यातील ढोंग सगळ्यांनाच दिसत होते पण अशावेळी काहीही बोलायचे नाही, असा एक अलिखित रिवाज असतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक असलेले संजय सोनवणी हे या सगळ्यात एक अपवाद होते. सोनवणी यांचे आणि नरकेंचे कौटुंबीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची मित्तरकथा सर्वज्ञात आहे. हरी नरके यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर कसे चुकीचे उपचार झाले याबाबतचा एक व्हाटसअप संदेश सोनवणींना पाठवला होता. तो वाचल्यानंतर नरके यांच्या मृत्युबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. हा घातपाताचा प्रकार आहे, असा स्पष्ट आरोप सोनवणी यांनी केला. माध्यमांनी त्याची यथायोग्य दखल घेतली. मात्र आश्चर्यकारकपणे हा विषय मागे पडला आणि आता तर काही घडलेच नाही, अशा आविर्भावात तथाकथित नरके समर्थक आनंदोत्सव साजरा करत आहेत. नरके हे उगवत्या सूर्याला नमस्कार करून वाटचाल करणारे विचारवंत होते याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्यांच्या मृत्युबद्दल साशंकता निर्माण झालेली असताना संबंधितांना क्लिन चिट देणारे भुजबळांसारखे त्यांचे निकटवर्तीय बघितले की, या माणसाच्या आयुष्याची दिशा कशी भरकटली होती हे लक्षात येते. ज्यांच्यावर निष्ठा ठेवून आपण आपल्या जीवनाची राखरांगोळी करून घेतो ते आपल्याबाबत किती बेफिकिर असू शकतात, याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. असो!
या सगळ्या पार्श्वभूमीत संजय सोनवणी यांचे प्राजक्त प्रकाशनने नवे पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘हरिभाऊ नरके आणि मी’ असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. यातील नरके आणि मी म्हणजे अर्थातच संजय सोनवणी हे दोघेही महत्त्वाचे आहेत. आपला बंधुतुल्य स्नेही गेल्यानंतर त्याच्याविषयी वाटणारा उमाळा या पुस्तकातून व्यक्त झाला आहे. तो केवळ भावनिक नाही. या निमित्ताने नरके यांचे सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील योगदान स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. विविध व्यासपीठांवर, समाजमाध्यमांवर नरके यांनी ज्या भूमिका मांडल्या, जी मते नोंदवली, जे मंथन घडवले त्याचा हा आढावा आहे. या पुस्तकातून सोनवणी यांचे नरके यांच्यावरील अकृत्रिम प्रेम दिसून येते. हरी नरके यांना वाहिलेली ही वैचारिक आदरांजली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जो माणूस हयात नाही, जो आपल्या टिकेला उत्तर देऊ शकणार नाही त्याच्याविषयी वैयक्तिक टीकाटिपण्णी करू नये, असा संकेत असतो. माझे असे अनेक मित्र आहेत की आम्ही एकमेकांवर टीका करण्याचा अधिकार पूर्णपणे मान्य केलेला आहे. वैचारिक मतभेद अपरिहार्य असतात. ते समजून घेऊन दोस्ती निभावता येते, याची आम्हाला कल्पना आहे. हरिभाऊंना हा अधिकार मान्य नव्हता. त्यांच्यावर टीका केलेली त्यांना सहन होत नव्हती. त्यामुळे त्यांनी मला समाजमाध्यमांवरही ब्लॉक केले होते. आमचा परिचय मैत्रीत कधीच बदलला नाही त्याचे हे एक कारण होते. प्रस्तुत पुस्तकाचे लेखक संजय सोनवणी यांचीही अनेक मते, भूमिका मला मान्य नसतात. मात्र ज्यांच्यावर मी निखळ प्रेम करतो, ज्यांच्याविषयी अंतःकरणपूर्वक आदर आहे, अशा माझ्या मोजक्या मित्रांपैकी ते एक ज्येष्ठ मित्र आहेत. त्यामुळे नरके यांच्याविषयीच्या माझ्या भावना बाजूला ठेवून या पुस्तकाकडे बघूया.
हरी नरके यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर आधी वाईट वाटले. आपला वैचारिक विरोध बाजूला ठेवला तरी समाजाला अशा विचारवंतांची गरज असते. त्यानंतर त्यांच्या मृत्युबाबतची सोनवणी यांची फेसबुक पोस्ट वाचली आणि डोळे पाणावले. कुणाच्याही वाट्याला असे मरण येऊ नये. ते गेल्यानंतर फेसबुकसारख्या माध्यमांवर श्रद्धांजलीचा असा पाऊस पडत होता की, हरिभाऊंच्या निधनानं उरलेसुरले पुरोगामी विश्वही संपुष्टात आले. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतलेली त्यांची श्रद्धांजली सभा असेल किंवा प्रस्तुत पुस्तकाचे झालेले अनौपचारिक प्रकाशन असेल. या दोन्ही कार्यक्रमांना प्रत्येकी वीस माणसेही नव्हती. ज्या समता परिषदेला नरकेंनी आपली मातृसंस्था मानली त्याचे टोळीप्रमुख छगन भुजबळ यांनी तर पूर्णपणे पाठ फिरवली. चळवळीसाठी राबणार्या, खस्ता खाणार्या जवळपास प्रत्येकाचे विधिलिखित असेच असते. नरके हेही याला अपवाद ठरू नयेत, याचे वैषम्य वाटते.
2009 साली पुण्यात ‘बहुजनीय चळवळीचे मारेकरी कोण?’ या विषयावर परिसंवाद झाला होता. त्याचा गोषवारा या पुस्तकाच्या प्रारंभी दिलाय. ‘महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी शांत बसले होते, तेव्हा मी हा लेख लिहिला,’ असे सांगणार्या नरके यांनी यात बहुजनीय चळवळ विखाराच्या मार्गाने जात असल्याबद्दलची खंत व्यक्त केलीय. ‘प्रा. नरके, मी आणि जातीयवादी संघटना’ हा या पुस्तकातील लेख प्रत्येकाने वाचायला हवा. यात लेखक सोनवणी प्रांजळपणे लिहितात, मी प्रा. नरके यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे तो केवळ त्यांचा सॉके्रटिस होऊ नये म्हणून. मते पटोत वा न पटोत… पण मत मांडण्याचे स्वातंत्र्य अशा संघटना वा व्यक्ती हिरावून घेत असतील तर त्यांचा निषेध केलाच पाहिजे...
‘चळवळ समतेसाठी आहे, नव्या मनुवादासाठी नाही’ हा लेख म्हणजे एका लेखावरची प्रतिक्रिया आहे. लोकप्रभा साप्ताहिकातील हरी नरके यांच्या लेखावर संभाजी ब्रिगेडच्या भैय्या पाटलांनी जी प्रतिक्रिया दिली त्याला दिलेले हे सणसणीत उत्तर आहे. संभाजी ब्रिगेडने ब्राह्मणांची विशेषतः ब्राह्मण स्त्रियांची अकारण बदनामी कशी केली हे यात सप्रमाण मांडले आहे. हरी नरके यांच्यावर टीका करणारे मूलनिवासी नायक हे एक धादांत असत्य वृत्तपत्र असल्याचे पुढील लेखात मांडले आहे. संभाजी ब्रिगेड व भारत मुक्ती मोर्चा म्हणजे बहुजनीय चळवळ नव्हे, हे ठणकावून सांगण्याचे धाडसही सोनवणी यांनी दाखवले आहे. हरी नरके हे त्यासाठी निमित्त ठरले आहेत. या पुस्तकाच्या नावातील ‘मी’ अशा लेखांतून दिसतो आणि नरके यांच्या टिचुकल्या कर्तबगारीपेक्षा यातील ‘मी’ सर्वश्रेष्ठ ठरतो हे माझ्यासारख्या ‘सोनवणीप्रेमीं’साठी महत्त्वाचे आहे. आता तरी जागे होणार आहात काय?, चळवळींचा मृत्यू कसा होतो?, वाघ्याचे स्मारक, इतिहास आणि समाज, स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर, बाबासाहेबांचा पराभव कोण करतंय? अशा लेखांतून सोनवणी यांची देदीप्यमान वाटचाल समजून घेता येते.
‘ब्राह्मणांत जसे जीवनभर एखाद्या विषयाला वाहून घेतलेले दिग्गज होते, तसे दुर्दैवाने बहुजनांत नाहीत. त्या विद्वानांशी मतभेद असले तरी त्यांच्या ज्ञाननिष्ठेबाबत शंका घेता येत नाही’, (पृष्ठ क्र. 72) हे या पुस्तकातील हरी नरके यांचे विधान महत्त्वपूर्ण आणि बहुजनांना विचार करायला भाग पाडणारे आहे. नरके यांना 1 जून 2012 रोजी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचा पहिला पुरस्कार प्रदान केला गेला. त्यावेळी सोनवणी यांनी लिहिलेले आणि द्यायचे राहून गेलेले मानपत्र आणि त्यावरील त्यांचे मुक्त चिंतन अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रसाधने प्रकाशित करणार्या समितीचे नरके हे अध्यक्ष होते. त्यांनी डॉ. आंबेडकरांचा चित्रमय चरित्र खंड प्रकाशित केला. त्यावरून जे राजकारण झाले, आरोप-प्रत्यारोप झाले त्याचीही दखल एका प्रकरणात घेण्यात आली आहे. सोनवणी यांच्या लढ्याविषयी नरके यांनी ब्लॉग लिहून जो पाठिंबा दिला होता तो या पुस्तकात पुन्हा वाचता येऊ शकेल.
