राजकारण आणि समाजकारण ही एकाच गाडीची दोन चाके! पण राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर समाजकार्यात टिकून राहणारे अपवादात्मक असतात. अशापैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे मोहन धारिया! पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा अण्णांचा विलक्षण प्रवास आहे. राजकारणातून निवृत्ती घेत त्यांनी पाणी प्रश्नावर काम सुरू केलं आणि ‘वनराई’च्या माध्यमातून त्याला व्यापक स्वरूप दिलं. गावागावात त्यांनी अनेक झाडे लावली. बंधारे बांधले. पाण्याअभावी दुष्काळात होरपळणार्या अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवत त्यांनी हिरवीगार पालवी फोडली.
स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे धारिया 1964 ते 1971 या कालावधीत राज्यसभेवर होते. 1971 साली त्यांनी पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात यश मिळवले. या निवडणुकीत त्यांनी जनसंघाच्या रामभाऊ म्हाळगी यांचा पराभव केला होता. चंद्रशेखर आणि धारिया ही जोडगोळी त्याकाळच्या राजकारणात ‘तरूण तुर्क’ म्हणून ओळखली जायची.
काँग्रेसमध्ये राजकारण सुरू झाल्यावर इंदिरा गांधी यांनी त्यांना मंत्रीपद दिले. ‘अन्यायाविरूद्ध मनस्वी चीड’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता. प्रचंड मतांनी लोकसभेवर गेल्यावर इंदिराजींनी त्यांना उपमंत्रीपद दिले पण धारिया शपथविधीलाच गेले नाहीत. त्यांची नाराजी आणि नकार कळल्यावर त्यांना नियोजन खात्याचा स्वतंत्र कारभार देऊन राज्यमंत्रीपद दिले गेले.
इंदिराजी आणि जयप्रकाश नारायण यांच्यातील वादात इंदिराजींनी जयप्रकाश यांच्याशी संवाद साधावा अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी तसा आग्रह धरला पण इंदिराजींच्या हे स्वभावाबाहेर होते. 25 जून 1975 ला अणीबाणी जाहीर झाली आणि धारियांनी त्यांना विरोध केला. परिणामी त्यांना अटक झाली आणि सतरा महिने नाशिकच्या तुरूंगात काढावे लागले. एका केंद्रीय मंत्र्याला राजकीय भूमिकांसाठी अटक होण्याची ही घटना महत्त्वपूर्ण होती. आजच्या भाषेत सांगायचे तर हा हायहोल्टेज ड्रामा होता. 1977 साली धारिया पुन्हा जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आणि केंद्रात वाणिज्यमंत्री झाले.
त्यांच्या संघर्षमय सफर या आत्मचरित्रात्मक पुस्तकात इंदिराजी यांच्याबरोबरचे संभाषण वाचनीय आहे. ते लिहितात – 1971-72 मध्ये मिळालेली सुवर्णसंधी आपण आपल्या हाताने घालवली. माझ्या आग्रहाप्रमाणे तेव्हापासून आपण मूल्यांवर व ध्येयवादावर आधारित वचनपूर्तीचे राजकारण आपण केले असते तर देशात दिसणारा असंतोष, बेशिस्त निर्माण झाली नसती. काँग्रेसची अशी शोचनीय अवस्था झाली नसती. ही अखेरची संधी आहे, असे मी मानतो.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
धारिया यांनी इंदिराजींनी असे सुनावण्याचे धाडस अभूतपूर्व होते.
पुण्यातून अचानक त्यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर तेव्हाच्या काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने त्यांना बारामतीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची गळ घातली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते काँग्रेसतर्फे शंकरराव बाजीराव पाटील आणि जनता पक्षातर्फे संभाजीराव काकडे. त्यांच्या प्रचारसभांना उत्तम प्रतिसाद मिळत असताना कोणीतरी म्हणाले, ‘धारिया पुण्याचे! त्यांनी पुण्यातून व्हाया मुंबई करत थेट लोकसभेत जायचे तर ते असे पुणे-बारामती व्हाया दौंड करत दिल्लीत कसे पोहोचतील?’ तिथून सगळे चित्र बदलले आणि ते तिसर्या क्रमांकावर गेले.
आपल्या मृत्युनंतरही एक झाड लावावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या शरद पवार आणि इतर नेत्यांच्या हस्ते वैकुंठ स्मशानभूमित एक झाड लावण्यात आले.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 8 मे 2024.