महाराष्ट्र शाहीर अमर शेख यांचा जन्म 20 आक्टोबर 1916 चा. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचा. माता मुन्नेरबी यांच्या पोटी जन्मलेल्या ह्या कलावंताला सोबत मिळाल्या त्या दोन गोष्टी.
एक दारिद्य्र आणि दुसरे म्हणजे काव्य. दारिद्य्राने जगण्याचे शिक्षण दिले तर काव्याने जीवनदृष्टि दिली. हे दोन्ही पंख पसरूनच त्याने जीवनभर भरारी घेतली. दारिद्य्रात पिचणारी आई मराठी संस्कृतीची, मराठी परंपरेची, मराठी चालीरितींची अभिमानी होती. त्या अभिमानाचे बाळकडू मेहमूदला प्राप्त झाले होते. तिचा, मातेचा संस्कार होता तो वारकरी पंथाचा. म्हणजेच तिच्या मनाचा मूळ धर्म होता तोच मुळी वैष्णवाचा धर्म. याच धर्माची जागती जोत तिच्या अंतरंगात तेवत होती. ती सांगत होती…
‘टाळ मृदंगाचा आवाज येतो माझ्या कानी
या गं या सयांनो, दिंडी आली गावरानी’
हाच धर्म, हीच उत्कट भावना रक्तातून पाझरत गेली ती अमरच्या, मेहमूदच्या हृदयात, मेहमूदच्या रक्तात. म्हणूनच त्यानेही बार्शीच्या पुष्पावतीच्या पाण्याशी जन्मापासून इमान राखले होते. ते राखताना तोही बालेघाटीच्या काळ्या आईचे गीत मनातून, आतून गात होता. या पुष्पावतीच्या काठी होते ते माळरान पण हे माळरान विशालतेची, भव्यतेची जाणीव देत होते. मनाची कक्षा रूंदावत होते. तिच भावना काव्यातूनही पाझरून आली. बार्शीच्या पुष्पावतीबद्दलची भावना प्रकटताना अमरनेच म्हटले आहे…
‘‘रूक्ष या माळावरती, महाराष्ट्र धर्माच्या ज्योती
थोर पंढरीची भागवती, धो धो जवळूनी वाहत होती’’
माळरान रूक्ष होते, उजाड होते तरीही त्याच्या अंगाखांद्यावर सुगंधाचे लेणे चढलेले होते. अमर सांगतो,
‘‘जाईजुई, शेवंती, केतकी यांचे ठायीठायी दिसे वन
नाव मात्र पुष्पावती, काठी कुसळ, सराटे यांची लावण’’
हा तसा विरोधाभासच होता, तरीही त्याने अमरचे जीवन अंकुरले होते, बहरास आणले होते. कारण अशाच माळावर नैसर्गिक अशा प्राप्त झालेल्या स्वरांचे इंद्रधनुष्य फुलत होते. याच रूक्ष माळावर अमर बेभानपणे गात होता. सुगंधीत झालेल्या मनाला आणि स्वराला नवा आकार देत होता. तारस्वरात गाणे आणि आसमंतात तीव्र स्वर भरून टाकणे हा छंद त्याच्या जीवाला वेडापिसा करत होता. तो करत असताना काव्याचा अभ्यासही सुरू होता. विशेषतः आपल्या पहाडी स्वराला साजेसेच काव्य तो कंठात रूळवित होता. पुरूषार्थाची धार त्या स्वराला जात्याच प्राप्त झाली होती. पराक्रमाची, ध्येयत्वाची भूकच त्यात एकवटून गेली होती. म्हणूनच त्या काळी कुसुमाग्रजांचे ‘गर्जा जयजयकार’ हे गीत ओठात रूळून घेतले होते. हे गीत बेभानपणे बालेघाटीच्या काळ्या आईला साक्षीला ठेऊन अमर त्या रूक्ष माळावर बेभानपणे गात होता. या पुरूषार्थ निर्माण करणार्या गीतानेच त्याच्या मनाला प्रसन्नता आली होती. तिच त्याच्या शब्दातून महाराष्ट्र धर्माची महती सांगत होती.
वयाच्या अठराव्या वर्षीच त्याने मजुरांची संघटना बांधली ती सोलापुरात आणि गिरणी कामगारांचा संपच त्याने घडवून आणला. त्यामुळे तो पकडला गेला. अमरच्या स्वरावर लोकांचे केवढे प्रेम आहे हे ब्रिटिश काळातल्या पोलिसांनाही समजले होते. त्यामुळे त्याला भरदिवसा तुरूंगात नेणे कठीण होणार आहे हे त्यांनी ओळखले आणि वेळ रात्रीची ठरवली. बंद पिंजर्याच्या गाडीत अमरला बसवले आणि गाडी सुरू झाली; तोच झंकारलेल्या मनातून ‘गर्जा जयजयकार’ हे गीत उसळून वर आले. तो गाडीतून या गीताच्या ओळी एकामागून एक म्हणू लागताच रात्र असूनही लोक जागे झाले आणि गाडीच्या मागून चालू लागले. हा हा म्हणता हजारोंचा जमाव जमला आणि पोलिसांची पंचाईत झाली. गाणे अनेकजण गातात पण अमर ज्या तडफेने गात होता त्याने सारे जनमत हेलावून जात होते. पोलिसांना नेमके हेच दृश्य डोळे भरून बघावे लागले. इतकेच काय, जेलमध्ये अशा राष्ट्रगीत गाण्याला बंदी असतानाही खुद्द जेलरच अमरकडून हे गीत पुन्हा पुन्हा गाऊन घेत होता आणि आपल्या गोंधळलेल्या मनाला शांती देत होता. कुसुमाग्रजांच्या या गीताला अमरने स्वतःची अशी दिलेली चाल जनसामान्यांच्या हृदयाला पार भिडून गेली होती.
नाशिकला आम्ही कुसुमाग्रजांची-तात्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांना प्रश्न केला की, ‘‘टीव्हीवर तुमचे हे अमरगीत म्हटले जाते. या गीताला खरंच न्याय मिळाला असे वाटते का?’’ तेव्हा तात्या म्हणाले, ‘‘माझ्या या गीताचा न्याय दिला व खरा अर्थ आणला तो शाहीर अमर शेखनेच.’’
चित्रपटातल्या मायावी जगात अमर गेला पण थोड्याच दिवसात तो तेथून निघाला. तेथे त्याचा जीव गुदमरून गेला. तिथले जीवन, त्याच्यातल्या कलावंताची तडफड सुरू करताच या जगापासून त्याने दूर जाण्याचा निश्चय केला आणि तसा तो निघालाही. 1941 ला विसापूर जेलमधून सुटून अमरने कोल्हापूर गाठले होते. मास्टर विनायक यांनी त्याच्या कलेची कदर केली होती पण तिथले जीवन थोड्याच काळात त्याला असह्य झाले. त्याबाबतची नोंद त्याने आपल्या दैनंदिनीत करून ठेवली ती 2 ऑक्टोबर 1941 रोजी. त्याने लिहिले आहे,
‘मला कुणी विचारील, आज काय होतंय तुमच्या स्टुडिओत? मी चटकन् म्हणेन, ‘दारू’ समाजाला पाजण्यासाठी. याला जर कला म्हणायचे असेल तर ती एका विशिष्ट वर्गापुरती. बहुजन समाजाची खास नाही.‘ अमरचे मन झेपावले होते ते बहुजन समाजाच्या सेवेसाठी आणि ही सेवा कलेतून, स्वरातून, अभिनयातून आणि काव्यातून त्याला साधायची होती. म्हणूनच त्याने 1942 मध्ये पुणे गाठले.
ब्रिटिशांची पाशवी सत्ता बेगुमानपणे वागत होती. ती चळवळ चिरडीत होती. स्वातंत्र्याची भावना मारत होती. त्यासाठी गोळीबार करत होती. दहा ऑगस्टलाच पुण्यात गोळीबार झाला होता. एसपी कॉलेज, ससून हॉस्पिटलवर गोळीबार झाला होता. ही सरकारी कृती चीड आणणारी होती. अमर या दडपशाहीमुळेच पेटून उठला. प्रत्यक्ष लढ्यात उतरण्याचा त्याने संकल्पही केला. आपली कला चार भिंतीत अडकून ठेवण्यापेक्षा उघड्या मैदानावर तिला न्यायचे आणि लोकमत जागवायचे हा त्याने त्याचवेळी निश्चय केला आणि तो जन्मभर त्याने पाळला.
आपला गळा, गाता गळा घेऊनच आणि उरात काव्य साठवून घेऊनच अमर 1945 ला मुंबईत आला. तसा आसरा कुठेच नव्हता पण श्रीपाद अमृत डांगे या नेत्याने हे रत्न अचूक हाती घेतले आणि त्याची घरीच राहण्याची व्यवस्था केली. उषाताईंनी प्रेमाची पाखर त्या भटकत्या जीवावर घातली ती याचवेळी. योग असा की दत्ता गव्हाणकर, अण्णा भाऊ हे साथी नेमके याचवेळी मिळाले आणि अमर शेख, गव्हाणकर, अण्णा भाऊ साठे या त्रिकुटाचे ‘लालबावटा’ पथक जन्माला आले.
