कुठल्याही प्रदेशाचा सांस्कृतिक व साहित्यिक इतिहास किंवा मागोवा घेताना त्या प्रदेशाचा भौगोलिक व राजकीय इतिहास बघणे महत्त्वाचे ठरते, असे मला वाटते. साहित्यावर त्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा प्रभाव पडत असतो. साहित्य म्हणजे त्या प्रदेशातील समाजजीवनाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्यात ह्या सर्वांचे पडसाद उमटणे हे अपरिहार्य असते. साहित्याचा अभ्यास करताना तेथील भौगोलिक व राजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
महाराष्ट्राची भूमी ही संत भूमी आहे. इथल्या काळ्या मातीत अनेक मोलाचे संत जन्मास आले. मध्ययुगीन कालखंडात जेव्हा अनेक क्षेत्रात बजबजपुरी निर्माण झाली होती, वैचारिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रात गोंधळ माजला होता त्यामुळे परंपरेच्या, अंधश्रद्धेच्या वरवंट्याखाली सामान्य माणूस भरडला जात होता, अशावेळी ह्या संत संप्रदायानी त्यांना एक दिशा दाखवली. त्याचवेळी विपुल प्रमाणात संत व महानुभाव पंथामध्ये साहित्यनिर्मिती झाली.
तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत वारकरी संप्रदाय व महानुभाव संप्रदाय यांनी समाजात लक्षणीय काम केले. या भक्तिरसाच्या माधुर्यात स्त्री न्हाऊन निघाली. या काळात स्त्रियांवर अनेक बंधने होती; पण त्या अडीअडचणीवर मात करत स्त्रियांनी भक्तिरसात रममाण होत आपली आध्यात्मिक उन्नती साधली. महदंबा, मुक्ताई, जनाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, सखुबाई… अशा अनेक संत कवयित्रींनी त्या काळात पुरूषी वर्चस्व नाकारत आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली.
महदंबा – रूपाईसा (इ. स. 1242 ते 1312)
स्त्री संत साहित्यामध्ये प्रथम नाव घ्यावे लागते ते महदंबा ह्यांचे. ह्यांचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातल्या रामसगाव इथला. महदंबा ह्यांचे घराणे विद्वानांचे. त्याकाळातील रीतीप्रमाणे त्यांचे लग्न लहान वयात झाले व लवकरच वैधव्य आले. याच काळात महानुभाव पंथाची स्थापना झाली होती. महदंबा हिला मुळात परमार्थ व आध्यात्मिक ओढ होती. तिने या पंथाचा स्वीकार केला. अत्यंत कठोर असे आचरण तिने स्वीकारले. महदंबा ही नागदेवचार्य यांची बहीण. तिच्या जिज्ञासू वृत्तीमुळे तिला पंथात एक विशेष मान होता.
तिने रचलेले धवळे (विवाह गीते) – ती महानुभाव पंथाची होती. श्रीकृष्ण व चक्रधर स्वामी ह्यांच्याप्रती तिची अतूट श्रद्धा होती. तिने लिहिलेल्या धवळ्यातून ती प्रकट होते. धवळ्यात तिने एका स्त्रीच्या विशेष शैलीचे सहजसुंदर वर्णन केले आहे.
रूक्मिणीस सखिया सांगती वृत्तांतु
सर्वांगी न देखेचि तुझा ओ कांतु
देखिले तेचि आंग, तेथोनिया नयन न ढळती ॥
मातृकी रूक्मिणी स्वयंवर, गर्भकांड ओव्या, काही स्फुट व चक्रधर स्वामी ह्यांची आरती हे तिचे साहित्य उल्लेखनीय आहे. चक्रधरांनी आपले अवतारकार्य समाप्त करताना महानुभाव पंथाची जबाबदारी नागदेव व महदंबा यांना दिली. महदंबा यांनी आपले पूर्ण जीवन महानुभाव पंथाच्या सेवेत व स्वामींच्या चिंतनात घालवले.
मुक्ताबाई (1279 ते 1297) –
चिंता, क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा…
हा अभंग माहीत नसलेला मराठी माणूस विरळाच. मुक्ताबाई ही ज्ञानेश्वर महाराज यांची लहान बहीण. संत मुक्ताई ह्यांचा जन्म आपेगाव येथे झाला. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरवलेल्या भावांची ती अतिशय समजूतदार बहीण. निवृत्तीनाथ यांनी मुक्ताईला नाथसंप्रदायाची दीक्षा दिली. अवघ्या अठरा-वीस वर्षाच्या जीवनकार्यात तिने अतिशय समृद्ध असे साहित्य रचिले.
नाममहिमा सांगणारे हरिपाठ अभंग बारा, साधकांना उपदेश करणारे बावीस, दोन कूट अभंग, ताटीचे अभंग व मुक्ताई व चांगदेव यांच्यातील संवाद यातले बरेच अभंग तिचे आहेत. चांगदेव यांनी तिला गुरूपद दिले होते. ते तिला गुरूमाउली म्हणत. ह्यामुळे तिचे व्यक्तिमत्त्व बदलले. तिचे भावविश्व ढवळले. तिने चांगदेव यांना पुत्र मानत एक अलौकिक नाते तयार केले. एका अभंगात त्या म्हणतात,
गुण ना निर्गुण शब्दातीत । तेथे तू निश्चित निज बाळा ॥
पाळणा लाविला हृदयकमळी । मुक्ताई जवळ सादविते ॥
ह्या अभंगात तिची स्त्रीसुलभ भावना दिसून येते. आध्यात्मिक क्षेत्रात तिचे कार्य श्रेष्ठ आहे. मेहुण गावी तिची समाधी आहे. विजेच्या कडकडाटात ती लुप्त झाली, अशी आख्यायिका आहे. नामदेव, ज्ञानेश्वर, चांगदेव यांना मार्गदर्शन करणारी, स्वतःच्या ज्ञानाने तळपणारी ती एक वीज होती. विजेप्रमाणे ती स्वयंसिद्ध होती, असे म्हणल्यास वावगे ठरू नये.
