सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे! संत तुकाराम महाराजांच्या या ओळींचा प्रत्यय मानवी जीवनात पदोपदी येतो. जीवन, संसार म्हटलं की सुख- दु:ख, बऱ्यावाईट घटना ह्या ठरलेल्या असतात. आजकाल सुविधा भरपूर प्रमाणात मिळत असल्या तरीही सुख, समाधान, आनंदाच्या कक्षा, आशा -अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की, दु:ख, उदासीनता, नैराश्य यायला वेळ लागत नाही. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया ह्यांचं मन, भावना कोमल असतात शिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्याही महिलांवर अधिक असल्याने त्या प्रत्येक प्रसंगात पटकन व्यक्त होतात. कधी आनंद असतो, कधी समाधान असते, प्रसंगी दु:खही येते. स्त्रियांना दु:खी होण्याची कारणेही अनेक आहेत. जाच, छळ, शोषण इत्यादी कारणांमुळे त्या व्यथित होतात परंतु दु:खांना बाजूला सारून स्वतःसह कुटुंबाला पुन्हा नव्याने उभे करण्यातही स्त्रियांचा सिंहांचा वाटा असतो.
नुकताच जयश्री सोन्नेकर यांचा ‘व्यथिता’ हा दहा कथांचा संग्रह वाचण्यात आला. घनश्याम पाटील, प्रकाशक चपराक प्रकाशन पुणे यांनी अत्यंत दर्जेदार स्वरूपात हा संग्रह प्रकाशित केला आहे. संग्रहातील दहा नागरिकांची व्यथा समोर ठेवून साजेसे असे मुखपृष्ठ चित्रकार संतोष घोंगडे यांनी रेखाटले आहे. घनश्याम पाटील यांनी संग्रहाला योग्य अशी प्रस्तावना लिहिली असून पाठराखण विनोद पंचभाई यांनी केली आहे.
या संग्रहातील ‘वेदना अंतरीची’ या कथेची नायिका आसावरी ही शिक्षिका आहे. एका प्रशिक्षणात सर्व प्रशिक्षणार्थींच्या आग्रहास्तव इतरांप्रमाणे स्वतःचा संसार पट उलगडून दाखवते. ऐकणारा पुरुष असो की महिला सर्वांचे डोळे ती कर्मकहानी ऐकताना पाझरायला लागतात. अत्यंत हृदयस्पर्शी भाषेत आसावरीच्या दु:खाला वाचा फोडते. समाज कितीही प्रगतीशील झाला, उच्चशिक्षित झाला तरीही स्त्रियांच्या दु:खाला थांबवू शकत नाही हे आसावरी या सुशिक्षित नायिकेच्या कथनातून जाणवल्याशिवाय राहत नाही.
परिस्थिती ही मानवाला अनेक वळणांवर नेऊन ठेवते. कधी हसवते, कधी रडवते. परिस्थितीने गांजलेली व्यक्ती पटकन कुणावरही विश्वास ठेवत नाही. काही व्यक्तिंमुळे वाईट वाटत असल्याने चांगल्या मनाने हात पुढे करणारास सकारात्मक प्रतिसाद देण्याचे टाळते किंवा पुढे आलेला निखळ मैत्रीचा, आधाराचा हात धरतानाही अनेक वेळा विचार करते. ‘मृदू झंकार’ या कथेची नायिका सविता अशाच द्विधा मनस्थितीत असते. आईवडील, भाऊ-बहिणी यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या सविताला संदीप नावाचा तरुण भेटतो. तिची गायकी, तिचा प्रामाणिकपणा यामुळे तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडतो. आणि एकेदिवशी आईवडिलांसह सविताच्या घरी येऊन तिला मागणी घालतो त्यावेळी संदीपची आई म्हणते, ‘आधार नसलेल्या व्यक्तिवर लोक टपून असतात बोलण्यासाठी आणि जेव्हा सौंदर्य, बुद्धिमत्ता एकत्र येऊनही साधारण परिस्थिती असेल नं.. मग तर त्या व्यक्तिच्या प्रत्येक हालचालीची बातमीच होते…’
संदीपही सविताला खूप समजावून सांगतो. सविता जो नकारात्मक विचार करते तो दूर होऊन संदीप – सविता लग्नाचे बंधन स्वीकारतात का? यासाठी मृदू झंकार ही कथा वाचायला हवी.
‘कोलाहल’ ही कथा थोडी वेगळ्या धाटणीची आहे. यातही व्यथा आहे पण ती बोचणारी नाही. दोन शेजारणी आणि त्यांच्या सासवा यांच्यामधील नात्यांची वेगळी गुंफण घेऊन येणारी कथा आहे. ज्याप्रमाणे दोन सख्ख्या बहिणींमध्ये एक कामसू आणि स्वतःवर काम ओढवून घेणारी असते तर दुसरी बहीण कामात कंटाळा, चालढकल करणारी असते. तसेच या कथेतील दोन नायिका अनिता आणि रंजना यांचे आहे. एकत्र कुटुंबात राहणारी सविता ही सर्वांसाठी झटणारी आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारी तर दुसरीकडे रंजना मात्र अनिताच्या विरुद्ध टोकाची! इतरांची कामं करायला नको म्हणून स्वतंत्र राहणारी.
कालांतराने अनिताच्या मनात एक सल निर्माण होते की घरातील कुणाचे आपल्याकडे लक्ष नाही, कुणाला आपली गरज नाही. परंतु त्याचवेळी तिच्या हेही लक्षात येते की, पती आणि सासू तिची आस्थेने चौकशी करतात. सासू म्हणते,
‘अगं आपली काळजी आपण घेतली पाहिजे. त्रास कुणाला होणार? प्रत्येकजणाला आपापली कामे असतात गं. मग कधी कधी विचारणंही होत नाही..’
दुसरीकडे रंजनाचे वागणे आणि तिच्या सासूबाईंनी रंजनावर दाखविलेले वरकरणी प्रेम पाहून अनिताच्या मनात वेगळेच विचार येतात. ती स्वत:ला भाग्यवान समजते. हे सारे लेखिका जयश्री सोन्नेकर यांनी अगदी तपशीलवार मांडले असून ते वाचनीय आहे.
‘एकाकी!’ तारुण्यात पतीचे निधन झाल्यानंतर जगणाऱ्या कुसुम नावाच्या तरुणीची कारुण्यमय अशी कथा. पती व्यसनी असला तरीही त्याच्यासाठी झटणारी ही तरुणी. काही प्रमाणात मनस्वी! पतीचे निधन होते नि सारेच अर्थ बदलतात. आत्महत्येचा विचार मनात डोकावत असताना मुलांचं भवितव्य समोर दिसते नि ती नकारात्मकता बाजूला पडते. शेजारणी तिच्याबद्दल काही तरी बोलतात आणि एक नवीन विचार, नवीन दु:खाची सल मनात घर करते. अनेकानेक विचारांनी त्रस्त झालेली कुसुम तिच्या मधुरा नावाच्या मैत्रिणीकडे जाते. मधुरा तिला पती असताना आणि नसताना कुसुमच्या जीवनात काय बदल झाला, तिच्या दु:खाचं मूळ कारण काय हे तपशीलवार समजावून सांगते. त्यावेळी होणारा संवाद लक्षवेधी आहे. शेवटी कुसुम काय ठरवते हे एकाकी या कथेत लेखिकेने उत्तमरीत्या मांडले आहे.
जयश्री सोन्नेकर यांच्या कथा हृदयस्पर्शी आहेत. अनेक कथा लघुकथा प्रकारच्या आहेत. त्यामुळे कंटाळवाणे होत नाही
साध्या सरळ भाषेत लिहिलेल्या असल्याने त्या मनाला भिडतात. स्त्रियांना होणारे दु:ख हा सर्व कथांचा मूळ गाभा असला तरीही प्रत्येक कथानक वेगळे आहे. प्रत्येक कथानायिकेचा सल वेगवेगळा आहे. दु:खाची किनार वेगळी आहे.
‘शांता’ ही कथाही वेगळी आहे. एका जहागीरदाराने सांभाळलेल्या मुलीची ही काळजाचा ठाव घेणारी कथा आहे. जहागीरदार शांता नावाच्या मुलीचे लग्न लावून देतात परंतु जहागीरदाराच्या उपकाराचे ऋण फेडण्यासाठी शांता त्यांच्याकडे कामाला दररोज येत राहते.
लग्न होऊन आलेल्या जयंती नावाच्या सुनेसोबत मैत्री होते. कधी शांता जयंतीशी नणंद तर कधी सासूच्या भूमिकेतून तिला समजावून सांगते.
