मराठी जीवनभाषा व्हावी

Share this post on:
मराठी भाषा गौरव दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होईल. ‘नेमिची मग येतो पावसाळा’ या न्यायाने दिन साजरे होत राहतात. कधी भाषा संवर्धन पंधरवाडा, मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन, दरवर्षी मराठी भाषेचा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जातात. यासारखे अनेक उपक्रम करत आपण मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतोच. शासनही वेगवेगळे आदेश देऊन मराठी संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठीत स्वाक्षरीची सक्ती आणि सर्व पत्रव्यवहार मराठीत करणे याबाबत सक्ती केली जाते. सारे करूनही मराठी ज्ञानभाषेचा प्रवास करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. केवळ उत्साही असेच कार्यक्रमाचे स्वरूप राहिले तर भाषेचे संवर्धन कसे होणार? हा खरा प्रश्न आहे.  

आपल्याला मराठी भाषेचा विकास करायचा असेल तर जाणीवपूर्वक संस्थात्मक स्वरूपाचे प्रयत्न करावे लागणार आहेत.  मराठी भाषेच्या विकासासाठी सरकारसोबत सामान्य माणसांनी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. सारे सरकारवर टाकून आपल्याला पुढे जाता येणार नाही. जगाच्या पाठीवर भाषा जतन करण्यासाठी स्थानिक पातळीवर राज्यकर्ते व जागृत नागरिक प्रयत्न करत असतात. भाषा मेली की स्वातंत्र्याची प्रेरणा मरते. त्यामुळे भाषा मरू न देणे म्हणजे व्यक्ती आणि राष्ट्राचे स्वातंत्र्याचा मार्ग अबाधित ठेवणे आहे.
मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी येथील मराठी लेखक, प्रकाशन आणि रसिकांनी एकत्रित प्रयत्न केले तर बरेच काही हाती लागेल. 1980 च्या दशकापर्यंत समाजमनावर लेखकांचा मोठा प्रभाव होता. त्यानंतर दूरचित्रवाणी वाहिन्यांचा प्रभाव वाढत गेला आणि प्रभावाचे स्थान बदलले.  हा झालेला बदल चिंतनीय आहे.  समाजातील बदलाच्या अनुषंगाने साहित्यात त्याचे प्रतिबिंब उमटण्याची गरज आहे. संमेलनाचा उत्सव करण्याबरोबर मराठीच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न कसे होतील, मराठी साहित्य घराघरात कसे पोहोचवले जाईल आणि साहित्य वाचले जाईल यादृष्टीने प्रयत्नांची गरज आहे.  मराठीत उत्तम दर्जाच्या साहित्याच्या निर्मितीचा विचार करण्याची गरज आहे.  प्रकाशकांना पुस्तके प्रकाशित करताना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.  राज्यातील ग्रंथालयांना पुरेसे अनुदान नाही. हजारो ग्रंथालये मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. पुस्तकांवर सरकार कर लावत आहे.  आपल्याला भाषेचा विकास करायचा असेल तर राज्यातील पुस्तकांवर आणि संबंधित प्रक्रियेवीरल कर लावणे बंद करायला हवे.  त्यामुळे पुस्तकांच्या किंमती कमी होऊन सामान्य वाचकांना मदत होईल. आज पुस्तकांच्या किंमती प्रचंड वाढताना दिसत आहेत. राज्य सरकारच्या विविध संस्थाच्या वतीने प्रकाशित होणार्‍या  पुस्तकांची किंमत देखील खाजगी प्रकाशकासारख्याच  महागड्या झाल्या आहेत. त्यामुळे सामान्य वाचकांना पुस्तके घेणे परवडणासे झाले आहे. घराघरात पुस्तके पोहोचविण्यासाठी पुस्तके परवडतील यादृष्टीने शासनाने हातभार लावण्याची गरज आहे. साहित्य घराघरात पोहचले तरच भाषेचे संवर्धन होण्याची शक्यता अधिक आहे. पुस्तकांच्या वाचनाने वाचकांची मस्तके घडतील.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणाले होते की, ज्यांची मस्तके पुस्तके घडवितात ते कोणाच्या चरणावर नतमस्तक होत नाहीत. त्यातून आपण एक स्वाभिमानी आणि विचारांची माणसं घडवत असतो. त्यामुळे उत्तम समाजाची निर्मिती हा विचारही वाचनसंस्कृती साध्य होण्यास मदत होत असते. भाषा विकास म्हणजे केवळ भाषा विकास असं नाही तर त्यात विकासाच्या सोबत आपण एक चांगला समाज निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्याही साध्य करत असतो हे लक्षात घ्यायला हवे. जेथे भाषेचा विकास आहे तेथे संस्कृती आणि माणसांची मस्तके विकसनाची प्रक्रिया घडणे घडते.
