आईच्या म्हणी : एक समृद्ध दालन- डॉ. शकुंतला काळे

Share this post on:

भाषेचे सैांदर्य अनेक अंगांनी बहरतं, समृद्ध होतं ते त्यातील शब्दप्रयोग, म्हणी, वाकप्रचार यांच्या वापराने. त्यात म्हणींचा वापर हा तर भाषिक समृद्धीचा परमबिंदू आहे. म्हणींचा वापर करत वारसा निर्माण करण्याचे काम जुन्या पिढीतील मंडळींनी केले आहे. भावभावनांचा आविष्कार, रूढी, परंपरा, लोकजीवन, त्या-त्या भागातील संस्कृती, मूल्ये, जगण्यातला विरोधाभास, प्रकृृती आणि विकृती या साऱ्याचं प्रतिबिंब म्हणींच्या वापरातून ध्वनीत होतं. म्हणींमध्ये विनासायास जुळलेला यमक भाषेच्या नजाकतीत अजून भर घालतो आणि थोड्याशा शब्दात किती मोठा आशय आढळतो याचा साक्षात्कार म्हणींमूधन प्रत्ययास येतो.

एखादी गोष्ट पाच-दहा मिनिटे समजावून सांगून सुद्धा नीटसा अर्थबोध होत नाही मात्र तेच एखादी चपखल म्हण वापरली तर अर्थ हृदयातील अंतरात जाऊन पोहोचतो. संभाषण, भाषण, संवाद यांचा उत्कट परिणाम साधण्याचे म्हणी हे एक प्रभावी अस्त्र आहे आणि आपली मराठी भाषा ही अशा म्हणींच्या आभूषणांनी सालंकृत आहे.

मराठी भाषेच्या अनेक प्रादेशिक बोली आहेत. दर दहा मैलावर भाषा बदलते, असे म्हणतात. प्रत्येक प्रदेशागणिक भाषा वापरण्याच्या लकबी, विशिष्ट बोली, त्या बोलीत वापरले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण शब्द, वाकप्रचार, म्हणी यातून तेथील समाजजीवनाचे, भाषिक आदानप्रदानाचे प्रातिनिधिक स्वरूपात दर्शन घडते. तेथील लोकजीवन, संस्कृती, परंपरा, जगण्याचे आयामही त्यातून निदर्शनास येतात. मराठी भाषा ही तर अशा बोलीभाषांनी श्रीमंत झाली आहे. या श्रीमंतीचा प्रत्यय ग्रामीण भागात जास्त प्रमाणात येतो.

जुन्या पिढीतील मंडळी म्हणींचा वापर मुक्तपणे करायची ती भाषा ठसकेबाज तर असायचीच शिवाय परखडही असायची. आजही याचे दर्शन थोड्याफार प्रमाणात घडतेच घडते.

पुणे जिल्ह्यातीलद आंबेगाव तालुक्यात घोडेगावात मी लहानाची मोठी झाले. माझ्या आईचे माहेरही जवळच्याच नारोडी गावातील. जाणतं शहाणपण आणि अचूक शब्दफेक हे आईचं वैशिष्ट्य. म्हणी आणि वाकप्रचारांचा पुरेपूर वापर तिच्या भाषेत असायचा. तसं पाहिलं तर ती जुन्या पिढीतील अशिक्षित महिला होती पण तिच्या तोंडून सतत म्हणी आणि वाकप्रचारांची बरसात  असायची. ती ऐकतच मी मोठी झाले. भावनांचा सच्चेपणा, परखडता आणि म्हणींची अचूकता ही तिच्या भाषेची वैशिष्ट्ये आजही मला जाणवतात. माझा भाषेचा प्रांत त्यामुळे समृद्ध झाला.

तिचं जणग्याचं तत्त्व साधं-सोपं असायचं. कुणाकडे हात पसरणे तिला अजिबात आवडायचे नाही. आपल्या कमाईचे साधे का असेना, फाटके कपडे का असेनात पण ते आपले असतात. त्यात लाचारी नाही, स्वाभिमान आहे. ‌‘चिंधं रहावं पण मिंध राहू नये!’

गावात एखादी मयत झाली तर सारे नातेवाईक गोळा होतात. वियोगाचे दुःख असते. रडारड होतेच पण कितीही कुणी दुःख केलं, उपाशी राहिलं तरी सरणावर एकटंच जायचं असतं. अशावेळी ती म्हणायची, ‌‘किती घातलं गळं, तरी सरणी एकटंच जळं!’

उधारी, उसनवारी तिला आवडायची नाही. जेवढी कमाई तेवढ्यात गरजा असाव्यात कारण ‌‘उधारीचं खातं, सव्वा हात रितं.’

स्वतः कष्ट करून जगावं, कुणाच्या मेहेरबानीवर जगू नये. ताठ मानेनं जगता आलं पाहिजे. कधी उदरनिर्वाहासाठी एखाद्याकडून कर्ज घेतलं तर ते फेडताही येतं पण कुणाकडून फुकट काही घेऊ नये कारण ‌‘रिन फिटतं पण हिन फिटत नाही’, असा तिचा विचार होता.

आपल्या गरिबीचं गाऱ्हाणं सारखं कुणाकडे सांगू नये. नाहीतर लोक म्हणतात, ‌‘नित मढं, त्याला कोण रडं?’

पाण्याचं महत्त्व आपण सतत सांगत असतो. पाणी वाचवा, जपून वापरा यासाठी कितीतरी जाणीव जागृती मोहिमा हाती घेतल्या जातात. त्याकाळीही माझ्या आईला पाणी सांडलेलं, वाया गेलेलं अजिबात आवडायचं नाही. एकवेळ तेल सांडलं तरी चालेल पण पाणी सांडता कामा नये कारण उन्हाळ्यात पाण्यासाठी किती वणवण करावी लागते? हे तिनं अनुभवलेलं होतं. म्हणूनच ती म्हणायची, ‌‘तेल सांडी असावी पण पाणी सांडी नसावी.’

जेवायला जे केलेलं असायचं त्याऐवजी मला नेहमी दुसरंच खावसं वाटायचं आणि मी तसं मागितलं की तिची ठरलेली म्हण असायची, ‌‘असेल ते इटवा, नसेल ते पाठवा!’

पोट भरलेलं असलं तरी मला काहीतरी चरायला लागायचं. अशावेळेला ती हमखास म्हणायची, ‌‘पोटात नाही वाव अन जीव करतो खाव खाव!’

खाण्याच्या काही गोष्टींच्या जोड्या ठरलेल्या असतात. उदाहरणार्थ, पुरणपोळी गुळवणीबरोबर खायची. आमटी भाताबरोबर खायची पण मला गोड आवडायचं नाही. मग मी पुरणपोळी आमटीबरोबर खायचे की आलीच आईची म्हण, ‌‘गवत्या बसल्या जेवाया अन्‌‍ ताकासंगे शेवाया!’ खाण्याची पद्धत माहीत नसलेला अडाणी माणूस रीतिप्रमाणे न खाता वेगळ्या पद्धतीने खाणार.

लग्नघरी पंगत असायची. वाढपी आग्रह करून वाढायचे पण काही काही माणसं वरवर नको नको म्हणायची पण एकही वाढी चुकवायची नाही. मग आईचा टोमणा, ‌‘नाय नाय म्हणायचं अन पायलीचं हाणायचं!’

काही लोक जरासं काही दुखलं तरी कण्हत-कुथत पडून राहतात पण जेवायची वेळ झाली की मात्र उठून पोटभर जेवतात. अशावेळी आईची म्हण आपसूकच बाहेर यायची, ‌‘कण्हत कुथत अन मलिद्याला उठत!’

काही लोकांना जेवणावळीत वाढायची फार हौस असते. तेच स्वतःकडे जेवण असेल तर हात आखडला जातो. आईचं निरीक्षण जबरदस्त. असं काही पाहिलं की ती लगेच टोला लगावायची, ‌‘लोकाची कढी अन धावू धावू वाढी.’

खेडेगावात गोडधोड सणासुदीलाच असायचं आणि ज्याने त्याने आपापल्या ऐपतीप्रमाणे सण साजरा करायचा असतो. काही लोक एरवी गोडधोड करून खातील मात्र सणाच्या दिवशी साधं-सुधं जेवण जेवतील. अशा लोकाबाबत आईचं म्हणणं, ‌‘सणी घुगऱ्या अन आवशी पोळ्या.’

अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्न पाहिजे तेवढंच वाढून घ्यावं आणि हवं तेवढंच खावं! पण ताटात टाकू नये. अन्न वाया घालवू नये कारण अन्न मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. एकवेळ अन्न खाऊन वजनदार झालं तरी चालेल पण अन्न टाकून माजलेपण करू नये असा तिचा ठाम आग्रह असायचा. ‌‘खाऊन माजावं पण टाकून माजू नये’ असं ती मला सतत सांगायची.

स्वतःच्या कमाईऐवजी दुसऱ्याच्या जिवावर खाणाऱ्या लोकाना कदर नसते. त्याचा तिला प्रचंड राग यायचा. अशा लोकाना स्वस्ताई, महागाई याने काहीही फरक पडत नाही. काटकसर कशाशी खातात हेही त्यांना माहीत नसतं. म्हणून अशा लोकाबाबत तिच्या तोंडून सहजच म्हण बाहेर यायची, ती म्हणजे ‌‘हरामाचं खाई, त्याला स्वस्त-महाग काई!’

कोणतीही गोष्ट जपून ठेवावी, राखून वापरावी कारण साध्या गोष्टीही कठीण परिस्थितीत उपयोगी पडतात. तिचं म्हणणं असायचं, ‌‘भूकेला केळी अन वनवासाला सीताफळी.’

एखाद्या समारंभात, कार्यक्रमात कुणा व्यक्तिला मोठेपण देऊ इच्छितात किंवा सत्कार करू इच्छितात अशा वेळी ती व्यक्ती उगीचच वरवर ‌‘कशाला? कशाला?’ म्हणत असते. मनातून मात्र तिला ते मोठेपण हवे असते. अशा व्यक्तिला ती म्हणायची, ‌‘मान घे मुड्या तर मारतंय उड्या!’

काही लोक फक्त बोलण्यातच पटाईत असतात पण प्रत्यक्षात कृती मात्र काहीच नसते. अशी कुणी शेजारीण तिच्याकडे आली तर ती टोमणा देणारच, ‌‘बोलायला पट राघू अन्‌‍ कामाला आग लागू!’

आई स्वच्छताप्रिय, अंगणात तिला कचरा अजिबात आवडायचा नाही. ती म्हणायची, घर आतून कसं आहे हे अंगणावरून कळतं. ‌‘आंगण सांगतं घराची कळा!’

शेतावर कधी सगळ्या जणी एकत्र जेवायला बसल्यावर त्यातल्या एखाद्या बाईला विशिष्ट पदार्थ हवा असतो पण त्या पदार्थाचं जर तिला पथ्यं असेल तर मग मात्र पंचाईत होते. मात्र तो पदार्थ खूप आवडीचा असतो. त्याचा मोहही सोडवत नाही. आईला ते कळायचं. अशावेळी ती म्हणायची, ‌‘मी नाही खात पण माझा जीव त्यात!’

खेडेगावात कधी कीर्तन, प्रवचन असेल तर ती पर्वणीच असायची. अशावेळी ते ऐकायला सगळ्या बायका निघायच्या पण घरी राहणाऱ्या सूना, लेकींना हजार सूचना असायच्या. ‌‘झाक पाक कर,’ ‌‘मांजर दूध पिईल,’ ‌‘दार नीट लाव’ एक ना अनेक. आध्यात्मापेक्षा प्रपंचाचा मोह अधिक. अशा माझ्या चूलत काकी, आज्ज्या यांना आई दटावायची, बास झालं हो सासूबाई! ‌‘आवा चालली पंढरपूरा अन मडकी-गाडगी जतन करा.’

मला एखादा दागिणा करायचा असला तर पहिला मोडून द्यायचा अन मग दुसरा करायचा अशी माझी सवय. ते तिला अजिबात आवडायचं नाही. ती म्हणायची, अशाने आपला तोटा होतो अन सोनाराचा फायदा होतो. ‌‘मोड घड अन सोनाराची जोड.’

काही लोक फार नाजूकपणा करतात. जरा काही झालं की खूप मोठं आजारी असल्यासारखं वागतात. आईला वाटायचं एवढा नाजूकपणा काय कामाचा? ‌‘नाजूक जीव अन वागातं हिव’ असं ती त्या व्यक्तिला सुनवायची.

एखाद्या कुटुंबात सासू-सून, देणं-घेणं, आगत-स्वागत या बाबती सारख्याच असतात. म्हणजे सूनेनं सासूकडून शिकून घेतलेली वागायची पद्धत, उंबरठा ओलांडून आलेली सून जेव्हा उंबऱ्याच्या आत असणाऱ्या सासूसारखीच वागते तेव्हा ‌‘सासू तशी सून अन उंबऱ्या तुझा गुण’ ही म्हण आई वापरायचीच.

शेतकऱ्यांकडे बहुतेक सुगीच्या दिवसात माल विकला की थोडा फार पैसा हातात खेळता राहतो पण तो पैसा जपून वापरला पाहिजे. नाही तर पैसा आला की हवा तसा खर्च करायचा अन पैसा संपला की बोंब. पुन्हा ‌‘ये रे माझ्या मागल्या’ असं वागू नये असं तिचं म्हणणं असायचं. त्याला ती म्हणायची, ‌‘आसन तर दिवाळी नसन तर शिमगा!’

कुणाच्या उखाळ्या-पाकाळ्या काढत बसणाऱ्या बायकांना ती म्हणायची, यातून काही फायदा आहे का? ‌‘आपलं ठेवायचं झाकून अन दुसऱ्याचं बघायचं वाकून!’

अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नये, त्याने आपलेच कष्ट, वेळ वाया जातो. त्यातून लाभ काहीच होत नाही. ‌‘लाभ ना नफा अन चाल झपाझपा!’

आईला या म्हणी कशा सूचायच्या माहीत नाही. कदाचित तिने तिच्या पिढीतील इतरांकडून ऐकलेल्या असाव्यात वा तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीने तिला परखड आणि जास्त स्पष्टवक्ती केलं असावं. या म्हणींच्या माध्यमातून मात्र ती मानवी जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानावर नेमकेपणानं भाष्य करायची, असे मला वाटते. अशा कितीतरी म्हणी महाराष्ट्राच्या विविध बोलीभाषांत आहेत. कालौघात या म्हणी लोप पावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आईच्या स्मृतिंना उजाळा आणि या म्हणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

– डॉ. शकुंतला काळे

प्रसिद्धी ‘साहित्य चपराक’ जून २०२४

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!