सिंधुताई सपकाळ यांनी विसाव्या शतकात अनाथांना आणि बेघरांना आश्रय मिळवून दिला. ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी सिंधुताई उभ्या राहिल्या. अनाथ मुलांचे प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले.
या सगळ्यांपेक्षा सिंधुताईंचं सगळ्यात मोठं योगदान असं आहे की सामाजिक, सांस्कृतिक चळवळीपासून दूर गेलेल्या महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांना त्यांनी पुन्हा या चळवळीकडे आणलं. सामाजिक जाणिवेपासून दूर गेलेल्या आणि केवळ उपभोगवादाच्या नादाला लागलेल्या वर्गासमोर जाऊन सिंधुताई उभ्या राहिल्या.
या बेघर लोकांना, अनाथांना, परित्यक्तांना सांभाळण्याची जबाबदारी तुमची-माझी सर्वांची आहे याची जाणीव अशा सर्व लोकांना सिंधुताईंनी करून दिली. रोटरी क्लब, लायन्स क्लब असं जिथं बोलावतील तिथं त्या भाषणासाठी जायच्या. लोकांना या कार्याचं महत्त्व साध्या सोप्या भाषेत समजावून सांगायच्या आणि या कार्यासाठी पैसे गोळा करायच्या. भारतात, जगात जिथं जाईल तिथं आपलं काम लोकांना सांगून लोकांसाठी पैसे गोळा करायचे असं महाराष्ट्रात आजवर दोघांनीच प्रभावीपणे केलं. पहिले धोंडो केशव कर्वे होते. त्यानंतर सिंधुताई सपकाळ.
सिंधुताईंची मराठी भाषा अत्यंत साधी होती. सोप्या भाषेत त्या संवाद साधायच्या. ‘रस्त्यानं चालले व्हते. एक तांडा चालला होता. त्या तांड्याचा प्रमुख असलेला पुरूष एका गाढवावर एका मुलीला घेऊन बसला होता. ती मुलगी फाटके कपडे घालून बसली होती. नेहमीप्रमाणे एक बाई एक मूल कडेवर घेऊन चालत चालली होती. दुसर्या गाढवावर त्यांचं सगळं बिर्हाड टाकलं होतं. एक गाव सोडून ती दुसर्या गावाला मुक्कामी चालली होती आणि अशावेळी गाढवावर बसलेल्या माणसानं मुलीच्या हातात ट्रान्झीस्टर दिला होता. त्या मुलीनं तो हातात घेतला होता. अशी सगळी परिस्थिती. त्या मुलीला शाळा नाही, तिचं शिक्षण नाही, नीट कपडे नाहीत, आरोग्याची काळजी नाही, गाव नाही, घर नाही आणि तरीही ती निरागस मुलगी गाढवावर बसून हसत चाललेली असते. हातातला ट्रान्झीस्टर पडणार नाही याची काळजी घेत ती गाढवावर बसली होती आणि नेमकं गाणं तरी कोणतं लागावं? स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा…’ अशा पद्धतीनं एखादा प्रसंग सांगून त्या वातावरणनिर्मिती करायच्या. दलित, आदिवासी साहित्य संमेलन असू देत किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन असू देत, कुठल्या पक्षाचा राजकीय कार्यक्रम असू देत सिंधुताई गेल्या की तिथं पोटतिडिकीनं बोलायच्या आणि आपल्या शब्दांची किमया घडवून लोकांपुढे थाळी पसरून, पदर पसरून पैसे गोळा करायच्या. हे सगळे पैसे त्यांनी निर्माण केलेल्या कामासाठी जायचे.
मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीयांना त्यांनी ठणकावून सांगितलं की ही सामाजिक जबाबदारी आहे. ती तुम्हाला टाळून चालणार नाही. याचं भान तुम्हाला ठेवावं लागेल आणि सामान्य माणसाला तुम्हाला मदत करावी लागेल. यातून तुम्हाला वेगळं जाता येणार नाही. यापासून तुम्हाला अलिप्त राहता येणार नाही. सामान्य माणसाला सामाजिक काम करण्यासाठी भाग पाडणार्या सिंधुताई खर्याअर्थानं या आधुनिक महाराष्ट्रातली सर्वात समर्थ आणि सामर्थ्यवान आई आहे.
त्यांच्या जीवनावर एक चित्रपट आला. तेजस्विनी पंडित यांनी त्यात उत्तम अभिनय केला. मात्र सिंधुताई परदेशात असत्या तर त्यांच्यावर अनेक सिनेमे आले असते, नाटकं आली असती. मालिका निघाल्या असत्या. महाराष्ट्रात मात्र ही परंपरा नाही. चांगल्या लोकांकडं दुर्लक्ष करायचं आणि फडतूस लोकांच्या सुमार मालिका सुरू करायच्या या परंपरेप्रमाणं सिंधुताईंकडं दुर्लक्ष झालं. एकदा आता त्यांना श्रद्धांजली वाहून झाली की आपण मोकळे झालो असं अनेकांना वाटेल. सिंधुताईंनी जे काम हाती घेतलं होतं ते जगात फार थोड्या लोकांनी केलंय. त्यांचं कुटुंब कसं होतं, त्या कुटुंबातून बाहेर कशा आल्या, त्यांच्यावर अन्याय कसा झाला, त्यांना किती त्रास झाला हे सगळं त्या कधीतरी त्यांच्या भाषणात सांगायच्या पण ‘माझ्यावर अन्याय झाला, मी खूप त्रास सहन केला’ म्हणून माझ्याबद्दल सहानुभूती बाळगा असं त्यांचं कधीच म्हणणं नव्हतं. जे आयुष्य त्या जगून गेल्या ते त्यांच्या दृष्टिनं संपून गेलेलं होतं. त्यांच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर या दुःखाचा बाजार मांडत आत्मचरित्र लिहिलं असतं आणि साहित्य अकादमी किंवा ज्ञानपीठचे प्रयत्न केले असते.
बाणेरच्या दिलीपभाऊ मुरकुटे यांनी त्यांना चित्रपटासाठी सहाय्य केलं. त्यांच्याच प्रयत्नातून सिंधुताईंचं वसतीगृहाचं स्वप्न साकारलं. ज्ञानेश्वरभाऊ तापकीर यांच्यासारख्या अनेक सुहृदांनी त्यांना यथाशक्ती मदत केली. अशा सगळ्यांच्या हातभारातून त्यांनी थोड्या थोडक्या नव्हे तर पंधराशे मुलांला दत्तक घेतलं. अर्थात त्यांचे इतकेच जावईही आहेत. हे काम झपाट्यानं पुढे गेलं.
त्यांचं बोलणं जसं साधं होतं तसंच वागणंही सामान्य होतं. प्रसिद्धीचं वलय असूनही त्यांनी त्यांचा साधेपणा सोडला नाही. वाईच्या सुलोचनाबाई सणस म्हणतात, सिंधुताई नेहमी आमच्या घरी यायच्या. मी ज्या शाळेत काम करते तिथं त्यांचं अनेकदा येणं व्हायचं. एकदा त्या आल्या आणि म्हणाल्या मला तुझ्या शाळेतल्या मुली दाखव. माझ्यावर एक सिनेमा येतोय. त्यात माझी भूमिका करणारी एक बालकलाकार हवीय. सणसबाईंनी त्यांना शाळेत नेलं. सिंधुताईंनी तीनशे-साडेतीनशे मुली बघितल्या. त्यातली एक चुणचुणीत चिमुरडी निवडली. योगायोग म्हणजे त्या मुलीची आईही धुण्या-भांड्याचीच कामे करायची. तिथून घरी आल्यावर सणसबाईंनी त्यांच्यासाठी जेवण तयार ठेवलं होतं. सिंधुताई फतकल मारून खाली बसल्या. त्यांनी शिर्याचा एक घास घेतला आणि सांगितलं, मला याची सवय नाही गं पोरी. हे मला पचायचं नाही. हे सगळ्यांना वाटून टाक. मला ती सकाळची भाकरी आणि आमटी दे!
असं साधं, सामान्य माणसासारखं त्यांचं वागणं होतं, जगणं होतं. त्यांच्या जाण्यानं सामाजिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या अनेक लेकी पोरक्या झाल्या आहेत. मात्र हे काम आणखी पुढं नेणं हीच या सामर्थ्यवान माईला खरी श्रद्धांजली असेल.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, गुरुवार, 6 जानेवारी 2022.