परिवर्तनाची शक्ती देणारी वारी

महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे आणि तरी ते ‘महा राष्ट्र’ आहे. या महाराष्ट्राने समाजाच्या उद्धाराकरिता विचारांची पेरणी केली आहे. या मातीने अनेक विचारवंत दिले. या भूमीने या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला जसे अनेक क्रांतीकारक दिले त्याप्रमाणे समाजाचे उत्थान घडवण्यासाठी विचारवंत देखील दिला आहेत. या भूमीने सतत माणूसपणाचा विचार केला आहे. या मातीत जे उगवले होते त्यामागे विचारांची पेरणी हेच कारण आहे. पेरलेल्या विचारबीजांमुळे येथील भूमी अधिक समृद्ध झाली आहे. त्यामुळे येथील माणसं अधिक विचारप्रवण बनली होती. जे जे म्हणून चांगले आहे त्याचा स्वीकार करत या भूमीत सतत समतेचा लढा उभा राहिला आहे मात्र हा लढा म्हणजे लढाई नाही तर ती परिवर्तनाची वाट होती. येथील माणसांनी परिवर्तनाच्या वाटचालीत जे जे म्हणून चांगले आहे ते ते स्वीकारत आपला प्रवास सुरू ठेवला आहे. धर्मापासून आध्यात्मापर्यंत हे परिवर्तन घडवण्यात येथील मातीने प्रयत्न केले.


येथील समतेची लढाई जी लढली गेली त्याला जे बळ मिळाले त्यामागे येथील संत विचाराची पेरणी हेच मूळ कारण आहे हे लक्षात घ्यायला हवे. संतांनी सातशे साडेसातशे वर्षापूर्वी लढलेली लढाई ही माणसांसाठी होती. ती जात, धर्म, पंथाच्या पलीकडे होती. तीच परंपरा आजही या भूमीत पुढे जाते आहे. अनेक गोष्टी येथे घडल्या त्या चमत्कार वाटाव्यात इतक्या अद्वितीय आहेत असे म्हणावे लागेल. विनोबांच्या भूदान चळवळीने जगाला आश्चर्य वाटले होते. माणसं आपला स्वार्थ सोडून माणसांच्या उन्नतीसाठी पुढे आली होती. त्याचवेळी येथील मातीतील वारीची परंपरा ही देखील आश्चर्यकारक आहे. शेकडो वर्षाच्या पंरपरेतील या वारीत आजही लोक सतत चालत आहेत. ती पंरपरा आहे तशीच सुरू आहे. ज्या अर्थी ती पंरपरा शेकडो वर्ष टिकली आहे त्याचा अर्थ त्यात सत्त्व आहे. ती पंरपरा सत्त्वहीन असती तर केव्हाच संपली असती पण आज शिकल्यानंतर आणि विज्ञानाने क्रांती केल्यानंतरही लाखो लोक डोक्यावर समतेचा विचार घेऊन पुढे पुढे चालत आहेत. याचा अर्थ त्या परंपरेत बरेच काही सामावलेले आहे हे लक्षात घ्यायला हवे.

आपल्या हक्कासाठी लोक लढाया करतात हे जगाच्या इतिहासाने अनुभवले आहे. त्या हितासाठी रक्तपातही घडला आहे पण या मातीत देवाचे दर्शन व्हावे म्हणून लोकांनी लढा उभारला होता. जनमनात शहाणपण पेरणारे गुरूजी उपोषणाला बसले होते आणि अनेक विवेकवादी माणसं आपल्यातील भेद सोडून त्यामागे उभे राहिले होते. हे केवळ या मातीत घडले होते. या मातीने समतेचा लढा अधिक उत्तमतेने लढला आहे. या मातीने रक्त किती सांडले आणि काय मिळवले यापेक्षा या मातीने रक्ताशिवाय माणसांची मनं बदलवत परिवर्तनावर अधिक विश्वास ठेवला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीचे अनेकांना आकर्षण होते. आजही आपल्या पंरपरेतील वारीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अभ्यासक एकत्र येतात. वारीतील अनेक वैशिष्ट्यांचा आजही अभ्यास केला जातो. माणसं सतत आपले सर्व प्रकारचे अंहकार सोडून चालत आहेत. समर्पणाचा विचार या वारीतील प्रत्येकाच्या अंतःकरणात सामावलेला दिसतो आहे. वारीचा प्रत्येकाने विचार केला तर विविध अंगी अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.

