प्रमुख अतिथी

मार्च महिना संपला होता. तालुक्यातील अनेक शाळांतील वार्षिक स्नेहसंमेलने संपन्न झाली होती. आम्ही दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात स्नेहसंमेलन घेत असू. यावर्षी मात्र दुष्काळामुळे ते घ्यावे की नाही या द्विधा मन:स्थितीत होतो.

या निमित्ताने वर्षभर झालेल्या विविध स्पर्धांतील गुणवंतांचा गौरव करता येतो आणि विद्यार्थ्यांना स्वत:तील सुप्त कलागुण दर्शविण्याची संधी मिळते. असा हा प्रेरणादायी, वैशिष्ट्यपूर्ण व मनोरंजक कलामहोत्सव असल्यामुळे पालक मेळाव्यात स्नेहसंमेलन घेण्याचे सर्वानुमते ठरले.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातील तारीख नक्की झाली होती. दुष्काळाचे सावट तर इतके गडद होते की, आत्महत्येचे सत्र विदर्भ, मराठवाडा ओलांडून आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यापर्यंत पोहोचले होते. शेतकरी राजाचे मनोबल खचले होते. अशा वेळी जगण्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न म्हणून स्नेहसंमेलनासाठी मनोरंजनासोबत ‘गाथा पर्यावरणाची’, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’,‘बाबा, जहर खाऊ नका’, ‘खेळ मांडला’ अशा उद्बोधक सांस्कृतिक कार्यक्रमांची आम्ही तयारी चालू केली होती.

‘प्रमुख अतिथी’ म्हणून कोणाला आमंत्रित करावे ही एक विवंचना आमच्यासमोर होती. कलाकार, उद्योजक, अधिकारी किंवा पदाधिकारी यांपेक्षा बळीराजाच्या खचलेल्या मानसिकतेला उभारी देऊन पिचलेल्या मनगटात सामर्थ्य निर्माण करणारा प्रभावी वक्ता आमंत्रित करावा असे वारंवार वाटत होते. सुदैवाने एका रविवारी कामानिमित्त अहमदनगरला जाणे झाले. तेथील एका साहित्य संमेलनात प्रतिभावंत साहित्यिकांची मांदियाळी जमली आहे, असे समजले. खूप उत्साहाने व उत्सुकतेने तिकडे गेलो. कथा,कविता,परिसंवाद, चर्चासत्रातून साहित्यिक आपापले विचार प्रभावीपणे व्यक्त करत होते. दिग्गजांचे मार्गदर्शन श्रवण करण्याची ती एक पर्वणी होती. त्यांची ओथंबलेली वाणी प्रेरणा आणि संवेदनांचा सुंदर समन्वय होता. लालित्यपूर्ण शब्दांनी कल्पनांचे भावविश्व साकारलेले होते. प्रज्ञा आणि प्रतिभेचा प्रकट आविष्कार घडत होता. त्यातील साहित्यिकांच्या वाणीने माझ्या अंत:करणाला मोहिनी घातली होती. आपल्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला हे साहित्यिक जर ‘प्रमुख अतिथी’ म्हणून लाभले तर सोन्याला सुगंध येईल; असा मी विचार करत होतो. कारण त्यांचे शब्द हृदयाचा ठाव घेत होते. त्यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब उमटले होते. विविध कारूण्यपूर्ण घटनांचे वर्णन ऐकताना चित्त द्रविभूत झाले होते. रसिक श्रोत्यांची समाधी लागली होती. अशा प्रकारच्या त्या ग्रामीण जीवनाच्या भाष्यकाराला मी कार्यक्रम संपल्यानंतर त्वरित भेटून कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला. माझा  थोडक्यात परिचय करून दिला. आमच्या नियोजित शालेय कार्यक्रमाची पुसट कल्पना दिली. गर्दी खूप असल्याने त्यांनी व्हिजिटिंग कार्ड मला देऊन दुसर्‍या दिवशी रात्री निवांत फोन करण्यास सांगितले.

आता मी निश्चिंत झालो होतो. कारण बळीराजाच्या दुभंगलेल्या आत्मविश्वासाला सांधणारा शब्दप्रभू मला सापडला होता. दुसर्‍या दिवशी रात्री उत्सुकतेने त्यांना फोन करून कालच्या भेटीची आठवण करून दिली. आमची शाळा जिल्हा परिषदेची असून दुष्काळग्रस्त परिस्थितीची जाणीव करुन दिली. सर्व विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असून शाळा कमी पटसंख्येची व गाव लहान असल्याची कल्पना दिली. आपण जर आलात तर गुणवंत विद्यार्थ्यांचा तुमच्या शुभहस्ते झालेला सत्कार त्यांच्या पुढील आयुष्याला प्रेरणेची शिदोरी ठरेल, तर उपस्थित शेपाचशे लोकांना तुमच्या अमोघ वाणीद्वारा जिद्दीने लढण्याचे बळ येईल; असेही तळमळीने सांगितले. सर्व ऐकून घेऊन त्यांनी तारीख नक्की करून येण्यास होकार दिला परंतु त्यांनी घातलेल्या अटी, ऐकून माझे डोळे मात्र विस्फारले. ते म्हणाले, ‘‘कार्यक्रम रात्री असल्याने जामखेड येथे मुक्कामासाठी लॉजवर ए.सी. रूम बुक करावी लागेल. रात्रीचे ‘चमचमीत’ जेवण व दुसर्‍या दिवशीचा अल्पोपाहार व्यवस्था जागेवर म्हणजे लॉजवर करावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवास खर्च व मानधन एकूण पं`धरा हजार रुपये रोख द्यावे लागतील. यात कुठलीही तडजोड होणार नाही.’’ हे ऐकून मी विषण्ण झालो. पंधरा हजार रुपये त्यांनी अशा आविर्भावात उच्चारले होते की जसे पंधरा रुपये वाटावेत.

‘दुष्काळासारख्या जीवघेण्या अस्मानी संकटात तुम्ही आत्महत्या करू नका, तर निर्धाराने जगा’ हे सांगण्यासाठी येणार्‍या प्रमुख अतिथीला पंधरा हजार रुपये द्यावे लागणार हाच मोठा विरोधाभास होता. शब्दसम्राटाचे धनीसुद्धा पूर्णत: व्यावहारिक बनल्यामुळे कसे संवेदनाशून्य होतात याचा तो प्रत्यय होता. आपल्या ईश्वरदत्त प्रतिभेमुळे लोकांच्या भावनेला हात घालून त्यांचे अश्रू काढण्याचे सुद्धा दर ठरलेले असतात का? याला कलेचे मोल म्हणावे की सामाजिक जाणिवांचा अभाव? याला प्रतिभेच्या आविष्काराची शक्ती म्हणावी की आर्थिक लोभाची लालसा? अखेर त्या माझ्या पूर्वनियोजित संभाव्य प्रमुख अतिथीस मी स्पष्ट शब्दांत नकार दिला.

दोन दिवस खूप उदासवाणे गेले. तेवढ्यात एका व्हॉटसअप गु्रुपवर ‘एका हाताचा योद्धा’ अशी पोस्ट वाचायला मिळाली. ती लातूर जिल्ह्यातील मधुकर रामचंद्र चिद्रे या 76 वर्षीय शेतकर्‍याची प्रेरणादायी व संघर्षमय यशोगाथा होती.

शेतकर्‍यांच्या उपस्थितीत होणार्‍या शालेय कार्यक्रमात ‘प्रमुख अतिथी’ म्हणून योद्धा शेतकरीच आणला तर ? ही कल्पना भन्नाट वाटली. काही मित्रमंडळींशी चर्चा केल्यावर त्यांनी सोशल मीडियात अशा बर्‍याच फेक पोस्ट सुद्धा असतात, त्यामुळे याची खात्री करण्याचा सल्ला दिला. मला तर खूप उत्सुकता असल्याने त्या पोस्टमधील मधुकर अप्पांचा फोन मिळवण्याच्या प्रयत्नास लागलो. त्यावेळी मूळचे लातूर जिल्ह्यातील पण जामखेड तालुक्यातील नायगाव जवळील उगलेवस्ती शाळेत कार्यरत असलेले आमचे मित्र सुशेन चेंटमपल्ले सरांच्या मदतीने त्यांचा संपर्क झाला. अप्पांना रविवारी भेटण्यास येत असल्याचे कळवले सुद्धा.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या दवण हिप्परगा या गावी पोहोचायला मला जामखेडहून तब्बल नऊ तास लागले. दुपारचे दोन वाजले होते. एवढ्या लांबून केवळ आपल्याला भेटण्यासाठी एक शिक्षक येत आहेत, असे समजल्यापासून त्यांनासुद्धा मला भेटण्याची उत्सुकता होती.

मी अप्पांना भेटण्यासाठी त्यांच्या शेतातल्या घरी गेलो. ते माझीच वाट पाहत होते. सुरुवातीला जेवण केले व नंतर गप्पांना सुरुवात केली.

अप्पा म्हणाले, ‘‘चला, आपण आता एक फेरफटका मारून येऊ.’’

त्यांनी ट्रॅक्टर काढला. मला शेजारी बसायला सांगितले. ट्रॅक्टर चालू करून आमची वाटचाल डाळिंबाच्या बागेच्या दिशेने चालू झाली. मी तर आतून पुरता घाबरलो होतो. एका हाताचा हा वयोवृद्ध ड्रायव्हर आपल्याला कुठे आणि कसा घेऊन जाणार याच काळजीत होतो. पण ते मात्र अत्यंत सफाईदारपणे ट्रॅक्टर चालवत होते.

मी सहज विचारले, ‘‘अप्पा, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जडणघडणीत जन्मदात्यांच्या संस्कारांचा मोठा वाटा असतो, तुमच्या आई-वडिलांबद्दल मला जाणून घ्यायला नक्की आवडेल.’’

अप्पा सांगू लागले, ‘‘माझे वडील एक आदर्श शिक्षक होते. नोकरी सांभाळून सुट्टीच्या वेळेत शेतीकडेही त्यांना लक्ष द्यावे लागे. एकदा शेतात गेल्यावर जाळीत दडून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघासोबत त्यांची तुफान झटापट झाली. यादरम्यान आमच्या गड्याने कुर्‍हाडीने वाघावर जोरात आघात केला. झटापटीच्या चपळाईत वाघाऐवजी वडिलांच्याच पायावर घाव बसला. वाघ घाबरून पळून गेला, पण वडिलांना मात्र पाय गमवावा लागला.’’

अप्पा क्षणभर थांबले. त्यांचे डोळे भरुन आले होते. स्वत:ला सावरून ते पुढे बोलू लागले, ‘‘या घटनेनंतर त्यांच्यात वैराग्यवृत्ती निर्माण झाली व त्यांनी प्रापंचिक निवृत्ती घेतली. पुढील संपूर्ण जीवन त्यांनी ज्ञानेश्वरी वाचन, नामसाधना आणि अन्नदान या त्रिसूत्रीसाठी समर्पित केले. सबंध आयुष्यात त्यांना अद्वातद्वा बोलताना कधीच कुणी पाहिले नाही. ते नेहमी म्हणायचे, ‘जीभ जिंकली की जग जिंकलेच समजायचे’ माझ्यात जे जे काही आहे, ते सर्व त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. आईबद्दल सांगायचे तर, ती एक कर्तबगार स्त्री होती. वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील घोड्यावर रपेट मारून रुबाबात सर्व कामे करून ती घरी येई. तिला आळस, नेभळटपणा व अन्याय या बाबतीत भयंकर चीड असे. जिद्दीने अन्यायाचा प्रतिकार करणे या माझ्या वृत्तीतील मूळ प्रेरणा आईच !’’

मी कुतूहलाने विचारले, ‘‘अप्पा, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला?’’

अप्पा हसून म्हणाले, ‘‘माझे शिक्षण चौथीपर्यंत गावातच झाले. आमचे त्यावेळचे शिक्षक देवीदासराव वाडवणकर गुरुजी नेहमी म्हणायचे की, तुम्हाला भविष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर शालेय जीवनात भाषा व गणित या विषयांसोबत शारीरिक शिक्षणाला देखील तेवढेच महत्त्व द्यावे लागेल. या विचारांचा माझ्यावर फार मोठा प्रभाव पडला.’’ गावात चौथीपर्यंत शाळा असल्याने पाचवीला मला उदगीरला टाकले. जेवण बनवायला सोबत आजी होती. तेथील अंधारबावडीत साठ फूट उंचीवरुन मी सूर मारत रोज पोहत असे. हे समजल्यामुळे आजी घाबरली. तिने वडिलांजवळ हट्ट करुन लगेच पुढील वर्षात उदगीर सोडून सहावीला देवणीत आणले. सोबत जेवण बनविण्यासाठी आती होतीच. शिक्षणातील प्रत्येक क्षेत्रात मी सदैव अग्रेसर होतो. सातवीनंतर मात्र आमचे शिक्षण संपले व शेती, व्यायाम, कुस्ती, घोडेस्वारी इ.क्षेत्रात दमदार पदार्पण झाले.’’

मी जिज्ञासेने हाताच्या दुर्घटनेसंबंधी प्रश्न केल्यावर अप्पा सांगू लागले, ‘‘सर, ती कथा फार विलक्षण आहे. 1972 चा भीषण दुष्काळ होता. आम्हांला तशी 40 एकर जमीन होती, पण पाण्याअभावी काहीच पिकत नव्हते. आई, वडील, मी व चार बहिणी असे एकूण सात जणांचे आमचे कुटुंब होते.’’

अप्पांनी ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला घेतला. तो बंद केला आणि माझ्या दिशेने तोंड वळवून आत्मकथनात रमून गेले.

‘‘मानवी जीवनातील गंमत अशी आहे की, दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले की, विश्वातील कोणतीही शक्ती त्यास वाचवू शकत नाही. शेजारच्या एका गावात उत्सुकतेपोटी कुस्त्यांच्या हंगामात मी गेलो होतो. तेथे सलग तीन मल्लांना मी अगदी सहज चितपट केले परंतु शेवटी जो मल्ल राहिला त्याबरोबर पंचक्रोशीतील कुणीही दोन हात करायला तयार नव्हते. मी त्याच्या तुलनेत खूप लहान असल्याने मलासुद्धा त्याच्यासोबत लोक खेळू देत नव्हते. शेवटी मी त्याच्यासोबत कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला. आमची कुस्ती खूपच रंगली. चांगली झटापट झाली. जमलेले शेकडो लोक अक्षरश: तोंडात बोटे घालून आमची कुस्ती पाहत होते परंतु आमचा सामना ऐन रंगात आल्यावर सगळाच बेरंग झाला. माझा हात मनगटातून काटकन मोडला. भळभळ रक्त वाहू लागले. प्रचंड  वेदना सुरू झाल्या. डाव अर्ध्यावरतीच मोडला गेला. गावातील तज्ज्ञ हकीम बाहेरगावी गेल्याने त्यांच्या मुलाने आयोडीन लावून रगडून चोळला व त्या हाताला तीन ठिकाणी बांधले. रात्रभर घट्ट बांधल्यामुळे हात संपूर्ण सुजला होता. रक्तवाहिन्यांचा प्रवाह खंडित झाला होता. आमच्या गावापासून सुमारे शंभर कि.मी.अंतरावर असलेल्या कर्नाटकमधील बिदर येथे पुढील उपचारासाठी जाण्याचे ठरले. कमलनगर रेल्वेस्टेशनपर्यंत बैलगाडीतून जाण्यास आम्ही निघालो. सोबत आमच्या मदतीला दोन गडी होते. फक्त एक कि.मी.वर आल्यावर एक खोंड खाली बसला. कितीही मारले तरी तो जागचा उठेना. रेल्वे जर हुकली तर मोठा अनर्थ ओढावणार होता. आईच्या दृष्टीने तो इतका मोठा धक्का होता की तिने तेथेच हंबरडा फोडला. शेवटी त्या बसलेल्या खोंडासोबत ‘आमोशा’ नावाचा जो दुसरा बैल होता, ज्याचा व माझा जन्म एकाच दिवशी झालेला. त्याला परिस्थिती लक्षात आली. त्या आमोशाने एकट्यानेच नेटाने बैलगाडी ओढत व दुसर्‍या खोंडाने उठत बसत कसेतरी रेल्वे स्टेशन गाठून दिले. रेल्वेची वेळ होऊन गेली होती परंतु त्या दिवशी तब्बल अर्धा तास ती उशिरा आल्याने माझ्यावरील अनर्थ टळला. मानवी सुख आणि दु:खाची संवेदना प्राण्यांना सुद्धा समजते; हे मला त्यावेळी कळले. पुढे आम्ही बिदरला गेलो. तेथे माझा हात काढून टाकण्याशिवाय गत्यंतर नाही; असे जेव्हा डॉक्टरांनी सूचित केले, तेव्हा तेथे आईने वेगळाच हट्ट धरला व मला मिठी मारून बसली. ती डॉक्टरांना कळवळून म्हणाली, माझ्या मुलाचा हात काढून तिथे माझा हात लावता येत असेल तरच ऑपरेशन करा ओऽऽ डॉक्टर साहेब…..नाहीतर नाही. हे तर कदापि शक्य नव्हते, म्हणून नाईलाजास्तव अखेर आईला त्या हॉस्पिटलच्या प्रांगणातील लिंबाच्या झाडाला बांधून माझा हात काढावा लागला.’’

हा करुण प्रसंग सांगताना अप्पांचे डोळे पुन्हा भरून आले होते. पुढील संघर्षाची विदारकता सांगताना अप्पा म्हणाले, ‘‘या घटनेचा आमच्या संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात झाला. सात दिवसानंतर बिदरहून मला गावी आणले. आई व चारही बहिणी दु:खावेगाने सारख्या हंबरडा फोडायच्या. आई फक्त एवढेच म्हणायची, माझा मधुकर खूप मोठा झालेला मला पाहायचा होता. चारचाकी गाडीत फिरताना, रोज अनेक लोकांना सल्ले देताना, सरकार दरबारी त्याचे सत्कार होताना आणि पेपरमध्ये व टी.व्ही.वर बातम्यात झळकताना पाहायचा होता. पण…..तुटलेल्या हाताने मी मात्र गावात सुद्धा कुणाला तोंड दाखवत नसे. ज्या गावात माझा रूबाब होता, त्याच गावात मी दीनवाणा बनून तोंड लपवत होतो. आईचा टाहो ऐकवत नव्हता.’’

आभाळ भरून यावे तसे माझे डोळे भरून आले होते, मी रूमाल काढला आणि आसवे टिपून घेतली. अप्पाही क्षणभर थांबले होते. भावावेग ओसरल्यावर ते पुढे म्हणाले, ‘‘मी पहाटे पाच वाजता गावातील घरातून बाहेर पडत असे. दिवसभर शेतात राही. रात्री नऊ वाजता घरी जात असे. अश्रुंच्या धारा लागलेल्या असायच्या. वडिलांचे कष्ट, आईचे अधुरे स्वप्न, तिला बसलेला मोठा मानसिक धक्का…..या सर्वांमुळे फक्त रडावे की जीवनाचा शेवट करून सर्व प्रश्न संपवून टाकावे, अशी सारखी घालमेल चालू होती. अश्रुंच्या प्रवाहात, परस्परविरोधी विचारांच्या भावनिक आंदोलनात, प्रचंड मानसिक तणावात आणि शेवटी सखोल चिंतनातून चित्ताच्या पटलावर अंतर्मनातून आकाशवाणी व्हावी असे वाक्य कडाडले, ‘जीवन हे रणांगण आहे. इथे रडणारा नाही तर लढणारा जिंकला जातो.’ हा आतील आवाज होता माझ्या विवेकाचा, आईच्या स्वप्नांचा आणि वडिलांच्या कायावाचामनाने केलेल्या पुण्याईच्या संचिताचा. एखादी वीज चमकावी आणि क्षणात लख्ख प्रकाश पडावा तसा चमकून उठलो.’’

अप्पांच्या जीवनातील परिवर्तनाचे क्षण आले होते. विचारांचे सामर्थ्य जाणून घेताना मीही उत्साहित झालो होतो, त्यांच्या कथनातील आत्मविश्वासाने मी अंतर्मुख झालो होतो. अप्पा सांगू लागले, ‘‘आता मार्ग सापडला होता. जीवनाची दिशा स्पष्ट झाली होती. जगण्याचा मंत्र मिळाला होता. एकाच हाताने लढून संघर्षातही प्रेरणादायी कार्य कसे करावे; याची ती दीक्षा होती. कालिदास लेखणी हातात घेऊन ‘महाकाव्य’ निर्माण करत असेल, तर मी कुदळ हातात घेऊन जीवनाचा ‘भाष्यकार’ होईन. अर्जुन शस्त्र हातात घेऊन ‘भक्त’ बनत असेल, तर मी नांगर हातात घेऊन जीवनाचा ‘उपासक’ बनेल. लतादिदी अखंड स्वरसाधना करुन जर ‘गानसम्राज्ञी’ बनत असतील, तर मी काळ्या आईची घामाच्या धारांनी अविरत पूजा करुन जीवनाचा ‘श्रमसम्राट’ बनेल.’’

अप्पांचे आत्मकथन आवेशपूर्ण चालू होते. ते पुढे म्हणाले, ‘‘यानंतर मी ताडकन उठलो. आईकडे गेलो. तिला सांगितले, तुझी सगळी स्वप्ने मी पूर्ण करीन. तू निश्चिंत राहा. कुदळ फावडे घेऊन शेतात आलो. एका हाताने खोदकाम सुरु केले. तीन महिन्यात एकट्यानेच एक बिघा जमीन खोदून काढली. नंतर गड्यांच्या मदतीने आणखी काही क्षेत्र पेरणीयोग्य बनवले. तशी एकूण चाळीस एकर शेती होती, तरी पहिला प्रयोग अगदी दोन अडीच एकरवरच केला. जिद्दीने शेतीची सर्व कामे झपाटल्यासारखे केली. एका बैलाच्या मदतीने मी स्वत:च औत ओढण्याचा धाडसी प्रयोग केला. त्यावर्षी तब्बल वीस पोते तिळांचा महाप्रसाद काळ्या आईने प्रसन्न होऊन पदरात टाकला. आपल्यात जिद्द निर्माण झाली की अशक्यप्राय वाटणारी कामे सुद्धा अनाकलनीय पद्धतीने आपल्याद्वारे घडतात. पहिल्या या पिकापासून आमोशाला जोडीदार म्हणून एक बैल घेतला. दुधासाठी म्हैस घेतली. दोनही बहिणींची लग्ने केली.’’

अप्पांनी ट्रॅक्टर चालू केला आणि पुढील फेरफटका मारण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालो.  आता आम्ही डाळिंबाच्या बागेतून शेततळ्याकडे निघालो होतो. ‘‘ओसाड असलेल्या या पडिक जमिनीचे रूपांतर बागायत करण्यासाठी तुम्हाला किती वर्षे लागली अप्पा ?’’ मी सहज विचारले.

अप्पा क्षणाचाही विलंब न करता उद्गारले, ‘‘मी एक तत्त्व स्वत:च अंगिकारले होते. कोणतेही पीक घेतले की त्यातून मिळालेल्या नफ्यातून शेतीला उपयोगी पडेल अशी काहीतरी नवीन खरेदी करायची. सहा बैल, ऊस गाळप मशीन, क्रशर, खोडवा काढणी यंत्र, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, कचरा गोळा करणारे यंत्र, सोयाबीन काढणी यंत्र, ऊस लावणी यंत्र इत्यादी उपकरणे विकत घेतली. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुधासाठी गायी घेतल्या. शेततळी तयार केली. प्रत्येक पिकानंतर जमीन विकत घेऊ लागलो. शेतीचे आधुनिक प्रयोग करू लागलो.

विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळबागा, ऊस या माध्यमातून सर्व प्रकारची पिके घेऊ लागलो. मागील पंचेचाळीस वर्षांचा आढावा घेतल्यास चाळीस एकर पडीक जमिनीचे रूपांतर आज मी दीडशे एकर बागायत क्षेत्र करण्यास यशस्वी झालो आहे.’’

अप्पा आत्मविश्वासाने सांगत होते. आम्ही कधी बुलेट सफारी करायचो, तर कधी स्कॉर्पिओत फिरायचो, रेसची बैलगाडी, वरातीचा रथ, घोडा हे देखील त्यांनी हौसेखातर विकत घेतले होते. मी त्यांना भेटायला आलो की पिकनिकला हेच समजत नव्हते, परंतु एकच हात असतानाही दुष्काळावर मात करणार्‍या त्या ढाण्या वाघाने माझे चित्त वेधले होते. गप्पांच्या ओघात मी सहज विचारले, ‘‘अप्पा, एवढा सगळा व्याप सांभाळायचा म्हणजे मजूर तर लागणारच. तुमच्याकडे गडी टिकतात का हो ?’’

अप्पांच्या डोळ्यांतून खळकन पाणी आले व ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे काम करणार्‍या मजुरांना मी पोटच्या लेकरांसारखे जपतो. जिवाला जीव देणारी ही मंडळी माझी ‘खरी संपत्ती’ आहे. आमच्या शेतात प्रामाणिकपणाने वर्षानुवर्षे काम करणार्‍या अण्णाराव जाधव आणि रघुनाथ जाधव या दोन्ही गड्यांस एकूण दहा एकर शेती मी दान केली आहे. माझ्या शेतात कायमस्वरूपी किमान पंधरा महिला शेतीकामासाठी असतात. कित्येकवेळा इथल्या परिस्थितीमुळे किंवा त्यांच्या अडचणीमुळे त्यांना काम नसले तरी त्यांना मी नियमितपणे पूर्ण पगार देतो. 1980 साली लग्न झाल्यापासून खांद्याला खांदा लावून समर्थपणे साथ देणारी माझी पत्नी कौशल्या याचे उत्तम नियोजन करते.’’

‘‘अप्पा, मागे वळून पाहता पंचेचाळीस वर्षांपूर्वी तुम्ही पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झाल्यासारखं वाटतं का हो ?’’ मी कुतूहलाने विचारले.

अप्पा हसत म्हणाले, ‘‘माझे स्वत:चे असे कोणतेही स्वप्न नव्हते. माझ्या आईच्या स्वप्नांनाच मी माझे ध्येय बनवले होते. तिचे सर्व स्वप्न मी पूर्ण केले. आज मी चारचाकी गाडीत सन्मानाने फिरत आहे. शासन दरबारी व इतर अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांत मला ‘प्रमुख अतिथी’ म्हणून मानाने आमंत्रित केले जाते. नवरत्न, आदर्श शेतकरी, कृषी पर्यटन गौरव, कृषिभूषण इ. अनेक नामांकित पुरस्कारांचा आज मी धनी झालो आहे. तिरस्कारांतून सुरु झालेला माझा प्रवास आज पुरस्कारांच्या महामार्गाचा साक्षी बनला आहे. धिक्कारवत वाटणारे जीवन आज सत्काराचे केंद्र बनले आहे. शेकडो लोक माझे विचार ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. जीवनात हार मानलेले लोक पराभूत मानसिकतेतून जेव्हा माझ्याकडे येतात, तेव्हा त्यांना नैराश्य आणि औदासिन्यातून बाहेर काढण्यासाठी माझा एक हात मोठा आधार ठरत आहे. अनेक वर्तमानपत्र व दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर माझी यशोगाथा झळकताना मी आईच्या सर्व स्वप्नांना पूर्ण केल्याचा आनंद उपभोगत असतो. परिस्थिती, समाज, निसर्ग आणि अंतर्मन या सर्वांकडून झालेल्या आघातांस पूर्णपणे नमवलेला ‘शेतकर्‍यांचा एक योद्धा प्रतिनिधी’ असल्याचा मला अभिमान वाटतो.’’

यानंतर अप्पांनी स्वरचित कवितासुद्धा मला म्हणवून दाखविल्या. मायबाप, सुगी, भाकर, प्रियतमा, काळी आई, जिद्द इ.त्यांच्या कविता मनास खूप भावल्या.

आमची भेट होऊन आता तीन तास उलटले होते. माथ्यावरचा सूर्य आता मावळतीकडे झुकला होता. मला रात्रभर प्रवास करायचा होता, म्हणून शेवटी मी माझ्या मुख्य मुद्याला हात घातला. मी म्हणालो, ‘‘अप्पा, तुम्हाला आमच्या दत्तवाडी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला यावेच लागेल. कारण आमच्या जामखेड तालुक्यात तुमच्यासारख्या लढवय्यांच्या विचारांची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झाली आहे.’’

मी कार्यक्रमाची तारीख, शाळेचे अंतर, लागणारा वेळ, इथली सामाजिक परिस्थिती, शेतकर्‍यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी करावयाचे आवाहन या सर्व बाबींची कल्पना देऊन मानधनाचा मुद्दा पुढे केला. ‘‘अप्पा, कमीत कमी जाऊन येऊन अंदाजे पाचसहाशे कि.मी.चा तरी तुमचा प्रवास होईल. तुम्हाला मुक्काम करावा लागेल. त्यामुळे तुमचे दोन दिवस जातील. या सर्व बाबींचा विचार करुन मानधन किती घेणार हे सांगितले तर खूप बरे होईल. कारण आम्हाला त्याप्रमाणे पुढील तयारी करता येईल.’’

अप्पा मोठ्याने हसले व म्हणाले, ‘‘मानधन! म्हणजे लेकरांच्या कौतुकाला यायचे, त्यांचे सत्कार करायचे, मानसिकदृष्ट्या खचलेल्या लोकांना धीर द्यायचा आणि मानधन घ्यायचे? म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे. नाहीऽऽनाहीऽऽ मी एकही रुपया मानधन घेणार नाही.’’

मला धक्काच बसला; मी आश्चर्याने म्हणालो, ‘‘पण अप्पा, तुम्हाला तुमच्या गाडीत डिझेल तर टाकावे लागेल ना? नाही मानधन, पण प्रवास खर्च म्हणून फूल ना फुलाची पाकळी काहीतरी सांगा.’’

अप्पा पटकन म्हणाले, ‘‘कसला प्रवासखर्च? आता तुम्ही मला भेटायला एवढ्या लांबून आलात, तुम्हाला कोण देणार प्रवास खर्च ?’’

अप्पांनी मलाच निरूत्तर करुन टाकले, पण तरीही मी माझा मुद्दा रेटत म्हणालो, ‘‘अप्पा, अहो मी विद्यार्थ्यांसाठी आलो, शाळेसाठी आलो, तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांना तुमच्या विचारांनी जगण्याचे बळ देता येईल; या भावनेने आलो. हे माझे कर्तव्यच आहे. नाहीतरी आपण फोनवरसुद्धा हे सगळे ठरवू शकलोच असतो ना? पण मलाच तुम्हाला भेटायची इच्छा होती, म्हणून मी आलो. मला कोण देणार प्रवास खर्च ? आणि त्याची गरज काय?’’

एखाद्या निष्णात वकिलासारखा अप्पांनी लगेच माझा मुद्दा खोडला, ‘‘तुम्हाला जसे इथे प्रत्यक्ष येऊन खरे काय खोटे काय याची शहानिशा करून तुमच्या परिसरातील लोकांना धीर द्यावा हे कर्तव्य वाटते, तसे जेथे जेथे माझ्या विचारांची गरज आहे व मला आमंत्रित करण्यात येते, अशा आपत्तीच्या काळात तेथे जाऊन माझी यशोगाथा सांगून त्यांच्यात स्फुल्लिंग निर्माण करणे हे देखील माझे कर्तव्यच आहे; असे मी मानतो. त्यातले त्यात तुमची शाळा ही जिल्हा परिषदेची व ग्रामीण भागातील आहे. गोरगरीब व सामान्य कुटुंबातील भूमिपुत्रांची मुले तेथे शिकतात. म्हणून मला तेथे यायला तर नक्कीच आवडेल, मानधन किंवा प्रवासखर्चाचे टेंशन घेऊ नका, अहो मी आता दीडशे एकरचा मालक आहे ना? म्हणून तुम्ही निश्चिंत रहा. मी कार्यक्रमाला येईनच, मुक्कामही करेन, पण कोणत्याही लॉज किंवा हॉटेलवर नाही, तर तुमच्याच गावातील एखाद्या शेतकरी बांधवाच्या घरी, तेथे अगदी झुणका भाकरीचा बेत केला आणि सध्या उन्हाळा असल्याने त्यांच्या घरासमोरील मस्त चांदणं पडलेल्या अंगणात साधी चटई किंवा गोधडी मिळाली, तरी मला स्वर्गीय आनंद होईल.’’

मला तर खूप आनंद झाला, आश्चर्य वाटले आणि शंकापण आली. म्हणून मी वेगळीच खेळी केली. एक हजार रुपये अप्पांच्या हातात ठेऊन म्हणालो, ‘‘अप्पा, आतापर्यंत तीन तास मी तुमचेच ऐकले. आता माझे थोडे ऐका. हे एक हजार रुपये तुमच्याकडे राहू द्या. गॅदरिंगमध्ये मुलांचे कार्यक्रम रंगात आल्यावर तुमच्या वतीने बक्षीस म्हणून हे शाळेला द्या.’’

माझा खरा उद्देश वेगळाच होता. एवढ्या लांबून येणारी वयोवृद्ध व्यक्ती पत्नी, मुले, सुना किंवा नातू यांच्या आग्रहावरून ऐनवेळी कोणतेही कारण सांगून येण्यास नकार देऊ शकते. म्हणून इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी मी ही एक प्रकारची आगाऊ गुंतवणूक केली होती.

एखादे झुरळ झटकावे तसे अप्पांनी ते एक हजार रुपये माझ्याकडे देत मला म्हणाले, ‘‘वाह रे वा! सर, हे म्हणजे तुम्ही मला अगोदर पैसे देणार, ते मी बक्षीस म्हणून माझ्या नावे देणार, मग देणगीदार म्हणून माझी टिमकी वाजवून घेणार, मग माझ्या ‘प्रमुख अतिथी’ या तुम्हीच सन्मानपूर्वक दिलेल्या पदाचे महत्त्व काय ? ‘प्रमुख अतिथी’ हा केवळ सन्मान नसून ती एक नैतिक जबाबदारी देखील आहे. माझी तीनही मुले आज कर्तीसवरती आहेत. दोन शेती करतात, तर एक सांगली जिल्हा परिषदेत जत तालुक्यात तुमच्यासारखाच शिक्षक आहे. अमेरिकेत एक नातू इंजिनिअर आहे, तर एक नातू डॉक्टर आहे. मला प्रपंचात मिळालेले हे यश फक्त दानधर्म आणि नीतिमत्ता यामुळेच मिळाले आहे, अशी माझी भावना आहे. त्यामुळे तुमचे हे एक हजार रुपये तुम्हालाच लखलाभ! आणि हो, उरला प्रश्न मुलांच्या कार्यक्रमाला बक्षीस देण्याचा, तर मी सगळे कार्यक्रम नक्कीच बघेन व यथाशक्ती बक्षीस देखील देईन, परंतु आता हे नकोच!’’

मी हसलो, अप्पांची क्षमा मागितली व म्हणालो, ‘‘पण अप्पाऽऽ काहीही झालं तरी याच बरं का, आम्ही जंगी तयारी करतो.’’

अप्पांचा निरोप घेऊन मी आलो. आता त्यांच्या प्रेरणादायी संघर्षाला सर्वांसमोर आणण्याचा आम्ही चंग बांधला होता. दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम बसवले. आमच्या धोंडपारगावसह जामखेड, नान्नज, राजेवाडी, झिक्री, पाडळी फाटा येथे अप्पांचे एका हाताने विविध प्रकारची कामे करतानाचे फोटो असलेले मोठमोठे बॅनर्स लावले. आजूबाजूच्या पंधरा वीस गावांतून प्रचारासाठी रिक्षा फिरवली. वर्तमानपत्रांतून दोन हजार माहितीपत्रके वाटली. स्थानिक वाहिन्या व वर्तमानपत्रांतून त्यांच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या तीन चार दिवसांपासूनच ‘आम्ही सहकुटुंब स्नेहसंमेलनाला येणार!’ असे गावागावांतून शेकडो संदेश येऊ लागले आणि कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सकाळीच अप्पांचे चिरंजीव रमाकांत चिद्रे सर यांचा फोन आला.

‘‘नमस्कार सर, मी अप्पांचा मुलगा बोलतो. परवा दिल्लीची एक टीम अप्पांकडे गावी आली होती. त्यांना त्यांच्या वाहिनीवर अप्पांनी केलेल्या कामांचे शुटिंग दाखवायचे होते. अप्पांनी उत्साहाच्या भरात भर उन्हात नांगरणे, खोदकाम करणे; अशी अनेक खडतर कामे करून दाखवली. त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताच्या खांद्याची नस भयंकर दुखत आहे. त्यांना काल खूप तापसुद्धा आला होता. प्रचंड वेदना होत असल्याने आता त्यांना देवणीच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. त्यांना सध्या सलाईन चालू असून किमान आठ ते दहा दिवस आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तुमची ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला पूर्वकल्पना देण्यासाठी फोन केला……अप्पा उद्या जामखेडला येणार नाहीत.’’ हा फोन झाल्यानंतर मात्र मी गर्भगळित झालो. उत्साह संपला होता. शेकडो लोकांना अपेक्षाभंगाचा धक्का बसणार होता. यापूर्वी कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने केला नव्हता एवढ्या सगळ्या प्रचार प्रसिद्धीचा फज्जा उडणार होता.

मी खिन्न मनाने अप्पांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांना फोन लावत होतो. दिवसभर अनेक वेळा फोन करून फक्त रिंग वाजत होती. नंतर तर फोनसुद्धा बंद असल्याचे सांगितले जात होते. मी मात्र हे कुणालाही सांगत नव्हतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आपल्या हातात काहीच राहिले नाही; याची तीव्र जाणीव झाली की माणूस प्रार्थनेचा आश्रय घेतो. अवघ्या विश्वाची सर्व सूत्रे लीलया चालवणार्‍या त्या सूत्रधाराशी दिवसभर माझा मूकसंवाद चालू होता.

अखेर सायंकाळी अप्पांचाच मला फोन आला. मनाला दिलासा वाटला.फोनवर ते बोलू लागले, ‘‘सर, रमाकांतने तुम्हाला सकाळी जे कळवले, ते सगळे खरे आहे. मला तिकडे येण्याबाबत सर्वांचा विरोध आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका, मी उद्या पहाटे निघून सकाळी उन्हाच्या आत दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचतो. दिवसभर आराम करीन. रात्री वेळेत कार्यक्रमास येईन निश्चिंत राहा.’’ असे म्हणत त्यांनी फोन ठेवला.

दुसर्‍या दिवशी सकाळीच अप्पा साडेदहा वाजता जामखेडमध्ये हजर झाले. शेतकरी मार्केटचे संचालक संतोष पवार साहेब व त्यांच्या संपूर्ण सहकार्‍यांसमवेत दीड दोन तास रमले. माझे जिवलग मित्र असलेल्या संभाजी कोकाटे सरांचे वडील जुन्या काळातील एक निष्णात पहिलवान असल्याचे समजल्यावर त्यांच्या घरी जाऊन मनमुराद गप्पा मारल्या. गटशिक्षणाधिकारी आदरणीय पोपट काळे साहेबांच्या आग्रहानुसार पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने चालू असलेल्या प्रशिक्षणवर्गात सर्व वर्गशिक्षकांसमोर स्वत:ची यशोगाथा मांडली. सायंकाळी विश्वदर्शन न्यूज चॅनेलच्या स्टुडिओत विश्वदर्शनचे संचालक गुलाब जांभळे यांनी घेतलेल्या मुलाखतीस दिलखुलास उत्तरे दिली. रात्री ठीक सात वाजता शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी येऊन पूर्णवेळ उपस्थित राहिले. स्नेहसंमेलनात शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून उपस्थित शेकडो लोकांना स्वत:च्या प्रभावी वक्तव्याने प्रेरित करुन शेवटी आवाहन केले. ‘‘मी माझ्या शहात्तर वर्षांच्या आयुष्यात एकाच हाताने अनेक दुष्काळांवर व कित्येक जीवघेण्या संकटांवर मात केली आहे. तुम्हाला तर दोन हात आहेत. खचू नका. रडू नका. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा कधीच पर्याय ठरू शकत नाही. म्हणून तो विचार देखील करू नका. जिद्दीने आणि संयमाने लढून आजच्या या प्रतिकूल परिस्थितीवर मात करा. उद्याचा उष:काल आपले स्वागत करण्यास सिद्ध आहे.’’

अप्पांनी सर्वांची मने जिंकली होती. समाजमनाची अस्वस्थता व अशांती दूर करण्याचा परोपरीने प्रयत्न केला होता. आत्मसंयम व दूरदृष्टिची बीजे जनमानसात पेरली होती. गावातील भूमिपुत्र असलेले एक आदर्श व्यक्ती रामचंद्र दादा शिंदे यांच्या शेतातील घरी पाहुणचार स्वीकारला होता. आम्ही स्नेहसंमेलनात बसविलेल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत भरघोस बक्षिसे देऊन स्वत:चा शब्द पाळला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी निरोप देताना त्या महान योद्ध्याच्या चरणी मी जेव्हा नतमस्तक झालो, तेव्हा तापाने फणफणलेल्या अवस्थेत, डबडबलेल्या डोळ्यांनी व गदगदलेल्या स्वरात ते मला म्हणाले, ‘‘काल उपस्थित असलेल्या दीड ते दोन हजार लोकांमधून माझ्या यशोगाथेतून प्रेरणा घेऊन एखाद्या जरी शेतकर्‍याने आळस, जुगार आणि व्यसनास लाथाडून खचून न जाता जिद्दीच्या जोरावर दुष्काळास गाडण्याचा भीमपराक्रम करुन नंदनवन फुलविले आणि त्याचे कुटुंब वाचविले, तरी कालच्या स्नेहसंमेलनासाठी ‘प्रमुख अतिथी’ म्हणून उपस्थित राहिल्याचा तो माझा खरा गौरव असेल, सर!’’

– मनोहर इनामदार

हा लेख ‘चपराक’ प्रकाशनच्या मनोहर इनामदार लिखित ‘गवसणी’ या कथासंग्रहातून घेतला आहे. श्री. मनोहर इनामदार यांच्या ‘गवसणी’ कथासंग्रहातील सर्वच कथा सत्यघटनाधिष्ठित, हृदयस्पर्शी व प्रेरणादायी असून मानवी जीवनमूल्यांचा गौरव करणार्‍या आहेत. ‘गवसणी’ या शीर्षककथेत निरक्षर आईला साक्षर करून तिच्यातील प्रज्ञा व प्रतिभेच्या विकासासाठीची लेखकाची धडपड ही थोर मातृवंदना आहे, तर ‘श्यामच्या आईसाठी’मधील लेखकाचा पुस्तक विकत घेण्याचा लडिवाळ हट्ट पुरविण्यासाठी दम्याचा त्रास असूनदेखील वडिलांनी केलेली 23 कि. मी.ची पायपीट वाचकांसाठी मोठे संस्कारधन आहे.या कथासंग्रहाला मानवकल्याणाचे व मूल्यसंवर्धनाचे अधिष्ठान लाभलेले असल्याने यांतील अलकांरिक भाषासौंदर्य आणि विचारसामर्थ्याने वाचक प्रेरित व प्रोत्साहित होऊन कृतकृत्यतेचा अनुभव घेतील.

हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी

गवसणी

ई-बुक स्वरूपात वाचण्यासाठी खालील लिंक वरून खरेदी करा

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा