परिवर्तनाची नांदी – घनश्याम पाटील

कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सर्वोच्च स्थानी गेली की पुन्हा तिची घसरण सुरू होते, हा निसर्गाचा नियम असतो. म्हणजे एखादा डोंगर सर केल्यावर पुन्हा उतरंड लागतेच. अशावेळी डोंगरावर काही सपाट भाग असतो. तिथे तुम्ही किती वेळ थांबता हे तुमच्यावर अवलंबून असते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 2014 आणि 2019 साली घवघवीत यश मिळवल्यानंतर यंदाही त्यांना सत्तेची उब अनुभवता येईल, असेच सर्वांना वाटत होते. त्यातूनच त्यांनी ‘चार सौ पार’चा नारा दिला आणि मतदारांनी त्यांना खाडकन जागेवर आणले. अर्थात, पुन्हा मोदी यांचेच सरकार आले असले तरी 2029च्या दृष्टिने ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.


बरे, या सगळ्यातून काही बोध घेऊन सुधारणा घडवून आणण्याऐवजी ‘आपणच कसे बरोबर’ हे सांगण्याची काही भाजप नेत्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. एकीकडे ‘आघाडीतील सगळ्यांचे मिळूनही 243 होत नाहीत आणि दुसरीकडे फक्त भाजपाच्याच इतक्या जागा आल्या मग नेमके अपयश कुणाचे?’ असा हास्यास्पद दावाही केला जातोय.
विशेषतः महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास ज्या प्रवृत्तींच्या विरूद्ध आयुष्यभर संघर्ष केला त्यांचीच तळी उचलून धरणे संघ स्वयंसेवक आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना रूचत नव्हते. अजित पवार यांच्या सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे ‘गाडीभर’ पुरावे असल्याचे सांगणार्‍याबरोबर त्यांनी सकाळचा शपथविधी उरकला. त्यानंतर लगेचच घटस्फोट झाल्याने हा संसार मोडला. पुन्हा त्यांनाच सोबत घेऊन निवडणुकांचा जुगार खेळला गेला. छगन भुजबळ यांच्यासारख्या तुरूंगातून सुटून आलेल्या नेत्याला सोबत घेतले गेले. ज्या ‘आदर्श’ घोटाळा प्रकरणात अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या गेल्या आणि पक्षात प्रवेश केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांना राज्यसभेची ‘बक्षिसी’ देण्यात आली. या सगळ्यात भाजपचे नेते, कार्यकर्ते कुठंच दिसत नव्हते. मग यापेक्षा वेगळे कोणते चित्र अपेक्षित होते? जे राजकीय विश्लेषक सातत्याने भाजपच्या बाजूने पोपटपंची करत होते त्यांनी केंद्रीय नेतृत्वाचीही दिशाभूल केली.
‘जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे,’ असा संदेश सातत्याने आपल्या कृतितून देणार्‍या राज ठाकरे यांना सोबत घेऊन भाजपला नेमके काय साध्य करायचे होते? घड्याळ हे पक्षचिन्ह असल्याने ज्या भाजपच्या मतदारांनी हृदयावर दगड ठेवत मतदान करणे टाळले त्याच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन नेमका कोणता संदेश द्यायचा होता? लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या राज ठाकरे यांनी केवळ ‘अनाकलनीय’ या एका शब्दात प्रतिक्रिया दिली होती ती खरे तर या सर्वांसाठी लागू होते. तुमचं सगळं वागणं, बोलणं सामान्य मतदारांसाठी अनाकलनीय होतं. त्यामुळं तुमचं ‘आकलन’ वाढावं म्हणून मतदारांनी या निवडणुकीत त्याची झलक दाखवली. यातूनही त्यांना काहीच बोध घ्यायचा नसेल तर अगदीच तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे महाराष्ट्रात पानिपत झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
शरद पवार यांनी आजवर कायम अविश्वासाचेच राजकारण केले आहे. त्यांना शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तडफदार आणि बौद्धिक चातुर्य असलेले नेता पुढे आणला गेला. पहिल्या टर्ममध्ये त्यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. नंतरचीही त्यांची वाटचाल योग्य दिशेने होती मात्र आपल्या चार टर्ममध्ये एकदाही पाच वर्षाची कामगिरी पूर्ण न करू शकलेले शरद पवार त्यामुळे कमालीचे दुखावले गेले. मुळातच ‘ब्राह्मण द्वेष’ ठासून भरलेल्या या नेत्याचा अहंकार दुखावला गेला आणि मग फडणवीसांना दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते ते केले गेले. भाजपला न मागता ‘बाहेरून पाठिंबा’ देण्याची घोषणा करणार्‍या शरद पवारांची डाळ न शिजल्याने त्यांनी उद्धव ठाकरे नावाचे एक शस्त्र पुढे केले. या फुग्यात जेवढी भरता येईल तेवढी हवा त्यांनी भरली पण फडणवीसांनी पुन्हा एकदा पिन मारून हा भ्रमाचा भोपळा फोडला.

