भरभक्कम सावल्यांचे अंधार झाले आणि
दिवसांचे लाईट लांबले लांब लांब
काळोखाला ख्यालीखुशाली फिजूल बोलून आलो
चूना जास्त झाला सोलली गेली
शहराच्या दाढेत माझी त्वचा
फुलपाखराचं वय लाभेल आणि
मी जगायला सुरु करेल जसं
चाळीसचा पास काढण्याआधी खूप जगू वाटत होतं
इच्छा तर होती स्वतःचा खडकवासला होईल
डंपगवर साचेबंद सौंदर्याचा थर आयुष्य
पेलवेल असं अस्तित्वही नाही सैरभैर मनाचं जडत्व
पळवाट आणि शोधूनही पळता येत नाही हा थकवा
सोडून बघता येत नाही ते लांब गेलेलं असतं आधीच
पकडून ठेवावं अशी वाळू नाही ह्या नदीजवळ
उब संपलेल्या दिवसांची गोष्ट लिहीत होतो
हे हात अजूनही गरम आहेत तुझ्या हातात
एक खिडकी आणि मला अजूनही वाटतं
हे जग तितकंसं वाईट नाही इथून…
-कमलेश राजेंद्र महाले
नंदुरबार, 8999924218