अमरचे मन त्या अगोदरच निश्चयाने भारून गेलेले होते. बहुजनांची सेवा याच धर्मासाठी ते मन आतुरले होते. आपल्या गाण्याचा, कलेचा, काव्याचा या सर्वांचा उपयोग बहुजनांसाठीच करायचा असा तो निश्चय होता. त्याची नोंद 1 डिसेंबर 1944लाच अमरने दैनंदिनीत केली होती. ती अशी –
‘सन 1948 किंवा 1949 पर्यंत आपण खूप खपायचे. किसान संघटना करायची अन् एवढी प्रचंड करायची की 1949 साली तरी ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्रात भरवली जाईल. त्या सभेत एक लाख किसान आपण जमवूया हा आजचा निश्चय.’
कॉम्रेड गोदूताई परूळेकर ठाणे जिल्ह्यात वारली समाजात जाग आणत होती. त्यांच्यातला माणूस जागा करत होती. आपण गुलाम नाही, स्वतंत्र आहोत ही गोष्ट मनात भरवत होती. त्यातूनच 7 जानेवारी 1945 ला किसान सभेचे अधिवेशन भरले आणि अमरच्या गीताला, काव्याला, स्वराला भरते आले. अमरने पुढे अमरत्वाला पोहोचलेले जे गीत गायले तेच ‘माझ्या राजा कुणबी हरेराम.’ लोममनाला अभंगाचे वेड असते. वारकरी पंथाने संतांचा अभंग, हा अ-भंग केला होता. जो जनमनापर्यंत पोहचला होता. कीर्तन माध्यमातूनच त्याला उधाण आले होते. हे ओळखूनच त्या अधिवेशनात अमरने आपला अभंग गायला. रूपकात्मक काव्य कसे लिहावे व तेच कंठातून जनसामान्यांपर्यंत कसे पोहचवावे याचा उत्तुंग आदर्श याच दिवशी अमरने या महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रस्थापित केला. दत्ता गव्हाणकर, अण्णा भाऊ साठे यांचे हृदय तर हा अभंग ऐकताना दुथडी भरून वाहत होते. दोघेही अमरच्या जीवनकाव्याने, दर्दभरी स्वराने आणि अभिनयुक्त सादरीकरणाने भारावून गेले. मित्रांची ही स्थिती. उपस्थित जनतेचे काय? ती तर नुसते वेडीच झाली. तो अभंग, ते गीत असे होते,
‘जय जय रामकृष्ण हरी, राम राम राधेकृष्ण हरी
राम राम राधेकृष्ण राधे, शेतकरी भोळेकृष्ण माझे
भोळा राजा कुणबी हरेराम….
काळ्या आईचा सखा पुत्र तू, तूच खरा घनश्याम
ब्रह्मा होऊनि तूच निर्मिले, निर्मियले जग सारे
दरी डोंगरी फोडुनि सगळे, विश्व सजविले न्यारे
गाळुनिया तू घाम, राजा कुणबी हरेराम
विष्णु होऊन तूच पोशिले, पोशियले जग सारे
तू रे माळ ओसाड या इथे, उभी धान्य कोठारे
नामानिराळा राम… राजा कुणबी हरेराम
महादेव तू पार्वती शंकर, रूप कधी तव महाभयंकर
त्रिभुवन जाळुनि, भस्म लावुनि
पुन्हा तू भोळा सांब… राजा कुणबी हरे राम
नाही तुला टिचभर निवारा, तोच ब्रह्म तू का?