कान्होपात्रा
कान्हो हे तिचे नाव व पात्रा म्हणजे गणिका. यादवकाळात पात्रा हे विशेषण गणिका या संदर्भात वापरत असत. विठ्ठल भक्तीत रममाण झालेल्या कान्होपात्राबद्दल अतिशय थोडी माहिती उपलब्ध आहे. मंगळवेढा येथील एका शामा नावाच्या गणिकेची ही मुलगी. दिसायला अतिशय सुंदर. नृत्य व गायन यात पारंगत. आईला वाटत होते की तिने आपला व्यवसाय पुढे चालवावा पण कान्होपात्राने स्पष्टपणे सांगितले की, जर माझ्यापेक्षा रूपवान पुरूष असेल तरच मी त्याला स्वीकारेन… अर्थात हे कठीणच होते. तिथल्या नगराध्यक्षाची नजर तिच्यावर पडली पण कान्होपात्राला तो पसंत नव्हता. तिचा नकार ऐकून त्याने आई व मुलीचा छळ सुरू केला. शेवटी आईने माफी मागितली. त्याने कान्होपात्राला आणून देण्यास सांगितले. त्याच दिवशी वारकर्यांचा एक समूह तेथून जात होता. कान्होपात्राने दासीचा वेष धारण करून त्या वारकर्यांसोबत घर सोडले. पंढरपुरी आल्यावर तिने विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले व त्याच्या भक्तीत रममाण झाली.
कान्होपात्राचा आवाज अतिशय सुंदर होता. ती स्वरचित अभंग गाऊ लागली. ती विठ्ठल भक्तीत रममाण झाली. सकल संत गाथेत तिचे फक्त तेवीस अभंग उपलब्ध आहेत. तिच्या अभंगात एक प्रकारची आर्तता सापडते.
नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वथा फुटो पाहे ॥1॥
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ॥ 2 ॥
तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी ।
धावे हो जननी विठाबाई ॥3॥
मोकलोनी आस जाहले उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयात ॥4॥
हा तिचा अभंग विशेष प्रसिद्ध आहे.
संत बहिणाबाई (1628 ते 1700)
बहिणाबाई यांचा जन्म मराठवाड्यातील देवगाव रंगारी येथे झाला. अतिशय लहान वयात त्यांचे लग्न झाले. त्या काळात प्रपंच करत परमार्थ साधणे अतिशय कष्टदायक होते. त्यांनी तुकाराम महाराज ह्यांना गुरू मानले म्हणून त्यांना खूप विरोध सहन करावा लागला. त्यांनी सातशे बत्तीस अभंग लिहिले आहेत. त्या अभंगात त्यांनी आपली आत्मकथा लिहिली आहे. त्या काळात संसार करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या अडचणी त्यांनी अभंगरूपात अतिशय तटस्थपणे लिहिल्या आहेत. त्या एक सिद्ध अशा संत होत्या. त्यांनी ‘वज्रसूचिकोपनिषद्’ या ग्रंथाचा अभ्यास केला. संस्कृतमध्ये असलेल्या या ग्रंथाचे त्यांनी चिंतन करत त्यात आधारित असलेल्या जातीभेदाचा निषेध केला. तीनशे वर्षांपूर्वी अतिशय कर्मठ काळात त्यांनी जो निषेध केला तो उल्लेखनीय आहे. त्यांच्या सातशे बत्तीस अभंगातला एक अभंग खूप प्रसिद्ध आहे.
संत कृपा झाली इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया ।
नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार ।
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत ।
तुका झालासे कळस भजन करा सावकाश ।
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा ॥
डॉ. सुहासिनी इर्लेकर यांनी त्यांच्या काव्याची तुलना नामदेव व जनाबाई यांच्या काव्याशी केली आहे.
मराठी संत परंपरेत अनेक स्त्री संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या काळात लौकिकाला दूर करणे ही सोपी गोष्ट नव्हती. तरी सुद्धा ह्या सर्व स्त्री संतांनी अतिशय धैर्याने ही वाट चोखळली. त्यांनी आपल्या अभंगात एक जीवनदृष्टी दिली. त्यांचे अभंग वाचत असताना एक प्रकारचा ‘स्व’ सापडतो. विलक्षण आत्मविश्वास, तेज व ज्ञानसाधना ह्यामुळे ह्या सर्व संत स्त्रिया अतिशय वंदनीय आहेत.
मला आवडलेला एक संत सोयराबाई यांचा अभंग देऊन मी लेख संपवते.
देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ॥
देहीचा विटाळ देहीच जन्मला ।
सोवळा तो झाला कवण धर्म ॥
संदर्भ –
1) स्त्री साहित्याचा मागोवा खंड 1
(संपादक : डॉ. मंदा खांडगे, डॉ. लीला दीक्षित, डॉ. अरूणा ढेरे, विनया खडपेकर)
2) मराठवाड्यातील साहित्य
(संपादक : प्रल्हाद लुलेकर, सतीश बडवे)
3) आंतरजाल (इंटरनेट)