भाषा समृद्ध करण्यासाठी जगभरात नवनवीन संशोधने होत आहेत. त्या संशोधनाबरोबर नवनवीन संकल्पना अस्तित्वात येत आहेत. पाश्चात्य संशोधने आपल्या भाषेत येण्यासाठीचे किती प्रयत्न केले जातात! जेणेकरून नवी पिढीपर्यंत आपल्या भाषेतून संशोधन आणि ज्ञान पोहचेल. आज ते पोहचत नाही म्हणून तरूणाईला ज्ञानाशी जोडण्याकरिता इंग्रजीची सोबत करावी लागते.  आज मराठी भाषेत किती साहित्य प्रकाशित होते याचा विचार करायला हवा. मराठीत प्रकाशित होणार्‍या विविध पुस्तकांचा विचार करता केवळ एक हजार पुस्तकांच्या आवृत्तीच्या विक्रीसाठी  अनेक वर्षाची प्रतीक्षा करावी लागते. मराठी भाषेत अधिकाधिक अनुवादित साहित्य इतर भाषेतून यावे यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत. त्याचवेळी मराठीतील अधिक उत्तम साहित्य इतर भाषेत जायला हवे त्यादृष्टीने देखील विचार करायला हवा. मराठी भाषेत अधिकाधिक उत्तम मासिके प्रकाशित होण्यासाठी मदतीचा हात द्यायला हवा. त्यासाठी साहित्य संस्थांनी देखील प्रयत्न करायला हवेत. आपल्या भाषेत जगातील ज्ञान मिळू लागले तर मुले भाषेशी अधिक जोडले जाण्याची शक्यता उंचावते. प्रत्येक मुलाला आपल्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शासनही आपल्या धोरणात आणि कायद्यात त्याबद्दल विचार करते मात्र कायदे करून हे घडत नाही. आज राज्यात एकूण विद्यार्थ्यापैकी सुमारे पंचवीस टक्के विद्यार्थी इंग्रजी भाषेत शिक्षण घेत आहेत. त्यामागे इंग्रजी भाषेला मिळणारी प्रतिष्ठा, इंग्रजी भाषेचा व्यावहारिक उपयोग आणि ज्ञानाचा मार्ग म्हणून त्याचा उपयोग होत असले तर त्याकडे आकर्षित होणे घडते. त्यामुळे आपल्या भाषेत ज्ञान येईल यासाठी प्रयत्न केले जाण्याची गरज आहे.  मराठी ज्ञानभाषा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले तरच उद्या मराठी शाळा वाचतील, मराठी साहित्य वाचले जाईल आणि मराठी संस्कृतीचे जतन होईल. भाषा मेली की स्वातंत्र्याची प्रेरणा मरते. त्यामुळे भाषा वाचविण्यासाठी आणि संवर्धनासाठी आपण सामूहिक प्रयत्न करायला हवेत.
मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी आणि भाषेच्या विकासासाठी पावले  पडणार नसतील तर मराठी माणूस म्हणून घेण्याचा काय उपयोग? भाषा विकासासाठी संस्थात्मक काम उभे राहण्याची गरज आहे. आपल्याकडे मराठी संवर्धन होण्यासाठी ‘गाव तेथे ग्रंथालय’ उभे राहण्याची गरज सातत्याने व्यक्त करण्यात येते आहे. आज आपल्याकडे सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या साधारण तेरा हजार इतकी आहे. राज्यातील सुमारे ४४ हजार गावे आहेत.  ग्रंथालयांची सुविधा दिल्याने गावोगावी वाचनसंस्कृती विकसित होण्यास मदत होत असते. ग्रंथालये विकसित झाली तर मराठी भाषा वाचकांची संख्या वाढण्यास मदत होईल. मराठी वाचक हेच भाषेचे रक्षक असतात. आपल्याकडे अद्यापही वाचनसंस्कृतीचा फारसा प्रभाव समाजमनात नाही. वाचनसंस्कृती म्हणजे केवळ वाचन नाही तर त्यातून माणसांची मस्तके घडणार आहेत. त्यातून समाजातील अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. वाचणार्‍या माणसांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होते त्याप्रमाणे भाषा देखील समृद्ध होत जाते. नवनवीन शब्द लोकांपर्यंत पोहचणे आणि नंतर ते शब्द लोकसंवादात येणे घडल्याने भाषा गतिमान होत राहते. ग्रंथालये म्हणजे उद्याच्या समृद्ध समाजाची पाऊलवाट आहे. ती भाषेच्या विकासाची प्रक्रिया आहे. आज आपल्या समाजात बोलीभाषांचा मोठ्या वेगाने र्‍हास होतो आहे. बोली हे आपल्या भाषेचे लावण्य आहे.  बोलीतील शब्दांनी आपली मराठी समृद्ध केली आहे मात्र आज आपण ज्या वेगाने प्रगतीची झेप घेत आहोत त्याच वेगाने  बोलीभाषेतील शब्द वेगाने कमी होत आहेत. शब्द कमी होत आहे याचे कारण आपल्या संस्कृती, पंरपरा देखील हरवत चालल्या आहेत. बोलीत असलेल्या घंगाळ, काठवड, ताम्हान,  सपार, कालवन, टरमाळ, रूम्हण, जातं, उखळ, चाटू यासारखे अनेक मराठी शब्द आता मराठीत फारसे उरले नाहीत. असे शब्द कोणी बोलले तरी त्याचा अर्थ समजणे देखील कठीण आहे. आपले ग्रामीण जीवन, संस्कृती हळूहळू कमी होत चालली आहे. राज्यात ५१ टक्के शहरीकरण झाले आहे. त्याचा परिणाम भाषेच्या विकासात देखील दिसत आहे. ग्रामीण संस्कृतीसोबत तिच्याशी जोडले गेलेल शब्द देखील संपुष्टात येत आहेत. भाषेत अनेक शब्द तत्कालीन परीस्थितीत आले आणि काळाच्या ओघात लुप्त देखील झाले. जे-जे नवे येते आहे ती संशोधने, तंत्रज्ञान आणि प्रगतीसोबत नवीन मराठी शब्द येण्याची गरज आहे. आपण त्या संकल्पना, त्यातील इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द देण्याऐवजी  मूळच्या भाषेतील इंग्रजी शब्द उपयोगात आणण्याची गरज आहे. अनेकदा आहेत तसे इंग्रजी शब्द आपण स्वीकारतो आणि आपल्या भाषेचा प्रवास सुरू ठेवतो.