नाही तुला कुटकाही खावया, विष्णु उपाशी उभा
नाही तुझ्या हाती मृत्यू, राहिला रे भोळ्या सांबा
घालू लागले नीच दैत्य, या जगामध्ये थैमान
ऊठ रे राजा, कुणबी हरेराम
घे हाती या सार्या जमिनी, घे ब्रह्माचा अवतार
पहिले खा तू विष्णु होऊनि, जगून जगाला तार
उघड नेत्र तो तिसरा भयंकर, लालेलाल अंगार
ऐतखाऊंचे कर निर्दालन, घेई रूद्र अवतार
ऊठ हे सर्वव्यापी भगवान, माझ्या राजा कुणबी हरेराम
गदाचक्र अन् त्रिशुळ हाती, जुनी तुझी अवजारे
शंख डमरूचा आवाज ये ना, ठेव तुर्त ते सारे
पद्मपोथीची गळली पाने, नको सर्प निष्प्राण
घेई आता ही एकजुटीची मशाल, उचल निशाण
माझ्या राजा कुणबी हरेराम…’
कष्टकर्यांच्या जीवनाचे असे रूपकात्मक पण मर्मभेदी चित्रण आजवर कोणत्याही मराठी कवीने केलेले आम्हाला तरी पहायला मिळाले नाही. अमरने हा अभंग ज्या दिवशी गायला त्या दिवसापासूनच त्याची गायकी जनताजनार्दनाला खरीखुरी समर्पित झाली. कष्टकर्यांच्या जीवनाशी त्याची प्रतिभा शेवटपर्यंत रंगून गेली आणि तिने त्या जीवनातील कारूण्य काव्यातून प्रकट केले आणि ते कंठातूल लिलया बाहेरही आले. अमर जन्मभर गात राहिला ती जनगीतेच होती. शब्दाला स्वरांची साथ देऊन त्याने काव्यगायनाचा नवा चमत्कारच केला होता. त्याने जे स्वतःचे कलापथक उभे केले ते कष्टकर्यांसाठी, त्यांच्या भावना बोलक्या करण्यासाठीच, त्यांच्याच वेदना मांडण्यासाठी. आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या पलीकडे जाऊन तो परचिंतन करीत होता. लोकांची कळ कळकळीने मांडत होता. म्हणूनच लोकांचा प्रतिसादही तितकाच मिळत होता.
14 ऑगस्ट 1947 ला सात-आठ साथीदारांसह अमर शेख नभोवाणीवर मुंबई केंद्रावर गेला. स्टेशन डायरेक्टर होते प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर. मर्ढेकरांच्या ऑफिसात अमर शेख गात होते…
‘हिंदी संघराज्याच्या विजयी आत्म्या घेई प्रणाम
खुलवू जीवनबाग, लाऊ जुन्याला आग
नव्या जगापुढती, नवा आळवू राग’
गाणं संपलं. मर्ढेकर पुढे आले आणि त्यांनी अमर शेखांना कडकडून मिठीच मारली. दोघांच्याही डोळ्यातून त्यावेळी गंगायमुनेचे प्रवाह वाहत होते.
1949 चे वर्ष. कलकत्ता शहरात अखिल भारतीय शांती परिषद भरली होती. शेवटच्या दिवशी मुशाहिर्याचा कार्यक्रम होता. हजारो लोक उपस्थित होते, भारतीय कीर्तिचे कवी उपस्थित होते. मधूनच पोवाडा, लावणीही सुरू होती. इतक्यात मंडपालाच आग लागली. एकच गोंधळ माजला. आग कशीबशी विझवली गेली पण लोक मात्र शांत नव्हते. ध्वनिक्षेपकावरून शांततेचे आवाहन केले जात होते पण गोंगाट थांबत नव्हता. तोच अमरने सुर फेकला…
‘आऽऽवो, ऽऽ आऽऽ वोऽऽऽ नया तराना गायेऽऽ’
एकदम जादूची कांडी फिरली. त्या स्वराने, त्या स्वरांच्या दिव्यतेने लोक क्षणात भारून गेले आणि भारावलेही. श्रोत्यांतून ‘गायिए’ असा गलका सुरू झाला. लोक आपण होऊनच गप्प झाले. अमरने म्हटले, ‘पहले शांती से बैठ लो। बादमें गाऊंगा। नही तो नही।’ सगळे बसले. टाचणी पडावी अशी शांतता निर्माण झाली. अमर तेच गीत पुढे गाऊ लागला आणि जनता जनार्दन अक्षरशः डोलू लागला. भावभरी असा आवाज, दर्दभरी स्वर ते प्रथमच ऐकत होते. असा गायक जन्मात कधी ऐकला नव्हता. असे दिव्य स्वर कधीही कानात स्पर्शुन गेले नव्हते. गाणे संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. अमरने भारतीय पातळीवरचा तो विजय संपादला होता.
सचिन तेंडुलकर याचे वडील व आमचे मित्र प्रा. रमेश तेंडुलकर यांनीही म्हटले आहे की, ‘अमर शेखांचा दुर्लभ असा आवाज ऐकून आमची पिढी खरोखरच श्रीमंत झाली. त्यांच्या रूपाने मुक्त झालेला कलावंत कसा असतो याचेच खरे दर्शन घडले’ तर बबन डिसोझा यांनीही आपली भावना व्यक्त करताना म्हटले आहे की,‘शाहीर अमर शेख हे कम्युनिस्ट चळवळीतून पुढे आले असले तरी त्यांची बांधिलकी व्यक्तिगत स्वरूपाची होती. शिवाय ती पददलित, कामगार यांच्याशी होती. पक्ष, पंथ, जात यांच्याशी त्यांनी आपली बांधिलकी मुळीच ठेवलेली नव्हती. अमर शेखांचा आवाज हा अद्वितीय होता. जसा महाराष्ट्रात दुसरा बालगंधर्व झाला नाही, तसाच दुसरा अमर शेखही झालेला नाही किंवा होणेही शक्य नाही.’
लाखो लोकांवर मोहिनी टाकणारा असा अमरचा आवाज होता, असे त्यांचाच जीवलग स्नेही शाहीर दत्ता गव्हाणकरही म्हणत होता. अमर शेख हा बहुजनांचा बालगंधर्व होता. त्याची गायकी, त्याचा स्वर, त्याची शब्दफेक ही त्याचीच स्वतःची होती. त्यात कुणाचेही अनुकरण नव्हते की कुणाचीही बांधिलकी नव्हती. म्हणूनच त्याच्या गायनाचा ठसा स्वतंत्र असल्यामुळे लोकमनावर कायमचा उमटून राहत होता.
पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातल्या कोयनाड या गावी अमरच्या कलापथकाला निमंत्रित केले होते. 1948-49चा हा काळ होता. एका उत्सवात भजनी मंडळही बोलावले होते. रात्रभर त्याच भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार होता. फक्त दोनच तास या कला पथकासाठी राखून ठेवले होते. रात्रीचे दहा वाजले. भजनकर्यांनी म्हटले, ‘‘दोन तासात कलापथक कार्यक्रम संपवणार आहे तर त्यांना प्रथम संधी देऊया! बारानंतर आमचे मंडळ गायला बसेल.’’
अमर शेखांचा स्वर निनादला आणि त्याने लोकमनाचा जो कब्जा घेतला तो इतका की, कलापथकाचाच कार्यक्रम त्या रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहिला. आश्चर्य हे की ते भजनी मंडळही त्यात रंगून गेले व त्या मंडळाचाच मुळी आपल्या नियोजित कार्यक्रमाचा विसर पडला. ही हकीकत ‘कृषीवल’मध्ये प्रभाकर पाटील यांनी आपल्या अग्रलेखात नमूद करून ठेवली होती.
अमर शेखला जीवनाची विलक्षण अशी ओढ होती. जीवनात क्लेश, संकटे, संघर्ष सर्वकाही असूनही जीवनात सौंदर्यही आहे हे तो कधीही विसरला नव्हता. माणसाचे जीवन हे जगण्यासाठी आहे याचे त्याला चांगले भान होते. अशा या माणसाला जी शक्ती इतर प्राणीमात्रांपेक्षा लाभली आहे ती आहे वाणीची शक्ती. या वाणीतून निघणारा शब्द हे जीवन व्यवहाराचे साधन आहे. ते आहे म्हणूनच माणसाचे जिवंतपणही आहे. अशा या जीवनात जो माणसानेच माणसासाठी निर्माण केला आहे तो शब्दही तितकाच महत्त्वाचा आहे. किंबहुना शब्द आहे म्हणूनच माणूस आहे, त्याचे जीवन आहे, ते प्रवाही आहे, गतिमान आहे. म्हणून या शब्दाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. म्हणूनच अमर शेख सवाल करतो,
‘जीवना वगळुनि शब्द कोणता सांगा?’ माणसाच्या जीवनात जे चैतन्य खेळते ते या शब्दांमुळेच. म्हणूनच त्या शब्दावर त्याची भक्तीही अतूट आहे. कारण शब्द हे जीवनाचे अंगभूत असे मर्मग्राही साधन आहे. म्हणूनच आपण कवी आहोत याचे भान त्याने मनात कायमचे ठेवले होते. त्या शब्दाची म्हणूनच त्याने आळवणीही केली होती आणि म्हटलेही होते…
‘सत्य जगा सांगायला, शब्दा चल ये गायाला’ शब्दातूनच झरणारे वा ओसंडून बाहेर पडणारे गीतच माणसाला जगवायला, फुलवायला, उमेद द्यायला बाहेर येते. तो स्वतः गायक असल्यामुळेच शब्दमाध्यमातून तो जीवनसत्य सांगण्यासाठी आवाहन करत होता. किंबहुना परिस्थितीला तो जे आव्हान देत होता तेही शब्दातूनच. याच शब्दातून तो आत्मविश्वासाने जीवनाचे तत्त्वज्ञानही ऐकवत होता. जनसामान्यांपर्यंत तो ते पोहचवत होता तेही शब्दातूनच. त्याने सांगितले आहे….