 

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रीय संस्कृती म्हणून ज्या अनेक गोष्टींचा विचार केला जातो त्यात वारी ही एक महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे. कोणत्याही प्रकारचे निमंत्रण नाही, कोणत्याही प्रकारचा मानपान नाही. कोणत्याही प्रकारचा आग्रही नाही. अगदी कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास नसताना देखील लाखो लोक एकत्र येतात. पोलिसांचे संरक्षण नाही आणि कोणत्याही गोंधळाशिवाय अनेक दिवसांचा हा उत्सव अत्यंत नियोजनबद्ध सुरू असतो. अनेकांना आश्चर्य वाटावे असे हे व्यवस्थापन आहेच पण त्या पलीकडे या वारीत लाखो लोक सहभागी होताना आपले वय, वेदना विसरलेले दिसतात. त्याचवेळी ही माणसं नियमित पण वीस-पंचवीस किलोमीटर चालतात. तेही कोणत्या स्वार्थाशिवाय…! यात ही माणसं काय मिळवतात? असा प्रश्न अनेकांना पडतो; मात्र ही वारकरी मंडळी ज्या पद्धतीने हे सर्व श्रद्धेने आणि समर्पणाच्या वृत्तीने करत असतात. वारीने आपल्या सामाजिक परंपरेत देखील महत्त्वाचे परिर्वतन घडवले आहे. त्यामुळे वारीकडे बघताना व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या भूमीत सुरू असणार्‍या प्रत्येक परिवर्तनाच्या लढाईत संतांच्या विचारांचे बीज आहे हे सतत लक्षात घ्यायला लागते.
महाराष्ट्राला जी ओळख आहे त्यात ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात अनेक जातीचे संत जन्माला आले आहेत. त्या संतांनी येथील भूमी समृद्ध केली आहे. संतांनी आपल्या विचारपरंपरेत माणूस केंद्रस्थानी मानला. संतांनी समाजातील भेदाभेद संपुष्टात आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आपल्या संतांचा देवही एकच आहे. पंढरपूरचा पांडूरंग हाच त्याचा देव. पंढरीचा पांडूरंग हा अत्यंत साधा भोळा देव आहे. तो रंगाने सावळा आहे आणि तो सामान्यांना प्रिय आहे. त्या पांडूरंगाला भक्ती, उपासना करण्यासाठी काही सुद्धा लागत नाही. त्याला पानाफुलांची पूजा देखील प्रिय आहे. बहिनाबाई म्हणतात की,
सोन्यारुप्याने मढला मारवाड्याचा बालाजी
शेतकर्‍याचा इठोबा पानाफुलामध्ये राजी
अरे बालाजी-इठोबा दोन्ही एकच रे देव
श्रीमंतीने गरिबीने केला केला दुजाभाव
अशा पांडूरंगाची आराधना करण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. राज्याच्या कानाकोपर्‍यातून दिंड्या येत असतात. या वारीत येणारी माणसं म्हटलं तर अशिक्षित असण्याचे प्रमाण एकेकाळी खूप होते. लोक अशिक्षित आहेत म्हणून येतात असं म्हटले जात होते. आज मात्र सुशिक्षत असलेली माणसं देखील लाखोच्या घरात वारीत सहभागी होताना दिसत आहेत. ही वारी म्हटले तर इतकी सहज सोपी नाहीच. आपल्या गावावरून निघालेल्या दिंडीत लोक सहभागी होतात. खरंतर दिंड्याचे प्रमाणही गेली काही वर्षे वाढते आहे. ही माणसं सहभागी होतात ती संख्या बारा ते पंधरा लाख असते. खरंतर आपल्या समाजव्यवस्थेत शिक्षणाचे प्रमाण वाढल्यानंतर त्या सोबत आणखी काय वाढले आहे? असा प्रश्न केला तर त्यासोबत माणसांचा अहंकार वाढला आहे हे उत्तर येते. गावात नात्यातील लग्न असेल किंवा कोणताही कार्यक्रम असला तरी प्रत्येकाला निमंत्रण हवे असते. तेही निमंत्रण हे देखील मानापानाने हवे असते. असे निमंत्रण दिले गेले नाही तर माणसं नात्यातील कार्यक्रमाकडे देखील दुर्लक्ष करतात. माणसं स्वतःचा अहंकार नात्यात देखील विसरत नाहीत मात्र येथे लाखो लोक कोणत्याही निमंत्रणाशिवाय एकत्र येतात. वारीत आलेल्या कोणत्याही भाविकाला विचारले तरी त्याला कोणीही निमंत्रण दिलेले नसते. केवळ अंतरिक असलेल्या पांडूरंगाच्या ओढीने ही माणसं वारीत सहभागी होत असतात. वारीत सहभागी होणारी ही माणसं वयाचा विचार करत नाहीत. आजही वारीच्या चित्रावर नजर टाकली तर त्यात अनेक वयोवृद्ध माणसं सहभागी झालेली असतात. ही माणसं तशी फारसे अंतर चालू शकतील का? असा प्रश्न अनेकांना पडतो देखील मात्र आपले वय, आजारपण, वेदना विसरून ही वयोवृद्ध माणसं सतत चालत असतात. वारीतील वेळापत्रक हे म्हटले तर अत्यंत व्यग्रस्वरूपातील असते. सकाळी चार वाजता काकड आरती, दिवसभर भजन, अभंग, गवळणी म्हणत चालत राहणे, सायंकाळी हरीपाठ, रात्री कीर्तन आणि मग बारा वाजता झोपणे. हे सर्व घडत असताना कोणताही त्रास झाला आहे असे प्रसंग फारच अपवादाने समोर येतात. हे चालणे म्हणजे एक प्रकारची अंतरिक ओढ, प्रेरणा असते. ही ओढ काय असते असे जमलेल्या लाखो लोकांना विचारले तर त्याची ओढ असते फक्त पांडूरंगाच्या भेटीची आणि त्याचे दर्शन हीच त्यांची अंतरिक प्रेरणा असते. वारीत जेव्हा कोणी सहभागी होत असेल तेव्हा माणसं आपले सर्वच विसरून गेलेले असतात. वारीत सहभागी झालेली माणसं आपली श्रीमंती, गरिबी, जात, धर्म विसरून गेलेले असतात. वारीत सहभागी होणारा प्रत्येक माणूस हा समान असतो. गर्भश्रीमंत माणसं देखील पायीपायी चालत असतात. खरेतर त्यांच्याकडे सर्व सुखसुविधा चरणावर समर्पित होत असताना देखील ती माणसं सामान्य माणसांसारखे पायीपायी चालत असतात. त्यांच्या त्या चालण्यात कोठेच आपल्या श्रीमंतीचे दर्शन नसते. हा समतेचा विचार केवळ वारीत प्रतिबिंबीत झालेला दिसतो. त्याचवेळी माणसं आपली जात देखील विसरलेले असतात. वारीत सहभागी होणारा माणूस कोणत्या जातीचा आहे हे लक्षात येत नाही आणि कोणी त्याची दखलही घेत नाही. वारीने काय केले असा प्रश्न तर त्यातून सर्वाधिक मोठी गोष्ट घडली ती म्हणजे समता प्रस्थापित करण्यात वारकरी संप्रदाय अधिक आघाडीवर राहिला आहे. संतांनी या भूमीत जात-धर्माच्या भेदाच्या पलीकडे जात समतेचा विचार दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रभागेच्या वाळवंटावर लाखो लोक एकत्र येतात आणि त्यामागे जो भाव असतो तो तर कितीतरी महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. संत लिहितात…
यारे यारे सान थोर, अवघ्या जातीचे नारी नर
संत पंरपरेने येथील जाती व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी शूद्र समजलेल्या महिलांना देखील माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रदान केला आहे. हे अधिकार प्रदान करताना संतांनी त्यावेळी केलेली एका अर्थाने बंडखोरी होती. अर्थात संतांनी दिलेल्या विचाराने चालण्यासाठीची हिंमत वारीत मिळत असते. वारीत माणूस म्हणून अधिक विचार केला जातो. त्या पलीकडे फारसा विचार होत नाही. म्हणून वारी म्हणजे एका अर्थाने माणूस घडविणारी शाळा आहे. माणसाला जिवनाचे जे तत्त्वज्ञान महत्त्वाचे वाटते, जीवनात जे तत्त्व सापडायला हवे असे वाटते ते तत्त्व वारीच्या तत्त्वज्ञानात सामावलेले आहे. पंढरपूरच्या पांडूरंगाच्या दर्शनाची ओढ सामान्यांना होतीच मात्र जेव्हा ते दर्शन घडत नव्हते, पंढरपूरचा पांडूरग जेव्हा सामान्य माणसापासून दूर होता तेव्हा त्या पांडूरंगाच्या दर्शनासाठी याच भूमीत साने गुरूजींनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला आता पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली आहेत. केवळ पंढरपूरच्या पांडूरंगाचे दर्शन घडावे म्हणून उपोषण केले जाते. हजारो लोक त्यासाठी भूमिका घेतात. हे सारेच अनाकलनीय वाटते. दर्शनासाठीचा हा लढा अद्वितीयच म्हणायला हवा. एका दगडाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी लाखो लोक एकत्र येतात पण ती मूर्ती म्हणजे दगड नाही तर त्यात माणसांची श्रद्धा आहे. दुःखाचे हरण करण्याची शक्ती आहे. जीवनाला, जगण्याला उमेद देणारी भक्ती आहे. चळवळीला दिशा देणारे विचार आहेत. त्यामुळे येथील लढे उभारले गेले आहेत. आज पंढरपूरचा पांडूरंग लाखो भाविकांसाठी खुला झाला आहे मात्र तो इतक्या सहजतेने नाही हे लक्षात घ्यायला हवे. येथील देवतानी सामान्यांना जगण्याची शक्ती भरलेली आहे हे लक्षात घ्यायला हवे.
पंढरपूरचा दर्शनाचा लढा जेव्हा अभ्यासला जातो तेव्हा तो भाव आहे तोच आज प्रत्येक वारकर्‍याच्या मनात सामावलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची लढाई थांबली होती. प्रत्यक्ष स्वातंत्र्य लवकरच मिळणार होते मात्र तरीसुद्धा त्या राजकीय स्वातंत्र्याला खरंच अर्थ होता का? याचा विचार समाजातील अनेक धुरीन करत होतीच. खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य हे दीन दलितांसह सर्वांना मिळायला हवे होते. राजकीय स्वातंत्र्याबरोबर सामाजिक, सांस्कृतिक स्वातंत्र्याची भूक सर्वांनाच होती. सामाजिक स्वातंत्र्य आणि परिवर्तनासाठी महाराष्ट्रात महत्त्वाची चळवळ उभी राहत होती. पंढरपूर येथील बहुजनाचे आराध्य दैवत असलेल्या लोकदेवता विठ्ठलाचे मंदिर दलितांसाठी खुले करण्याची मागणी पुढे आली होती. मंदिर दलितांसाठी खुले होणे हेच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य होते. मंदिर प्रवेश हा केवळ प्रवेश नाही तर सामाजिक परिवर्तनाचा आरंभ होता. साने गुरूजींनी त्यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. स्वातंत्र्य मिळत असताना देखील एकप्रकारे दलितांचे हक्क नाकारले जात होते. त्यावेळी सानेगुरूजींच्या उपोषणाला देखील विरोध झाला होता. पंढरपूरमध्ये मंदिर प्रवेशाला विरोध करणार्‍यांनी ‘साने जावो सीमापार, नही खुलेगा मंदिरद्वार’ अशा घोषणा देत विरोध केला होता मात्र ‘मंदिर खुले होणार नसेल तर मी मृत्युला कवटाळणे पसंत करेल’ असा त्यांचा जणू निर्धार होता. तो लढा स्वातंत्र्यासोबत जी काही आव्हाने उभी टाकली जाणार होती त्याचे दर्शन घडवत होता. आज त्या आंदोलनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. त्या आंदोलनाने जातीअंताची लढाई लढून हक्क देण्याचा प्रयत्न केला होता. मानवी हक्काची ती लढाई होती. त्यातून मंदिरे, पाणवठे खुले झाले होते. म्हणजे आपल्याकडील वारकरी परंपरेत समतेचा विचार किती दृढ आहे हे सहजतेने अधोरेखित होत जाते.
भारतीय स्वातंत्र्याचा विचार सुरू असताना सामाजिक परिवर्तनाचा विचार महत्त्वाचा होता. स्वातंत्र्याच्या काळात या देशात जातीअंताच्या लढाईसाठी प्रयत्न झाले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून 1921 ला कायदेशीर लढाई सुरू केली होती. 1929 ला एस.एम.जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि सहकार्‍यांनी मंदिर प्रवेशासाठीचा प्रयत्न केला होता तेव्हा पेशवे समर्थक ब्राह्मण मंडळींना मारहाण करत विरोध केला होता. नाशिकमध्ये 1930 ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा सुरू झाला होता. या लढ्यांना त्यावेळी तात्काळ फार मोठे यश मिळाले असे नसले तरी त्यानिमित्ताने जाणीवा समोर आल्या होत्या. मानवी हक्काच्या जाणीव पेरणीत यश मिळत होते. अस्पृश्यतेचा प्रश्न गंभीर होताच. या देशाला अस्पृशता कलंक होता. हे सारे लढे समतेचे होते. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. धर्माच्या आणि जातीच्या आधारावर माणसामाणसात भेद करणे हे या लढाईतील अनेकांना मान्य नव्हते. स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक जण सहभागी झाले होते मात्र त्या सर्वांनाच हे हवे होते असे मात्र नाही. अनेकांनी आज ना उद्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायदा होऊन दलितांना मंदिर खुले होईल असे वाटत होते. साने गुरूजींचे आंदोलन हे दोन समाजात भेदाभेद करून संघर्ष निर्माण करणारे आहे असे साने विरोधकांनी गांधीजींना पटवून देण्यात यश मिळविले होते. त्यामुळे गांधींनी गुरूजींना उपोषण मागे घेण्याच्या निरोपाची तार धाडली होती. जातीअंताच्या लढाईला अप्रत्यक्ष काहींचा विरोध होता मात्र मातृहदयी आणि अत्यंत संवदेनशील असलेल्या साने गुरूजींनी जीवनभर ज्या गांधीवर निस्सिम प्रेम केले, त्यांचे विचार मस्तकी घेऊन पाऊलवाट चालणे पसंत केले त्या गांधीना त्यांना अत्यंत विवेकशीलतेने, प्रखरतेने व विनम्रतेने पत्र लिहून नकार कळविला होता. त्यांचे हे पत्र म्हणजे साने गुरूजींनी सुरू केलेल्या लढाईतील त्यांचे या विचारावर किती प्रेम होते याचे दर्शन घडविते. साने गुरूजी हे जितके आध्यात्मिक वृत्तीचे होते तितकेच सामाजिक सुधारणाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांना मंदिराचा दरवाजा खुला करणे म्हणजे माणसांच्या मनांचे, हृदयाचे दरवाजे खुले करणे आहे असे वाटायचे. मनाचे दरवाजे खुले झाले म्हणजे राजकीय व सामाजिक दरवाजे आपोआप खुले होतील अशी गुरूजींची धारणा होती. ती खरी देखील होती. शेवटी मनातील जातीयता संपेल तरच समाजातील जातीचा अंत होणार होता. त्यामुळे देशातील जातीअंताच्या लढाईतील ही एक महत्त्वाची लढाई होती. कायद्याने काही संपविण्याचा प्रयत्न झाला तर ते वरवर संपेल. बाह्यांगे जात संपेल मात्र मनातून ती जाईलच असे नाही. त्यामुळे ही लढाई भारताच्या जातिभेदाच्या अंताच्या लढाईसाठी महत्त्वाची ठरणार होती.
सामाजिक बदलासाठी साने गुरुजींनी हा लढा सुरू केला होता. महाराष्ट्रातील दीन दलितांसाठी पंढरपूरचे प्राचीन मंदिर खुले व्हावे यासाठी त्यांनी प्रबोधन करत अनेक सभा घेतल्या होत्या मात्र त्यातून मानसिक प्रबोधनाची प्रक्रिया घडत होती. बहुसंख्या लोकांचा पाठींबाही मिळत होता. तरी सुद्धा मंदिर खुले होत नव्हते. अखेर 1 मे 1947 रोजी साने गुरुजी यांनी उपोषणाचा निर्णय जाहीर केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळाला. राज्यातील अनेक स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, विचारवंत यांचा उपोषणाला पाठींबा मिळू लागला होता मात्र पंढरपुरात उपोषणाला जागाच मिळू नये अशी तजवीज विरोधकांनी केली होती. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र पंढरपूरात गाडगेबांबाच्या विचाराची दिशा घेऊन काम करणारे कुशाबा महाराज तनपुरे यांनी आपल्या मठात उपोषणाला जागा उपलब्ध करू दिली. समतेचा जयघोष करणार्‍या संत विचाराचे आद्यपीठ असलेल्या पंढरीत उपोषणाला जागा देण्यात अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. हा लढा वर्तमानात जितका सोपा वाटतो तितका तो सोपा नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. जात आणि त्या जातीच्या माणसाच्या सावल्या देखील नको असे मानण्याच्या काळात जागा उपलब्ध करून देण्याचे धाडस होते. आज त्या पेरलेल्या विचाराचे फळ म्हणून वारीतही समतेचा जयघोष होताना दिसतो.
उपोषण सुरू झाले होते. मंदिर खुले झाल्याशिवाय उपोषण मागे घ्यायचे नाही हा निर्धार पक्का होता मात्र तरीसुद्धा साने गुरूजींचे उपोषण दहा दिवस चालले होते. या काळात त्यांच्या प्रकृतीची चिंता सर्वांना लागून होती. अनेकांनी उपोषण लवकर सुटावे म्हणून प्रयत्न सुरू केले होते. लढाईने ‘आर नाही तर पार’ असे स्वरूप धारण केले होते हे लक्षात आल्यावर विरोधकांनाही धक्का बसत होता. समाजमनातून मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत होता. विरोधकांच्या वृत्तीबद्दल संतापही व्यक्त होत होता. गांधीजींचा गैरसमज दूर करत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू झाले होते. त्यांच्यापर्यंत आंदोलनाचे वास्तव पोहचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले होते. त्यात काही प्रमाणात यशही मिळत होते. त्याचवेळी लोकसभेचे पहिले सभापती राहिलेले दादासाहेब मावळणकर पंढरपूरला दर्शनासाठी आले होते. त्यांना येथील परिस्थितीचा अंदाज आला होता. त्यांनी देखील सांगितले की, दलितांना जेथून दर्शन मिळते तेथूनच मी दर्शन घेईल. त्यांनी उपोषण सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गांधीजींच्या वतीने ‘मावळणकरांच्या मार्गदर्शनाखाली काम करा’ असा संदेश पाठविण्यात आला आला होता. अखेर मोठ्या प्रमाणावर विविध मार्गाने प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन पंच कमिटी सदस्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन दलितांना प्रवेश देण्याचा विचार पुढे आणला. त्या संदर्भात जिल्हा न्यायालयाला कळविण्यात आले. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता देखील करण्यात आली. 10 मेला हा ठराव झाला आणि त्याच दिवशी दलितांना मंदिर प्रवेशासाठी खुले झाले. सायंकाळी गुरूजींनी उपोषण सोडले. खरेतर एका मातृहृदयी, संवेदनशील असलेल्या गुरूजींनी सामाजिक क्रांतीची ही लढाई सत्याग्रहाच्या मार्गाने आणि कोणत्याही हिंसक संघर्षाशिवाय यश मिळविले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जातिअंताच्या लढाईला चांगले यश मिळाले होते. त्या प्रवेशानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मंदिरे खुली झाली होती. अनेक ठिकाणी पाणवठे देखील खुले झाले होते. सामाजिक क्रांतीचा ही मशाल पेटविली गेली होती.
साने गुरूजींच्या या उपोषणाला आता 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या आंदोलनाने जातिभेदाच्या विरोधात पाया घातल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर या राज्यात मानसिक परिवर्तनाची पाऊलवाट निर्माण करण्यात यश मिळत गेले. त्यामुळे आतापर्यंत आपण बरेच काही कमवले असले तरी साने गुरूजींचा विचार रूजविण्यात आपल्याला पुरेसे यश मिळू शकलेले नाही. साने गुरूजी यांनी ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हा प्रार्थनेतून मांडलेला विचार वर्तमानात रूजण्याची नितांत गरज आहे. आपली एक लढाई संपली असली तर त्या लढाईच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने शेवट करण्यासाठी लढे उभे करावे लागतील. आज 75 वर्ष झाले तरी त्या लढ्याचे स्मरण करण्याचा ना प्रयत्न झाला ना त्या आंदोलनाच्या स्मृती जोपासल्या गेल्या. आज मंदिर सर्वांसाठी खुले असले तरी ते इतक्या सहजतेने खुले झालेले नाही हेही लक्षात घ्यायला हवे. आज या मंदिरात प्रवेश करताना लाखो दलितांना देखील आधार वाटत आला आहे. त्यात श्रद्धा हा भाग अधिक महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. पंढरपूरचा पांडूरंग हा नेहमीच सर्वांना आधार ठरत आला आहे. या लढ्याने पेरलेल्या विचाराचे आजही वारीत दर्शन घडते आहे. वारीचा विचार हाच महाराष्ट्राच्या जडणघडणीत अधिक महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. वारी ही जशी आध्यात्माच्या सुखासाठी आहे त्याप्रमाणे येथील माणसांच्या जीवन विकासासाठी देखील आहे. येथील प्रत्येक लढ्यात वारीचा समतेचा विचार आहे म्हणून ती केवळ आध्यात्माची वारी नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर परिवर्तनासाठी शक्ती देणारी वारी आहे. खरेतर ही शक्ती येते कोठून असा प्रश्न मलाही कायम असतो. त्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर केवळ पांडूरंगाच्या ओढ आणि त्यावरील निस्सिम श्रद्धा या पलीकडे त्याचे उत्तर मात्र मिळत नाही हे खरे.

– संदीप वाकचौरे
(प्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ मासिक जून २०२४)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा