वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! त्यामुळे उगीच शब्दांचे अवडंबर न माजवता, फाफटपसारा टाळून रंजकपणे थोडक्यात विषय मांडणे महत्त्वाचे असते.
नेमकेपणाने विषयाचा वेध घेऊन वाचकांना त्यात गुंतवून ठेवणे हे काम सोेपे नसते. ही किमया साधली आहे नगर येथील लेखिका सुजाता पुरी यांनी. हे वृत्तपत्रीय लेखन असल्याने शब्दांची मर्यादा असणे स्वाभाविक आहे; मात्र या मर्यादेचेच सामर्थ्य करत त्यांनी या मशाली चेतवल्या आहेत.
प्रस्तुत पुस्तकातील 55 लघुलेखांद्वारे लेखिकेने जे चिंतन मांडले आहे ते वाचकांचे प्रबोधन करणारे आहे. सामाजिक जाणिवा समृद्ध करणार्या या लेखांच्या माध्यमातून सुजाताताईंनी समाजशिक्षकाची भूमिका पार पाडलीय. यातून स्त्रियांचे प्रश्न, शिक्षण विचार, संस्कार, नवा भारत, कोविडच्या काळाचे चित्रण, लोकशाही, घरपण, वृद्धावस्था, प्रेरणा, मृत्युविचार, पुरस्कारांचे राजकारण, प्रसारमाध्यमे, स्वप्रतिमा, ग्रंथश्रेष्ठता, निरोप, वाचन हे व असे चौफेर चिंतन आहे. रानफुले, रानावरच्या वेली, अंगण हे लेख मला विशेष आवडले. ग्राम्य संस्कृतीचे दर्शन घडवतानाच आपल्या पिढीच्या बालपणाचा काळ डोळ्यासमोर जिवंत करण्याचे सामर्थ्य या लेखांत आहे.
या लेखांची भाषा प्रवाही आहे. आवश्यक तिथे त्यांनी कवितांची पखरण केल्याने शब्दसौंदर्यात आणखी भर पडलीय. तीन-चार मिनिटांत एक लेख वाचून होतो. वाचताना कंटाळा तर येत नाहीच पण वाचक अंतर्मुख होऊन विचार करतो. भवतालाचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर साकारते आणि त्यात तो आपले स्थान शोधू लागतो. काही मिनिटांसाठी का असेना पण त्याला रोजच्या रहाटगाड्याच्या चिंतेपासून दूर नेत, त्याच्या आतल्या आवाजाला प्रभावीपणे साद घालत वेगळ्या विश्वात नेण्याचे कसब लेखिकेला जमले आहे. कोणत्याही कलाकृतीचे यापेक्षा मोठे यश ते कोणते? एखाद्या कथा-कादंबरीप्रमाणे वाचकांना गुंतवून ठेवत त्याच्या विचारांना दिशा देण्याचे काम हे लेख करतात. खरेतर आजच्या व्हाटसअॅप विद्यापीठाच्या माध्यमातून रोजच माहिती आणि ज्ञानाची मनसोक्त उचलफेक होत असताना नवे काही वाचावे, नवे काही शोधावे ही वृत्तीच खुंटित होत चालली आहे. त्यामुळे सुजाता पुरी यांच्यासारख्या लेखिका वाचकांचे मनोरंजनातून प्रबोधन करत असतील तर ते कार्य मोलाचे आहे.
नगर येथील ‘राष्ट्र सह्याद्री’ या दैनिकातील साप्ताहिक स्तंभाचे हे पुस्तक आहे. स्तंभलेखन करताना सातत्य खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे दर आठवड्याला एक विषय निवडणे आणि त्यावर साध्या-सोप्या भाषेत वाचकांशी शब्दसंवाद साधणे जिकिरीचे असते. हे कसब पुरी मॅडमकडे आहे. त्यामुळेच हे लेख प्रकाशित होताच समाजमाध्यमाद्वारे प्रचंड व्हायरल झाले. वृत्तपत्राच्या वाचकांबरोबरच महाराष्ट्रभर त्यांनी त्यांचा वेगळा वाचक निर्माण केला. नव्याने लिहिणार्यांसाठी हे एक आव्हान असते. ते त्यांनी यशस्वीरित्या पेलले. या पुस्तकाच्या शेवटी समाजमाध्यमांवरील निवडक वाचकांच्या दिलेल्या प्रतिक्रिया त्याची साक्ष देतात.
या पुस्तकाच्या मनोगतात सुजाता पुरी लिहितात, ‘‘माझ्या लिखाणातून मी जाणती झाले, डोळस झाले आणि मलाच माझी नव्याने ओळख झाली. माझे हरवलेले सूर या निमित्ताने मला सापडले…’’ हे असे ‘हरवलेले सूर’ सापडणे यातच जीवनाचे सार असते. ‘आपण कोण?’ याची ओळख होणं यापेक्षा मोठं यश कोणतंही नसतं. युगायुगाची साधना करूनही अनेकांना या प्रश्नाचे उत्तर गवसत नाही. ती आत्मानुभूतीची जाणीव अशा अभिव्यक्तीतून होते. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘दिसामाजी काहीतरी लिहावे!’ मात्र आपले अनेक लेखक या वाक्यातील गर्भितार्थ लक्षात न घेता ‘काहीतरीच’ लिहितात आणि स्वतःचे हसे करून घेतात! सुजाता पुरी यांच्यासारख्या काही प्रतिभावंतांना ‘दिसामाजी काहीतरी ‘चांगले’ लिहावे’ हे कळते. त्यामुळेच त्यांचे कौतुक वाटते.
आपली प्रत्येकाची आयुष्यात पुढे जायची धडपड असते. या वाटचालीत काहीवेळा नैराश्य येते. प्रतिकूलतेतून आलेल्या वैफल्यामुळे मनोधैर्य खचते. अशावेळी काही प्रकाशमान मशाली आपल्याला निश्चित दिशा दाखवतात. हा अंधार भेदून बाहेर पडण्याचे सामर्थ्य देतात. सुजाता पुरी यांनी ‘वाटेवरच्या मशाली’ या लेखसंग्रहाच्या माध्यमातून वाचकांचे असेच मनोबल उंचावण्याचे काम केले आहे. त्यामुळे ही फक्त शब्दांची साधना नसून एका सामाजिक जबाबदारीचे कृतज्ञतापूर्वक केलेले पालन आहे. सुजाताताई पुरी यांची यानंतरही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित होतील आणि वाचकांना उत्तम वैचारिक मेजवानी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी लेखनप्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो!
– घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक आणि संपादक
हे पुस्तक खालील लिंकवरून तुम्ही घरपोच मागवू शकता!
https://shop.chaprak.com/product/watewarchya_mashali/
ई-पुस्तकासाठी
https://www.amazon.in/dp/B0C1H5NLJB?ref_=cm_sw_r_apan_dp_DQZEX10WQQTSYCSPSQ2J