‘जीवनावरी माझी श्रद्धा, सत्यावरती असीम भक्ती’ प्रत्येक शब्दाला स्वतःचा नाद असतो, त्याची स्वतःची लय असते आणि हीच लय लयकारी ठरते. माणसाला चुंबकासारखी ओढून घेते आणि भावभावनांचे नतृनही घडवते. शब्द मृदू असतात तर ते प्रसंगी कठोरही बनतात. परिस्थितीवर त्यांची ताकत प्रत्ययकारी ठरत असते. अमर शेखांचा गळा हा गाता होता म्हणूनच त्याला शब्दही नादवाहक वाटतात. लयकारी वाटतात. तो त्यांना आवाहन करताना म्हणतो, त्यांची आळवणी करतो…
‘नादवाहकांनो! या रे, या ना नटवुनि न्यारे
कामगार अन् शेतकरी, तसे तुम्ही जीवनांतरी
शब्द स्वरांना या माझ्या, जीवनात आहे दर्जा’
अमर शेख यांचे वैशिष्ट्य हे होते की तो जगून सांगत होता, तो गाऊन जनजीवनाचा राग आळवित होता. कष्टकर्यात, श्रमिकांत, कामगारांत, शेतकर्यांत तो आपले जीवन समर्पित करत होता. म्हणूनच आपल्या जीवनात शब्दांना विशेष महत्त्व आहे हे पटवत होता. गाण्याचे, सांगण्याचे, कळवळ्याचे, भाव दर्शनाचे, आवाहनाचे, पेटवण्याचे, उठवण्याचे, चेतवण्याचे त्याचे माध्यम होते ते शब्दच! या शब्दांनाच त्याने संगीताची साथ दिली होती. म्हणून तेच त्याचे कायमचे जीवनसाथी बनले होते.
अमर शेख उत्तम कवी तर होताच पण लोक मनाला जाग आणणारा चांगला शाहीरही होता. शाहीर प्रेतांनाही उठवतो, उभे करतो आणि लढायला, संघर्षासाठी प्रवृत्त करतो. त्यासाठी तो उघड्यावर येतो, मैदानात येतो, चार भिंती सोडतो आणि मुक्तपणाने गाऊन सांगतो. अमर शेखांनी जन्मभर हे एकच व्रत केले म्हणून ज्या ज्या वेळी मायभूमी संकटात सापडली, माणसाने माणसाचा घास घेतला, कुटील नीतिने माणसाचे जीवन बर्बाद केले, धनिक बनून ज्यावेळी दुबळ्यांचे शोषण केले वा रक्त प्याले त्या त्या वेळी हा कवी उघड्यावर आला, मैदानात आला आणि त्याने लोकमनाला साद घातली, जाग आणली आणि लढण्यास हाक दिली. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, चीनचे आक्रमण या सर्वांमाग जी हीन प्रवृत्ती होती आणि गुलामी करण्याची जी विकृती होती तिला ठोकरीने उडवून लावण्यासाठी माणसाला हाक देऊन त्याची संघशक्ती निर्माण केली, प्रत्येक मनाला जाग आणली आणि युद्धभूमिवर प्रत्येक गुलामाला येणे भाग पडले ते एवढ्यासाठी, माणूस मुक्त व्हावा व त्याचे जीवन सुखदायी व्हावे. आनंदाने, समाधानाने त्याला जगायला मिळावे हे कृत्य करणारा महाराष्ट्रातला हा एकमेव कवी होता आणि काव्य गाणारा, भावना ओथंबून जीवन सुखी करण्यास आतुरला होता. इतर कवी चार भिंतीत दडून लोकांना सांगण्याचा आव आणत होते. त्यात त्यांची देशभक्ती होती तशी देवभक्तीही होती. अमर शेखांची भक्ती होती माणसावरती. तो देव पाहत होता तोही माणसात. मानवता हाच त्याचा एकमेव धर्म होता व त्यासाठीच त्याचे जगणे आणि मरणेही होते.
क्रांतीची, परिवर्तनाची त्याला विलक्षण अशी भूक होती. माणसाची विकृती गेली पाहिजे आणि संस्कृती टिकली पाहिजे ही जीवनातली ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून विकृतीला तो आग लावायला सदैव तयार होता आणि लोकांनाच सांगत होता…
‘परिस्थितीचे दही घुसळा रे, कृतार्थ व्हा, साधा मोका
आता सत्यासत्या लावुनिया आग, विचाराला जाग येऊ दे रे’
अमर शेखाचे संस्कृतीवर, भारतीय संस्कृतीवर, महाराष्ट्र संस्कृतीवर प्रेम होते पण ती छीन्नभिन्न होत आहे हे दिसताच तो पेटून उठत होता आणि सांगतही होता…
‘विकास मम संस्कृतीचा व्हावा, मानव्याचा वेलू चढावा
फुले फळे ती यावी गोड, हीच अंतरी लागे ओढ’
सारे जीवन याच ओढीने तो जगत होता पण अशा या सुंदर संस्कृतीला कुरूप करणारे हात पुढे सरसावताच तो त्याची जाणीव देऊन ही विकृती नष्ट करण्यास सजग राहिला होता. तो म्हणत होता,
‘होय, तोच आहे मी अंगार, आग ओकणे मजला प्यार
बाग आगीची फुलवावी, सर्व चांगले ठेवावे, सगळे वाईट जाळावे’
यासाठीच उद्याच्या भविष्यकालीन सुखदायी जीवन जगण्यासाठीच…
‘जीवन अमृत ओतून, नव कमळांची फुलवू बाग
कळ्याकळ्यावर गाऊ राग, अमरत्वाचे गाऊ गीत
तिन्ही काळ संचार करू, अवघे जीवन साकारू
जुन्या सुंदरा प्रत जाऊ, त्याचेही गाणे गाऊ’
विध्वंसतेपेक्षा विधायकता महत्त्वाची. जे जाळायला हवे तेच जाळायचे पण संस्कृतीत जे चांगले ते मात्र ठेवायचे. जीवनाचा हा समतोल साधला जावा ही तर अमरची खरी भूक होती. आमच्या मराठी कवितेत अशी भावना, असा विचार क्वचितच कुठे आला असावा असे वाटते. अमरचे वेगळेपण त्याच्या जीवनाच्या ओढीत होते. संस्कृती प्रेमात होते आणि सौंदर्यसंपन्न अशा उद्याच्या आकारात होते.
अमर शेखला स्वराची, स्वरभक्तीची, जीवनाच्या आसक्तीची, माणुसकीची जशी ओढ होती तशीच त्याच्या जवळ आणखी एक शक्ती होती ती अभिनयाची. शब्दातून अभिनय साकारणारा असा हा श्रेष्ठ प्रतिचा कलावंत होता. त्याच्या शब्दोच्चारात अभिनयाची विशेष ताकत होती. मानवी भावनांचे इंद्रधनुष्य त्याच्या अभिनयातून मराठी जनतेने सतत 25 ते 30 वर्षे तरी अनुभवले होते. म्हणून तो गात असताना रडतही होता. रडू येई ते आतून. त्याचे अश्रू बोलके होत होते. त्या अश्रुतून खराखुरा अभिनय साकारला जात होता. ‘ही आग भुकेची जळते आमुच्या पोटी’ म्हणून गरिबांची भावना तो व्यक्त करत होता. त्यावेळी जो अभिनय प्रकट होत होता त्याने लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत होते. दुसर्याच्या डोळ्यात अश्रू उभे करणे ही सामान्य गोष्ट नाही. हृदयाला भावना भिडल्याखेरीज अश्रू बाहेर येत नसतात. अमर अभिनयुक्त गाताना लोकांच्या हृदयावरच हात घालीत होता आणि ते हृदय गदगदून टाकत होता. अंगार व्यक्त करणारे शब्द जेव्हा त्याच्या ओठातून बाहेर येत होते त्यावेळी त्याच्या डोळ्यात अक्षरशः अंगार फुलत होता आणि तो अंगार हा अभिनययुक्त होता. तोच जनमाणसाला भिडत होता त्यामुळे लोक चेतून, पेटून उठत होते. चीनने आक्रमण केले त्यावेळी त्याने अभिनययुक्त असे गीत गायले होते. ते शब्द होते…
‘बर्फ पेटला हिमालयावर, विझवायाला चला चला
फक्त रक्त द्या, वृद्ध तरूण या, द्या रे साद हाकेला’
हे सांगताना देशभक्तीचा लाव्हारस त्याच्या पोटात उकळत होता आणि तोच आगीचे रूप घेऊन डोळ्यातून बाहेर पडत होता. अभिनय म्हणजे काय याचा तो मुर्तिमंत साक्षात्कार होता. बर्फ थंडगार असतो पण देशभक्तीने पेटलेल्या अमर शेखाला झालेले आक्रमण हे भयंकर दोषास्पद वाटते. म्हणून त्याने ‘बर्फ पेटला’ ही प्रतिमा लोकांपुढे उभी केली आणि त्यामुळे लोकही पेटून उठले.
‘स्वातंत्र्याच्या भाजी भाकरीत सापडती रे अजून खडे
वेचुनि काढा मत्त पोर्तुगिज मुळासकट अन् चला पुढे’
गोवा मुक्ती संग्रामात आघाडीवर राहिलेला हा शाहीर जुलमी सत्तेविरूद्ध हाक देत होता. लोक संघटित करीत होता. सत्याग्रहासाठी लोक जमवत होता. त्यासाठी तो गात होता पण त्याबरोबर त्याचा जो प्रत्यक्षात अभिनय प्रत्ययाला येत होता त्यानेच लोक बेभान होत होते आणि गुलामीविरूद्ध कंबर कसून सत्याग्रहात सहभागी होत होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही हा शाहीर, महाकवी ‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागती आहे’ हे तारस्वरात सांगताना जो अभिनययुक्त आवेश दाखवत होता त्याने जनता भारावून जात होती. म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीची ताकत वाढली होती. गाण्याला, शब्दांना अभिनयाची अशी काही जोड दिली जात होती आणि पहाडी स्वरात जनसमुदायाला जी चेतना दिली जात होती त्यावेळचा अभिनय लोकांचे लक्ष वेधून घेत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिल्लीला जाग आणण्यासाठी छाती फोडून हा कलावंत साभिनय गात होता. त्याचे ते विलोभनीय दर्शन दिल्लीकरांनीही थक्क करत होते कारण तो एक संगिताभिनयाचा एक चमत्कारच होता. अमर शेख जेव्हा ‘मऊ मऊ कापूस’ हे शब्द गात उच्चारित असे त्यावेळी शब्दातून प्रकटणारा त्याचा अभिनय पाहून जनता अक्षरश: हवालदिल होत होती. त्याच्या गाण्यात, काव्यात जशी ताकत होती तशी ती अभिनयातही होती. म्हणूनच प्रत्येक गीत, प्रत्येक कविता ही विलोभनीयच वाटत होती.
चित्रपटसृष्टीत एखादे वर्ष त्याने घालवले होते पण त्या मायावी जगात हा अभिनयसम्राट रमला नाही. त्याचे जगणे आणि जीवनध्येय हे लोकांसाठी होते, ते लोकसेवेचे होते तरीही जीवलग मित्र आचार्य अत्रे यांच्यासाठी त्याने चित्रपटात शाहिराची भूमिका साकारली. हा चित्रपट होता ‘महात्मा फुले’. त्यातील पोवाडा गाणारा शाहीर लोकांनी नुसता पाहिला नाही तर तो अभिनयाने भारलेला पाहिला. नेमका याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता.
अमर शेखांना अभिनयाचे राष्ट्रीय पदक मिळाले. ते त्यांचे ‘प्रपंच’ या चित्रपटातील कुंभाराच्या भूमिकेला. त्याने जे अभिनयाचे उत्तुंग असे दर्शन घडवले त्याने लोक अक्षरश: थक्क झाले. निवड समितीने अभिनयाचे पहिले राष्ट्रीय पदक अमरलाच जाहीर केला. तो जिवंत अभिनय ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना त्यांना कसदार अभिनयाचा एक चमत्कृतीपूर्ण असा ‘सामना’च अनुभवास मिळाला.
अमर शेखांचे स्वत:चे कलापथक होते. यातून वगनाट्ये सादर केली जात होती. त्यात प्रत्यक्ष अमर शेखही भूमिका करत असत. ‘जाऊ तिथे खाऊ’ हे वि. वा. बुवा लिखित मुक्तनाट्य महाराष्ट्रभर अमर शेखांनी गाजवले होते. द. का. हसबनीस यांनी ‘वा रे न्याय’ या लोकनाट्याचे लेखन केले होते.
या लोकनाट्याचे साभिनय वाचन अमरने त्यांच्या घरी केले. त्या दिवशी त्याचा जो अभिनय प्रकटला तसा क्वचितच कुणी पाहिला असेल. वाचन अभिनययुक्त करण्याचा जणू मानदंडच त्याने त्यादिवशी प्रत्ययाला आणून दिला होता.
गाणे, जगणे आणि अभिनयाचा साक्षात्कार घडवणे यातच अमरच्या व्यक्तित्वाचे खरे मोठेपण होते. ते त्याने जवळजवळ तीस वर्ष महाराष्ट्र कलेला अर्पण केलेले होते. असा शाहीर, असा कवी, असा अभिनयपटू पुन्हा लोकांना कधीच दिसले नाही हे एक ढळढळीत सत्य आहे.
– डॉ. माधव पोतदार, पुणे
020- 24375454
९८२३५१६२०४
साहित्य चपराक, मे २०१६