एके दिवशी अत्रे जातिल दुसरे दिवशी पित्रे रडतिल – घनश्याम पाटील

Share this post on:

या महिन्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो म्हणजे प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर! त्यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवल्याचे पुढे आले आहे. यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर करणे, प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती असताना कार्यालयाचा ताबा, तेथील सुविधा, ऑडीसारख्या महागड्या गाड्या, आई-वडिलांच्या घटस्फोटाचा बनाव असे गंभीर विषय आहेत. त्यांच्या आईने तर हातात शस्त्र घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचे आणि जमिनी ताब्यात घेतल्याचेही काही व्हिडिओ प्रसारित झाले. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि पंतप्रधान कार्यालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यातील दोषींवर कारवाई होईल का? आणि झालीच तर नेमकी काय होईल? हे येणाऱ्या काळात दिसून येईलच.


मुळात हे प्रकरण बाहेर कसे आले हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. कुण्या पत्रकाराने शोधवार्ता आणून हे प्रकरण उघडकीस आणले नाही की, प्रशिक्षणार्थी आयएएस असलेल्या पूजा खेडकर यांच्या कुणा हितशत्रूने ही बातमी पसरवली नाही. वैभव कोकाट नावाच्या बीड जिल्ह्यातील एका तरूणानं समाजमाध्यमाचा आधार घेत एक पोस्ट ‘एक्स‌’वर केली आणि पूजा खेडकर चव्हाट्यावर आल्या. ‘खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावणे अयोग्य आहे पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या 2022 बॅचच्या आयएएस डॉ. पूजा खेडकर यांनी व्हीआयपी नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावून घेतला‌’ अशी पोस्ट वैभवनं ‘एक्स‌’वर शेअर केली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. समाजमाध्यमामुळं सरकारं येतात तशीच ती कोसळतात, राजाचा रंक होतो आणि रंकाचा राव हे आपण आजवर बघितलं होतंच. इथं या बाईचा भंडाफोड झाला आणि अशा आणखीही काही घटना घडल्यात का? याची सखोल चौकशी सुरु झाली.
हे प्रकरण पुढे इतकं टोकाला गेलं की, डॉ. पूजा यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक छळाचाही आरोप केला. उपजिल्हाधिकारी पदावरील एका बाईचा असा छळ होतोय आणि इतकं सगळं घडल्यावर तिला त्याची जाणीव होते म्हणून पुन्हा चर्चांना उधाण आलं. ‘स्त्री‌’ असल्याचा गैरफायदा कोण कोण अन कसा कसा घेतात यावरही चर्चा रंगली. आमदार पंकजा मुंडे यांनीही या बाईला ‘सर्वतोपरी‌’ सहकार्य करून खतपाणी घातल्याचा आरोप झाला. अर्थात, पंकजा मुंडे यांनी तो धुडकावून लावल्याने याचे राजकारण करणाऱ्यांनी ‘पूजा यांचा काका भाजपचा पदाधिकारी असल्याचा‌’ शोध लावून याचं खापर भारतीय जनता पक्षावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. देशात-राज्यात काहीही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे समर्थ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोषारोप करून राजकारण सुरु करण्याचा प्रघात गेली काही वर्षे पडला आहे. यावेळीही त्याला अपवाद ठरला नाही. ‘डॉ. पूजा खेडकर यांना यातून बाहेर पडण्याचा आता एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे भाजपात जाणे‌’ अशाही द्वेषपूर्ण प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला जेमतेम पन्नास दिवस राहिलेले असताना भाजपला अडचणीत आणण्यासाठी जे काही करता येईल ते करायचे असे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचे म्होरके शरदराव पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देत त्यांच्या अनेक दुष्मनांशीच ‘घरोबा‌’ करणारे उद्धव ठाकरे आणि लोकसभा निवडणुकीत व्हेंटिलेटरवरून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट झालेले काँग्रेसवाले यांनी भाजपच्या विरूद्ध रणशिंग फुंकले आहे.
डॉ. पूजा खेडकर या कवा त्यांच्या ठिकाणी आणखी कोणी दुर्दैवाने जर ब्राह्मण असता तर एव्हाना सगळीकडून महाराष्ट्र पेटला असता. ‘आम्ही जातीयवाद करत नाही‌’, म्हणून सतत जातीयवादी राजकारण करणाऱ्या मनोज जरांगे यांचे उदाहरण आपल्या समोर आहेच. गेल्या काही काळात जातीय अस्मिता इतक्या टोकदार झाल्यात की त्या थोपवणे आता भल्याभल्यांच्या हातात राहिले नाही. सुरुवातीला निर्भया प्रकरणावरून न्याय मागणारे मराठा मोर्चे आरक्षणावर गेले आणि त्याचेही राजकारण करून केवळ भाजपला विरोध इथवर येऊन ठेपले आहेत. शांततेच्या मार्गाने लाखोंचे मोर्चे काढणाऱ्यांनी भाजप आणि फडणवीसांना वेठीला धरून द्वेषपूर्ण, आक्रमक राजकारण सुरू केले. ‘महाराष्ट्रात भाजपची एकही जागा येऊ देणार नाही‌’ इथपर्यंतच्या भूमिका घेण्यात आल्या आणि वर ‘आम्ही राजकारण करत नाही‌’ हे पालुपद सुरुच ठेवण्यात आले.
पूजा खेडकर असोत कवा मनोज जरांगे यांचे राजकारण असो आपली व्यवस्था कुजत चालली आहे. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता ॥‌’ असं जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याचा आपणा सर्वांना सोयीस्कर विसर पडलाय. काय खरं आणि काय खोटं याचा निवाडा आपलं मनच करत असतं. त्यामुळं बहुमत जरी असत्याच्या बाजूनं असलं तरी मनाविरुद्ध जाऊन ते मानू नये, हा संत तुकाराम महाराजांचा विचार आम्ही पायदळी तुडवला आहे. मराठा समाजातील मुलांच्या वाट्याला दारिद्य्र, उपेक्षा, अवहेलना येते का? तर निश्चित येते! पण त्यासाठी कुणाला अकारण वेठीस धरण्याचे राजकारण करु नये. ही अवस्था फक्त मराठा समाजाचीच नाही तर समाजातील अनेक घटक, अनेक जाती या सगळ्या अरिष्टातून जात आहेत. त्या प्रत्येकाच्या मनात आपल्यावर अन्याय होतोय, ही भावना प्रबळ होते आणि मग आपले राजकारणी त्याचा बरोबर फायदा घेतात. ‘आर्थिक निकषानुसार आरक्षण‌’ ही न्याय मागणी अनेकांनी अनेकदा केलीय. ती कशी अशास्त्रीय आहे आणि सामाजिक मागासलेपण कसे महत्त्वाचे आहे यावरही बरेच चतन झालेय. अशा सगळ्या परिस्थितीत सगळ्यांचे समाधान करणे राज्यकर्त्यांना शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरीही राजकारण तापवले जाते. शरद पवार गटाने आजवर अनेकदा सभागृहात एक आणि बाहेर वेगळीच भूमिका घेऊन लोकाची दिशाभूल केली आहे. त्याविषयी त्यांना जाब विचारण्याऐवजी जे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक भूमिका घेत आहेत त्यांच्याच मागे आपण लागलोय. इतकेच कशाला, मराठा समाजाच्या ‘मूक मोर्चां‌’ना ‘मुका मोर्चा‌’ म्हणून टगलटवाळी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नादाला लागून आपण त्यांची साथ देत आहोत.
पूजा खेडकर यांचे केडर बदलले जाईल पण त्यांच्यावर कारवाई काय होणार हे बघितले पाहिजे. जसजशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तसतसे नवनवे विषय पुढे येत जातील. त्यात आपल्याला अशा प्रकरणांचा विसर पडेल. या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनोज जरांगे यांच्यात भरता येईल तितकी हवा भरली जाईल. एकदा का या निवडणुका पार पडल्या की महाराष्ट्रात कोणी मनोज जरांगे होते हेही यांना आठवणार नाही. आचार्य अत्रे यांच्या मृत्युनंतर लोककवी मनमोहन नातू यांनी चार ओळी लिहिल्या होत्या. त्या अशा होत्या –
एके दिवशी अत्रे जातिल
दुसरे दिवशी पित्रे रडतिल
आणि कुणीसा नवा विदूषक
पुुन्हा जगाची बगल खाजविल
याचा अर्थ अत्रे आज गेले. त्यांच्याशी संबंधित लोक उद्या रडतील आणि पुन्हा एखादा अत्रे यांच्यासारखा नवा विदूषक पुढे येईल आणि लोकाचे रंजन करेल. अशा अनेक पूजा खेडकर आणि अनेक मनोज जरांगे यापूर्वी आलेत आणि पुढेही येतील. त्यांनी काय चांगलं-वाईट केलं हे मात्र काळाच्या पटलावर नोंदवलं जाईल. आपली सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवून लोकानी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान केलं तरी यातील अनेकांचे चेहरे आणि मुखवटे दिसून येतील. या सगळ्या हलाहलात सामान्य माणसाचे भले व्हावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.

-घनश्याम पाटील 

७०५७२९२०९२

(संपादकीय लेख ‘साहित्य चपराक’ ऑगस्ट २०२४)

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!