2015 साली बाबासाहेब पुरंदरे यांच्या बाजूने मते मांडल्याने मोठे वादळ निर्माण झाले होते. त्यावेळी काही माथेफिरूंनी सोनवणी यांना मारण्याची धमकी दिली होती. अशा भुरट्यांना शिंगावर घेत ‘वादाला का भिता’ हा लेख मी ‘चपराक’मधून लिहिला होता आणि सोनवणी यांचे समर्थन करत ठामपणे त्यांच्या पाठिशी राहिलो होतो. त्यावेळी नरके यांनी सोनवणींना ‘माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, सौ. वहिनी आणि मुलांना मनस्ताप नि त्रास होऊ नये यास्तव कृपया यापुढे आता हा विषय बंद करा. तुर्तास ही नोंद तुमच्या फेसबुक व ब्लॉगवरून हाईड करा. यात कमीपणा नाही,’ असे ईमेलद्वारे कळवले होते. यातील सोनवणी यांच्याविषयी त्यांना वाटणारी काळजी लक्षात घेतली तरी अणीबाणीच्या प्रसंगीचा त्यांचा पळपुटेपणा आणि संजय सोनवणी यांचा धीरोदात्तपणा पुन्हा पुन्हा स्पष्ट होतो. नरके यांच्याविषयी राग असण्याचे आणि सोनवणी यांच्यावर प्रेम करण्याचे हे एक कारण आहे.
हरी नरके यांच्या दुटप्पीपणाविषयी, त्यांच्या विसंगत भूमिकांविषयी मी सातत्याने लिहिले आहे. नरके यांच्यावर झालेल्या टीकेची दखल घेताना सोनवणी लिहितात, आज माझे मित्र घनश्याम पाटील यांचा सा. ‘चपराक’मधील प्रा. हरी नरके यांच्यावर टीका करणारा लेख वाचण्यात आला. या लेखानंतर मला जे जातीय संघटनांच्या आणि नरके विरोधकांच्या आनंदाच्या उकळ्या फुटणारे फोन आले, त्यामुळे मी ही प्रतिक्रिया देण्यास बाध्य आहे. घनश्याम पाटील यांना त्यांच्या लेखनाचे स्वातंत्र्य आहेच आणि त्यांना जे पटत नाही त्याविरूद्ध आसूड उगारण्याचा हक्कच आहे हे मान्य करून उकळ्या फुटणार्यांसाठी मला खालील बाबी स्पष्ट करायच्या आहेत…’ या बाबी या पुस्तकात वाचू शकाल.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी नरके यांना कशा भूलथापा दिल्या याचेही वर्णन या पुस्तकात आले आहे. नरके यांनी आणि सोनवणींनी समाजमाध्यमांवर घेतलेल्या भूमिका यात पुन्हा एकदा वाचायला मिळतील. ‘हरी नरके आणि संजय सोनवणी यांची मित्तरकथा’ असे एका वाक्यात मी या पुस्तकाचे वर्णन करेन. सुप्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार प्रसन्न जोशी यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. पाठराखणही त्यांनीच केली आहे. ‘या पुस्तकाच्या निमित्तानं आपण काय गमावलंय हे महाराष्ट्राच्या ध्यानी यावं,’ अशी रास्त अपेक्षा प्रसन्न यांनी व्यक्त केली आहे.
…महाराष्ट्र सोडा, पण नरके समर्थक आणि तथाकथित पुरोगामित्त्वाचा टेंभा सर्वत्र मिरवणार्यांच्या जरी हे ध्यानात आले तरी पुरे झाले. बाकी काय म्हणणार?
या पुस्तकासाठी संपर्क
प्राजक्त प्रकाशन – 020-24469595
चपराक
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -
साक्षात हरिभाऊना समोर उभे करणार लेख आहे . नक्कीच खूप प्रेरणा मिळाली. आणखी खूप लेख चांगले आहेत .