दिवस जातात, महिने नि वर्षे ही जातात. जहागीरदाराच्या घरात सुनांचे आगमन होत जाते. घरात बायकांची संख्या वाढल्यामुळे कामेही विभागली जातात. शांताला काम नसल्यामुळे तिचे येणे सणवारापुरते मर्यादित होते. परंतु ज्या हक्काने ती पूर्वी घरात वावरत असे ते घर तिला परके झाले असल्याची बोच जाणवत राहते. तिची अवस्था जयंतीला अस्वस्थ करीत राहते.
तीन मुलांचा सांभाळ, पतीची कमाई फारशी नसल्याने शांता इतरत्र काम करते. काम करणाऱ्या बाईला उरलंसुरलं देण्याची पद्धत असते परंतु शांता कामवाली बाई असली तरीही ती जहागीरदाराची मुलगी आहे ही संकोचावस्था लेखिका मर्मग्राही शब्दात लिहिते…
‘जहागीरदाराकडे वाढलेल्या मुलीला उरलंसुरलं, दान कसं द्यावं या विचाराने लोक बिचकत. मागणं बरं दिसत नाही, भूक भागत नाही आणि दारिद्रय हटत नाही अशा अवस्थेत शांता जीवन जगत होती…’
अत्यंत हलाखीचे, गरिबीचे जीवन जगत असलेल्या शांताला कुणी मदतीचा हात पुढे करते का, जयंती किंवा जहागीरदार तिला काही मदत करतात का हे जाणून घेण्यासाठी ‘शांता’ ही अत्यंत तळमळीने लिहिलेली कथा वाचलीच पाहिजे..
इंद्रजाल ही कथाही उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या पतीच्या प्रेमासाठी आसुसलेल्या पत्नीची रेणू उर्फ दिशा या तरुणीची आहे. तिचे वर्षानुवर्षे हृदयाच्या कप्प्यात खोलवर बंद करून ठेवलेले दु:ख तिची जिवाभावाची मैत्रीण अलका खूप वर्षांनी भेटते तेव्हा धरणाचे दरवाजे उघडताच पाणी ज्या वेगाने बाहेर येते त्याच वेगाने बाहेर पडते. अलका श्रीमंत नसली तरीही संसारात खूप आनंदी असते. स्वतःचे दुःख प्रकट करताना रेणू म्हणते,
‘तुला काय वाटलं पैसा म्हणजे सगळं सुख? अगं घरच्या अन्नाची चव रुचकर नसते ह्यांच्यासाठी… वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, वेगवेगळी सौंदर्य अनुभवणं अंगवळणी पडलंय त्यांच्या… जाणीवपूर्वक मला असं सजावं लागतं, टिकवावं लागतं नाहीतर केरसुणी झाली असती माझी. बहुरुप्याप्रमाणं चेहरा रंगवत भावना लपवाव्या लागतात. मुलांसाठी वडीलधाऱ्यांसाठी, जगासाठी आणि स्वतःसाठीही जगावं लागतं. हा फरक आहे अलका तुझ्यात आणि माझ्यात…! खरी नशीबवान तर तूच आहेस.”
किती वेगळी परिस्थिती लेखिकेने मांडली आहे ना, उच्च पदावर पती, भरपूर पैसा, सारी सुखं पायाशी लोळतात म्हणजे यापेक्षा दुसरा आनंद कोणता हा समज असणारांनी ही कथा जरुर वाचावी.
महिलांच्या दु:खाची किनार असलेल्या उत्तरार्ध, काळीज, आई आणि पिल्लू या कथाही वेगळ्या बाज असलेल्या वाचनीय कथा आहेत.
जयश्री सोन्नेकर यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे. कथा मर्मग्राही, भाषा शैली प्रवाही असल्यामुळे एक जाणवते की, लेखिकेने केवळ एकाच कथासंग्रहानंतर थांबू नये उलट त्यांचा लेखनाचा, विषय वैविध्याचा आवाका लक्षात घेता त्यांनी कादंबरी लेखनाचा गांभीर्याने विचार करावा. शुभेच्छा!
००००
व्यथिता : कथासंग्रह
लेखिका : जयश्री सोन्नेकर
प्रकाशक: घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन पुणे
पृष्ठ संख्या: ८०
किंमत :. ₹ १२०/-
आस्वादक: नागेश शेवाळकर
पुणे
(९४२३१३९०७१)
संग्रह घरपोच मागवण्यासाठी
घनश्यामजी,
परिचय लेख प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
शेवाळकर सर फारच छान रसग्रहण केले आहे व्यथिता कथा संग्रहाचे.