दरवळ

एकनाथ शिंदे यांनी पूर्ण सामर्थ्याने उद्धव ठाकरेंचा बुरूज नेस्तनाबूत केला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा ताबा घेतला. ही गोष्ट त्यावेळी अनेकांना रूचली नव्हती मात्र तत्त्पूर्वी उद्धव यांनीही बाळासाहेबांच्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देवून त्यांचे कट्टर वैरी असलेल्या शरद पवार यांच्या पक्षासोबत घरोबा केला होता. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांचे बंड लोकानी इच्छा नसतानाही स्वीकारले होते. अशा सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या सत्ताकारणापासून दूर राहायचे, असा निर्णय घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अनिच्छेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. इथवरही सगळे ठीक होते! पण हाच खेळ अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्यासोबत झाला आणि या फितूर राजकारणाने कळस गाठला. शरद पवार यांच्यावर कितीही आरोप-प्रत्यारोप होऊ द्या मात्र त्यांच्या संयुक्त कुटुंबसंस्कृतीचा दाखला सर्वत्र दिला जायचा. त्याला तडा गेला आणि नणंद-भावजयीचा दुर्दैवी संघर्ष महाराष्ट्राला बघावा लागला.
हे सगळे सुरू असतानाही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी काही विधाने केली. मोदींनी ‘नकली राष्ट्रवादी’ आणि ‘नकली शिवसेना’ असे शब्द वापरले. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आवाहन करून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याचे आवाहन केले. एकीकडे उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्यावर अतिशय कडवट टीका करून त्यांना ‘भ्रष्टाचारशिरोमणी’ म्हणत असताना दुसरीकडे त्यांना सोबत येण्याचे आवाहन केले जात होते. मुस्लिम आरक्षणावरून मोदींनी जाहीर विधाने केली. ‘मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो’ असे फडणवीसांनी सांगितले खरे पण सामान्य माणसाला त्यात त्यांचा मोठेपणा दिसण्याऐवजी उन्मत्तपणा आणि अहंकारच दिसत होता. हे सगळे लोकापर्यंत पोहोचविण्यात शरद ब्रिगेड यशस्वी ठरली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे व्यापक आंदोलन हाती घेतले होते. त्यातही फूट पाडण्यात आली. जरांगे कसे मतलबी आणि निर्बुद्ध आहेत, हे दाखवून देण्यासाठी आयटी सेल कामाला लागले. समाजमाध्यमांवर मिम्सचा पाऊस पडला. मराठा समाजाला काही आश्वासने देण्यात आली. त्याची पूर्तता न करता नवनव्या सबबी पुढे आणण्यात आल्या. परिणामी रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे अशा मातब्बर नेत्यांनाही घरी बसावे लागले. उदयनराजे भोसले निवडून आले ही सुद्धा फार मोठी बाब ठरावी असे वातावरण निर्माण करण्यात आले.
गृहमंत्री असताना ‘भगवा दहशतवाद घातक’ असे विधान करणार्‍या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्येचा पराभव सहज शक्य होता. राम सातपुते यांच्यासारखा आश्वासक नेता इथून सहजी लोकसभेवर गेला असता मात्र इथली गणितेही पक्षनेतृत्वाला सोडवता आली नाहीत आणि त्यांच्याच चक्रात ते अडकून पडले. चंद्रपूरमधून तर सुधीर मुनगंटीवार यांनी पराभूत मानसिकतेतूनच निवडणूक यंत्रणा राबवली.
पराभव का झाला, कुणामुळे झाला याची प्रत्येक मतदारसंघाची कारणे वेगवेगळी असली तरी भाजप नेत्यांना त्यांचे विकासाचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले नाही. वैयक्तिक टीका-टिपण्या आणि वादाच्या बाहेर ते पडले नाहीत. राहुल गांधी यांची ‘पप्पू’ म्हणून सररासपणे खिल्ली उडवताना ते देशभर पदयात्रा काढत होते आणि त्यांच्यावर टीकेचे प्रहार करणारे हेलिकॉप्टरमधून पाय खाली ठेवायला तयार नव्हते. तीन-तीन, चार-चार मतदारसंघ एकत्र करून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मोदींच्या सभा घेतल्या जात होत्या. पंतप्रधानपदावरील नेत्याचे इतके अवमूल्यन का करावे लागले याचे आता तरी चिंतन होणे गरजेचे आहे.
भाजपाचे सर्वोच्च नेते एकीकडे ‘आता आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बोट धरून चालण्याची गरज नाही,’ असा संदेश देत होते. दुसरीकडे परंपरागत विरोधकांना आपल्या सोबत घेऊन त्यांना आपल्या शेजारी मानाचं पान टाकून बसवत होते, त्यांच्या आजवरच्या सर्व भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत होते आणि तिसरीकडे संविधान बदलण्याची भाषा करणार्‍या स्वपक्षातील नेत्यांकडे दुर्लक्ष करत त्यांना खतपाणी मिळेल असेच वागत होते. मुस्लिमांचा रोष, स्थानिक राजकारण, उमेदवाराची निवड अशी काही कारणे दिली जात असली तरी अयोध्येतही भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागणे हे नाचक्कीचे आहे. नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ आदी नेत्यांचे पक्षांतर्गत खच्चीकरण होत असल्याची राजरोस चर्चा श्रेष्ठींना थांबवता आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांत जाणारा संदेश अत्यंत मारक ठरला.
परिवर्तन हा सृष्टीचा अटळ नियम असतो. आईच्या मृत्युनंतर लगेचच कामाला लागलेल्या नरेंद्र मोदी यांचे वाराणशीतून घटलेले मताधिक्य ही बदलत्या समीकरणाची नांदी आहे. विधानसभेला महाराष्ट्र हातातून जायचा नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याने सगळे सोडून पंधरा दिवस विपश्यनेसारखी साधना करावी. डोके शांत ठेवून काही नियोजन केले तरच वस्त्रहरण होणार नाही. मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या मराठा नेत्याला केंद्रात महत्त्वाचे सत्ताखाते देऊन त्यांचे नेतृत्व पुढे आणण्याचा संकेत मिळाला आहेच. 2029च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत मुरलीअण्णा मोहोळ हे महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जातील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळची निवडणूक होईल, असेही जाणकारांकडून सांगितले जात आहे.
येत्या ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होईल. घोडामैदान जवळच आहे. या सगळ्या अनुभवातून बोध घेऊन भाजपवाले काही सुधारणा करतील की काँग्रेसचा वारू आणखी सुसाट सुटेल हे दिसून येईलच. या दिवाळीत कुणाची दिवाळी होईल आणि कुणाचे दिवाळे निघेल ते स्पष्ट झालेेले असेल.

-घनश्याम पाटील

(‘साहित्य चपराक’ जुलै २०२४)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “परिवर्तनाची नांदी – घनश्याम पाटील”

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा