ म्हणत असू! माई नावाप्रमाणेच मायाळू होती. एक छान शुश्रुषा जाणणारी आणि नेहमी बाबासोबत खंबीरपणे उभी राहणारी ही माउली आमच्या कुटुंबासाठी समईच्या ज्योतीप्रमाणे तेवत राहिली. अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर प्रशासक असूनही बाबांनी माझ्यावर, माईवर निरातिशय प्रेम केले. आमच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. वेळोवेळी भावनिक आधार दिला.
ते नेहमी म्हणायचे, ‘या समाजाप्रती माझे देणे आहे.’ ते चुकते करण्यासाठी त्यांनी चळवळीची सुरूवात केली. वयाच्या पंवविसाव्या वर्षापासूनच त्यांनी सामाजिक बांधिलकीतून उतराई होण्याचा प्रयत्न केला. आपली नोकरी आणि प्रशासनातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतही त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे अनेकांना मार्गदर्शन केले. आपल्या मर्यादा आणि सामर्थ्य यांची त्यांना उत्तम जाण होती. त्यांनी नगरमध्ये जो भव्य मेळावा घेतला आणि एक मोठे परिवर्तन घडवून आणले त्याचा साक्षीदार तर उभा महाराष्ट्र आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील काही भाग मांडला आहे. सांगण्यासारखे अजून बरेच काही आहे. बाबांनी या आठवणी शब्दबद्ध केल्या. त्या पुस्तकरूपाने येताना दुर्देवाने ते आज आपल्यात नाहीत. तरीही हे लेखन निश्चितपणे आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून ते कायम आपल्या सोबत असणार आहेत. त्यामुळे आमचे कुटुंबीय, समाज आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. ‘चपराक प्रकाशन’ने या पुस्तकाची निर्मिती अतिशय दर्जेदार स्वरूपात केली आहे. आपण सर्व वाचक याचे स्वागत कराल अशी अपेक्षा आहे.
– विवेक लक्ष्मण देगलूरकर,पुणे
माझ्या आठवणीतले डॉक्टर साहेब

माझ्या लहानपणापासून डॉक्टर देगलूरकर साहेब एक आदर्श म्हणून माझ्या डोळ्यासमोर होते. त्यांचे विचार, सामाजिक तळमळ, दिलखुलास व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व हे सर्व काही नवीन पिढीला व माझ्यासारख्या असंख्य तरुणांना प्रेरणादायी आहे. त्यांच्याशी माझा पहिला जास्त जवळचा संबंध मी इंजिनियरींगला छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे असताना आला. ते संभाजीनगरमध्ये आल्यावर मला शोधत भेटायला यायचे, सर्व प्रकारची मदत करायचे. त्यावेळी त्यांच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर खूप प्रभाव पडायचा. त्यांनी जसं कष्ट करुन एमबीबीएस, एमएस केलं तसं आपणही उत्कृष्टदृष्ट्या अभियंता बनून क्लास वन ऑफिसर बनलं पाहिजे व नंतर समाजासाठी त्यांच्या सारखंच काम केलं पाहिजे असा विडाच मी उचलला. त्यांच्या प्रेरणेतून मी अभियांत्रिकी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण तर झालोच पण यूपीएससीची सीडीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन आर्मी ऑफिसर झालो.
जेव्हा जेव्हा मी सुट्टीवर यायचो तेव्हा तेव्हा मी आवर्जून त्यांची भेट घेत होतो. त्यांची बोलण्याची, वागण्याची कला, विविध विषयांवर असलेले ज्ञान व सामाजिक तळमळ याचा प्रचंड प्रभाव माझ्या मनावर बिंबलेला आहे. पुण्यामध्ये माझी बदली झाल्यावर मी सतत त्यांची भेट घेत होतो. डॉक्टर साहेबही वेळ काढून माझ्या घरी मला भेटण्यासाठी येत असत. अगदी त्यांच्या देहावसनाच्या पंधरा दिवस अगोदर ते पूर्ण दिवस माझ्या घरी होते. आमची विविध विषयांवर चर्चा होत असे. ते मला सतत म्हणायचे की, तुझ्यासारखे चांगल्या विचारांचे लोक / शासकीय अधिकारी यांनी पुढाकार घेऊन आपल्या समाजाला पुढे आणले पाहिजे. मला कधीही वाटले नाही की त्यांना एवढ्या लवकर देवाज्ञा होईल.
परंतु दुर्दैवाने आपल्या समाजाने एक आदर्श व्यक्ती गमावली आहे. डॉक्टर साहेबांना वाटायचं की, समाजातील अंधश्रद्धा, अडाणीपणा, गुन्हेगारी प्रवृत्ती, भेदभाव मिटून समाजाने एक सुशिक्षित, प्रगत व सधन व्यवस्थेकडे वाटचाल केली पाहिजे.
आपला समाज दगड फोडून देव निर्माण करतो. देवाचा जर ‘बाप’ कवा निर्माता कोण असेल तर ‘वडार’ आहे, हे माझे ठाम मत आहे परंतु आपल्या समाजाला माणसातला देव ओळखता येत नाही. डॉ. देगलूरकर यांचे स्थान सदैव वडार समाजाचा आश्वासक प्रवर्तक म्हणून इतिहासात नोंदले जाईल, यात काही शंका नाही.
-श्री कर्नल ऋषिकेश भानुदासराव धोत्रे
भारतीय सैन्यदल अधिकारी
विचार व ज्ञानाचा दिवा तेवत राहील

शोषित, वंचित, अशिक्षित, दारिद्य्र असलेल्या समाजात जन्माला येणं हाच एक शाप मानला जायचा. अशा समाजात जन्मलेले परंतु आपल्या कर्तृत्वाने घडलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर. त्यांच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने मनोगत लिहिण्याची संधी मिळणं हेच माझं मोठं भाग्य आहे. माझ्यासाठी ते नेहमीच गुरु, मार्गदर्शक व आदर्श राहिले आहेत. त्यांच्या या आत्मचरित्रामुळे येणाऱ्या पिढीला सदैव मार्गदर्शन मिळेल यात काही शंका नाही.
कुटुंबात शिक्षणाचा लवलेशही नसताना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणं, डॉक्टर होणं, सर्जन होणं व जाणता, उच्चपदस्थ, प्रशासकीय अधिकारी होणं हे त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता व कष्टामुळे शक्य झालं. आज आपण ‘गुगल’चे महत्त्व जाणतो पण आमच्यासाठी अगदी लहानपणापासून ते ‘गुगल’ होते. शिक्षण, साहित्य, क्रीडा, नाटक, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रांबद्दल वाचन व ज्ञान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे ‘डॉक्टर काका’. त्यांचा सहवास म्हणजे शारदीय चांदण्याचं सुख होतं जे मला शेवटपर्यंत लाभलं. ही देवांनी माझ्यावर केलेली विशेष कृपा.
माई आंटी व काका यांना नेहमी समाजाच्या प्रगतीची व हिताची काळजी असायची. आपला समाज फक्त साक्षर होऊन उपयोगाचे नाही तर शिक्षितपण झाला पाहिजे, विचार करण्याची क्षमता वाढली पाहिजे, राहणीमान उंचावले पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं. आज त्यांनी भौतिक जगाचा निरोप घेतला असला तरी आपल्या विचारांमध्ये ते नेहमीच जिवंत राहतील. येणाऱ्या पिढीला या पुस्तकरुपी विचारांनी नेहमीच प्रेरणा देतील व मार्गदर्शन करत राहतील.
आज त्यांचे चिरंजीव विवेक देगलूरकर यांनी ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यमातून हे पुस्तक छापून माईंचं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्यांच्या आत्मचरित्रामुळे विचारांचा व ज्ञानाचा दिवा कायम तेवत राहील हा माझा विश्वास आहे.
वी विल ऑलवेज मिस यू काका ॲन्ड माई आँटी.
– शितलकुमार जाधव
सहाय्यक संचालक,
आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य
‘चपराक’ प्रकाशित ‘ओड आणि ओढ’ या स्व. डॉ. देगलूरकरांच्या आत्मचरित्राची पूर्वनोंदणी करण्यासाठी संपर्क व्हाट्सएप्प क्र. ७०५७२९२०९२