आपण एकीकडे मराठी भाषेविषयी चिंता करत आहोत आणि दुसरीकडे  मराठी ज्ञानभाषा बनावी यासाठी भूमिका घेत आहोत.  मराठी भाषा ज्ञानभाषा बनण्यासाठीचा प्रवास मात्र होताना दिसत नाही. मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी मराठी माध्यमातून शिक्षण, ग्रंथालयांची निर्मिती, घराघरात मराठी पुस्तके वाचली जातील त्यादृष्टीने प्रेरक वातावरण, जनभाषा विकासाबरोबर सरकारने त्यादृष्टीने भाषा विकासासाठीची कोषनिर्मिती, मराठी भाषेचा शासन, न्यायालये, राज्यातील केंद्रीय कार्यालये, पोस्ट, रेल्वे, बँका अशा सर्व ठिकाणी मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला तर मराठी भाषेबद्दलची चिंता काही प्रमाणात मिटण्यास मदत होईल.  मराठी भाषा ही जीवनभाषा बनली तर तिचा प्रवास ज्ञानभाषेच्या दिशेने होईल. एकीकडे ज्ञानभाषेचा प्रवास करण्याचा माणसाचा संवाद महत्त्वाचा असतो मात्र आज मराठी भाषा बोलणे कमीपणाचे वाटावे असा भोवताल आहे. दोन शिकलेली माणसं एकत्रित आली तरी मराठीपेक्षा इंग्रजीत बोलणे पसंत करतात. दारावर भाजी, फळविक्रेता आला तरी त्याच्याशी हिंदीत बोलण्याचा सोस झाल्याशिवाय राहत नाही. आपली मुलं मराठी माध्यमात शिकणे म्हणजे आपला सामाजिक दर्जा घसरला आहे असे अनेकांना वाटते आहे. घरात इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं मराठीत बोलत नाहीत, त्यांना इंग्रजी बोलण्यात अधिक प्रतिष्ठा वाटते. मराठी बोलणे म्हणजे आपण जणू गावंढळ अशी धारणा बनत चालली आहे. 
आपण स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचा प्रवास ज्ञानभाषेच्या दिशेने फारसे प्रयत्न करू शकलो नाही. मराठी राजभाषा असलेल्या महाराष्ट्रात मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. ज्या शाळा अस्तित्वात आहेत त्या मराठी शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थी संख्येला उतरती कळा लागली आहे.  इंग्रजी भाषेच्या माध्यमातील शाळांचा प्रवास हा कधीकाळी केवळ महानगर, नगरांपुरता मर्यादित होता तो आता खेड्यापाड्यापर्यंत पोहचला आहे. मराठी शाळा कमी झाल्याने केवळ शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होतो असे नाही तर त्यातून समाजाचे अधिक नुकसान होत असते.  मराठी भाषेतील शिक्षण, संवादाकडे दुर्लक्ष केल्याने आपण आपलेच प्रचंड नुकसान करत आहोत. शिक्षणातून भाषा प्रवाहीत होते आणि पुढच्या पिढीपर्यंत जात असते. भाषेबरोबर संस्कृतीचा प्रवास होत असतो. तो जर मार्ग थांबला तर भाषा टिकणार कशी हा खरा प्रश्न आहे.
शाळा, लोकसाहित्य, जनसंवाद, लोकव्यवहाराच्या माध्यमातून भाषा समृद्ध होत असते आणि टिकत असते. भाषेतून आपली संस्कृती प्रतिबिंबीत होते आणि एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जाण्यास मदत होत असते.  भाषेमुळे माणसां-माणसातील नात्यातील ओलावा उंचावत असतो. आपण संस्कृतीरक्षणाच्या गप्पा मारत असताना ती संस्कृती प्रवाहित करणारी भाषा मरते आहे याचा विचार करायला हवा.
गेल्या काही वर्षात सातत्याने इंग्रजी शाळांची संख्या वाढते आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. जगाशी जोडण्याची ती खिडकी आहे असे आपण म्हणत असलो तरी आज इंग्रजी भाषेची असलेली खिडकी आता दरवाजाचे स्वरूप धारण करते आहे. असाच प्रवास सुरू राहीला तर मराठी भाषेची खिडकी होण्याचा धोका वाढतो आहे. आज मराठी भाषेचा अभिमान बाळगणे महत्त्वाचे आहेच. केवळ मराठी असे म्हणून चालणार नाही, आपण महाराष्ट्रीयन म्हणून अभिमान बाळगत असताना तर आपण मराठी भाषिक आहोत त्यासाठी मराठी बोलायलाच हवे. आपले घर, शासकीय कार्यालय, परिसर असे सर्वत्र मराठी बोलायला हवे. मराठी भाषामय आपला लोकव्यवहार व्हायला हवा. प्रश्न केवळ मराठी भाषा अभिमानाचा नाही तर आपल्या सर्व मराठी बांधवांच्या अस्मितेचा आणि त्याचबरोबर अस्तित्वाचा देखील आहे. कोणतीही भाषा मेली की त्या भाषेशी संबंधित असलेली संस्कृती मरते हे लक्षात घ्यायला हवे. आपली संस्कृती मेली तर आपली ओळख पुसली जाण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे उद्या मराठीला मंत्रालयाबाहेरच प्रतीक्षा करण्याची वेळ आली तर नवल वाटायला नको. आपणच आपला भाषा समृद्धतेचा प्रवास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेकदा भाषेचे काय एवढे? असे म्हणून दुर्लक्ष करता येईल पण त्या दुर्लक्षाने उद्याच्या अंधःकारात आपल्याला चाचपडत राहावे लागण्याचा धोका आहे. 
आपली संस्कृती जोपासली पाहिजे असे प्रत्येक समाजाला वाटत असते. त्याला मराठी समाज अपवाद नाही. संस्कृती प्रत्येक समाजाचे वैशिष्ट्य असते मात्र संस्कृतीवहनाचे भाषा हेच प्रभावी माध्यम आहे.  भाषेमुळे आपले नाते तेथील माणसांशी आणि संस्कृतीशी अधिक पक्की होत जाते. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांना आपले सण, उत्सव समजावून सांगावे लागतात. त्याचवेळी ते त्यांना किती आनंद देतात हाही प्रश्न आहे. आज इंग्रजी माध्यमातील मुले जेव्हा बोलतात तेव्हा अंकल, अंटीच्या पलीकडे नाते जात नाही. संवादात नात्यातील ओलावाही फारसा जाणवत नाही. आपले प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात व्हायला हवे कारण मराठी भाषेतील संस्कृतीशी काही नाते आहे. ते नाते भाषेतून प्रवाहीत होत जाणार आहे. त्यामुळे भाषेचे जतन करण्याला कोणताही पर्यायच उरत नाही. जगाच्या पाठीवर अनेक भाषा संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे बोलीसह स्थानिक भाषा वाचवायला हव्यात. त्यासाठी युनोस्कोने भाषा वाचविण्याचे आवाहन केले आहे मात्र जेथे भाषा मेली तेथे संस्कृती मेली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्याची प्रेरणाही त्यांनी गमावली आहे. त्यामुळे मराठी भाषेतील शिक्षण म्हणजे मराठी संस्कृतीचे संवर्धन आहे हा विचार लक्षात घ्यायला हवा.  जगातील भाषा अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञांनी मुलांच्या शिक्षणासंदर्भात मातृभाषेचा सातत्याने आग्रह धरला आहे. मातृभाषेचा आग्रह हा नेहमीच गुणवत्तेचा प्रवास आहे त्यामुळे मराठी शाळा आणि ग्रंथालय टिकवणे महत्त्वाचे आहे.
आज मराठी भाषेत होणारा संवाद इंग्राजाळलेला आहे. मराठीत बोलताना देखील आणि इंग्रजाळलेली मराठी ऐकताना आपण नेमकी कोणती भाषा बोलतो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. माझा मोबाईल लाईफ टाईम रिचार्ज  फ्री आहे, असे वाक्य बोलणारी मुलं आपल्याभोवती आहेत. ही माझी अंटी आहे, आता दिवाळी फेस्टिवल साजरा केला जाणार आहे, स्कूलमध्ये प्रोग्रॅम सुरू आहेत, आम्ही फ्रेंड खूप एन्जॉय करतो आहोत, आमची स्कूल व्हेरी स्मार्ट आहेत अशी विधाने नेमके कशाचे निदर्शक मानायची? याने मराठी खरंच समृद्ध होणार आहे का? आज इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी बोलणे कमीपणाचे वाटते आहे. आईबाबा शिकलेले असतील तर ते घरात इंग्रजीत बोलतात. आपली मुलं इंग्रजी बोलत आहेत याचा त्यांना अभिमान वाटत असेल पण इतर कोणी ग्रामीण भागातील नातेवाईक आले तर त्यांच्याशी मराठीत बोलताना कमीपणाचे वाटते. आपल्याशी इंग्रजीत न बोलणारी माणसं आपल्यातील वाटत नाही. त्यांची नात्याची वीण बनत नाही.  त्यातून इंग्रजीने त्यांचा वाढत जाणारा अहंकार नेमका कशाचे द्योतक मानायचा? त्यातून आपण वेगळे आहोत ही अंहकाराची जाणीव समूहापासून दूर घेऊन जाण्यास मदत करते. या प्रक्रियेमुळे आपल्या नात्यातील सत्त्व आणि ओलावा आटत जाण्याचा धोका निर्माण होतो आहे. माध्यमातील या शिक्षणामुळे शिक्षण आणि समाजमनातील विषमता देखील अधोरेखित होते. त्याकडे होणारे दुर्लक्ष आपल्या समाजाला परवडणारे नाही. याने काय होते? असे म्हणून आपण भाषेच्या विकासाकडे आणि भाषा संवादाकडे दुर्लक्ष केले तर भाषा मरेल पण त्यापलीकडे नाते आणि संस्कृती देखील मरणाच्या दिशेने प्रवास करू लागतील हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे मराठीचा वापर सक्तिचा करण्याबरोबर तिच्या संवर्धनासाठी सातत्याने भूमिका घेऊन काम करण्याची गरज आहे.  अन्यथा चिंता वाहणे आणि भाषणे करणे घडत राहील पण त्यातून मराठीत काहीच फरक पडणार नाही.
आपण जेव्हा स्वभाषा जगवायची आणि भाषा समृद्ध करायची असे म्हणतो तेव्हा त्या भाषेतील शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावत असते. मुलांच्या भविष्याची वाट ही जशी शिक्षणातून निर्माण होत असते तसे भाषेसाठीचा प्रवासही संबंधित भाषेच्या माध्यमांच्या शाळेतून होत असतो. बालकांचे शिक्षण सुरू असताना भाषा हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. जेव्हा मुले शाळेत येतात तेव्हा विद्यार्थी गरजेपुरती संवादाची भाषा शिकलेले असतात  मात्र भविष्याच्या दृष्टीने संवाद अधिक समृद्ध करण्यासाठी पुरेशा प्रमाणात भाषा विकसित झालेली नसते. त्यासाठीची जबाबदारी शाळांची असते. आपण कोणताही विषय शिकणार असलो आणि भविष्यात कोणतीही शाखा निवडणार असलो तरी त्याचा पाया हा मातृभाषा शिक्षणातून घातला जात असतो. त्यामुळे भाषा हे महत्त्वाचे साधन जगभर मान्य केले आहे. शिक्षणातून ज्या मुलांची भाषा समृद्ध होत जाते त्या मुलांचे शिक्षण अधिक परिणामकारक होण्यास मदत होते. भाषा समृद्ध करण्यासाठी केवळ शिक्षक पुरेसे नाहीत तर त्यापलीकडे शाळांमध्ये सुविधा महत्त्वाची भमिका बजावत असतात. शाळांमध्ये होणारे उपक्रम, कृती, प्रयोग, प्रात्यक्षिक आणि त्यासोबत ग्रंथालय, पुस्तक पेढी, शाळांच्या बोलक्या भिंती यासारख्या विविध उपक्रमातून मुलांची भाषा विकसित होत असते. त्यामुळे भाषा जतन करणे आणि ती घराघरात पोहचवणे महत्त्वाचे आहे. मुलांची भाषा समृद्ध करत तिचे लोकव्यवहारात उपयोजन करण्याच्या दृष्टीने मराठी माध्यमाच्या अर्थात सरकारी शाळा या जितक्या समृद्ध होतील तितक्या वेगाने आपल्या स्थानिक भाषा विकसित होत जाणार आहेत.  त्या शाळा या खर्‍या अर्थाने बोली आणि मराठी जतन करणार्‍या संस्था आहेत. शिक्षण स्मार्ट करताना शाळांमधून भाषा विकसनाचे प्रयत्न अधिक महत्त्वाचे ठरतात.
मराठी भाषेविषयी सतत चिंता करत आहोत मात्र ती चिंता गेल्या अनेक दशकांपासून व्यक्त होत आहे. तरीही आपली मराठी भाषा का संपली नाही? वर्तमानात कदाचित मराठी शाळांची संख्या कमी झाल्याने आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या उंचावल्याने मराठी बोलणार्‍या मुलांचा मराठीतील संवाद कमी झाला आहे. तरीसुद्धा गावागावात, वसतीवसतीवर सुरू असणार्‍या सरकारी शाळामंधून मुलांच्या होणार्‍या शिक्षणात अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. एकाच वर्गात आणि शाळेत अनेक भाषा बोलणार्‍या विद्यार्थ्यांचा प्रवेश होत असल्याने बोलीचे जतन करण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावत असतात.  कोणतेही मूल शाळेत प्रवेशित होते तेव्हा ते स्वतःसोबत ज्या काही गोष्टी आणते त्यात त्याची स्वतःची भाषा असते. त्याच बरोबर अनेकदा परिसरभाषाही असते. या भाषांपेक्षा शाळेचे माध्यम आणि पुस्तकांची भाषा भिन्न असते.  शाळांमध्ये शिक्षक अशा तीन प्रकारच्या भाषांसोबत घेऊन संवाद करत असतो. त्या तीनही भाषा सोबत चालत राहिल्या आणि शिक्षणात स्वीकारल्या गेल्या की भाषेतील अंतर कमी होते. त्याचबरोबर मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्यास त्यातून मदत होते. भाषेमुळे शाळांशी अधिक चांगल्या रीतीने जोडले जाणे घडते.  शाळेत एकाच वेळी अनेक संवर्गातील, विविध क्षेत्रातून विद्यार्थी  येत असतात.  शाळेत येताना मुले घरातील भाषा सोबत आणत असतात. त्यातून शाळेत विविध भाषांची देवाणघेवाण होत असते. शिक्षकांची भाषा मुलांच्या कानी जाते, मुलांची भाषा शिक्षकांच्या कानी येते. त्यातून भाषेतून होणारी अनुभवांची अभिव्यक्ती आणि देवाणघेवाण मुलांना समृद्ध करणारी आहे. मुले एकमेकांच्या भाषेतील शब्द सोबत घेऊन जातात आणि त्यातून नवनवीन शब्द कानी पडल्याने स्वतःच्या भाषेबरोबर इतरांच्या बोलीतील शब्द संवादात उपयोगात आणली जातात. सरकारी शाळांमधून स्थानिक बोलीभाषा जोपासण्याचा होणारा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद म्हणायला हवा. या निमित्ताने विविध भाषेतील शब्दांची होणार्‍या देवाणघेवाणीबरोबर भाषा जतन करण्यासाठी मोठा हातभार लागत असतो. इतर शाळेत एका आर्थिक स्तरातून विद्यार्थी येत असल्याने त्यांची भाषा समान असण्याची शक्यता अधिक असते. सरकारी शाळेत तसे घडत नसल्याने खर्‍या अर्थाने भाषा जगविण्यासाठी या शाळा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. भाषा संवर्धनासाठी सरकारी शाळांना आधार देणे म्हणजे भाषा समृद्धतेसाठीचा प्रयत्न करणे आहे. त्यामुळे सरकारी शाळा टिकविण्याची नितांत गरज आहे. त्या टिकल्या तर वाडी वस्ती, तांड्यावर बोलल्या जाणार्‍या भाषा संवादातून जिवंत राहण्यास मदत होणार आहे. बोली भाषा मेली तरी त्या छोट्या-छोट्या समूहाची संस्कृती देखील मरते. त्यामुळे आपल्या देशाची विविधता जपण्यासाठी या सरकारी शाळांच्या भूमिका अधिक महत्त्वाच्या ठरतात.
सरकारी शाळांमध्ये वाचनसंस्कार पुढे कायम राहत असतो. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी समृद्ध ग्रंथालय असायला हवे. अलीकडील शैक्षणिक संशोधनानुसार शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांचा आणि भाषेचा विचार करून वाचनस्तर निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी अनेक प्रकाशक त्या-त्या स्तरानुसार पुस्तके प्रकाशित करत आहेत. ही पुस्तके मोठ्या प्रमाणावर शाळांच्या ग्रंथालयात असायला हवीत. पुस्तकांसोबत चित्रं देखील भाषा विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मुले चित्र वाचत असतात. त्यानंतर ते वर्णन करतात आणि त्यापुढे गप्पा मारत असतात. चित्रांचा हा प्रवास मुलांच्या भाषा विकासाला कितीतरी मदत करणारे आहेत. आपल्या मनातील शब्दांना सोबत घेऊन, अनुभवानाशी सांगड घालत मुलं बोलत जातात. भाषा विकासासाठी अनुभवातून होणारा भाषा विकास महत्त्वाचा आहे. शाळा स्मार्ट असायल्या हव्यात याचा अर्थ त्या अधिक बोलक्या असायला हव्यात. त्यातून त्यांच्या भावविश्वाशी जोडलेली चित्रं असतील तर मुलांच्या अभिव्यक्तिवर त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम होत असतात. त्यामुळे या शाळांमध्ये समृद्ध ग्रंथालय, शाळांच्या भिंती अधिक बोलक्या असण्याची गरज आहे.
शाळांमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांच्या मदतीने शब्दकोश निर्मितीची शक्यता अधिक आहे. भाषा ही दर दहा कोसाला बदलते असे म्हटले जाते. प्रत्येक प्रांतात एखाद्या वस्तू, प्रक्रिया, संकल्पनेसाठी वेगवेगळे शब्द उपयोगात आणले जात असतात. त्यानुसार स्थानिक पातळीवर भाषेतील शब्द एकत्रित करून स्थानिक भाषा शब्दकोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील सुमारे ५२ बोली भाषा आहेत. त्या भाषांचे शब्दकोश सहजतेने विकसित करता येतील. शब्दकोश विकसित झाल्याने भाषा पुढच्या पिढीच्या हाती देण्यास मदत होत असते. शब्दकोश हे कोणत्याही भाषेचा महत्त्वाचा ठेवा आहे. आपण सरकारी शाळांच्या माध्यमातून या बोलींचा अधिकाधिक उपयोग करत तिचा स्वीकार करण्याची भूमिका घेतली आहे. आता स्थानिक भाषांमधील उत्तरे स्वीकारली जात असल्याने मुलांना भाषेमुळे वाढलेले अंतर कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या शाळा बळकटी करणे म्हणजे आपल्या राज्यातील स्थानिक भाषा जतन करणे आणि सक्षम करणे आहे. त्यातून विविध  संस्कृतीचे आणि समूहाच्या परंपरांचे जतन करणे आहे. त्यामुळे या शाळांच्या बळकटीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ भागातील शाळा म्हणजे केवळ अध्ययन अध्यापनाची केंद्रं नाहीत तर भाषा विकासाची केंद्रं आहेत हे लक्षात घ्यायला हवे.
मराठी भाषा जतन करण्यासाठी विविध संस्था प्रयत्न करताना दिसतात. मराठी भाषेच्या बर्‍या-वाईट परिस्थितीबद्दल संमेलनात चर्चा घडत असते. अनेकदा मराठी भाषेबद्दलची चिंता आणि सरकारसाठीचे ठराव केले जात असतात. आपल्याकडे मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने साहित्य संमेलनात विविध प्रकारचे ठराव करण्यात येतात. त्या ठरावाद्वारे मराठी भाषेच्या संवर्धनाचा विचार आणि भूमिका मांडली जात असते. ठराव मांडणारी संस्था आणि व्यक्ती ही भाषा प्रेमी आहेत हे मान्यच असते मात्र जे ठराव केले जातात त्या ठरावाची खरंच अंमलबजावणी होते का? वर्षानुवर्षे फक्त ठराव केले जात आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. ठराव केला की जबाबदारी संपली असे मानने चुकीचे आहे. शासनाने देखील त्याबाबत अत्यंत संवेदनशीलतेने अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे. सर्वत्र भाषा विकास आणि जतन, संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारवर टाकून मोकळे होता येईल. त्याने फार तर आपण प्रयत्न केले एवढेच समाधान मिळेल पण त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाची प्रक्रिया करता येईल. प्रत्येकाने आपापल्या परीने भाषा जतनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.
– शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे
Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!