कलियुगातील भावी पिढीची पाळंमुळं मजबूत करणारं पुस्तक – इंजि. रिठे राजेश चंद्रकांत

प्रति,
श्री.नानासाहेब खर्डे सर,
सेवानिवृत्त उप कार्यकारी अभियंता,
जलसंपदा विभाग , महाराष्ट्र शासन.

आ. महोदय,
नमस्कार.
आपले पहिलेवहिले *पाळंमुळं* हे पुस्तक वाचून नुकतेच पूर्ण झाले.आपली सुकन्या सौ.धनश्री विजय थोरात यांनी म्हटल्याप्रमाणे ; ही कथा वाचकांची कहानी आहे , हे वाचकांना जाणवेल , ही गोष्ट किंबहुना भाकित माझ्या बाबतीत १०० % खरे झाले आहे.पहिल्या पानापासून ते शेवटच्या पान क्रमांक ३१२ पर्यंत मी तुमच्या मागेच जीवनप्रवास करत असल्याचे जाणवले.त्यामुळे मी ही माझ्या जीवनाचा नुकतेच ५० वर्षांचा प्रवास तर केलाच आणि लक्षणीय बाब म्हणजे अनेक काळांपासून माझ्या मनात घोळत असलेल्या आत्मचरित्र लिहिण्याच्या विचारांना चालना व दिशा मिळाली.*आपण आपला आयुष्यपट शब्दांच्या जोरावर अतिशय प्रभावीपणे जगासमोर मांडला असून मला खात्री आहे की ; माझ्यासारखेच अनेक जणांचेही डोळे पाणावले असतील.वास्तविक पाहता , हेच आपल्या लेखणीचे यश आहे.*

आपला (सुर्या प्रकल्प : सन १९८३ ) व माझाही (भातसा प्रकल्प : सन २००१ ) शासन सेवेतील आरंभ मुंबईसाठी जीवनवाहिनी असलेल्या ठाणे जिल्ह्यातून झाला असल्याने सुरवातीपासूनच अभियंता व वाचक या दुहेरी भूमिकेतून पुस्तक वाचण्याचा एक औरच आनंद अनुभवला व तो शेवटच्या पानापर्यंत टिकला , हे यानिमित्ताने आवर्जून नमूद करावेसे वाटते.

आपल्या पुस्तकाचे अप्रतिम वटवृक्षाचे मुखपृष्ठ , मलपृष्ठावर डॉ संजय बेलसरे सरांचे अभिप्राय , ज्येष्ठ विचारवंत श्री.सोपानराव देशमुख सरांची प्रस्तावना , उत्सुकता वाढवणारी व ३१२ पानातील भाषाशैली तसेच आई – दादा – बाई ही अतिशय छान दिलेली शीर्षके , त्यानुषंगिक चित्रे इत्यादींच्या माध्यमातून *एक उत्तम साहित्य कृतीची निर्मिती झाल्याचे जाणवले.*

आपण व्यापक जनहितार्थ केलेली कामे व पुस्तकात नमूद अनेक प्रसंग माझ्याही जीवनानुसार असल्याने आपला प्रदीर्घ अनुभव व माझा छोटेखानी २८ वर्षांचा अनुभव हा बहुतांशी साधर्म्य दर्शविणारा असल्याने पुस्तक वाचताना *आपण एकाच बोटीतील सहप्रवासी असल्याचे पदोपदी जाणवले व वाचनाची उत्कंठा क्षणोक्षणी वाढतच गेली.*

पुस्तकातून उलगडलेले अनेक जीवन पैल्लू वाचकांपर्यंत पोहोचलेच असतील , या तिळमात्र शंका नाही.*त्यामुळेच यातील हृदयाला भिडलेली काही वाक्ये नमूद करावीशी वाटतात.*

१] जगात अन्नाइतकी महत्वाची कुठलीच गोष्ट नाही , याची मला जाणीव झाली. (पान क्रमांक ७६)

२] फरशीवर वर्तमानपत्राच्या कागद पसरवून त्यावर लाडू आणि गोटा यांची भेट घडवून आणली.यामुळे लाडू तुकड्या तुकड्यांच्या रुपानं मी भक्षण केला.पण एकही लाडू मात्र फेकून दिला नाही.(पान क्रमांक ७९)

३] माणूस आशेवर जगतो.(पान क्रमांक ८१)

४] घरच्या जेवणापेक्षा कोल्हापूरला खानावळीचं जेवण निश्चितच चवदार होतं.(पान क्रमांक ९५)

५] आयुष्याच्या वैराण वाटेवरील रणरणत्या उन्हात सावली देणारं हक्काचं पहिलं झाड वार्धक्याने वरून गेलं.(पान क्रमांक १०३)

पाळंमुळं

६] एखाद काम हौस म्हणून आवडीनं करत असू तर थकवा येत नाही.कंटाळा येत नाही.येणा-या आव्हानांना तोंड देत पूर्णत्वाकडे जाता येत हे खरं!
(पान क्रमांक १०८)

७] बालमनावर झालेले संस्कार, संस्कारक्षम वयात आलेले अनुभव, याचा मोठा परिणाम व्यक्तिच्या मनोबळावर, कर्तुत्वावर सरतेशेवटी त्याच्या जगण्यावर होत असतो.(पान क्रमांक १०९)

८] कितीही आणि कोणताही गुन्हा करा.तो सिध्द होईल पण त्याला शिक्षा होणार नाही असं एकमेव कोर्ट म्हणजे *आई-वडील*(पान क्रमांक २२०)

९] दादांनी मला इंजिनिअर करण्याचा निश्चय करून जीवापाड मोठं ओझं पेलण्याची तयारी केली.(पान क्रमांक २८२)

१०] संकटं आपल्याला अधिक सक्षम करण्यासाठी येतात, हेच खरं!अर्थातच, या कठीण काळात आपल्याच माणसांची नव्याने ओळख होते.(पान क्रमांक ३१०)

आपण पुस्तकातून व्यक्त केलेले ग्रामीण जीवन , संघर्ष, मैत्री , शिक्षण, परिस्थिती , लोकव्यवहार , नाती-गोती , चिकाटी व जिज्ञासू वृत्ती , आई-वडील व इतरांप्रतीचा आदर , सुख-दुःखाचे प्रसंग,गंमतशीर प्रसंग, शासकीय अनुभव , लोकप्रतिनिधींचा सहवास व मार्गदर्शन , मान – अपमान – फटफजिती- गोंधळलेली परिस्थिती
इत्यादी सर्वच गोष्टी वाचक म्हणून खिळवून ठेवतात.तसेच प्रत्येक पानानंतर पुढील पानावर काय असेल , हे वाचण्याची उत्कंठता वाढते.

आपले हे पुस्तक अभियंत्यांसह इतरही अनेकांना एक मार्गदर्शक व दिशादर्शक म्हणुन उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे. पुस्तकातील भाषा शैली सोपी असल्याने वाचकांच्या निश्चितच पसंतीस पडेल. आपल्या पूर्वजांच्या कार्याचा आणि विचाराचा समृद्ध वारसा आपण जपला असल्याचे या पुस्तकातील कार्याद्वारे अधोरेखित होते.मी ही आपल्या पुस्तकाद्वारे नकळत लोटलेल्या ५० वर्षांचा जीवनपट तसेच गेल्या २८ वर्षांचा लोटलेला अभियांत्रिकी सेवेचा कालखंड पुन्हा नव्याने अनुभवला.शिवाय उर्वरित सेवेत सुद्धा अतिशय जोमाने शासन आणि पर्यायाने लोकहितार्थ काम करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. त्यासाठी आपले आभार मानतो व अभिनंदन ही करतो.*या पुस्तकामुळे येणा-या भावी पिढीची कलीयुगातील उत्कृष्ट माणूस होण्यासाठीची पाळंमुळं निश्चितच मजबूत होतील , याची मला खात्री वाटते.*

*जे सत्य सुंदर सर्वथा , आजन्म त्याचा ध्यास दे , यास अनुसरून आपल्या हातून व्यापक जनहितार्थ अनेक वर्ष यापुढेही कार्य होत राहो व अशाच प्रकारे आपल्या अनुभवाची संपन्नता आम्हा सर्वांना येथून पुढेही वाचण्याचा योग येवो, आपणास परमेश्वर आरोग्यदायी उदंड आयुष्य देवो,या सदिच्छासह थांबतो.*

धन्यवाद.
*जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय किसान !!!*
💧🌾💧🌾💧🌾💧🌾💧

आपला सहकारी,
इंजि. रिठे राजेश चंद्रकांत,
कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्ष,पुणे- १

(शनिवार,दि.२९ जून २०२४ , सकाळी ८.३० )

*!!सिंचनातून समृद्धीकडे!!*

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा